स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विवाहित महिला उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्र व मतपत्रिकेवरील नावाबाबत आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या विवाहित महिलांबाबत मतदार यादीत असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज करावा लागत असे. आता मात्र महिलांना उमेदवारी अर्जावर विवाहापूर्वीचे की विवाहानंतरचे नाव असावे, याबाबतचा संभ्रम दूर झाला. यासाठी संबंधित महिलेला उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत आवश्यक पुराव्यासह विनंती अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल. मतदार यादीमधील नावाशिवाय महिलांना लग्नानंतरचे किंवा लग्नापूर्वीचे नाव आता मतपत्रिकेवर लावता येणार आहे. त्यासाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मात्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांनाच देण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ही सुविधा १३ मार्चच्या आदेशाने उपलब्ध केल्याने महिला उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित मतदार यादीत असणे आवश्यक अर्हता आहे. त्यामुळे महिला उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदार यादीत असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागत होता. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवाहित महिला उमेदवारांना मतदार यादीत व उमेदवारी अर्जात नमूद नावाखेरीज त्यांना मतपत्रिकेवर इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर तो बदल आता करता येणार आहे. मात्र यासाठी आवश्यक पुरावे विनंती अर्जासोबत जोडावे लागतील. त्यानंतर वैध उमेदवारांच्या अंतिम यादीत व मतपत्रिका तयार करताना या सुधारित नावाचा समावेश करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील. यामध्ये यादीतील नावापुढे विवाहानंतरचे / पूर्वीचे नाव कंसात छापण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएमवर नाव मुद्रित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा व विहीत फॉडचा वापर होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात आल्यामुळे राजकारणातील महिलांचा सहभाग वाढत आहे. महापालिका, जिल्हा परिषद नगरपालिका किंवा ग्रामपंचायत असो सर्व ठिकाणी सभागृहामध्ये निम्म्या महिला दिसत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणुकीसाठी दुसर्या फळीतील कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला वाटत असते आपला मतदारसंघ सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राहावा म्हणून; परंतु तसे होत नाही. महिलांसाठी प्रभाग आरक्षित झाला तर तयारी करणारे कार्यकर्ते शक्यतो आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवत असल्याचे दिसते. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना मतदार यादीत जे नाव असेल त्याच नावाने उमेदवारी अर्ज भरावा लागतो. मतदार यादीत लग्नानंतरचे नाव लावण्यात येते. उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागणार्या कागदपत्रावर मात्र लग्नापूर्वीचे नाव असते. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणार्या विवाहित महिलांनी नामनिर्देशन पत्रांवर विवाहापूर्वीचे नाव किंवा विवाहानंतरच्या नावांपैकी नेमके कोणते नाव नमूद करावे, याबाबत संभ्रम असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्यामुळे यासंदर्भात नवीन आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.
अर्जासोबत हे पुरावे आवश्यकज्या नावाचा उल्लेख निवडणूक लढविण्यासाठी करावयाचा आहे, त्याच्या पुष्ठ्यर्थ विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध विवाहानंतरचे नाव आदी सादर करणे अनिवार्य आहे. सदर राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदाराने मतदान करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये १७ पुराव्यांपैकी महिला उमेदवारास हव्या असलेल्या नावासहित छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. यावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.