Friday 16 December 2022

थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी रविवारी 18 डिसेंबरला मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींचा समावेश

पुणे जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तर विविध 79 सदस्य पदासाठी एकही अर्ज नाही

महिलांना मासवडी तर पुरुषांना बिर्याणीची खैरात


पुणे- थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी रविवारी उद्या (18 डिसेंबरला) मतदान होणार असून प्रचाराची सांगता आज झाली यामध्ये पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज आलेला नाही आणि जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ७९ सदस्यपदासाठी एकही अर्ज नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून या जागा रिक्त राहणार आहेत. अर्ज दाखल झाला नसल्याची प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात आहेत. संगणक प्रणाली सदोष होती व निवडणूक पूर्व तयारीतील उदासीनता आवश्यक कागदपत्रांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींमध्ये शहरालगतच्या गावांमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला. मतदारांसाठी बक्षिसांची मेजवानी आणि मार्गशीर्ष महिना असल्यामुळे महिलांना मासवडीचे जेवण तर पुरुषांना चिकन व मटण बिर्याणी जेवणाचा बेत आयोजित करून निवडणुकीतील रंगत वाढली आहे. ऐन गुलाबी थंडीत राजकारण तापले आहे. ज्या ठिकाणी एका जागेसाठी जास्त अर्ज आले आहेत, अशा ठिकाणी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. झालेल्या मतदानाची मतमोजणी २० डिसेंबरला प्रत्येक तालुकास्तरावर केली जाणार आहे.
         राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या रविवारी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात आले. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी झाली. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल तर नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751 असे आहे.
       पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने त्या गावचे सरपंचपद रिक्तच राहणार आहे. त्यामुळे १६७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी रविवारी मतदान होईल. पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी व त्याअंतर्गत येणाऱ्या १८५३ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी सरपंचपदाच्या ४९; तर सदस्यपदाच्या ७१२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर ७९ सदस्यपदासाठी एकही अर्ज आला नाही त्यामुळे उर्वरित १०६२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी गेली दहा दिवस जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान जेवनावळीचा बेत व पार्ट्या जवळपास सर्वच उमेदवारांनी आयोजित केल्या आहेत. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे महिलांना मासवडीचे जेवण तर पुरुषांना चिकन व मटण बिर्याणी जेवणाचा बेत आयोजित केला जात आहे. मतदारांची बडदास्त ठेवली जात आहे. सोशल मिडियावार स्टेट्सवर फोटो, व्हिडिओ व माहितीपत्रके पाठवून प्रचार केला जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेड तालुक्यातील बाराशे बहात्तर मतदार संख्या असलेल्या आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या साकुर्डी गावात हजेरी लावली. 'योग्य व चांगल्या उमेदवारांना निवडून द्या,' असे या वेळी जाहीर आवाहन त्यांनी केले. खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या उशालगत दुर्गम भागातील १६७६ लोकसंख्या व १२७२ मतदार संख्या असलेल्या साकुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तीन वॉर्डमधून नऊ सदस्य व लोकांमधून सरपंच निवडून देण्यासाठी एकासएक पद्धतीने दोन पॅनेलमध्ये निवडणुकीची सरळ लढत होत आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यात पारगावतर्फे खेड, लांडेवाडी-चिंचोडी-शेवाळवाडी व निघोटवाडी या तीन ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या आहेत. पारगावतर्फे खेड येथे सरपंचपदासाठी नवखंडबाबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार सुरेखा बाळासाहेब सावंत विरुद्ध श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार नंदा सचिन पानसरे यांच्यात मुख्य लढत आहे. येथे वॉर्ड एकमध्ये सदस्यपदासाठी नवखंडबाबा पॅनेलकडून रामदास जाधव, सोनाली सावंत, प्रशांत आचार्य यांच्या विरुद्ध भैरवनाथ पॅनेलचे सुरेश अभंग, शीतल पठारे, किशोर कंगने हे उमेदवार आहेत. वॉर्ड दोनमध्ये नवखंडबाबा पॅनेलच्या गणेश चिखले, उषा पालेकर, सुनीता भागडे यांच्या विरुद्ध भैरवनाथ पॅनेलचे रामदास चिखले, वैशाली भागडे, सविता भागडे व अपक्ष श्यामराव भागडे हे रिंगणात आहेत. वॉर्ड तीनमध्ये नवखंडबाबा पॅनेलच्या बेबी कोळेकर विरुद्ध भैरवनाथ पॅनेलच्या प्रशांत पवार, सुवर्णा पवार, पुनम बागल, अपक्ष श्यामराव भागडे हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड चारमध्ये नवखंडबाबा पॅनेलचे मच्छिंद्र मनकर, त्रिवेणी