Tuesday, 12 December 2017

इगतपुरीत शिवसेना, त्र्यंबकेश्वर मध्ये भाजपचे वर्चस्व ; जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार

इगतपुरीत शिवसेना, त्र्यंबकेश्वर मध्ये भाजपचे वर्चस्व


इगतपुरी शिवसेनेने १३ जागा जिंकून तर त्र्यंबकमध्ये भाजपने १४ जागा जिंकून एकहाती सत्ता


नाशिक जिल्ह्यतील इगतपुरी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत अडीच दशकांपासूनची आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले असताना दुसरीकडे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपने शिवसेनेसह काँग्रेसची तीच अवस्था केली. इगतपुरीच्या नगराध्यक्षपदी सेनेचे संजय इंदुलकर तर त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षपदी भाजपचे पुरुषोत्तम लोहगांवकर विजयी झाले. इगतपुरी शिवसेनेने १३ जागाजिंकून तर त्र्यंबकमध्ये भाजपने १४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली. दरम्यान, सटाणा नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच अ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आघाडीने भाजप-शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला.
भाजपच्या अंतर्गत नाराजीचा लाभ
इगतपुरी : भाजपच्या अंतर्गत नाराजीचा लाभ उठवत शिवसेनेने नगराध्यक्षपदासह १८ पैकी १३ जागा जिंकून इगतपुरी नगरपालिकेवरील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. भाजप नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्यांना तिकीट देण्याचा निर्णय भाजपला धक्का देणारा ठरला. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी सेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सेनेने निवडणूक लढविली होती.आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मतदारांनी नाकारले.
इगतपुरी नगरपालिका निवडणुकीविषयी जिल्ह्यात उत्सुकता होती. शिवसेना-रिपाइंने २५ वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखली. १८ पैकी १३ जागा तसेच नगराध्यक्षपदावरही विजयी होऊन सेनेने एकहाती वर्चस्व कायम राखले. प्रथमच स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेशी दोन हात करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला इगतपुरीकरांनी साफ नाकारले. काँग्रेस, भारिपचा सुपडा साफ झाला. शिवसेनेने तिकीट नाकारलेला एक जण अपक्ष विजयी झाला. बहुचर्चित नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेनेचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भाजपच्या फिरोज पठाण यांचा दारुण पराभव केला. बहुजन विकास आघाडीचे महेश शिरोळे, काँग्रेसचे बद्रीनाथ शर्मा, भारिप बहुजन महासंघाचे बाळू पंडित, अपक्ष राजू कदम आणि महमद मेमन यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले. नऊ प्रभागातील १८ जागा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या मतांची मोजणी इगतपुरीत पार पाडली. इगतपुरीच्या इतिहासात ऐतिहासिक निकाल लागले असून इगतपुरीकरांनी चार जणांना पुन्हा नगरसेवकपदाची संधी दिली आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी ७९ उमेदवार रिंगणात होते. ६८.५३ टक्के मतदान इगतपुरीकरांनी केले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मिरवणूक काढली. शिवसेनेचे १३, भाजपचे चार तर एक अपक्ष निवडून आला.
विजयी झालेले उमेदवार
नगरसेवक पदाच्या १८ पैकी १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये प्रभाग एकमधून युवराज भोंडवे, प्रभाग दोनमधून किशोर बगाड आणि रोशनी परदेशी, प्रभाग तीनमधून आरती कर्पे,  प्रभाग चारमधून सुनील रोकडे आणि मिना खातळे, प्रभाग पाचमधून उमेश कस्तुरे, प्रभाग सहामध्ये उज्वला जगदाळे, प्रभाग सातमधून आशा सोनवणे आणि गजानन कदम, प्रभाग आठमधून सीमा जाधव आणि नईम खान, प्रभाग नऊ मधून रंगनाथ चौधरी यांचा समावेश आहे. भाजपच्या अर्पणा धात्रक प्रभाग क्रमाक एकमधून तर प्रभाग पाचमधून साबेरा पवार, प्रभाग सहामध्ये दिनेश कोळेकर आणि प्रभाग नऊमधून गीता मेंगाळ हे विजयी झाले. प्रभाग तीनमधून अपक्ष उमेदवारी करणारे संपत डावखर विजयी झाले.

त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपदी भाजपचे पुरुषोत्तम लोहगांवकर विजयी 


मागील पाच वर्षांत सर्वपक्षीय खिचडीच्या राजकारणाला वैतागलेल्या त्र्यंबकेश्वरमधील मतदारांनी नगराध्यक्ष पदासह १७ पैकी १४ जागा जिंकून देत भाजपच्या हाती एकहाती सत्ता सोपविली. नगराध्यक्षपदी भाजपचे पुरुषोत्तम लोहगांवकर विजयी झाले. थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तिसऱ्या आणि चवथ्या क्रमांकावर फेकले गेलेले काँग्रेस, शिवसेना स्पर्धेतही नव्हती. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत सेनेला दोन तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि बारा जोतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरची नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीयांनी कंबर कसली होती. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नाटय़मय घडामोडी घडल्या. आपापल्या पक्षांच्या नगरसेवकांना थोपविणे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांना अवघड गेले. निवडणुकीच्या तोंडावर इतकी पक्षांतरे झाली की, प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत संभ्रमाची स्थिती होती. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपने एकहाती जिंकली. भाजपचे पुरूषोत्तम लोहगांवकर यांनी अपक्ष उमेदवार बाळू झोले यांचा १२८६ मतांनी पराभव केला. लोहगांवकर यांना ३०५३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेची बिकट अवस्था झाली. काँग्रेसचे सुनील अडसरे (१७४७) तृतीय तर शिवसेनेचे धनंजय तुंगार (१३६८) चवथ्या क्रमांकावर राहिले. १७ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १४ जागा जिंकून भाजपने नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग क्रमांक चारमध्ये एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला.
नवनिर्वाचित नगरसेवक
१७ पैकी १४ जागांवर भाजपने विजय मिळविला. त्यामध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक एकमधून भारती बदादे (७८३) अणि कैलास चोथे (८६२). प्रभाग दोनमध्ये विष्णू दोबाडा (४७१) आणि सायली शिखरे (४२८), प्रभाग तीनमध्ये त्रिवेणी तुंगार (अविरोध), प्रभाग चारमध्ये दीपक गीते (४७८), प्रभाग पाचमधून अनिता बागूल (६२५) आणि स्वप्नील शेलार (७९५), प्रभाग सहामधून सागर उजे (५२१) आणि माधवी भुजंग (६७४), प्रभाग सातमध्ये शीतल उगले (६०३), प्रभाग आठमधून संगिता भांगरे (७८८), शिल्पा रामायणे (६७९) आणि समीर पाटणकर (७६५) यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या कल्पना लहांगे (४३५) प्रभाग चारमधून तर प्रभाग सातमधून मंगला आराधी (५७९) या विजयी झाल्या. प्रभाग तीनमध्ये अपक्ष उमेदवार अशोक घागरे यांनी अवघ्या १३ मतांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले. घागरे यांना (२७६) मते मिळाली.
सटाणा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी
सटाणा येथील नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच अ मधील चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आघाडीच्या आशा भामरे यांनी भाजप-शहरविकास आघाडीच्या उमेदवार नर्मदा सोनवणे यांचा ४८ मतांनी पराभव केला. भामरे यांना ६६४ मते मिळाली.
शहरातील प्रभाग क्रमांक पाच अ हा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून या प्रभागातून भाजपच्या लता सोनवणे या विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांना तीन अपत्य असल्याची तक्रार पराभूत उमेदवार निर्मला सोनवणे यांनी केली. या तक्रारीची शहानिशा होऊन मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लता सोनवणे यांना अपात्र घोषित केले. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी रविवारी पोटनिवडणूक होवून सोमवारी मतमोजणी झाली. या पोटनिवडणुकीसाठी अनुसूचित जाती-जमातीच्या महिला राखीव गटातून भाजपने नर्मदा सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवतीने आशा सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली.  भाजप आणि सटाणा शहर विकास आघाडीच्या उमेदवार नर्मदा सोनवणे यांना ५९६ मतांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आघाडीच्या आशा भामरे यांना ६४४ मते मिळाल्याने त्या ४८ मतांनी विजय झाल्या. याच प्रभागामध्ये भाजपच्या लता सोनवणे वर्षभरापूर्वी विजयी झाल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाची मते सटाणा शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. मात्र तिसऱ्या अपत्यामुळे लता सोनवणे यांचे पद अपात्र झाले.

जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार 


जत नगरपरिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी अशोक बन्नेवार विजयी झाल्‍या आहेत. शुभांगी यांनी ७२१९ मते मिळवत भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभर केला. या निवडणुकीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात, राष्ट्रवादी काँग्रेसला सहा आणि बसपाला एक जागा मिळाली आहे.
शुभांगी बन्नेनवार यांनी तिसऱ्या फेरीपासून आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. शेवटच्या फेरीमध्ये त्यांनी भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव करून विजय खेचून आणला. रेणुका आरळी यांना ७०४१, राष्ट्रवादीच्या शबाना इनामदार यांना ३८६१, शिवसेनेच्या शांताबाई राठोड यांना २४६ मते मिळाली.

प्रभागानुसार विजयी उमेदवार
प्रभाग १ : आप्पासाहेब पवार : राष्ट्रवादी, वनिता साळे : राष्ट्रवादी
प्रभाग २ : संतोष कोळी : काँग्रेस, गायत्री सुजय(नाना) शिंदे : काँग्रेस
प्रभाग ३ : दिप्ती उमेश सावंत : भाजप, प्रमोद हिरवे: भाजप
प्रभाग ४ : भूपेंद्र कांबळे : बसपा, श्रीदेवी तम्मा सगरे : भाजप
प्रभाग ५ : आश्विनी माळी : काँग्रेस, इकबाल गवंडी : काँग्रेस
प्रभाग ६ : विजय शिवाजी ताड : भाजप, जयश्री दिपक शिंदे : भाजप
प्रभाग ७ : स्वप्नील सुरेश शिंदे : राष्ट्रवादी, बाळासाहेब मळगे : राष्ट्रवादी
प्रभाग ८ : प्रकाश माने : भाजप, भारती जाधव : राष्ट्रवादी
प्रभाग ९ : जयश्री मोटे : भाजप, लक्ष्मण (टिमू)एडके : राष्ट्रवादी
प्रभाग १० : नामदेव काळे : काँग्रेस, कोमल शिंदे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.