Wednesday, 23 May 2018

राष्ट्रवादीचे युवक माजी अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे भाजपच्या वाटेवर! आमदारकीचा राजीनामा; उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार

राष्ट्रवादीचे युवक माजी अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांचा आमदारकीचा राजीनामा ; राष्ट्रवादीला सोडचिट्ठी 

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार 



कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे पक्षातंर्गत गटबाजीला कंटाळून पक्षत्याग करण्याच्या तयारीत असून ते भाजपात प्रवेश करणार आहेत. निरंजन डावखरे यांनी ऑगस्ट 2015 ते एप्रिल 2017 या कालखंडात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे.निरंजन डावखरे हे  कोकण पदवीधर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार आहेत.

डावखरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने भाजपच्या ठाणे आणि कोकणमधल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजप चे माजी आमदार आणि सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार विनय नातू, आमदार संजय केळकर, संदीप लेले, रत्नागिरी अध्यक्ष माजी आंनदार बाळ माने, निलेश चव्हाण हे नाराज असल्याची माहिती आहे.
 राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे पक्षातंर्गत कोंडीला वैतागून भाजपात जाणार आहे.  निरंजन डावखरे हे वसंत डावखुरे यांचे राजकीय वारसदार आहेत. वसंत डावखरे हे शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जात असे. सोबतच डावखरे यांचे सर्वपक्षीयांसोबतच शिवसेनेशी उत्तम संबंध होते. जानेवारी 2018 मध्ये वसंत डावखरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे निरंजन डावखरे राजकारणात सध्या एकाकी पडले आहेत. जुलै 2012 मध्ये ते कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, आता राष्ट्रवादीकडून त्यांना संधी दिली जाईल का याबाबत सांशकता व्यक्त केली आहे. ठाण्यात आता जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांचे वर्चस्व आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून या दुकलीने डावखरेंऐवजी नवा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे डावखरे यांनी आपले राजकीय अस्तित्त्व टिकविण्यासाठी भाजप-शिवसेनेशी जवळिक साधण्याचा प्रयत्न केला. यातूनच ते भाजपच्या गळाला लागले आहेत. भाजप त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून संधी देऊ शकते. 2012 साली भाजपकडून पदवीधर संघातून लढलेले संजय केळकर 2014 साली विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे भाजपने डावखरेंना तेथे संधी देण्याचे कबूल केले आहे. सोबतच भाजपला ठाणे पटट्यात शिवसेना व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी डावखरेंसारखा तरूण नेत्यांची गरज आहेच. त्यामुळे डावखरेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का असल्याचे सांगितले जाते. 2012 साली कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून 5604 मतांनी विजय मिळवला होता. त्याआधी कोकण पदवीधर मतदारसंघ सुमारे 20 वर्षापासून भाजपच्या ताब्यात होता. डावखरे यांची एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची तेवढी क्षमता नाही. त्यामुळे जुलै 2018 मध्ये होणा-या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाऊन पुन्हा आमदार होण्याचा डावखरेंचा प्रयत्न आहे.विधानपरिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांची मुदत पुढच्या महिन्यात संपत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका पुढच्या महिन्यात  होणार आहेत. या पार्श्वभूमीवर डावखरे यांना भाजपात प्रवेश देवून भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. डावखरे उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला आहे. भाजपकडून डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातून उमेदवारी देण्यात येणार आहे.


निरंजन डावखरे यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी 


निरंजन डावखरे यांच्यावर विश्वास टाकून आमदारकी तसेच विदयार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी आजपर्यंत अनेक उपलब्ध जागा आणि संधी देऊनही त्यांनी केवळ संधीसाधूपणामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. निरंजन डावखरे यांचा संधीसाधूपणाचा इतिहास बघता ते जिथे कुठे जाणार असतील त्या पक्षाला त्यांच्या या संधीसाधूपणाचा फटका केव्हातरी बसेल असा इशाराही शिवाजीराव गर्जे यांनी दिला.


राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर!

आमदार निरंजन डावखरे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.निरंजन डावखरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मात्र यावेळी निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील आले होते.त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. मित्राला साथ देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली.नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत. निरंजन डावखरेंप्रमाणेच नरेंद्र पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत.नरेंद्र पाटील यांची विधानपरिषदेतील मुदत जुलै 2018 मध्ये संपत आहे.

कोण आहेत नरेंद्र पाटील?
माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचीत
नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.
नरेंद्र पाटील हे विधानसभा सदस्यांनी निवडून दिलेले आमदार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात आहेत.

निरंजन डावखरे अखेर भाजपमध्ये


विधान परिषदेच्या आमदारकीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणारे निरंजन डावखरे यांनी आज अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्याचे पक्षात स्वागत केले. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून कालच डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. ती अखेर खरी ठरली. निरंजन यांनी आज लगेचच भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. विकासाला साथ देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 'शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, मोदीच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.