Saturday, 16 June 2018

पुणे जिल्हयातील भोर नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतींचे १५ जुलैला मतदान

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 15 जुलै रोजी मतदान




पुणे जिल्हयातील भोर या नगरपरिषदेची मुदत संपल्याने तर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा आणि  मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायतीसाठी तसेच विविध ११ नगरपरिषदा, नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १५ जुलै  रोजी मतदान होणार आहे.१९ ते २५ जून ,नामनिर्देशनपत्रांची छाननी- २६ जून  ,अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- २ जुलै , मतदानाचा दिनांक- १५ जुलै ,मतमोजणी १६ जुलै रोजी करण्यात येईल.
         

 निवडणूक जाहीर झालेल्यांमध्ये भोर (जि. पुणे), वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला), वानाडोंगरी (नागपूर) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच विविध 11 नगरपरिषदा/ नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 15 जुलै 2018 रोजी मतदान; तर 16 जुलै 2018 रोजी मतमोजणी होणार आहे.  भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: जव्हार (जि. पालघर)- 6ब, पोलादपूर (जि. रायगड)- 16, राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)- 10ब, वाई (जि. सातारा)- 5अ, मेढा (जि. सातारा)- 15, निफाड (जि. नाशिक)- 6, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- 12अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- 16अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2, मोहाडी (जि. भंडारा)- 12 आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
·        नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 19 ते 25 जून 2018
·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 26 जून 2018
·        अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 जुलै 2018
·        अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- निकालाच्या तिसऱ्या                      दिवसापर्यंत
·        मतदानाचा दिनांक- 15 जुलै 2018
·        मतमोजणीचा दिनांक- 16 जुलै 2018


भोर नगरपालिका इच्छुकांची मोर्चेबांधणी

नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधी काहींनी प्रचारही सुरू केला आहे. शहरात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप शिवसेना अशी चौरंगी लढत होणार असून काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी, तर राष्ट्रवादी व भाजपा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.सन २००३मध्ये प्रभाग पद्धत सुरू झाली. त्या वेळी भोरमध्ये १७ प्रभाग होते. तर, २००८ व २०१३मध्ये ४ जागांचा एक असे ३ प्रभाग व ५ जागांचा एक असे एकूण ४ प्रभाग होते. या वेळी या रचनेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. २ जागांचा एक असे ७ प्रभाग, तर ३ जागांचा एक असे एकूण ८ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभागरचना व आरक्षण जाहीर झाले आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. एकूण ९ महिला व नगराध्यक्ष अशा १० महिला निवडून येणार आहेत. काँग्रेसकडे नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ७२ जणांनी अर्ज घेऊन गेले आहेत. तर, इतर पक्षांनीही आपापल्या उमेदवार निवडीची चाचपणी सुरू केली आहे. अनेकांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच गाठीभेटी तसेच थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भोर नगरपालिकेत १९७४मध्ये दिवंगत माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ, तर २००३ मध्ये चंद्रकांत सागळे हे थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आले होते. भोर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष पै. रामचंद्र आवारे यांच्या पत्नी निर्मला आवारे, नगरसेवक संजय जगताप यांच्या पत्नी नूतन जगताप, माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. जयश्री शिंदे, नगरसेविका डॉ. विजयालक्ष्मी पाठक यांच्यात रस्सीखेच आहे. राष्ट्रवादीकडून नगरसेवक यशवंत डाळ यांच्या पत्नी शारदा डाळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर, भाजपात नुकताच प्रवेश केलेल्या माजी नगराध्यक्षा दीपाली सतीश शेटे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेच्या वतीने स्वप्ना देशपांडे इच्छुक आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मागील पाच वर्षांत भोर शहरात आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून शहरातील काँक्रीट रस्ते, गटारे, पाईपलाईन, पूल, अग्निशमन यंत्रणा, नगरपालिका इमारत, स्मशानभूमी, घंटागाड्या, घनकचरा व्यवस्थापन यासारखी आदी कामे झाली. यामुळे शहरातील काँग्रेस जोरात आहे. तर, बाकीचे आपले अस्तित्व वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सन १९५५ ते १९६७ या कालावधीत लाल निशान पक्षाचे दिवंगत आमदार जयसिंग माळी यांच्या विचारांचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव भोर शहरावर १० ते १५ वर्षे राहिला. १९७०मध्ये काँगेसकडे सत्ता आली. तर, १९७४ ते १९९० पर्यंत दिवंगत अमृतलाल रावळ यांच्या गटाकडे भोर शहराची सत्ता होती. तालुक्यात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची सत्ता होती. १९९०नंतर अनंतराव थोपटे यांनी नगरपालिकेची सत्ता मिळवली. २००८चा अडीच वर्षांचा कार्यकाळ पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुन्हा सत्ता काँग्रेसकडे गेली होती. २०१३च्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १४ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. तर, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना-भाजपाला एकही जागा मिळाली नाही. या वेळी भाजपा-सेना सत्तेत असून त्या माध्यमातून वातावरण तयार करून काही प्रमाणात जागा मिळविण्याबरोबरच नगराध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न करतील अशी राजकीय सद्यस्थिती आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने बॅनर, पोस्टर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून भोर शहरात निवडणूकमय वातावरण तयार झाले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.