Tuesday, 29 May 2018

ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व ; विराट आकर्षणामुळे विठ्ठल सरपंच!

ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व 

जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायती व २५८ ग्रामपंचायतींमधील ४५६ रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. थेट जनतेतून सरंपच निवडीसाठी ही तिसरी निवडणूक होत असून, यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात बाजी मारली. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ९० पैकी सर्वाधिक ६० ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले. बारामती आणि आंबेगाव तालुक्‍यातील निवडणूक झालेल्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. या दोन्ही तालुक्‍यात काँग्रेस, भाजप, शिवसेनेला एकही ग्रामपंचायत मिळू शकलेली नाही.  जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी (ता. २८) मतमोजणी झाली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला शिरूर तालुक्‍यातील चार, मावळ तालुक्‍यातील चार, खेडमधील दोन अशा दहा ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपने दौंड तालुक्‍यातील दहापैकी सात ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापित केले आहे. काँग्रेसला पुरंदर तालुक्‍यातील पाच, इंदापूर तालुक्‍यातील दोन अशा सात ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. शिवसेनेला पुरंदर तालुक्‍यातील तीन, जुन्नर तालुक्‍यातील एक अशा चार ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. अन्य दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे.
निवडणूक झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती- बारामती- १५, शिरूर व भोर-  प्रत्येकी ६, पुरंदर व खेड- प्रत्येकी १३, दौंड व आंबेगाव-  प्रत्येकी १०, मावळ- ७, इंदापूर- ५, जुन्नर- ३, वेल्हे व मुळशी- प्रत्येकी १.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


================================

वाल्हे व सुकलवाडीवर राष्ट्रवादी तर वागदरवाडी व आडाचीवाडी या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता 

राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी होऊनही राष्ट्रवादीला वर्चस्व राखण्यात अपयश

वाल्हे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन चार ग्रामपंचायती निर्माण झाल्याने त्या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली होती. वाल्हे गावातील मतदान केंद्रावरील दोन गटात काहीकाळ झालेला तणावाचा प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. नव्याने स्थापन झालेल्या सुकलवाडी गावावर राष्ट्रवादी; तर वागदरवाडी व आडाचीवाडी या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आली. वाल्हे येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सरपंचपदासह तब्बल सात जागा जिंकून शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या सरपंचपदाचे उमेदवार माजी सभापती गिरीश पवार यांचा राष्ट्रवादीचे अमोल खवले यांनी पराभव केला. शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले. डॉ. दुर्गाडे यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी केलेल्या आघाडीमुळे राष्ट्रवादीला वाल्ह्यात सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. खवले यांनी गिरीश पवार यांचा 823 एवढ्या उच्चांकी मतांनी दारुण पराभव केला.
श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : चंद्रशेखर दुर्गाडे, सुरेखा तानाजी भुजबळ, दीपाली शांताराम भोसले, अंजली दीपक कुमठेकर, चित्रा साधू जाधव, सूर्यकांत ज्ञानेश्वर भुजबळ
श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सुनीता मोहन ढोबळे, प्रकाश विठ्ठल पवार, इक्‍बाल सुलेमान आतार, हनुमंत पवार. अपक्ष: वैशाली दादासाहेब पवार. 

