Saturday, 16 December 2017

काँग्रेसमध्ये राहुल पर्वाचा प्रारंभ

'राहुलपर्व' सुरू; काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान

काँग्रेसमध्ये आजपासून 'राहुलपर्व' सुरू झाले आहे. १३२ वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला आज ४७ वर्षीय राहुल गांधी यांच्या रूपानं नवं नेतृत्व मिळाले आहे. पक्षाच्या मुख्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. काँग्रेस कमिटीचे निवडणूक निर्णय अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी राहुल यांना काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रमाणपत्र दिले. सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून गेली १९ वर्षे धुरा सांभाळली. १९९८मध्ये सोनिया काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. सोनियांच्या काळात पक्षाने अनेक चढउतार पाहिले. लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवत मित्रपक्षांची मोट बांधून केंद्रात सलग १० वर्षे सत्ता राखण्याची किमया सोनिया यांनी साधली. मात्र, २०१४ मध्ये मोदीलाटेत दारूण पराभवही सोनियांच्या काळात पक्षाच्या वाट्याला आला. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वारे असताना राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे. एकीकडे पक्षाची नव्याने मोट बांधतानाच देशावरील ढिली होत चाललेली काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत करण्याचे महाकठीण आव्हानही त्यांच्यापुढे असणार आहे. एकवेळ देशातील बहुतांश राज्यांवर काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र मोदीलाटेत एकेक राज्य गमावत चाललेल्या काँग्रेसकडे आता केवळ ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पदुचेरीची सत्ता आहे. या अपयशाच्या गर्तेतून राहुल पक्षाला बाहेर काढतील का, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देणार आहे.
काँग्रेसकडे सध्या इतिहासातील सर्वात कमी 44 लोकसभा जागा आहेत. आणीबाणीच्या नंतर पहिल्यांदाच असे झाले जेव्हा हिमाचल, पंजाब, कर्नाटकसारख्या निवडक 5 राज्यांतच काँग्रेसचे सरकार आहे.
5 वर्षांत 27 राज्यांत पराभव, 9 राज्यांत विजय मिळाला आहे. पक्षाला पुन्हा मजबूत करायचे असेल तर प्रत्येक निवडणुकीत कमीत कमी 38 ते 40% मतदान कायम ठेवावे लागेल. यासाठी त्यांना भाजपच्या विरोधात काँग्रेसलाही बूथ लेव्हलवर मजबूत करावे लागेल. मोदी जेव्हा 2014 मध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले तेव्हा निवडणूक जिंकल्यानंतर संघटनेत अमित शहांना आणण्यात आले. अमित शहांनी आपली टीम बनवली आणि 3 वर्षांत 11 निवडणुका जिंकल्या. राहुल यांनाही अमित शहाप्रमाणेच आपली नवी टीम निवडावी लागेल. सोनियांच्या कार्यकाळात प्रणब मुखर्जी, मनमोहन सिंग, अहमद पटेल, मोतीलाल वोरा, वीरप्पा मोईली, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंह यासारख्या नेत्यांची टीम होती. राहुल यांना या नेत्यांपेक्षा वेगळे चेहरे घेऊन टीम निवडावी लागेल.

11 डिसेंबररोजी राहुल गांधी यांची अध्‍यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. 132 वर्षे जुन्या काँग्रेसचे अध्यक्षपद 44 वर्षे गांधी-नेहरू घराण्यातील व्यक्तीकडे राहिले आहे. अध्‍यक्षपद सांभाळणारे राहुल गांधी हे नेहरु-गांधी परिवारातील सहावे सदस्‍य असणार आहेत.  याअाधी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा साभांळली आहे.राहुल गांधी हे काँग्रेसचे 18वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत.याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी

1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते 2017

18) राहुल गांधी - 2017 पासून



सोनिया पर्वाचा अस्त


  1. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या कुटुंबातील दोन सदस्यांच्या हत्या जवळून पाहिल्या
  2. सोनियांनी राजीव गांधींच्या हत्येनंतर स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं
  3. पक्षाध्यक्ष होण्यापूर्वी आणि नंतरही नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांसारख्या ज्येष्ठांशी संघर्ष
  4. सोनिया गांधी ज्येष्ठांची गर्दी आणि मरगळ आलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या
  5. परदेशी मुळाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी पक्ष फोडून राष्ट्रवादीची स्थापना केली, सोनियांना पहिला मोठा धक्का बसला
  6. 'लिडर नव्हे रिडर', 'इटालियन मेमसाब', अशी टीका सहन करावी लागली
  7. सोनियांचं शिक्षण, त्यांचा व्यवसाय यावरुनही त्यांची खिल्ली उडवली गेली
  8. हिंदूतून थेट बोलता न येणं आणि वाचून बोलणं यावरुनही टिंगल
  9. सोनियांचं राष्ट्रीयत्व आणि त्या ख्रिश्चन असणं यावरुन गदारोळ
  10. बोफोर्स-क्वात्रोकी प्रकरणात राजीव गांधींनंतरही सोनियांना आजही आरोपांना तोंड द्यावं लागतं
  11. 2004 साली वाजपेयी-अडवाणी असतानाही सोनियांनी देश की बहू बनून भाजपचा पराभव केला
  12. 'अंतरात्मा की आवाज' ऐकून सोनियांना केलेल्या पंतप्रधानपदाचा त्याग प्रचंड गाजला
  13. काँग्रेससह समविचारी पक्षांची 'यूपीए' बनवण्यात सोनियांचा मोठा वाटा
  14. मात्र राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाद्वारे सोनिया या समांतर पंतप्रधान बनल्याची टीका झाली
  15. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मंत्री सोनियांचे आदेश पाळत, असं म्हटलं जायचं
  16. काँग्रेसवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी मनमोहन सिंह आणि श्रेयासाठी सोनिया असं चित्र बनलं
  17. विविध भ्रष्टाचार प्रकरणं, निर्भया, अण्णा आंदोलन यावर सोनियांच्या मौनाने पक्षाला अडचणीत आणलं
  18. गुजरात निवडणुकीत मोदींना सोनियांनी 'मौत का सौदागर' म्हणणं काँग्रेसला महागात पडलं
  19. आपल्यानंतर अध्यक्षपदी राहुल की प्रियांका यावर पक्षांतर्गत संघर्षालाही तोंड दिलं
  20. सोनियांनी 1997 साली ज्या अवस्थेत अध्यक्षपद स्वीकारलं त्याच अवस्थेत राहुल गांधींकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा


Political Research & Analysis Bureau (PRAB)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.