Friday, 1 September 2017

गुजरातमध्ये पुन्हा ‘कमळ’, नरेंद्र मोदी गड राखणार? काँग्रेसच्या जागा निम्म्याने घटतील-सर्वेक्षण

गुजरातमध्ये पुन्हा ‘कमळ’, नरेंद्र मोदी गड राखणार?
काँग्रेसच्या जागा निम्म्याने घटतील-सर्वेक्षण


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये पुन्हा कमळ उमलण्याची दाट शक्यता आहे. एका सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भाजपला विधानसभा निवडणुकीत तब्बल १४४ ते १५२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला अवघ्या २६ ते ३२ जागा जिंकता येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुजरातमधील सर्वच भागांमध्ये भाजपला चांगले यश मिळेल असे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. एबीपी न्यूज, लोकनिती, सीएसडीएसकडून हे सर्वेक्षण करण्यात आले.
भाजपने २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला ६१, तर इतर पक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये २९ ते ३७ जागांची वाढ होण्याचा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जागांमध्ये जवळपास निम्म्याने घट होण्याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. काँग्रेसच्या जागा ६१ वरुन २६ ते ३२ वर येऊ शकतात, असे सर्वेक्षणातील आकडे सांगतात.भाजपला गुजरातमधील सर्वच भागांमध्ये चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे. मध्य गुजरातमध्ये एकूण ४० जागांपैकी भाजपला ५६%, काँग्रेसला ३०%, तर इतर पक्षांना १४% जागा मिळतील, असे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. उत्तर गुजरातमधील ५३ जागांवरही भाजपला चांगले यश मिळेल, असे आकडेवारी सांगते. या भागात भाजपला ५९%, काँग्रेसला ३३% आणि अन्य पक्षांना ८% जागा मिळण्याचा अंदाज आहे. सौराष्ट्र-कच्छमधील ५४ जागांवर भाजप उत्तम कामगिरी करेल, असा अंदाज आहे. या भागात भाजपला ६५%, काँग्रेसला २६% आणि अन्य पक्षांना ९ टक्के जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण गुजरातमधील ३५ जागांवरही भाजप वरचढ ठरण्याची शक्यता आहे. या भागात भाजपला ५४%, काँग्रेसला २७% आणि अन्य पक्षांना १९ टक्के जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.
गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी विजय रुपाणी यांना सर्वाधिक पसंती मिळाली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २४% लोकांनी रुपानींच मुख्यमंत्रीपदी राहावे, असा कौल दिला. तर ७% लोकांनी नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये परत येऊन राज्याचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे मत ५% लोकांनी व्यक्त केले. एबीपी न्यूज, लोकनिती, सीएसडीएसने राज्यातील ५० विधानसभा क्षेत्रांमध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये ४ हजार ९० लोकांनी त्यांचे मत नोंदवले. या सर्वेक्षणात नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर कायदा, पूर परिस्थितीतील सरकारची कामगिरी याबद्दलदेखील प्रश्न विचारण्यात आले. नोटाबंदीचा निर्णय चांगला होता, असे मत ५५% लोकांनी व्यक्त केले. तर हा निर्णय ठिक होता, असे मत २२% लोकांनी नोंदवले. नोटाबंदीचा निर्णय वाईट होता, असे मानणाऱ्यांचे प्रमाण १९% आहे. वस्तू आणि सेवा कर कायदा चांगला असल्याचे मत ३८% लोकांनी नोंदवले. तर हा कायदा बरा आहे, असे २२% लोकांनी म्हटले. हा कायदा वाईट असल्याचे २५% लोकांनी सांगितले. पूर परिस्थितीत सरकारने केलेल्या मदतीवर ५७% लोक समाधानी आहेत, असे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. तर सरकारकडून पुरेशी मदत करण्यात आली नाही, असे २०% लोकांचे मत आहे. तर २३ टक्के लोकांनी या प्रश्नावर मत मांडण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री म्हणून कोण हवं?
विजय रुपाणी- 24 टक्के
नरेंद्र मोदी – 7 टक्के
आनंदीबेन पटेल-  5 टक्के
भरत सिंह सोलंकी – 2 टक्के

कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप- 144-152
काँग्रेस- 26-32
इतर- 3-7

गुजरातच्या पूरस्थितीत सरकारचं काम कसं होतं?
चांगलं – 57 टक्के
खराब- 20 टक्के
माहित नाही – 23 टक्के

निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा काय?
महागाई – 13 टक्के
बेरोजगारी- 10 टक्के
गरीबी- 9 टक्के
विकास- 7 टक्के

नोटाबंदीबाबत मत काय?
चांगला निर्णय – 55 टक्के
ठिक निर्णय – 22 टक्के
वाईट निर्णय – 19 टक्के
माहित नाही – 4 टक्के

भाजप सरकारचं कामकाज कसं आहे?
पूर्ण समाधानी – 37 टक्के
समाधानी- 32 टक्के
असमाधानी -14 टक्के
पूर्ण असमाधानी – 13 टक्के
प्रतिक्रिया नाही – 4 टक्के

जीएसटीबाबत मत काय?
चांगला निर्णय – 38 टक्के
ठिक निर्णय – 22 टक्के
वाईट निर्णय – 25 टक्के
माहित नाही – 15 टक्के

शंकरसिंह वाघेला यांनी काय करावं?
नवीन पक्षाची स्थापना करावी – 5 टक्के
भाजपसोबत जावं – 16 टक्के
काँग्रेसमध्ये परतावं – 11 टक्के
राजकारण सोडावं – 24 टक्के
प्रतिक्रिया नाही – 45 टक्के

कच्छ-सौराष्ट्रात कुणाला किती मतं?
एकूण जागा – 54
भाजप – 65 टक्के
काँग्रेस- 26 टक्के
इतर- 9 टक्के

उत्तर गुजरातमध्ये कुणाला किती मतं?
एकूण जागा – 53
भाजप – 59 टक्के
काँग्रेस- 33 टक्के
इतर- 8 टक्के

दक्षिण गुजरातमध्ये कुणाला किती मतं?
एकूण जागा – 35
भाजप – 54 टक्के
काँग्रेस- 27 टक्के
इतर- 19 टक्के
----------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.