बांधकामे शिस्त आणि वाढीव मिळकत करावरील नाराजीचे राजकारण विभाजनास कारणीभूत! विकासकामांना ब्रेक
नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील कर आकारणी दरामध्ये तफावत नाही तसेच नियमावलीत देखील समानता असल्याने फुरसुंगी-उरुळी नवीन नगरपालिकेचा निर्णय म्हणजे 'आगीतून फुफाट्यात पडणं' या उक्तीप्रमाणे घटनाक्रम घडत आहे. बांधकामे शिस्त आणि वाढीव मिळकत करावरील नाराजीचे राजकारण विभाजनास कारणीभूत ठरले असून ठराविक उद्देशाने घेतलेल्या राजकीय निर्णयाचे दूरगामी परिणाम या भागातील विकासकामांवर होणार असून सुरु असलेल्या विकासकामांना ब्रेक लागल्याने रहिवाशांचेच नुकसान होणार आहे. स्वतंत्रपणे नगरपालिका केल्यावर अल्प कर आकारणी होईल हे स्वप्न असून त्याचा प्रत्यय आगामी काळात स्थानिकांना येईलच. मात्र राजकीय दृष्टीकोनातून ठराविक लोकप्रतिनिधीना लाभ होणार आहे. ग्रामपंचायतच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात पुरेसे स्थानिकांना लोकप्रतिनिधीत्व मिळत नाही मात्र नगरपालिका क्षेत्रात पुरेसे स्थानिकांना लोकप्रतिनिधीत्व मिळेल मात्र विकासनिधी पुरेसा प्राप्त व निर्माण होणार नाही. फुरसुंगी-उरुळी नवीन नगरपालिकेचा निर्णयवर अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्कामोर्तब होईल मात्र महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचना नव्याने स्थापित झालेल्या सरकारने पूर्वीप्रमाणे 4 सदस्यीय प्रभाग प्रमाणे करण्याचा घाट बांधला आहे त्यामुळे राष्ट्रवादीने प्रभाग रचना बदलास विरोध करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्या निर्णयावर देखील या नवीन नगरपालिकेच्या निर्णयाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी जानेवारी मध्ये असून त्या निर्णयाचा देखील परिणाम नवीन नगरपालिकेच्या प्रक्रियेस होणार आहे. या सर्व राजकारणात या भागातील विकासकामे मात्र बंद होणार असल्याने नुकसान स्थानिक रहिवाशांचेच होणार आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे एक लाख इतकी लोकसंख्या आहे. 2 गावे मिळून नुकतीच 2 प्रभाग रचना अंतिम करण्यात आलेली होती. प्रभाग क्र 45 फुरसुंगी (लोकसंख्या 55957) आणि प्रभाग क्र 46 महंमदवाडी - उरुळी देवाची (लोकसंख्या 52720) अशी रचना करण्यात आलेली होती. महापालिकेत समावेश केल्यानंतर या दोन्ही गावांच्या विकासाकामांना वेग आला होता. मात्र महापालिकेत समावेश करुनही पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. विविध विकासकामांना गती मिळत असताना केवळ काही दुराग्रही नेते आणि त्यांची दिशाभूल करणाऱ्या ग्रामस्थांच्या अनाठायी हट्टापायी या दोन गावांच्या नगरपालिकेचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. या दोन्ही गावांमधून रिंग रोड जाणार आहे; तेथे नगररचना योजना प्रस्तावित आहेत; पण भविष्यातील विकासासाठी दूरदृष्टीने निर्णय घ्यावे लागतात. त्याऐवजी अल्पहित नजरेसमोर ठेवून कोणतेही तर्कशास्त्र न लावता घाईघाईने घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होण्याची शक्यता आहे. नव्या महापालिकेसाठी संपूर्ण पूर्व भागाचा विचार करण्याऐवजी केवळ दोन गावांसाठी झालेली ही नगरपालिका ग्रामस्थांसाठी आगामी काळात ओझे ठरेल. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या गावासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याती मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन गावे महापालिकेतून वगळण्यात आल्यामुळे गावांवर आता कोणताही खर्च महापालिकेला करता येणार नाही हे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट गावांना पूर्वीच्या कर आकारणी पेक्षा नव्याने मिळकत आकारणी दर अवाजवी वाटत असल्याची संतप्त भावना आणि अनधिकृत बांधकामे कारवाई वरील बडगा तसेच नवीन बांधकाम नियमावली शिस्त डोईजड वाटत असल्याने निर्माण झालेल्या नाराजीचे स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या राजकारणातून विभाजनाची संकल्पना समोर आली. पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत या गावांना खूप महत्व असून या गावातील नागरीकांच्या मतावरच आमदार ठरत असतो आणि हाच कळीचा मुद्दा आहे. आगामी निवडणुकीत पुरंदरचे माजी आमदारांना पुन्हा निवडून येण्यासाठी या भागाची सहानुभूती व वर्चस्व मिळवणे गरजेचे आहे म्हणूनच राजकीय दृष्टीकोनातून पुणे महापालिकेचे विभाजन करून फुरसुंगी-उरुळी नवीन नगरपालिकेचा निर्णय एकतर्फी घेण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकासकामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर आणि मूलभूत सोयी सुविधांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र काम करावं, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
"महाराष्ट्रातील राजकारण"
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.