Thursday, 7 December 2017

विधान परिषद पोटनिवडणूक ; प्रसाद लाड विजयी ; दोन मतं बाद

विधान परिषद पोटनिवडणूक: युतीचे उमेदवार प्रसाद लाड विजयी, लाड यांना 209 मतं


विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत. विधान परिषद निवडणुकीत दोन मतं बाद ठरवण्यात आली आहेत. तर विरोधकांची 9 मतं फुटली आहेत.शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला होता.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. लाड यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यावर १३६ मते अधिक मिळवित दणदणीत विजय मिळविला आहे.काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतंत्र पक्ष स्थापन करणारे नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत भाजपने पक्षातील एकनिष्ठ नेत्यांना डावलून प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती. प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याची चांगलीच चर्चाही रंगली होती. लाड यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलीप माने यांना मैदानात उतरवले होते. आज झालेल्या मतमोजणीत लाड यांना २०९ मते पडली तर दिलीप माने यांना अवघ्या ७३ मतांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, विरोधकांची ९ मते फुटल्याचे तसेच २ मतं बाद झाले. प्रसाद लाड यांच्या या विजयामुळे भाजपचे विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळात एकने वाढ झाली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक झाली. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली.छगन भुजबळांचे खंदे समर्थक असणा-या व राष्ट्रवादीची सत्ता जाताच प्रसाद लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2014ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि ते भाजपाकडून पराभूत झाले होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला; पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेले आणि चांगलेच स्थिरावले. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट विधान परिषदेवर निवडून आणलं. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील कट्टर समर्थक परिणय फुके यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशीच प्रतिष्ठा पणाला लावली आणि फुके विजयी झाले होते. तथापि फुकेंची गणना मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांपेक्षा मित्रांमध्ये होते. प्रवीण दरेकर, आर. एन. सिंह यांना विधान परिषदेवर पाठविताना मुंबई महापालिकेचे राजकारण डोळ्यांसमोर होते. मात्र, आज लाड यांना मिळालेली उमेदवारी ही मुख्यमंत्री समर्थकांना भविष्यात मिळणार असलेल्या संधीची सुरुवात मानली जात आहे.
सध्या विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 3, अपक्ष 7, एमआयएमचे 2 तर; सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांची आमदारकी उच्‍च न्‍यायालयाने रद्द केलेली असल्‍यामुळे त्‍यांना मतदानाचा अधिकार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ तुरुंगात असल्याने त्यांना मतदान करता आलं नाही. मात्र रमेश कदम हे तुरुंगातून मतदानासाठी आले होते. त्यामुळे दिलीप माने यांना किमान 82 मतं मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना 73 मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 9 मतं फुटली.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.