Monday, 3 October 2022

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर; बंडानंतरची पहिली निवडणूक मात्र पक्षचिन्हाबाबत संभ्रम!

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार असून बंडानंतरची पहिली निवडणूक असल्याने शिवसेना पक्षचिन्हाबाबत संभ्रम आहे. 
      अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी श्रीमती ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर शिंदे गटाने येथे उमेदवार देउन पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्याकडे घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे. शिंदे गटाने देखील निवडणूक लढवणार असेल तरच शिवसेना पक्षचिन्हाबाबत पेच निर्माण होऊ शकतो अन्यथा निवडणूक लढविणार नसेल तर या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट उमेदवार धनुष्यबाण पक्षचिन्ह वापरू शकते. उमेदवारी न देता शिंदे गट पक्षचिन्हावर दावा करून हरकत घेतली तर निवडणूक आयोगाची भुमिका महत्वपूर्ण ठरेल म्हणूनच शिवसेना पक्षचिन्हाबाबत संभ्रम असल्याचे मानले जात आहे. राज्यातील बदलत्या घडामोडींमध्ये पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. सहसा निवडणूक जाहीर झालेली असेल तर आयोग वादात असलेले चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असते. या प्रकरणात ते होते की, केस आयोगासमोर सुरु झालेली नाही, त्यामुळे आमचे चिन्ह आम्हाला राहिले पाहिजे हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दावा आयोगात योग्य ठरतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी 11 मे 2022 संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झाले होते. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाले होते. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे ​कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती. निवडणूक आयोगाकडून सोमवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. सन २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेता रमेश लटके यांना ६२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. जवळपास १७ हजार मतांनी लटके यांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीत अपक्ष मुरजी पटेल यांनी ४५ हजार मते मिळवली होती. तर काँग्रेसच्या उमेदवाराला २७ हजार मते प्राप्त झाली होती. मुरजी पटेल हे मूळचे काँग्रेसवासी आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पारड्यातील २७ हजार मते आपल्या पारड्यात पडण्यासाठी ते प्रयत्न करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची २७ हजार मते शिवसेनेच्या पारड्यात पडावीत, यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.अंधेरी भागात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत त्यात मूळचे कोकणचे असलेल्या मतदार जास्त आहे, त्यानंतर उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी, जैन, मुस्लिम आणि दक्षिणेचे मतदारही या भागात राहतात.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण"