Monday 29 July 2024

maharashtra assembly election 2024; विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम

लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा होणार गाजावाजा


विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच सत्ताधारी महायुती सरकारकडून देखील विविध लोकाभिमुख योजनांची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तब्बल 270 कोटींची तरतुदीकरून त्याबाबत शासन निर्णय परिपत्रक आज जारी केलेले आहे. लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा गाजावाजा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्याचा निर्णय कितपत लाभदायक ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. 

सामान्य प्रशासन विभागाकडून सन २०२४-२5 या आर्थिक वर्षात (जुलै ते मार्च या कालावधीत) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी माध्यम आराखडा तयार करण्यास व त्यासाठी येणाऱ्या रु. २७० कोटी ०५ लक्ष इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन निर्णय सांकेतांक क्रमांक 202407291500404407 दिनांक 29-07-2024 रोजी जारी केलेला आहे. विविध लोकाभिमुख योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये मुख्यमंत्री-बहिण लाडकी योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आदी विविध योजनांचा समावेश असून या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी प्रचार मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्य सरकारकडून 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविली जात असून विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी या महत्वाकांक्षी मोहिमेत आहे. आगामी ६ महिन्यांच्या कालावधीत २७० कोटी खर्च करताना निवडणूक आचारसंहितेचे २ महिने वगळता उर्वरित कालावधीत प्रसिध्दी मोहिमेवर खर्चाची उधळपट्टी होणार आहे. अर्थातच निवडणूकपूर्वीच अंदाजित खर्चाचे बजेट संपुष्टात येऊ शकते. मुख्यमंत्री-बहिण लाडकी योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याचा अजून लाभार्थ्यांना लाभ प्रत्यक्षात मिळणे बाकी असतानाच राज्य सरकारकडून 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविली जात आहे त्यामुळे आगाऊ प्रसिद्धीचा नकारात्मक परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

राज्य सरकारच्या योजनांची माहिती जाहिराती मेट्रो व महानगर सार्वजिक बस स्थानक, रिक्षांवर लवकरच झळकणार आहेत. विशेष प्रसिद्धी अभियानांतर्गत वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडिओ, बाह्य व इतर माध्यमे, सोशल मीडिया, डिजिटल माध्यमांसह विविध नवीन माध्यमांद्वारे शासकीय योजनांची माहिती व जनजागृती केली जाणार आहे. योजनांची माहिती व जनजागृती करण्यासाठी अंदाजित खर्चाचा माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिनांक १२/०७/२०२४ च्या पत्रान्वये सादर केली होती.   

कोणत्या प्रसिद्धी माध्यम करिता किती अंदाजे रक्कम आहे याबाबत तपशील आपण जाणून घेऊयात यामध्ये शासकीय संदेशाची निर्मिती १ प्रिंट, ऑडिओ व्हिज्युअल, टीव्हीसी, सेलिब्रेटींसह टीव्हीसी, ऑडिओ, जिंगल्स/स्पॉट्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी इ.करीता रु.3,00,00,000/-(तीन कोटी रु) तर राज्यात आणि राज्याबाहेरील प्रमुख वर्तमानपत्रातील जाहिरातींसाठी 40,00,00,000/- (चाळीस कोटी रु) आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी 39,70,00,000/-(एकोणचाळीस कोटी सत्तर लाख रु.) तसेच बाह्य माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी १३६,३५,००,०००/-(एकशे छत्तीस कोटी पस्तीस लाख रु) यामध्ये होर्डिंग डिजिटल फ्लेक्स बॅनर, एसटी बस स्टेंट हार्डिंग्ज, एलईडी/एलसीडी/ईएसबी स्क्रीन्स, बेस्ट बसेस रॅप, शेल्टर (बीक्युएस), स्ट्रिट लाईट बँकलिट पोल्स, महानगरपालिकांच्या सिटी बस रॅप, साईड पॅनेल, रेल्वे स्टेशन्स एलईडी/एलसीडी स्क्रीन, मेट्रो रेल्वे स्टेशन्स, मेट्रो रेल्वे रॅप/पॅनेल, डिजीटल वॉल पेंटीग, विमानतळावरुन प्रसिद्धी (होर्डिंग, बोर्ड, युनिपोल) एलईडी, डिस्प्ले, विमानतळावरुन प्रसिद्धी (होर्डिंग, एलईडी, डिस्प्ले बोर्ड, विमानतळ टॅक्सी, ऑटो हुड/टॅक्सीवरुन प्रसिद्धी, गृहसंकुलामधून एलईडी एलबीटी यांचा समावेश आहे. आणि सोशल मीडिया/डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी रु.51,00,00,000/- (एक्कावन्न कोटी रु) खर्च तरतूद केली असून यामध्ये एसएमएस इ., मोठ्या प्रमाणात OBD कॉल, WhatsApp चॅटबॉट,WhatsApp संदेशन / प्रसारण केले जाणार आहे अशाप्रकारे एकूण 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविली जाणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीतील सर्व पक्ष आणि महाविकास आघाडीतील पक्ष आणि उर्वरित राजकीय पक्ष सामाजिक संघटना तयारी करीत आहेत. महायुतीतील प्रमुख राजकीय पक्ष असलेला भाजप २८८ जागांची चाचपणी करीत आहे तर शिवसेना शिंदे पक्षाकडून ९० जागांवर तयारी केली जात आहे तर राष्ट्रवादी अजित दादा गटाकडून ८०-९० विधानसभा मतदारसंघात तयारी केली जात आहे. महायुतीतील घटक पक्षांची मदार जागा वाटपावर आहे तरीही आपापल्या परीने विधानसभा निवडणुकांसाठी चाचपणी सुरु आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष आणि काँग्रेस कडून समसमान जागांवर वाटप करण्याची चर्चा होत आहे. 

तर अन्य तिसरी आघाडी तसेच उर्वरित राजकीय पक्ष सामाजिक संघटना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यामध्ये आमदार बच्चू कडू यांच्याकडून शेतकऱ्यांची आघाडी माध्यमातून २८८ जागा तर रविकांत तुपकर ३० ते ३५ जागांवर लढण्याची तयारी करीत आहेत. राजू शेट्टी, महादेव जानकर, माजी पोलीस आयुक्त पांडे यांच्यासह अन्य देखील रणनीती ठरवीत आहेत. मनसेकडून २५० जागांवर चाचपणी सुरु आहे तर वंचित बहुजन आघाडी देखील बहुतांश जागांवर निवडणुकांना सामोरे जाण्याची भूमिका ठेवली आहे. तसेच मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे पाटील यांचा २८८ जागा लढवायच्या की कोणाचे उमेदवारांना पाडून कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणावयाचे याचा खल अजून सुरु आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांचे सामाजिक आंदोलन काहीसे भरकटले आहे त्याचा कितपत परिणाम होईल हे आगामी काळात स्पष्ट होईलच. 

राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुका लढविण्याची रणनीती केलेली असल्याने योजनांना व्यापक प्रसिद्धी देण्याचा सरकारचा हेतू दिसून येतो मात्र विरोधकांकडून कसे प्रत्युत्तर मिळते यावरून या प्रसिद्धी खर्चाची उधळपट्टी सकारात्मक की नकारात्मक परिणाम करेल यावर अवलंबून असेल. 270 कोटींच्या विशेष प्रसिध्दी मोहिमेचे फलित आगामी विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट होईलच.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book



Sunday 21 July 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर यांच्या 'धडपड भाग २' पुस्तकाचे प्रकाशन

धडपड भाग २’ हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार



उद्योजक राजेश बाहेती यांच्यासह विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार


पुणे- ‘धडपड भाग २’ या पुस्तकात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींची यशोगाथा पत्रकार श्याम दौंडकर यांनी रेखाटली असून हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित  धडपड भाग दोन या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग खेसे होते. 

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद ढमाले, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, महावितरणचे मुख्य अभियंता  राजेंद्र पवार, उद्योजक अजित इंगवले, उद्योजक वर्धमान शहा, लेखक व जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, माजी सदस्य, बाबा जगदाळे, अर्जुन गरुड,  जेष्ठ पत्रकार व प्रकाशक चंद्रकांत भुजबळ, वाघोलीच्या सरपंच जयश्री सातव, माजी उपसरपंच राजेंद्र सातव, आपटे मोटर्स स्कूलचे अमेय आपटे, उद्योजक लक्ष्मण बालवडकर, उद्योजक अरुण गायकवाड अरुण येवले, गणेश देशमुख, एडवोकेट पी जे थोरवे, उद्योजक अरुण गायकवाड, राजेश बाहेती, प्रीतम साठे, गणेश दरेकर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, माजी अध्यक्ष विष्णू हिंगे, एडवोकेट अनिल रजपूत, पांडुरंग थोरवे, जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे, प्रकाश भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, धडपड भाग २ या पुस्तकात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील 140 व्यक्तींच्या कार्याचा समावेश आहे. हे पुस्तक वाचनीय असून त्यामध्ये चिकाटी, जिद्द व ध्येय उराशी बाळगून या व्यक्तींनी यश संपादन केल्याचे पाहायला मिळते.

गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या व्यक्तींच्या संघर्ष कथा श्री. दौंडकर यांनी सोप्या भाषेत मांडल्या आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी जिल्हा परिषद, ग्रामपंचायती येथील समस्यांचा  अभ्यास करून त्या योग्य रीतीने मांडल्या आहेत. नागरिकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शासनाने तरुण-तरुणी, शेतकरी, माता, भगिनी करिता विविध योजना  आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतील लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी ३ हजार रुपयांच्या लाभाचे वितरण केले जाईल.

महिलांना समृद्ध करणे, त्यांना आत्मबल देणे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे  मुख्य उद्दिष्ट आहे. कुटुंबाचे ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. गरीब व होतकरू लाभार्थ्यांना याचा लाभ होईल. योजना राबविताना त्यात सातत्य राहावे यासाठी भरीव तरतूद केली आहे. विविध लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये उद्योजक राजेश बाहेती, भगवान पासलकर, रिद्धी लेंडे, लक्ष्मण बालवडकर, विष्णू हिंगे स्वाती डिंबळे, समीर भूमकर, आदिनाथ साळवी , वर्धमान शहा, अरुण गायकवाड, अजित इंगवले, आदींचा समावेश होता. याप्रसंगी लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)चे "महाराष्ट्रातील रणसंग्राम" हे पुस्तक अ‍ॅड.संध्या भुजबळ यांनी वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जर‘चला जगाचा प्रवास करूया’ या सुनिता नेराळे यानी टुरिस्ट साठी तयार केलेल्या अत्यंत सुसज्ज अशा वाहनाची पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शैलेश गुजर यांनी केले. तर आभार जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक चंद्रकांत भुजबळ यांनी मानले.

अन्य समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी संबंधित लिंक-


धडपड भाग २’ हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
--------------------------------------------------
 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर यांच्या धडपड भाग २ पुस्तकाचे प्रकाशन ! 
--------------------------------------------------
‘धडपड भाग २’ हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल -उपमुख्यमंत्री अजित पवार
--------------------------------------------------
राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?; अजितदादांनी आकडा सांगितला
--------------------------------------------------
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर यांच्या 'धडपड भाग २' पुस्तकाचे प्रकाशन
--------------------------------------------------
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर यांच्या 'धडपड भाग २' पुस्तकाचे प्रकाशन
--------------------------------------------------
श्याम दौंडकर यांच्या 'धडपड भाग २' पुस्तकाचे प्रकाशन
--------------------------------------------------
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा The Public Voice
--------------------------------------------------
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
--------------------------------------------------
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
--------------------------------------------------

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book





Thursday 18 July 2024

Loksabha Election-2024 Expenditure; निवडणूक पक्ष निधी वाटपात दादाच नंबर वन तर खर्चातही सर्व उमेदवारांमध्ये सुनेत्रा वहिनींचीच बाजी

लोकसभेतील निवडणूक खर्चाचा उमेदवारांकडील अंतिम तपशील आयोगाकडून जाहीर 


पुणे- निधी वाटप आणि अजित दादा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच त्यांच्या समीकरणाची चर्चा होत असते. निधी वाटपात अजिबात हयगय करीत नसलेल्या दादांनी लोकसभा निवडणुकीत भरघोस पक्ष निधी उमेदवारांना देऊन अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत दादाच नंबर वन राहिल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. नुकत्याच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संपन्न झाल्या त्यामधील उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खर्चाची अंतिम आकडेवारी तपशील सादर केले ते जाहीर करण्यात आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक निवडणूक खर्च करण्यात देखील खासदार सुनेत्रा वहिनींचीच बाजी मारली असल्याचे खर्चातील तुलनात्मक तपशिलावरून दिसून येत आहे. सुनेत्रा वहिनींनी लोकसभा निवडणुकीत 93 लाख 89 हजार 799 इतका खर्च केल्याचे आयोगाला दिलेल्या हिशोबात दर्शवलेले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना 95 लाख रु. खर्च करण्याची निर्धारित मर्यादा निश्चीत केलेली आहे. त्यावर खर्च झाल्याचे निष्पन्न झाल्यास अपात्रतेची कारवाई निवडणूक आयोगाकडून केली जाते. राज्याचे अर्थमंत्री आणि पक्ष प्रमुखच अजित दादा स्वतःच असल्याने निवडणूक खर्च निधी वाटपात अजिबात हयगय केली नाही निर्धारित मर्यादा असलेली संपूर्ण रक्कमच 95 लाख रु. प्रत्येकी चारही उमेदवारांना त्यांच्या निवडणूक खर्च बँक खात्यात थेट वितरीत केली. एकमेव राष्ट्रवादी असा राजकीय पक्ष आहे की सर्वाधिक रक्कम उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी दिलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही असाच निधी वितरीत होणार याबाबत कोणालाही साशंका वाटण्याचे कारण नाही.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च केल्याचे दर्शवलेल्यांमध्ये राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा ताई पवार यांचा प्रथम क्रमांक लागतो. 90 लाखांच्या पेक्षा जास्त खर्च केलेल्या 7 उमेदवारांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ सुनेत्रा अजितदादा पवार (राष्ट्रवादी) 93,89,799/-अमरावती लोकसभा मतदारसंघ नवनीत राणा (भाजप) 92,93,160/-, अमरावती लोकसभा मतदारसंघ बळवंत वानखडे (कॉंग्रेस) 92,53,697/-, जालना लोकसभा मतदारसंघ दानवे रावसाहेब (भाजप) 91,01,268/-, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ सुनील मेंढे (भाजप) 90,21,416/-, रामटेक लोकसभा मतदारसंघ राजू पारवे (शिवसेना) 90,15,670/-, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ डॉ. प्रशांत पडोळे (कॉंग्रेस) 90,03,230/- यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक कमी निवडणूक खर्च केलेल्यांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ वैशाली दरेकर-राणे शिवसेना (उबाठा) 38,83,209/- इतका केलेला आहे तर विजयी उमेदवारांमध्ये तुलनात्मक दृष्टीने शिर्डी लोकसभा मतदारसंघ भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना (उबाठा) 44,64,698/- इतका निवडणूक खर्च सर्वाधिक कमी केलेला असल्याचे सादर केलेल्या तपशिलावरून दिसून येत आहे.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात सुप्रिया ताईनाच सर्वाधिक निवडणूक पक्ष निधी
राष्ट्रवादी पक्षाचे विभाजन झाल्याने स्वतंत्र राजकीय पक्ष मान्यते शिवाय अधिकृत देणगी स्वीकारण्याच्या अभावाने पैशाची म्हणजेच निवडणूक खर्चाची चणचण भासली असावी त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवतपणा असलेल्यांना उमेदवारी दिली तरीही सर्वाधिक यश मिळाले त्यामुळे पक्षाच्या निधीवरून काहीही अडत नाही हे या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने दर्शवून दिलेले आहे. पक्षाने 10 पैकी 7 उमेदवारांना निवडणूक पक्ष निधी दिलेला असून यामध्ये स्वताच्या घरचा पक्ष की काय त्यामुळे खासदार सुप्रिया ताईना सर्वाधिक 95 लाख 01 हजार इतका निधी त्यांच्या निवडणूक खर्च बँक खात्यात वर्ग केला. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक खर्च मर्यादा 95 लाख निर्धारित केलेली आहे हे सुध्दा त्यांचे पक्ष कार्यालयातील काम करणारे विसरून गेले असावेत. सुप्रिया ताईनी लोकसभा निवडणुकीत 87 लाख 96 हजार 904 इतका खर्च केल्याचे नमूद केलेले आहे. अन्य उमेदवारांमध्ये असमतोल असे किंबहुना गरजेनुसार निवडणूक पक्ष निधी दिलेला असावा असे वाटते. पक्षाने उमेदवारांच्या निवडणूक खर्च बँक खात्यात डॉ. अमोल कोल्हे यांना 70 लाख रु. व बजरंग मनोहर सोनवणे यांना 60 लाख रु. आणि अमर काळे यांना 50 लाख रु. तसेच भास्कर भगरे यांना 35 लाख रु. आणि निलेश लंके यांना 30 लाख रु. तसेच मोहिते-पाटील धैर्यशील यांना 30 लाख रु. निवडणूक पक्ष निधी दिल्याचे आयोगाला सादर केलेल्या हिशोबातून दिसून येत आहे. रावेर, सातारा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना पक्षाकडून काहीही निवडणूक निधी दिलेला नाही असे दिसून येत आहे.

