Thursday, 26 April 2018

गोंदिया, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक ; 31 मे रोजी मतमोजणी ; पलूस-कडेगाव मतदारसंघात विधानसभेसाठी पोटनिवडणूक

गोंदिया, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक 





गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे, तर ३१ मे रोजी निकाल जाहीर होईल. त्यासोबतच, पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही २८ मे रोजीच होणार आहे. पालघरमधील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोट निवडणुकीसंबंधी अधिसूचना ३ मे रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मे रोजी आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख १४ मे रोजी असून निवडणूक निकाल ३१ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपी एटी अर्थात स्थापीत कागद रेकॉड पद्धती वापरली जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची ही पहिली कसोटी असणार आहे. पालघर आणि गोंदिया या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत विजय मिळवणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. 


सांगलीमधील पलूस विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेची जागाही रिक्त झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठीही 28 मे रोजी मतदान होणार आहे.कॉंग्रेसच्यावतीने प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम ही निवडणूक लढविणार आहेत. येत्या दोन दिवसात पक्षाकडून विश्‍वजीत कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.  या निवडणुकीच्या माध्यमातून विश्‍वजीत कदम पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत विश्‍वजीत कदम यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यावेळी ते सांगली लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनाने विश्‍वजीत यांना वडिलांच्या रिक्त जागेवर म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे.


वनगांच्या घरात उमेदवारी दिल्यास शिवसेना लढवणार नाही


दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी 2014 च्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली होती. वनगा यांचा कार्यकाळ संपायला 15 महिन्यांचा कालावधी उरला असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले. वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसने या पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपने वनगांच्या घरात उमेदवारी दिल्यास शिवसेना निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेची भूमिकेवर भाजप या पोटनिवडणुकीचा उमेदवार कोण देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

=================================

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पुन्हा नाना पाटोले?


मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश अद्याप केला नाही. गेल्या लोकसभा निवडणूकीत कोंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी मुळे राष्ट्रवादीला जागा देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रफ्फुल पटेल यांनी निवडणूक लढवली होती. आघाडी केली तर या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असेल यामुळेच नाना पटोले यांनी कॉंग्रेसमधील प्रवेश करणे तूर्तास टाळले असावे. गेल्या लोकसभा निवडणूकीत २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पोट निवडणुकीसाठी देखील इच्छुक उमेदवाराबाबत खलबते सुरु झाली आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत पक्षविरोधी भूमिका घेणारे भंडारा- गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तिथेही त्यांचे पक्षनेत्यांशी मतभेद होते. विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही त्यांना तात्काळ प्रवेश दिला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांच्या पदरी निराशा पडली. यात भर म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व पक्षात पटोलेंचे वजन कमी होत गेले. ही खदखद त्यांच्या मनात होती आणि यामुळेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस प्रवेशानंतरही पटोलेंपुढे अनेक आव्हाने


खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांच्यासमोर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांचे आव्हाने  उभे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस-भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास करणारे पटोले यांचे पक्षश्रेष्ठींनी स्वागत केले असले तरी स्थानिक नेत्यांना ते फारसे पचनी पडले नाही. पेटोल यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संपर्कात राहून पक्षात प्रवेश केला. परंतु भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना कितीपत साथ देतात. यावर त्यांची पुढची वाटचाल सुकर होणार आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा थेट संबंध तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी होता. परंतु भंडारा जिल्ह्य़ातील साकोली विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून मतभेद झाले होते. जिल्ह्य़ात शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून तगडे ‘नेटवर्क’ असलेले काँग्रेस नेते व माजी आमदार सेवक वाघाये यांना साकोलीची उमेदवारी निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पटोले यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला होता. जिल्हा राजकारणात वाघाये हे पटोले यांना ‘सिनिअर’ आहेत. ते दोनदा पराभूत झाले आहेत. परंतु त्यांनी काँग्रेस सोडली नाही. पटोले यांचा प्रवास काँग्रेस, भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा आहे. तेव्हा पक्ष त्यांना जिल्ह्य़ात किती पाठबळ देईल यावरच त्यांचे स्थानिक राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.माजी आमदार सेवक वाघाये यांची साकोली मतदार संघावर दावेदारी आहे तर पटोले यांचाही कल विधानसभा निवडणूक लढण्याकडे आहे. जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास हे दोघेही एकाच समाजाचे (ओबीसी)आहेत. या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ एकच असल्याने पेटोले यांना स्वपक्षीय नेत्यांची जिल्ह्य़ातील आव्हाने पेलावी लागणार आहे. पटोले आणि वाघाये यांच्यात जिल्ह्य़ातील वर्चस्वावरून याआधीही संघर्ष झाला आहे. जिल्ह्य़ात आणखी एक प्रस्थापित नेते आहेत. माजी मंत्री बंडू सावरबांधे. त्यांचीही जिल्ह्य़ावर चांगली पकड आहे. त्यांचा मतदार संघ आरक्षित झाला आहे.भंडारा जिल्ह्य़ांचा विचार करता पक्ष प्रस्थापित नेत्यांना प्राधान्य देतात की, नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना महत्व देतात. यावर सारेकाही अवलंबून आहे. हे दोन्ही नेते जिल्हा परिषदेच्या जागावाटपासून तर पक्षीय राजकारणात वजन ठेवून आहेत. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदार संघाचा विचार करता वरिष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल हे पक्षाचे दुसरे नेते आहेत. त्यांना जिल्ह्य़ातील राजकारणात कुणाचा हस्तक्षेप नको आहे.विदर्भात मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, नरेश पुगलिया आदी नेते पेटोले यांना पटोलेंच्या पक्ष प्रवेशाने आनंद झाल्याचे दिसत नाहीत. पक्षात वरचे स्थान मिळाले नसल्यास पटोले यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला मर्यादा येतील. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची दिसत आहे. अशावेळी जागा वाटपात पटोले यांना पक्षाने महत्व न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते पटोले यांना सहकार्य करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय प्रफुल पटेल सारखे स्थान पटोले यांना काँग्रेस देण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे स्थानिक राजकारणात पटोले यांच्यासमोर भविष्यात अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.दरम्यान पटोले यांच्यासाठी साकोलीची जागा मोकळी करण्यासाठी सेवक वाघाये यांना लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास सांगण्यात येत आहेत. परंतु वाघाये यासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यांना आपला मतदार संघ सोडायचे नाही. मात्र पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यास ते निवडणूक लढतील. पण पटोले यांना मतदारसंघात संघर्षांची स्थिती कायम राहणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) pune

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.