नव्या प्रभाग रचनेत विद्यमान सदस्यांचे प्रभाग गायब
सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले. चार सदस्यीय रचनेमुळे प्रभागांचे आकार वाढले असून विद्यमान बहुतांशी प्रभागांची मोठी मोडतोड करून नवे 20 प्रभाग अस्तित्वात आले आहेत. आज पार पडलेल्या प्रक्रियेवर येत्या 23 एप्रिलपर्यंत हरकती घेता येतील. नव्या रचनेत विद्यमान आणि दोन माजी उपमहापौरांचे प्रभागच गायब झाले आहेत. मिरजेतील गावठाण परिसर आणि सांगलीतील खणभाग परिसरात मात्तबरांच्या प्रभागांचे एकत्रिकरण झाले असून तेथे बंडखोरी पक्षांतरांचे वारे आजपासूनच वाहू लागले आहे. पुढील सभागृहात एकूण 20 प्रभागातून 78 नगरसेवक असतील. सांगलीवाडी व मिरजेतील अशा दोन प्रभागात प्रत्येकी तीन सदस्य असतील. उर्वरित अठरा प्रभाग चार सदस्यांचे असतील. प्रभागातील सदस्य संख्याच बदलल्याने प्रभाग रचना बदलणे अटळ होते मात्र झालेले बदल हे अमुलाग्र स्वरुपाचे असल्याने जवळपास 95 टक्के विद्यमान नगरसेवक माझा संपुर्ण प्रभाग कायम राहिला आहे असे म्हणून शकत नाहीत. त्याबरोबरच सांगलीवाडी, खणभाग, गावभाग, मिरज ब्राह्मणपुरी गावठाण भागांचे एकत्रिकरण झाल्याचे चित्र आहे. यापुर्वी गणपती मंदिर परिसरातून प्रभाग एकचा प्रारंभ होत असे. यावेळी प्रथमच कुपवाडमधून प्रभाग एकची सुरवात झाली आहे. तिथून मिरजेच्या मिशन परिसरापर्यंत आणि तिथून सांगली शहराच्या दिशेने प्रभाग क्रमांक बदलत पुन्हा वीस क्रमांकाचा शेवटचा प्रभाग मिरजेतच कृष्णाघाट परिसराचा समावेश असलेला असा आहे. ही रचना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आहे असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आणि त्यांच्या राजकीय प्रभाव क्षेत्राच्या दृष्टीने या प्रभाग रचनेवर नजर टाकली असता प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पायगोंडा पाटील आणि विजय घाडगे या तीन माजी आजी उपमहापौरांचे प्रभागांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यांचे प्रभाव क्षेत्र असलेले भाग चार चार प्रभागात विभागले आहेत. माजी महापौर कांचन कांबळे यांचा प्रभाग आणि आरक्षण कायम राहिले असल्याने त्यांना पुन्हा मैदानात उतरण्याची संधी असेल. हाय व्होल्टेज प्रभाग असलेला खणभाग हा सांगलीच्या गावठाणाचा भाग असलेला परिसर आता प्रभाग 16 असेल. येथे कॉंग्रेसमधील मात्तबर एकाच प्रभागात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस असेल. मिरजेत माजी महापौर आणि विद्यमान गटनेते किशोर जामदार यांचा प्रभाग कायम असून त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी असेल. मिरजेतील मात्तबर मैन्नुदीन बागवान आणि इद्रीस नायकवडी या दोन माजी महापौरांचे प्रभाव क्षेत्र एकाच म्हणजे प्रभाग सहा मध्ये समाविष्ठ झाले आहे. महापालिका संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील प्रस्थापित कारभारी एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या रचनेमुळे त्यांच्या प्रयत्नांना खो बसू शकेल.
प्रभाग क्रमांक निहाय आरक्षण असे
सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2018 प्रभाग आरक्षण
* एकूण जागा -78, कंसात महिला
* एससी (अनुसुचित जाती) -11 (6)
* अनुसूचित जमाती-1 (1)
* नागरिकांचा मागास प्रवर्ग-21 (11)
* खुल्या-45 (21)
अधिक माहितीसाठी -
http://www.smkcelection.com/pdf/tajya_ghadyamodi/Parshist2_Final_20.03.2018.pdf
http://smkc.gov.in
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.