ठाकरे यांच्या शिवसेनेतही निवडणूक पक्ष निधी वाटपात असमानता
लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात निवडणूक निधी वाटपात असमानता झाल्याचे अंतिम खर्च हिशोब सादर केला त्यामधील तपशिलावरून स्पष्ट होत आहे. 6 उमेदवारांना निवडणूक खर्च पक्ष निधी अजिबात दिलेला नसून सर्वाधिक पक्ष निधी अनिल देसाई यांना 85 लाख रु इतका दिलेला आहे. तर त्याखालोखाल अनंत गीते आणि विनायक राऊत यांना 75 लाख रु. तर संजय दिना पाटील यांना 60 लाख रु. आणि वैशाली दरेकर-राणे, नरेंद्र खेडेकर, भारती कामडी, करण पाटील-पवार, सत्यजीत पाटील सरूडकर, अरविंद सावंत, ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर, आष्टीकर पाटील नागेश , अमोल गजानन कीर्तिकर यांना प्रत्येकी 50 लाख रु. इतका पक्ष निधी दिलेला आहे.

काँग्रेस उमेदवार पक्ष निधी विनाच; देणगीतून खर्च
लोकसभा निवडणुकीत राज्यातील काँग्रेस उमेदवार पक्षाच्या निवडणूक निधी विनाच निवडणुकीला सामोरे गेले. अन्य पक्षांच्या तुलनेत केवळ काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे की या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला निवडणूक पक्ष निधी वितरीत केलेला नाही. फक्त सोलापूरच्या उमेदवार व नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांना जिल्हा शाखेतून 2 लाख 31 हजार 945 निधी दिलेला आहे. त्यांना देणगी स्वरुपात दिल्लीतून बड्या व्यावसायिकांनी व मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलने मिळून एकूण 73 लाख रु. असा भरघोस निधी दिलेला असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या अनुसूचित तपशील नमूद केलेला आहे. देणगी स्वरुपात अन्य उमेदवारांमध्ये नंदुरबार मतदारसंघातील पाडवी यांना 55 लाख 90 हजार तर पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 53 लाख 77 हजार 502 इतकी रक्कम निवडणुकीसाठी देणगीतून गोळा केलेली दर्शवलेली आहे त्यांचा एकूण निवडणूक खर्च 68 लाख 30 हजार 322 झाल्याचे अंतिम खर्च अनुसूचित नमूद केलेले आहे.  

दादांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारांना सढळ हाताने भरघोस निवडणूक निधी
निधी वाटपात उपमुख्यमंत्री अजित दादा अजिबात हयगय करीत नसतात हे लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारांना सढळ हाताने भरघोस निवडणूक निधी दिल्याने सिद्ध झालेले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व चारही उमेदवारांना प्रत्येकी 95 लाख रु. त्यांच्या निवडणुकीच्या बँक खात्यात निवडणूक पक्ष निधी वितरीत करून अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत वर्चस्व राखले आहे. दादांनी सढळ हाताने भरघोस निवडणूक निधी दिला तरीही खर्च करण्यात उमेदवारच कुठेतरी कमी पडले की काय अशी स्थिती समोर आलेली आहे. सुनेत्रा ताई मात्र निवडणुकीत खर्च करण्यात आघाडीवर राहिल्या आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत 93 लाख 89 हजार 799 इतका खर्च केल्याचे आयोगाला दिलेल्या हिशोबात दर्शवलेले आहे. तर प्रदेश अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी 65 लाख 53 हजार 359 तर शिवाजी आढळराव यांनी 86 लाख 64 हजार 853 आणि अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी 88 लाख 12 हजार 666 इतका खर्ची केल्याचे निवडणूक आयोगाला अंतिम हिशोबात नमूद केलेले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून सर्वाधिक निवडणूक पक्ष निधी
लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून निवडणुकीला उमेदवारांना पक्ष निधी वितरीत करताना असमतोल राखलेला असून राज्याचे मंत्री व लोकसभेला पराभवाचा सामना करावे लागलेले सुधीर मुनगंटीवार यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 80 लाख रुपयांचा निवडणूक पक्ष निधी दिलेली माहिती समोर आलेली आहे. त्यांनी निवडणुकीत केवळ 78 लाख 54 हजार 046 रु. खर्च केल्याचे दर्शवलेले आहे. भाजपने निवडणुक रिंगणात उतरवलेल्या निम्याच उमेदवारांना पक्ष निधी दिलेला असून कमी-जास्त पद्धतीने वितरीत केलेला असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या दैनंदिन निवडणूक खर्च नोंद हिशोबातून माहिती समोर आलेली आहे. तर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय मंत्री पियुष गोयल एकमेव उमेदवार आहेत की त्यांना केंद्रीय समिती कडून पक्ष निधी मिळालेला आहे. प्रदेश व केद्रीय पक्षाकडून त्यांना एकूण 75 लाख रु. निवडणूक निधी वितरीत केलेला होता. निवडणूक खर्च करण्यासाठी स्वतंत्र बँकेत खाते उघडावे लागते व त्यातून खर्च करावा लागतो अशा बँक खात्यात सदरील पक्ष निधी वितरीत केला जातो त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या विहित अनुसूचि क्र.8 मध्ये तपशील सादर करावा लागतो त्याप्रमाणे त्यांनी आयोगाला माहिती दिली यामध्ये वरील तपशील दिलेला आहे. पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीत 61 लाख 02 हजार 512 इतका खर्च झाल्याचा तपशील सादर केलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केवळ 6 लाख रु. पक्ष निधी दिलेला असून खासदार अनुप संजय धोत्रे यांना 65 लाख रु. तर उज्वल निकम, डॉ हिना विजयकुमार गावित, डॉ. भारती प्रवीण पवार, रामदास चंद्रभान तडस, मिहीर चंद्रकांत कोटेचा, राम विठ्ठल सातपुते, चिखलीकर प्रतापराव, श्रीमंत छ.उदयनराजे भोंसले, डॉ. सुजय विखेपाटील, भामरे सुभाष रामराव या उमेदवारांना प्रत्येकी 50 लाख रु. निवडणूक पक्ष निधी भाजपने दिलेला असून उर्वरीत उमेदवारांना काहीही निधी दिला नसल्याचे आयोगाला सादर केलेल्या अंतिम हिशोबावरून दिसून येत आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत निवडणूक पक्ष निधीचे उमेदवारांना समान वाटप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील बहुतांश उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी पक्ष निधीचे एकसमान पद्धतीने वाटप केल्याचे आयोगाला सादर केलेल्या तपशिलावरून दिसून येत आहे. केवळ औरंगाबादचे उमेदवार यांनी दिलेला पक्ष निधी दर्शवलेला दिसून येत नाही अन्य उर्वरित सर्व उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी प्रत्येकी 50 लाख 05 हजार 001 रु. इतका पक्ष निधी दिलेला आहे. त्यामधील नाशिकचे गोडसे यांच्या निवडणूक खर्च बँक खात्यात अन्य उमेदवारांपेक्षा 5 लाख रु रक्कम कपात केल्याचे दिसून येते. त्यांना 45 लाख 05 हजार 001 रु. इतका पक्ष निधी दिलेला आहे. निधी वाटपात असमानता नसावी हे धोरण केवळ शिवसेनेत पाळले आहे.

प्रमुख उमेदवार व त्यांनी केलेला लोकसभेतील एकूण खर्च

मतदारसंघ

विजयी उमेदवार व पक्ष

निवडणूक खर्च

1.नंदुरबार

गोवाल पाडवी(कॉंग्रेस)

4637348

2.धुळे

बच्छाव शोभा दिनेश(कॉंग्रेस)

6326272

3.जळगाव

स्मिता उदय वाघ(भाजप)

7742964

4.रावेर

खडसे रक्षा निखिल(भाजप)

6110648

5.बुलढाणा

जाधव प्रतापराव(शिवसेना)

6994210

6.अकोला

अनुप संजय धोत्रे(भाजप)

8772933

7.अमरावती

बळवंत बसवंत वानखडे(कॉंग्रेस)

9253697

8.वर्धा

अमर शरदराव काळे(राष्ट्रवादी) (एसपी)

7605055

9.रामटेक

श्यामकुमार (बाबालू) दौलत बर्वे(कॉंग्रेस)

7168728

10.नागपूर

नितीन जयराम गडकरी(भाजप)

6302565

11.भंडारा गोंदिया

डॉ. प्रशांत यादराव पडोळे(कॉंग्रेस)

