Saturday, 17 March 2018

28 मार्चला राज्यातील छोट्या पक्षांच्या बैठकीचे शरद पवारांकडून आयोजन ; राज ठाकरे राज्यातील भाजप विरोधी आघाडीत सामील होणार!

राज ठाकरें यांची शरद पवार यांच्याशी आज बंद दाराआड चर्चा!
मनोहर जोशी यांच्या पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरे व शरद पवार
उद्या (रविवारी) एकत्र



सत्ताधारी भाजपच्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या 28 मार्चला पवारांनी राज्यातील छोट्या पक्षांची बैठक बोलावली आहे. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे राज्यातील भाजप विरोधी आघाडीत सामील होणाची शक्यता आहे. नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती तर कॉंग्रेसने बोलावल्या आघाडीच्या बैठकीला देखील शरद पवार यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी भाजपच्या विरोधकांची मजबूत आघाडी तयार करण्याची रणनीती सुरु आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकां व भेटीगाठींमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनाला भाजपकडून चुचकारण्याचा प्रयत्न केला जात असून आगामी निवडणुकांसाठी युती असेल व सेना बरोबर असेल अशी विधाने भाजप नेत्याकडून केली जात आहेत. भाजपचे राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आता का नाही पडत सरकारमधून बाहेर असे म्हणून डिवचले तरी सेनेने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दरम्यान गेल्या जानेवारी महिन्यात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. तसा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. तरीही शिवसेनेचे मंत्री व आमदार पाठिंब्यासाठी भाजपकडे आल्याने भाजपच्या गोटातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी एकाच वेळी दुहेरी सामना करणे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. यामुळेच शिवसेनेने बरोबर लढावे, असे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. अलीकडे भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विरोधात कडक भूमिका किंवा शिवसेना नेत्यांना डिवचण्याची भाषणे करण्याचे टाळले आहे.दरम्यान लोकसभेत तेलुगू देसमने सरकारच्या विरोधात मांडलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी शिवसेना आमच्याबरोबर असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी शक्ती एकत्र आहेत, असे सांगत केंद्र व राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र असल्याची पुष्टी त्यांनी दिली.

राज ठाकरें यांची शरद पवार यांच्याशी आज बंद दाराआड चर्चा!

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या एक दिवसाआधीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवार यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी आज सकाळी त्यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. गुढीपाडव्या निमित्त मनसेचा उद्या रविवारी मेळावा आहे. या मेळाव्यात राज पुढील राजकीय वाटचालीचं मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज यांनी पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात राज आणि पवार एकत्र येण्याची शक्यताही वर्तविली जात असून राज आजच्या भेटीबाबत उद्याच्या मेळाव्यात भाष्य करतील अशी शक्यता आहे. राज ठाकरे यांचा पक्ष मनसेच्या स्थापनेला नुकतीच 12 वर्षे पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने येत्या एप्रिल आणि मे महिन्यात राज्यव्यापी दौरा करणार आहे. राज यांनी सांगितले की, मनसेचे नेते आणि पदाधिकारी 21 मार्चपासून राज्यव्यापी दौर्‍याला सुरुवात करणार आहेत. जनतेशी संपर्क वाढवणे हा या दौर्‍यामागील उद्देश आहे. दरम्यान ''शरद पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यांच्या मुलाखतीनंतर भेट झालेली नव्हती, त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती'', अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. मात्र, सदिच्छा भेट असल्याचं सांगत राज ठाकरेंनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

मनोहर जोशी यांच्या पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरे व शरद पवार उद्या (रविवारी) एकत्र

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचं उद्या रविवारी प्रकाशन होत आहे. यावेळी शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याआधीच राज यांनी पवार यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

काय बोलणार राज ठाकरे? 

गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केले आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवाय, पक्षाची भविष्यातील वाटचालही मांडणार आहेत. देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेली 12 वर्षं मराठी माणूस, भूमिपुत्र, मराठी भाषा हे प्रमुख मुद्दे घेऊन लढणाऱ्या आणि 'खळ्ळ-खटॅक'साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढचा अजेंडा काय असेल, त्यांचं 'इंजिन' कुठल्या दिशेनं पुढे जाईल, हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार आहेत.

मुंबई महानगरपालिका पोटनिवडणूक; सेना-भाजप एकत्र

मुंबई महानगरपालिकेच्या प्रतीक्षानगर विभागातील प्रभाग क्र. १७३ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. या प्रभागात भाजपने पाठिंबा द्यावा म्हणून शिवसेनेचे मंत्री व काही आमदारांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर  उपस्थित होते. भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभागात गेल्या डिसेंबरमध्ये पोटनिवडणूक झाली असता शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. शिवसेना नगरसेवकाच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असल्याने या वेळी भाजपने पाठिंबा द्यावा, अशी शिवसेनेची भूमिका होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही भूमिका मान्य केली. या पोटनिवडणुकीत भाजप शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देईल, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीर केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेने केला असला तरी,मुंबई महानगरपालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीकरिता शिवसेना आणि भाजप एकत्र आले आहेत. ही एकत्र येण्याची नांदी असल्याची चर्चा सुरू आहे.

6 एप्रिलला भाजपचा मुंबईत महा-मेळावा 

शिवसेना मुंबईत दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करते. त्याच पद्धतीने भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त महा-भाजप, महा-मेळावाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. 6 एप्रिल रोजी भाजप पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर हा महा मेळावा घेण्यात येणार आहे. राज्यभरातून 3 लाख कार्यकर्ते या मेळाव्यासाठी येणार असून या विषयी राज्यभरात ठिकठिकाणी नियोजनाची बैठक घेण्यात येत आहे. या महा मेळाव्याततून भारतीय जनता पक्ष मुंबईत एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन करणार आहे.या महा मेळाव्यासाठी राज्यभरातून 22 रेल्वे सोडण्यात येणार आहेत. एक बूथ 10 कार्यकर्ते असे यांचे नियोजन असणार आहे. प्रत्येकाला या महा मेळाव्यात सहभागी करण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.