================================
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या ३७ सदस्य जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात होते.
दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी ८२.५१ टक्के मतदान झाले होते. वाखारी, पारगाव, नायगाव, पांढरेवाडी, कुरकुंभ, खोपोडी, वाटलूज, वडगावबांडे, पानवली, केडगाव या दहा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी निवडणूक झाली. खोपोडी ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी बिनविरोध निवडणूक झाल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक झाली नाही. 
राहुल कुल समर्थकांची राष्ट्रवादीवर मात!
ग्रामपंचायतीची निवडणूक पुणे जिल्हा परिषेदच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके व दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड यांनी प्रतिष्ठेची करूनही यश न मिळाल्याने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी वर्चस्व कायम राखले आहे. दौंड तालुक्यातील 32 गावांचा नाका म्हणून केडगाव ओळखले जाते. शेळके यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या वाखारी गावापेक्षा शेजारीच असणा-या केडगावच्या निवडणुकीला जास्त महत्व दिले. वाखारी गावच्या निवडणुकीत शेळके यांना सत्ता मिळविता आली नाही. राणी शेळके यांच्या जिल्हा परिषद गटात वाखारी, केडगाव, पारगाव, खोपोडी या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. यातील एकाही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळविता आलेले नाही. शेळके यांची जिल्हा परिषदेची ही दुसरी टर्म चालू आहे.  मात्र त्यांना स्वतःच्या गावावर सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न यंदाही अधुरे राहिले आहे.
भोर तालुक्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन निवडणुक ३ ग्रामपंचायतीसाठी आज सरासरी ८५ टक्के मतदान झाले होते. भोर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन करंजे व अशिंपी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. तर ३ पैकी २ ग्रामपंचायतींच्या सदस्य बिनविरोध झाले असुन एका नाटंबी ग्रामपंचायतीचे सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यांची निवडणुक झाली. यात एकुण ८५ टक्के मतदान झाले होते..सर्वाधीक मतदान वारंवड ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये ९४ टक्के मतदान झाले. तालुक्यातील रायरी व करंजे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन करंजे व अशिंपी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहेत. तर अशिंपीचे ७ पैकी २ जागा भरल्या असुन ५ ग्रामपंचायत सदस्यपदे रिक्त राहिले आहेत. तर नाटंबी ग्रामपंचायतीत सरपंचप महिलेसाठी राखीव असुन दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर ग्रामपंचायत सदस्याच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. वरवंडला ५ सदस्य बिनविरोध झाले आहेत.
शिरूर तालुक्यातील अण्णापूर, शिरुर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी व वाजेवाडी या पाच ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. 
वाजेवाडी गावात राष्ट्रवादीचा पराभव
वाजेवाडी (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत पद्मावती परिवर्तन पॅनलने परिवर्तन करीत गेल्या वीस वर्षांपासून एकहाती सत्तेत असलेल्या माजी सरपंच धर्मराज वाजे यांच्या पद्मावती ग्रामविकास पॅनलचा धुव्वा केला. यात धर्मराज वाजे यांचा 16 मतांनी पराभव करीत सरपंचपदासाठी मोहन वाजे विजयी झाले. वाजेवाडी हे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दत्तक घेतले असल्याने या निवडणुकीवर पालकमंत्री गिरीश बापट व आमदार बाबुराव पाचर्णे हेही विशेष लक्ष ठेवून होते. वाजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह एकुण दहा जागांसाठी काल (दि.27) झालेल्या निवडणूकीत पद्मावती परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांनी मिळविलेले मतदान पुढील प्रमाणे. मोहन शिवाजी वाजे (सरपंचपदासाठी मिळविलेले मतदान 632), इतर सदस्य : गोपीचंद काळूराम भोंडवे (230), भारती शंकर लोहोट (260), अनिता सतिश शिंदे (248), अमित तानाजी सोनवणे (233), देविदास बबुशा भोर (254), अस्मिता जगदीश तिखे (283). पद्मावती ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार : आण्णा बबन शिंदे (241), माधुरी नानासाहेब वाजे (217), शारदा राजेंद्र मांजरे (216). वाजेवाडी ग्रामपंचायतीवर गेल्या वीस वर्षांपासून माजी सरपंच व राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक धर्मराज वाजे यांची एकहाती सत्ता होती. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिका-यांसह भाजपा, शिवसेना व इतर सर्वच विचारांचे पदाधिकारी एकत्र आले होते. यात सरपंचपदासाठीच्या निवडणूकीत धर्मराज वाजे यांचा 16 मतांनी पराभव झाला.
पुरंदर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. या ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी ४२ सरपंचपदाचे उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या २२४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रथमच थेट जनतेतून उमेदवार निवडण्यात येणार असल्याने मतदानात खूप उत्साह जाणवत होता. तेवढीच चुरस ही निर्माण झाली होती. तालुक्यातील वाल्हे, वीर, एखतपुर,- मुंजवडी, वनपूरी, उदाचीवाडी, राजुरी, माळशिरस, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, कोथळे, भोसलेवाडी, रानमळा, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते.  वाल्हे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन चार ग्रामपंचायती निर्माण झाल्याने त्या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली होती. वाल्हे गावातील मतदान केंद्रावरील दोन गटात काहीकाळ झालेला तणावाचा प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.पुरंदर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तेच्या तुलनेत अपेक्षित कामगिरी शिवसेनेला करता आली नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचे राजकारण करीत पाच- पाच ग्रामपंचायतीत विजय मिळवला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला 13 पैकी 10 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला तीन ठिकाणी यश मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेसने माळशिरस, राजुरी, कोथळे, वीर, रानमळा ह्या ग्रामपंचायती; राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाल्हे, वनपुरी, भोसलेवाडी, सुकलवाडी, उदाचीवाडी आदी ग्रामपंचायती; तर शिवसेनेने एखतपूर- मुंजवडी, आडाचीवाडी, वागदरवाडी, भोसलेवाडी या ग्रामपंचायतीत यश मिळाल्याले आहे.
बारामती तालुक्यात रविवारी पार पडलेल्या एकूण १५ ग्रामपंचायतींसाठी ८७.९ टक्के मतदान झाले. यामध्ये १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत लढत होत झाली., तर चांदगुडेवाडीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आणि भाजपा पुरस्कृत पॅनलमध्ये लढत झाली. तालुक्याजवळील कोहाळे खुर्द, सुपे, वंजारवाडी, करंजे, मगरवाडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, दंडवाडी, जराडवाडी, कारखैलेवाडी, कुतवळवाडी, पानसरेवाडी, साबळेवाडी, शिर्सुफळ, उंडवडी क.प. या गावांची सार्वत्रिक निवडणूक या टप्प्यात होती. त्यापैकी मगरवाडी आणि भोंडवेवाडी ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली, तर वडगाव निंबाळकर, गोजुबावी, सांगवी, वाकी, मेडद, मोरगाव या गावांची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी वडगाव निंबाळकर आणि मेडद गाव वगळता उर्वरित चार गावांची पोटनिवडणूक बिनविरोध पार पडली. वडगाव निंबाळकरमध्ये एका जागेसाठी ६८ टक्के मतदान झाले होते. 
इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत ८०.३९ टक्के मतदान झाले. दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी साठी ८९.०७ टक्के मतदान झाले. बावडा, वकीलवस्ती, काझड, शिंदेवस्ती, लाकडी या पाच ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक व वरकुटे खुर्द, गिरवी, भिगवण, पिठेवाडी, रुई (थोरातवाडी) या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. बावडा ग्रामपंचायतीच्या १६ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या. शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या ९ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या. लाकडी ग्रामपंचायतीची १ जागा बिनविरोध झाली. भिगवण, वरकुटे खुर्द व गिरवी या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणूका बिनविरोध झाल्या. पिठेवाडी ग्रामपंचायतीच्या दोनपैकी एका जागेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. बावडा ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी, शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहा जागा व काझड, वकीलवस्ती ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी व रुई व पिठेवाडी या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