9003230

12.गडचिरोली

डॉ. किरसन नामदेव(कॉंग्रेस)

6572920

13.चंद्रपूर

धनोरकर प्रतिभा सुरेश(कॉंग्रेस)

7778783

14.यवतमाळ

संजय उत्तमराव देशमुख(शिवसेना) (उबाठा)

15.हिंगोली

आष्टीकर पाटील नागेश (शिवसेना) (उबाठा)

7284838

16.नांदेड

चव्हाण वसंतराव बळवंतराव(कॉंग्रेस)

7111138

17.परभणी

जाधव संजय (बंडू) हरिभाऊ(शिवसेना (उबाठा)

7549358

18.जालना

कल्याण वैजिनाथराव काळे(कॉंग्रेस)

7762822

19.औरंगाबाद

भुमरे संदिपनराव आसाराम(शिवसेना)

8042792

20.दिंडोरी

भास्कर मुरलीधर भगरे(राष्ट्रवादी (एसपी)

6232858

21.नाशिक

राजाभाऊ प्रकाश वाजे(शिवसेना (उबाठा)

8088362

22.पालघर

डॉ. हेमंत विष्णू सावरा(भाजप)

8383930

23.भिवंडी

सुरेश गोपीनाथ म्हात्रे(राष्ट्रवादी (एसपी)

6995666

24.कल्याण

डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे(शिवसेना)

6433375

25.ठाणे

नरेश गणपत म्हस्के(शिवसेना)

6320581

26.मुंबई उत्तर

पियुष गोयल(भाजप)

6102512

27.मुंबई उत्तर प

रवींद्र दत्ताराम वायकर(शिवसेना)

7386249

28.मुंबई ईशान्य

संजय दिना पाटील(शिवसेना (उबाठा)

7210823

29.मुंबई उत्तर मध्य

गायकवाड वर्षा एकनाथ(कॉंग्रेस)

7759029

30.मुंबई दक्षिण मध्य

अनिल यशवंत देसाई(शिवसेना (उबाठा)

7410974

31.मुंबई दक्षिण

अरविंद गणपत सावंत(शिवसेना (उबाठा)

7144644

32.रायगड

तटकरे सुनील दत्तात्रेय(राष्ट्रवादी)

6553359

33.मावळ

श्रीरंग आप्पा चंदू बारणे(शिवसेना)

8207192

34.पुणे

मुरलीधर मोहोळ(भाजप)

8139481

35.बारामती

सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी (एसपी)

8796904

36.शिरूर

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे(राष्ट्रवादी (एसपी)

7042730

37.अहमदनगर

निलेश ज्ञानदेव लंके(राष्ट्रवादी (एसपी)

6646088

38.शिर्डी

भाऊसाहेब  वाकचौरे(शिवसेना (उबाठा)

4464698

39.बीड

बजरंग मनोहर सोनवणे(राष्ट्रवादी (एसपी)

6216838

40.उस्मानाबाद

ओमप्रकाश  राजेनिंबाळकर(शिवसेना (उबाठा)

7240868

41.लातूर

डॉ. काळगे शिवाजी बंडप्पा(कॉंग्रेस)

4917277

42.सोलापूर

प्रणिती सुशीलकुमार शिंदे(कॉंग्रेस)

6619609

43.माढा

मोहिते-पाटील धैर्यशील (राष्ट्रवादी (एसपी)

7051088

44.सांगली

विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील(अपक्ष)

5583884

45.सातारा

श्रीमंत छ.उदयनराजे भोंसले(भाजप)

8344770

46.रत्नागिरी

नारायण तातू राणे(भाजप)

8456117

47.कोल्हापूर

छत्रपती शाहू शहाजी(कॉंग्रेस)

6394778

48.हातकणंगले

धैर्यशील संभाजीराव माने(शिवसेना)

8531618

मतदारसंघ

प्रतिस्पर्धी उमेदवार व पक्ष

निवडणूक खर्च

1.नंदुरबार

डॉ हिना विजयकुमार गावित(भाजप)

7377984

2.धुळे

भामरे सुभाष रामराव(भाजप)

8644192

3.जळगाव

करण पाटील-पवार(शिवसेना (उबाठा)

5598741

4.रावेर

श्रीराम दयाराम पाटील(राष्ट्रवादी (एसपी)

6420130

5.बुलढाणा

नरेंद्र दगडू खेडेकर(शिवसेना (उबाठा)

