Wednesday 24 January 2024

Maharashtra states final voter list राज्यात नवमतदारांच्या संख्येत वाढ

पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८० लाख ७३ हजार


पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन, तर ग्रामीण भागातील दहा अशा एकूण २१ विधानसभा मतदार संघांमधील मतदारांची संख्या ८० लाख ७३ हजार १८३ झाली आहे. तर राज्यात नवमतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. 
निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यानुसार मतदार यादी आज अंतिम करण्यात आली आहे. ही यादी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रावर तसेच निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच राजकीय पक्षांना देखील ही यादी देण्यात येणार आहे. मतदारांनी या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी. आपल्या तपशीलात काही बदल करायचा असल्यास विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी अद्ययावतीकरण प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत मतदारांची यादी अद्ययावत करण्यात आली असून, याबाबत आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी माहिती दिली. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात होण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण महत्त्वपूर्ण असते. या वर्षीच्या महत्वाच्या निवडणुकांसाठी मतदार यादी अद्ययावत करून, संकेतस्थळावर व मतदार केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच प्रारूप याद्या प्रसिद्ध करणार असून, मतदारांनी आपले नाव जुन्या मतदान केंद्रात नाव नसल्यास नजीकच्या मतदार केंद्रात असल्याची खात्री करून घ्यावी किंवा व्होटर हेल्प लाईन ॲपवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडावा व आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी. मतदार ऑनलाईन पद्धतीनेही नाव नोंदवू शकतात त्याचाही मोठ्या प्रमाणात मतदारांनी वापर करावा.  ज्या युवकांचे वय एप्रिल महिन्यात १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा तरुणांनी आगाऊ नोंदणी करण्यात सांगितले होते. त्यांनाही एप्रिल नंतर मतदान करता येणार आहे. यामुळे मतदारांच्या संख्येत वाढ होणार असल्याचेही श्री. देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३  प्रारुप मतदार यादीत २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतकी झालेली आहे. त्यानुसार १ लाख ०१ हजार ८६९ पुरुष मतदार तर ३ लाख ०८ हजार ३०६ स्त्री मतदारांची आणि ५७२ तृतीयपंथी मतदारांची वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९१७ वरून ९२२ इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये ६ लाख ७० हजार ३०२ मतदाराची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात ८ लाख ३३ हजार ४९६ मतदारांची वाढ झालेली आहे.  प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ३ लाख ४८ हजार ६९१ (०.३८ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत १० लाख १८हजार ९९३ (१.१२ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या १ कोटी ५५ लाख ११ हजार ३७६ (१७.८ टक्के) होती, ती अंतिम यादीत १ कोटी ६३ लाख ४४ हजार ८७२ (१७.९१ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरामुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. या सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली.
त्यानुसार ११ लाख ६० हजार ६९६ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यापैकी ऐंशीपेक्षा अधिक वय असलेले ४ लाख ९२ हजार ३९५ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याची नावेही वगळण्यात आलेली आहेत, त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये ९ लाख ०५ हजार ५५९ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज, PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत २ लाख ८४ हजार ६२० मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज DSE) २ लाख ५४ हजार ४६० मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून ७४ हजार ४२६ मतदाराची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदाराच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशिररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.
यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरामध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले, नाशिक, वाशीम, हिंगोली, कोल्हापूर, ठाणे, नांदेड, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, यवतमाळ, नागपूर, अकोला, धाराशिव, जालना, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, वर्धा, अमरावती, सांगली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ही शिबिरे घेण्यात आली होती. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण १६ हजार ४४३ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली.
यंदाच्या अंतिम मतदार यादीत कातकरी (काथोडी), माडिया गोंड, कोलाम या समूहातील ३८,८७६ मतदारांचा समावेश आहे. दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  शहरी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांतील १५० मतदान केंद्रे ही मोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये ठेवण्यात आलेली आहेत, त्यामुळे शहरी भागातील मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा आहे. २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’ या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले.

पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर;तरुण मतदारांची संख्या वाढली

पुणे- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जाहीर केली. जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत १ लाख ७५ हजार  ५९९ मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या  ९७ हजार ३५० पेक्षा अधिक आहे. १८-१९ वयोगटातील ४५ हजार आणि २०-२९ गटातील ६५ हजार ९८४ नवमतदारांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या ७९ लाख ५१ हजार ४२० होती, तर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाआधी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ८० लाख ७३ हजार १८३ होती. प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणीची सुविधा, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या ८१ लाख २७ हजार १९ एवढी झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत पुरुष मतदारांच्या संख्येत ७८ हजार ४९, तृतीयपंथी मतदार २००, परदेशातील मतदार ५७, सैन्य दलातील मतदारांच्या संख्येत ७ ने वाढ झाली आहे. तर दिव्यांग मतदार संख्या ९ हजार २६७ आणि ८० वर्षावरील मतदार संख्येत ३४ हजार १४१ एवढी घट झाली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत १८-४९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार २९९ मतदार वाढले, तर ५० वर्षावरील मतदारांच्या संख्येत ८७ हजार ४६३ एवढी घट झाली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तृतीयपंथी मतदारांची संख्या ६९५ ने वाढली आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे, प्रक्षेपित लोकसंख्यनुसार विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येनुसार मतदार नोंदणी करुन घेणे आणि वगळण्याबाबत नियोजन, समाजातील भटक्या व विमुक्त जाती, महिला, तृतीयपंथी व्यक्ती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर भर, मतदार यादी शुध्दीकरणाच्या अनुषंगाने मयत, दुबार स्थलांतरील मतदारांची पडताळणी योग्यरित्या करण्यासाठी मोहिम स्तरावर काम केल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले आहे.
नवमतदार नोंदणीसाठी सामाजिक संस्था, महाविद्यालयांचे सहकार्य
१८-१९ वयोगटातील मतदार नोंदणीस मोठ्या प्रमाणात वाव असल्याने १०५ महाविद्यालयात निवडणुक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय परिसरातच ऑनलाईन मतदार नोंदणी करून घेण्यात आली. वर्शीप अर्थ फाऊंडेशनच्या मदतीने कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत मतदार नोंदणीचे महत्व आणि प्रक्रीया पोहोचविण्यात आली. निवडणूक साक्षरता मंडळाच्या अंतर्गत १०६ महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे एकाच दिवशी आयोजन करण्यात येऊन शिबीरामधून सुमारे १८ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्हा निवडणूक कार्यालय व वुई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एकूण ८७ महाविद्यालयांमधून १४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १४ हजार ८१६ अर्ज भरून घेण्यात आले.
तरुण मतदारांच्या संख्येत ६५ हजारांची वाढ
२०-२९ वयोगटातील नवमतदार नोंदणीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात आला. रेडीओ जॉकी संग्राम खोपडे यांची मतदार जागृती दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांनीदेखील व्हिडीओ संदेशाद्वारे मतदारांना नोंदणीसाठी आवाहन केले. पदव्युत्तर महाविद्यालयातही नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याने प्रारुप मतदार यादीच्या तुलनेत या वयेागटातील मतदारांच्या संख्येत ६५ हजार ९८४ एवढी वाढ झाली.
मतदारांचे लिंग गुणोत्तर वाढले
महिला मतदार नोंदणीसाठी गावोगावी असलेल्या बचत गटांमार्फत महिलामध्ये मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यासोबत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत महिला मतदारांचे असलेले ९०८ चे लिंग गुणोत्तर, २७ ऑक्टोबर २०२३ अखेर ९१० झालेले होते व अंतिम मतदार यादीत हे लिंग गुणोत्तर ९१५ आहे.
वयोवृद्ध मतदारांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष भेटीवर
घरोघरी पडताळणी मोहिमेत नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी मयत मतदार यांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांच्या बाबतीत वारंवार आढावा घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करणेत आली. ज्या मयत मतदारांचे मयताबाबतचे पुरावे प्राप्त होऊ शकत नव्हते त्यांच्या बाबतीत जन्म मृत्यु नोंदणी विभागाकडून मागील ५ वर्षातील माहिती उपलब्ध करुन घेऊन मयत मतदार वगळणीचे काम करण्यात आले. जागेवर न आढळणाऱ्या आणि स्थलांतरीत मतदारांची केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करुन वगळणी करण्यात आली. या मोहिमेत ९१ हजार ६७० इतके मयत ३७ हजार ४२० इतके स्थलांतरीत मतदार आढळून आले.
मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत ८०+ वयोगटातील मतदारांची पडताळणी करुन हयात नसलेल्या मतदारांची मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील तरतुदी व मुख्य निवडणूक आयोगाने वेळोवळी दिलेल्या निर्देशानुसार वगळणी करणेत आली. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत एकुण १ लाख ७१ हजार ८१७ इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली.
दुर्लक्षित घटकांसाठी मतदार नोंदणी 
तृतीयपंथी मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण यांना समन्वय अधिकारी नेमून त्यांचे मार्फत स्वयंसेवी संस्थेच्या बैठका घेण्यात आल्या. नोंदणीकृत असलेल्या तृतीयपंथी व्यक्तींची यादी प्राप्त करुन घेऊन त्यांच्या मतदार नोंदणीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालय व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टीव्हीज पुणे यांचे संयुक्त विद्यमाने शिबिरांचे आयोजन करण्यात आले, सिग्नलवर तृतीयपंथी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. पुणेरी प्राईड संस्था आणि रोटरी क्ल्ब ऑफ पुणेच्या सहकार्याने ढमढेरे बोळ, बुधवार पेठ येथे तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करणेसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून २०० तृतीयपंथी व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यात आली. ५ जानेवारी २०२३ रोजी ४९५ इतकी नोंद असलेल्या तृतीयपंथी मतदारांची संख्या ६९५ इतकी झाली आहे. भटक्या व विमुक्त जमातीतील मतदार नोदंणीसाठी सामाजिक संस्थांच्या सहाय्याने २१ एवढी शिबीरे घेण्यात आली व त्याअंतर्गत ४३५ मतदारांची नोंदणी करण्यात आली.
५० हजारावर दुबार मतदारांची नावे वगळली
मतदार यादी शुद्धीकरणाच्या अनुषंगाने समान छायाचित्रे असलेली व दुबार नावे असलेली ५० हजारावर नावे वगळण्यात आली आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मतदार नोंदणी अधिकारी यांनी दैनदिन आढाव्यात त्रुटी व अडचणींचे निराकारण करुन आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून समान छायाचित्रे असलेली ४० हजार ३९० आणि १० हजार २०४ दुबार नावे वगळली आहेत.
जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील नवनर्मित सहकारी गृहनिर्माण संस्थाचा मतदार नोंदणीत सहभाग वाढविण्यासाठी शहर भागातील १९ हजार ६८५ व ग्रामीण भागातील ३ हजार ४०४ संस्थांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष व पत्राद्वारे संवाद साधला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत हिंजवडी येथे या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेअंतर्गत ३५ हजार ३३६ अर्ज रहिवाश्यांकडून भरून घेण्यात आले.
मतदार नोंदणी प्रक्रीया २३ जानेवारीनंतरही सुरू राहणार आहे. पात्र मतदारांनी यादीत आपले नाव नसल्यास नमुना क्र.६ चा अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या मतदान केंद्रावर भरावा. मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप किंवा भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करावा. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आणि राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींद्वारे मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
मतदारांची संख्या वाढलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हडपसर, खडकवासला, कोथरूड, वडगाव शेरी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, मावळ, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड आणि शिरूर आदींचा तर, मतदार संख्या कमी झालेल्या मतदारसंघांमध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड, कसबा, कँटोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची आकडेवारी

