दिव्यांगाच्या कार्यसिद्धीने पावन झालेल्या तपोभूमीत येण्याचे भाग्य आनंददायी- किरण डी. एम.
पुणे - दिव्यांगाच्या स्वावलंबी जीवनासाठी निरंतरपणे मार्गदर्शन व सेवा करण्याचे कार्य करणाऱ्या या संस्थेमध्ये येऊन दिव्यांगाच्या कार्यसिद्धीने पावन झालेल्या या तपोभूमीत येण्याचे भाग्य आनंददायी असल्याचे प्रतिपादन ओएनजीसी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम. यांनी केले. ते दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवडी येथे आयोजित वार्षिकोत्सव व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, विशिष्ट हेतू ठेवून समाजामध्ये बहुतांश सामाजिक प्रकल्प राबविले जातात मात्र या संस्थेतील कार्य पाहून मी थक्क झालेलो आहे. निस्वार्थीपणे निरंतरपणे दिव्यांगाच्या स्वावलंबी जीवनासाठी गेली 66 वर्ष कार्यरत राहणे म्हणजे एक प्रकारची दीर्घकालीन तपशर्याच असून या तपोभूमीत येण्याचे भाग्य मला मिळाले त्यामुळे मी अतिशय आनंदी आणि प्रभावित झालेलो आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करून ओएनजीसी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम. पुढे म्हणाले कि, मी विविध प्रात्यक्षिकांचे फोटो काढून माझ्या मित्रांना पाठवले, त्यांच्याकडून यामध्ये वेगळे काय असा प्रतिप्रश्न असलेला प्रतिसाद आल्यावर मी फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेले असा संदेश पाठवला तर क्षणार्धात कौतुकास्पद प्रतिक्रियांचे मेसेज आले. अतिशय अप्रतिम प्रात्यक्षिक केली त्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. ओएनजीसी फाउंडेशनचे वतीने संस्थेच्या आगामी विस्तारित शैक्षणिक संकुल इमारत व वसतिगृह इमारत उभारणी प्रकल्पासाठी भरघोश आर्थिक मदतीचे त्यांनी आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध वस्तू विशारद (आर्किटेक्ट) श्री. अविनाश नवाथे, प्रमुख पाहुणे म्हणून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.(ओएनजीसी) फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम. आणि मॅप्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मयूर वोरा उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार तथा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे, उपाध्यक्षा डॉ. स्मिता जोग, मानद सचिव रवींद्र हिरवे, हिमाद्री कुंडू, सुषमा सारोळकर, मुख्याध्यापिका शिवानी सुतार, अर्पणा नायक व संस्कार वर्गातील शिक्षक, विद्यार्थी पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर संस्थेची पाहणी केली, दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले त्यानंतर संघटन मंत्र, स्वागतगीत, विविध प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रम, सांघिक गीत या कार्यक्रमाने प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर मंत्रमुग्ध झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेले मानवी मनोरे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र संस्थेच्या कार्याची माहिती देऊन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या आगामी विस्तारित शैक्षणिक संकुल इमारत व वसतिगृह इमारत उभारणी प्रकल्पाची माहिती त्यांनी दिली. पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.स्मिता जोग यांनी केले. प्रमुख पाहुणे यांचा परिचय करताना डॉ.स्मिता जोग यांनी सांगितले की, श्री. किरण डीएम यांना 25 वर्षांपेक्षा जास्त कॉर्पोरेट अनुभव आहे आणि त्यांना ग्रास रूट सामाजिक संस्थांसह सखोल अनुभव आहे. ओएनजीसी फाऊंडेशनसाठी सीईओ पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी किरण हे युथ फॉर सेवाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते सेंटर फॉर लीडरशिप अँड मॅनेजमेंट इन पब्लिक सर्व्हिस (C-LAMPS) चे संस्थापक सदस्य होते, जिथे त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात विकासात्मक प्रकल्पांसाठी जबाबदार पदे त्यांनी भूषवली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध वस्तू विशारद (आर्किटेक्ट) श्री. अविनाश नवाथे यांनी दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आगामी काळातील विस्तारित शैक्षणिक संकुल इमारत व वसतिगृह इमारत उभारणी कार्यात त्यांनी योगदान देण्याचे आश्वासन दिले तर मॅप्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मयूर वोरा यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
या प्रसंगी दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवडी या संस्थेच्या वतीने वार्षिकोत्सव व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने अनुक्रमे वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालय पुणे, श्री संतोष बोळगे श्रीगोंदा, संस्थेत शिक्षण घेतलेल्या आणि सध्या वैद्यकीय उच्च शिक्षण घेत असलेल्या कु. अनिता चाकणकर पुणे, आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट प्रशिक्षण घेणारे प्रसिद्ध दिव्यांग प्रशिक्षक श्री. प्रणव ज्ञानदेव राजळे संभाजीनगर औरंगाबाद यांच्या सह अन्य मान्यवरांना दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्काराने प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आभार प्रदर्शन व कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
"महाराष्ट्रातील राजकारण"
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.