डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये 13 ऐवजी 17 डिसेंबरला मतदान
पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत कार्यक्रमानुसार आता 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.
या नगरपरिषदांच्या नामनिर्देशनपत्रांसदंर्भातील न्यायालयांचे निकाल आणि संबंधित अधिनियमातील तरतुदी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार तीन ठिकाणी 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 18 डिसेंबर 2017 रोजी मतमोणजी होईल. त्याचबरोबर खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.6-अ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार इगतपुरी, त्र्यंबक (जि. नाशिक) व जत (जि. सांगली) नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. हुपरी (जि. कोल्हापूर), नंदुरबार, नवापूर (जि. नंदुरबार), किनवट (जि. नांदेड), चिखलदरा (जि. अमरावती), पांढरकवडा (जि. यवतमाळ), वाडा (जि. पालघर), शिंदखेडा (जि. धुळे), फुलंब्री (जि. औरंगाबाद) आणि सालेकसा (जि. गोंदिया) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल.
इगतपुरी, त्र्यंबक आणि जत येथे उद्या मतदान
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबक आणि सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेसाठी रविवारी (ता.10) सदस्यपदांसोबतच थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होईल. त्याचबरोबर सटाणा (जि. नाशिक) नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5-अ च्या रिक्तपदासाठीदेखील रविवारीच मतदान होणार आहे. इगतपुरी नगरपरिषदेच्या एकूण 9 प्रभागातील 18 जागांसाठी 79 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण 24 हजार 468 मतदार असून त्यांच्यासाठी 34 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्र्यंबक नगरपरिषदेच्या एकूण 8 प्रभागातील 17 जागांसाठी 57 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण 10 हजार 614 मतदार असून त्यांच्यासाठी 17 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे.
जत नगरपरिषदेच्या एकूण 10 प्रभागातील 20 जागांसाठी 76 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण 24 हजार 560 मतदार असून त्यांच्यासाठी 36 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असेल. तीनही नगरपरिषदांची मतमोजणी 11 डिसेंबर 2017 रोजी होईल.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.