जुन्नर विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 8 हजार 439
आंबेगाव विधानसभा मतदारसंघ- 2 लाख 98 हजार 598
खेड विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 45 हजार 35
शिरूर विधानसभा मतदारसंघ- 4 लाख 29 हजार 818
दौंड विधानसभा मतदारसंघ- 2 लाख 99 हजार 260
इंदापूर विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 18 हजार 924
बारामती विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 64 हजार 40
पुरंदर विधानसभा मतदारसंघ- 4 लाख 14 हजार 690
भोर विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 97 हजार 845
मावळ विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 67 हजार 779
चिंचवड विधानसभा मतदारसंघ- 5 लाख 95 हजार 408
पिंपरी विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 64 हजार 806
भोसरी विधानसभा मतदारसंघ- 5 लाख 35 हजार 666
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ- 4 लाख 52 हजार 628
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ- 2 लाख 72 हजार 798
कोथरूड विधानसभा मतदारसंघ- 4 लाख 1 हजार 419
खडकवासला विधानसभा मतदारसंघ- 5 लाख 21 हजार 209
पर्वती विधानसभा मतदारसंघ- 3 लाख 34 हजार 136
हडपसर विधानसभा मतदारसंघ- 5 लाख 62 हजार 186
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ- 2 लाख 69 हजार 588
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ- 2 लाख 72 हजार 747

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.