खासदार नाना पटोले यांचा राजीनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या खासदार नाना पटोले यांनी अखेर शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपला हादरा बसला आहे.
शेतक-यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत पक्षविरोधी भूमिका घेणारे भंडारा- गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज दुपारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे नाना पटोले यांनी राजीनामा सोपवला आहे. विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तिथेही त्यांचे पक्षनेत्यांशी मतभेद होते. विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही त्यांना तात्काळ प्रवेश दिला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांच्या पदरी निराशा पडली. यात भर म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व पक्षात पटोलेंचे वजन कमी होत गेले. ही खदखद त्यांच्या मनात होती आणि यामुळेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांना अशी चमकोगिरी करण्याची सवयच आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी असाच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. आताही शेतक-यांच्या नावाखाली ते नौटंकी करत असून, त्याचाच भाग म्हूणून त्यांनी राजीनामा दिला आहे. आमचे सरकार शेतकरी, दुर्बल घटक व सर्व सामान्यांसाठीच काम करत आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी पटोलेंच्या राजीनाम्याबाबत दिली आहे.
नाना पटोले गेले काही महिने पक्षविरोधात भूमिका घेताना दिसत होते. शेतक-यांचे प्रश्न उपस्थित करून केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारला ते लक्ष्य करत होते. मोदी पक्षाच्याच नेत्यांचे व खासदाराचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. काही प्रश्न किंवा मुद्दे उपस्थित केले की चिडतात असा आरोपही पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केला होता. फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल करताना हे सरकार जनतेच्या हिताला प्राधान्य देत नसल्याचे सांगत वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. मात्र, भाजप श्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले होते. याच काळात विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर गेले होते. मागील काळात ते उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटले होते. राहुल गांधी यांनाही ते गुजरात निवडणुकीनंतर भेटणार आहेत. अशोक चव्हाण यांनी तर पटोले यांना काँग्रेसमध्ये येण्याचे जाहीर आवाहन केले आहे.दोन दिवसापूर्वी अकोल्यात ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनात नाना पटोले यांनी सहभाग घेतला होता. तसेच भाजप सरकार सर्वसामान्य जनता व शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने पक्षातील अनेक नाराज नेते यात सहभागी होतील असे वक्तव्य केले होते. या आंदोलनाला मतता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या आंदोलनानंतर दोनच दिवसात नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नानांना आपल्यासोबत येण्याची ऑफरच दिली होती. या पार्श्वभूमीवर, पटोले यांनी आज दिल्लीला जाऊन खासदारकीचा राजीनामा सोपवला.
दरम्यान ‘राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नसतं. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे की ते जवळच्याच व्यक्तीच्याच वैयक्तिक जीवनात जातात. तसं त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. एवढीच माझी त्यांना सूचना आहे.’ असं म्हणत नाना पटोलेंनी मुलाखतीत भाजप सरकारसह फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
पटोले हे सांगडी येथून भंडारा जिल्हा परिषदेत १९९० मध्ये निवडून आले. त्यानंतर १९९५ मध्ये ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले. आमदार आणि खासदार झाले. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारण अनुभव असला तरी गॉडफॉदर नसणे आणि धरसोड वृत्ती हे त्यांच्यासाठी घातक ठरत आहे.१९९५ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा लढवली. त्यात ते भाजपच्या उमेदवाराकडून पराभूत झाले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही. काँग्रेसच्या तिकिटावर लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून १९९९ आणि २००४ मध्ये विजयी झाले. विदर्भ विकास आणि धान उत्पादक शेतकरी यांच्या मुद्दय़ांवरून तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाशी त्यांचे मतभेद झाले. त्यांनी २००९ मध्ये आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्याचा पराभव झाला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी २००९ मध्ये सोकाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात विजयी झाले. मागील लोकसभेत ते भाजपकडून लढले आणि प्रफुल पटेल यांचा पराभव केला. परंतु सातत्याने भाजपच्या प्रमुख नेत्यांना ते लक्ष्य करत होते. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता होती. त्यांच्या राजीनाम्याची जणू वाट पाहत होते, अशा पद्धतीने भाजपने आमदार परिणय फुके यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. तर नाना पटोले यांनी पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यावर ठरवू असे जाहीर केले आहे.
काँग्रेसमध्ये असताना नाना पटोले यांचे नेतृत्वाशी वाद झाले होते. २००८ मध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटली होती. तेव्हा नानांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. तेव्हापासूनच त्यांचे काँग्रेसशी बिनसले होते.
पटोले यांनी मोदी आणि फडणवीस तसेच इतर नेत्यांवर जाहीर टीका करून पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. अशाच पद्धतीने त्यांनी २००८ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशन काळात विदर्भाचा विकास आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस नेत्यांशी त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.