================================

विराट आकर्षणामुळे विठ्ठल सरपंच! 

हुबेहुब विराटसारखा दिसणारया सौरभ गाडेचा करिष्मा!


सौरभ गाडे ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आला होता. ते विठ्ठल घावटे लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक लढवत होते, अखेर विठ्ठल घावटे हे रामलिंग गावाच्या सरपंचपदी निवडणुकीत निवडून आले आहेत. विठ्ठल घावटे हे १७०० मतांनी निवडून आले आहेत.मतदारांना आकर्षिक करण्यासाठी उमेदवार अनेक कल्पना लढवतात कारण शिरूर तालुक्यात रामलिंग गावात रामलिंग पॅनलच्या प्रचारासाठी चक्क क्रिकेटर, टीम इंडियाचा कॅप्टन सारखा दिसणारा हा विराट कोहली आला होता. रामलिंग पॅनलचं प्रचार चिन्हं देखील बॅट होतं, तेव्हा त्यांनी या विराटला प्रचारासाठी आणले आणि जीपवरून संपूर्ण गावात त्याची हातात बॅट घेऊन रॅली देखील काढण्यात आली, गावकऱ्यांनी विराट सारख्या दिसणाऱ्या या विराट सोबत सेल्फी काढण्याची हौस देखील भागवली.

डुप्लिकेट विराट कोहलीकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार


निवडणुकीच्या मैदानात उभे राहिल्यानंतर मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार शक्य ते सर्व प्रयत्न करतात. या निवडणुकीतील रामलिंग पॅनलचा प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली मैदानात उतरला होता. रामलिंग विकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट असल्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली रामलिंग विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले होते. ड्युप्लिकेट विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला होता. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

हुबेहुब विराटसारखा दिसणारा हा कोण?


हुबेहुब विराटसारखा दिसणारा हा आहे, सौरभ गाडे. सौरभ गाडे हा इंजीनिअर आहे. सौरभ हा देहूचा आहे. मी देखील क्रिकेट खेळतो, लोक मला विराटसारखा दिसणारा म्हणून प्रेमाने बोलतात, फोटो काढतात, पण जास्त गर्दी झाली तर मला भीती वाटते, असे सौरभ गाडे याने म्हंटले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

+++====+++=====+++====+++=====+++====+++=====
+++====+++=====+++====+++=====+++====+++=====

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक वृत्त --












POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.