4761875

6.अकोला

अभय काशिनाथ पाटील(कॉंग्रेस)

6464784

7.अमरावती

नवनीत रवी राणा(भाजप)

9293160

8.वर्धा

रामदास चंद्रभान तडस(भाजप)

7843211

9.रामटेक

राजू देवनाथ पारवे(शिवसेना)

9015670

10.नागपूर

विकास ठाकरे(कॉंग्रेस)

5926718

11.भंडारा गोंदिया

सुनील बाबुराव मेंढे(भाजप)

9021416

12.गडचिरोली - चिमूर

अशोक महादेवराव नेटे(भाजप)

7624455

13.चंद्रपूर

मुनगंटीवार सुधीर(भाजप)

7854046

14.यवतमाळ- वाशीम

राजश्रीताई हेमंत पाटील (शिवसेना)

 --

15.हिंगोली

बाबुराव कदम कोहळीकर(शिवसेना)

7334557

16.नांदेड

चिखलीकर प्रतापराव(भाजप)

8238476

17.परभणी

जानकर महादेव जगन्नाथ(रासप)

8302054

18.जालना

दानवे रावसाहेब दादाराव(भाजप)

9101268

19.औरंगाबाद

इम्तियाज जलील सय्यद(एमआयएम)

6701100

20.दिंडोरी

डॉ. भारती प्रवीण पवार(भाजप)

7514426

21.नाशिक

गोडसे हेमंत तुकाराम(शिवसेना)

8602113

22.पालघर

भारती भारत कामडी(शिवसेना (उबाठा)

5510182

23.भिवंडी

कपिल मोरेश्वर पाटील(भाजप)

8050906

24.कल्याण

वैशाली दरेकर-राणे(शिवसेना (उबाठा)

3883209

25.ठाणे

राजन बाबुराव विचारे(शिवसेना (उबाठा)

5873897

26.मुंबई उत्तर

भूषण पाटील(कॉंग्रेस)

5803929

27.मुंबई उत्तर पश्चिम

अमोल गजानन कीर्तिकर(शिवसेना (उबाठा)

7408928

28.मुंबई ईशान्य

मिहीर चंद्रकांत कोटेचा(भाजप)

8117983

29.मुंबई उत्तर मध्य

उज्वल निकम(भाजप)

5908693

30.मुंबई दक्षिण मध्य

राहुल रमेश शेवाळे(शिवसेना)

4537547

31.मुंबई दक्षिण

यामिनी यशवंत जाधव(शिवसेना)

4291046

32.रायगड

अनंत गीते(शिवसेना (उबाठा)

4743612

33.मावळ

संजोग वाघेरे पाटील(शिवसेना (उबाठा)

7476357

34.पुणे

धंगेकर रवींद्र हेमराज(कॉंग्रेस)

6830322

35.बारामती

सुनेत्रा अजितदादा पवार(राष्ट्रवादी)

9389799

36.शिरूर

आढलराव शिवाजी दत्तात्रेय(राष्ट्रवादी)

8664853

37.अहमदनगर

डॉ. सुजय विखेपाटील(भाजप)

8509291

38.शिर्डी

लोखंडे सदाशिव किसन(शिवसेना)

8125897

39.बीड

पंकजा मुंडे(भाजप)

6440169

40.उस्मानाबाद

अर्चना राणाजगजितसिंह पाटील(राष्ट्रवादी

8812666

41.लातूर

सुधाकर तुकाराम शृंगारे(भाजप)

5140338

42.सोलापूर

राम विठ्ठल सातपुते(भाजप)

8198973

43.माढा

रणजीतसिंह नाईक निंबाळकर(भाजप)

6165831

44.सांगली

संजय (काका) पाटील(भाजप)

4934556

45.सातारा

शशिकांत जयवंतराव शिंदे(राष्ट्रवादी (एसपी)

6933347

46.रत्नागिरी- सिंधुदुर्ग

विनायक भाऊराव राऊत(शिवसेना (उबाठा)

4837576

47.कोल्हापूर

संजय सदाशिवराव मंडलिक(शिवसेना)

7575043

48.हातकणंगले

सत्यजीत पाटील सरूडकर(शिवसेना) (उबाठा)

6656631


पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे निवडणूक आयोगाला अभिप्रेत असलेला निवडणूक खर्च व्यवस्थापन व सल्ला सेवा दिली जाते. अशी सेवा देणारी एकमेव (प्राब) विश्वसनीय संस्था आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book