मनकर, मंगल पारधी विरुद्ध भैरवनाथ पॅनेलचे अमोल मनकर, रूपाली मनकर, कल्पना दुधवडे, असा सामना आहे. चिंचोडी- लांडेवाडी, शेवाळवाडी ग्रामपंचायतीत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाच्या उमेदवार संगीता शेवाळे विरुद्ध श्री कुलस्वामी खंडेराया पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार रोहिणी शेवाळे यांच्यात लढत आहे. येथे वॉर्ड एकमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या शशिकला मलिक या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर, सचिन शेवाळे, सतीश शेवाळे यांच्या विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनेल गणेश शेवाळे, अशी लढत आहे. वॉर्ड दोनमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या लतिका शेवाळे, सचिन ढेरंगे, अंकुश शेवाळे यांच्या विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनेलच्या पूजा शेवाळे, समीर ढेरंगे, वसंत शेवाळे, असा सामना आहे. वॉर्ड तीनमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या संदीप बोकड, अंकिता शेवाळे विरुद्ध कुलस्वामी पॅनेलच्या सुमन वाघ, रोहिणी शेवाळे, अशी लढत आहे. वॉर्ड चारमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या शांताबाई खंडागळे, शितल पानसरे विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनल सुमन वाघ, विद्या लांडे, असा सामना आहे. वॉर्ड पाचमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या अंकुश लांडे, आशा शेवाळे, ऊर्मिला शेवाळे विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनेलच्या रविराज शेवाळे, सुनीता खंडागळे, अंजना भांगे, अशी लढत आहे. निघोटवाडी येथे सरपंचपदासाठी जय हनुमान ग्रामविकास पॅनेलचे नवनाथ निघोट व जय श्री कृष्ण ग्रामविकास पॅनलचे सचिन निघोट यांच्यात लढत आहे. येथे वॉर्ड एकमध्ये जय हनुमान पॅनेलच्या दीपाली निघोट, महेंद्र घुले, मनीषा मोहिते विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलचे अक्षय रेणके, कोमल थोरात, उषा चव्हाण, अशी लढत आहे. वॉर्ड दोनमध्ये जय हनुमान पॅनेलच्या सीमा निघोट, नीलेश निघोट, विनोद निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या सोमनाथ निघोट, सारिका निघोट, बाळासाहेब निघोट यांच्यात सामना आहे. वॉर्ड तीनमध्ये जय हनुमान पॅनेलच्या वर्षा निघोट, चेतन निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या राजेंद्र निघोट, कमल पारधी यांच्यात लढत आहे. वॉर्ड चारमध्ये जय हनुमान पॅनेलच्या अरुणा चिंचपुरे, वर्षा निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या उषा चिंचपुरे, वामन जाधव, असा सामना आहे. वॉर्ड पाचमध्ये जय हनुमान पॅनेलच्या निशा निघोट, संदीप निघोट, कल्याणी निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या संदीप निघोट सोनल सावंत, असा सामना आहे. दरम्यान पूर्व हवेलीतील वाघोली मंडलाधिकारी कार्यक्षेत्रातील पेरणे, बुर्केगाव, पिंपरी सांडस, आव्हाळवाडी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावरच उमेदवार व कार्यकर्त्यांनी भर दिला. या प्रचारात सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा सातत्याने प्रयत्न सुरु होता. तर, प्रत्यक्ष गाठीभेटीसह पदयात्रा, रॅली, प्रचार वाहनाद्वारेही प्रभावी प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावरच उमेदवार व कार्यकर्त्यांनी भर दिला. वाघोली मंडलाधिकारी कार्यक्षेत्रात १७ सदस्यसंख्या असलेल्या पेरणे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी पाच; तर १३ सदस्य संख्या असलेल्या आव्हाळवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी दोन उमेदवार नशीब आजमावत आहेत. ११ सदस्यसंख्येच्या पिंपरी सांडसमध्ये चार; तर ९ सदस्यसंख्या असलेल्या बुर्केगाव ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी दोन उमेदवारांनी चुरशीने प्रचार केला. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारात लढत होत आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष व विद्यमान सरपंच नंदकुमार काळभोर यांच्या पत्नी मनिषा तर भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्या गौरी गायकवाड सरपंचपदासाठी एकमेकासमोर उभ्या ठाकल्या आहेत. तर विरोधात कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच देवीदास काळभोर यांनी आपली पत्नी सुनंदा काळभोर यांना रिंगणात उतरवले आहे. तर या तिघांच्यासह सुजाता रायगोंडा गायकवाड यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. मावळ भागातील नऊ ग्रामपंचायतींचा या यादीत समावेश आहे. मावळ तालुक्यातील सावळा, देवले, भोयरे, शिरगाव, वरसोली, इंदोरी, कुणे नामा, निगडे, गोडुंब्रे या गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत. तर बारामती तालुक्‍यात एकूण 13 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यामध्ये मोरगाव, वागळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व पळसी अशा एकूण 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.