पुणे जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व;भाजप दुसर्या क्रमांकावर
पुणे जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. सहा जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर एकूण 40 सदस्यांपैकी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक 21 झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) 40 पैकी 34 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 6 जागांसाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. मंगळवारी दुपारी कौन्सिल हॉल येथे मतमोजणी झाली. यावेळी अर्चना कामटे, अनिता इंगळे, वैशाली पाटील, स्वाती पाचुंदकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल याही विजयी झाल्या. त्यांनी लोकशाही क्रांती आघाडीमार्फत निवडणूक लढविली होती. तसेच नगरपालिका मतदारसंघातील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराने बाजी मारली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या एकूण 40 जागांपैकी 21 जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी खालोखाल भाजप दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपाचे उमेदवार 14 जागांवर निवडून आले आहेत. काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी 2 उमेदवार तर लोकशाही क्रांती आघाडीचा 1 उमदवार निवडून आला आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.