Wednesday 21 August 2024

Maharashtra Legislative Assembly Election 2024; विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संख्येने जास्त असल्याच्या कथित जातीय आकडेवारींची फेकाफेकी

सामाजिक आंदोलनाला राजकीय महत्वाकांक्षेचे विरजण


हाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष, संघटनांकडून तयारी सुरु असून मतदारसंघाची राजकीय व सामाजिकदृष्ट्या परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नात आहेत. सामाजिकदृष्ट्या स्वतःच्या जातीचे कसे मतदारसंघात सर्वाधिक प्राबल्य आहे हे दर्शविण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून कथित जातीय आकडेवारींची फेकाफेकी सामाजिक संघटनांकडून सुरु आहे. अशाप्रकारे कथित, कपोलकल्पित जातीय मतदार संख्येच्या आधारावर रणनीती ठरविण्यात येत असेल तर त्याची परिणीती अपयशातच होऊ शकते. कथित जातीय आकडेवारींच्या फेकाफेकीमुळे मतदारसंघाची सामाजिकदृष्ट्या स्थितीबाबत चुकीची माहिती तपशील वरिष्ठांपर्यंत जात असल्याने निवडणुकीतील उमेदवारी वाटप व पक्ष ध्येय धोरणांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. राज्यातील सामाजिक संघटनांचे आंदोलने राजकीय पाठबळामुळे व महत्वाकांक्षेमुळे भरकटत चालली आहेत. जाणीवपूर्वक निवडणुकीच्या मैदानात उतरवून प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी या सामाजिक संघटनांचा वापर केला जात आहे.
 
सामाजिक आंदोलनाने देशामध्ये क्रांती झाली. स्वातंत्र्यानंतर देखील अनेक सामाजिक आंदोलनातून परिवर्तन घडले मात्र अलिकडील काळामध्ये सामाजिक आंदोलनात राजकीय महत्वाकांक्षेचे विरजण पडल्याने स्वार्थासाठी चळवळीचे स्वरूप बदलते हे कालांतराने समाजापुढे उघड होते. स्वातंत्र्य सैनिक व जेष्ठ सामाजिक आंदोलक अण्णा हजारे यांच्या राजधानीतील आंदोलनालात देखील राजकीय महत्वाकांक्षेचे विरजण पडल्याने आप या पक्ष नेतृत्वाचा उदय झाला हे सर्वश्रुत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात देखील आप पक्षाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठींबा दिलेला असून निवडणुकीत एकत्र लढण्याची इच्छा दर्शवलेली आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आमदी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी खासदार संजय सिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संख्येने जास्त असल्याच्या कथित जातीय आकडेवारींची मतदारसंघ निहाय यादी सोशल मिडीयावर व्हायरल केली जात आहे. यामध्ये विधानसभा निहाय मराठा मतदारांची संख्या यादी, धनगर, माळी, वंजारी समाजाची विधानसभा निहाय मतदारांची संख्या यादी, ओबीसी समाजाची विधानसभा निहाय मतदारांची संख्या यादी, मुस्लिम समाजाची विधानसभा निहाय मतदारांची संख्या यादी द्वारे कथित, कपोलकल्पित जातीय आकडेवारींची फेकाफेकी सुरु आहे. राजकीय पक्षांनी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांना निवडणूक विषयक कामांसाठी नियुक्त केलेले आहे या कंपन्या इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मिडियाच्या माध्यमातून मतदारसंघनिहाय आकडेवारीचा अंदाज घेत असतात त्यासाठी संबंधित इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी जात वास्तव नावाने सामाजिक आंदोलनाच्या प्रतिनिधींच्या मुलाखती घेऊन माहितीचे फुकट संकलन करीत असतात यामध्ये सोशल मिडीयावर व्हायरल कथित, कपोलकल्पित जातीय आकडेवारींची पेरणी केली जाते त्यामुळे वरिष्ठांपर्यंत विधानसभा मतदारसंघातील सामाजिकदृष्ट्या स्थितीबाबत दिशाभूलकारक माहिती पोहोचते त्या आधारावर घेतलेले निर्णय फसतात त्यामुळे निवडणुकांमध्ये विपरीत परिणाम समोर येतात.

मतदारसंघ निहाय सामाजिकदृष्ट्या स्थिती जाणून घेण्यासाठी पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने वेळोवेळी प्रकाशित केलेले अहवाल व महाराष्ट्रातील राजकारण या पुस्तकात अधिकृत संशोधनात्मक आकडेवारी उपलब्ध आहे. तसेच राज्यातील सामाजिक संशोधन संस्थांचे अहवाल, राज्य मागास आयोगाचे अहवाल, निवडणूक आयोगाचे अहवाल यामध्ये अधिकृत सामाजिक जातीय आकडेवारी मिळू शकते. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या कथित आकडेवारी वास्तविकता नसून कपोलकल्पित असल्याचे प्राब संस्थेने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान मराठा आंदोलनामुळे राज्यात सामाजिकतेची चळवळ स्थानिक पातळीवर पोहोचली असून गोवोगावी प्रत्येक जात समूहाच्या घटकाला आपल्या जातीचा अभिमान वाटावा अशी सामाजिक स्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळे सामाजिक आंदोलनात राजकीय महत्वाकांक्षेचे विरजण टाकल्याने सर्व समाज घटक सजग झालेला आहे. मराठा आंदोलनाचा लाभ घेण्यासाठी सर्वच राजकीय महत्वाकांक्षा असलेले सरसावले असून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी लगड करण्याच्या प्रयत्नांत आहेत यामध्ये स्वराज्य पक्ष आघाडीवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील, प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या आघाडीत कोणकोणते पक्ष आणि संघटना असतील याबाबत स्पष्टता नाही. मात्र, मनोज जरांगे यांना सोबत घेण्यासाठी सर्व नेते प्रयत्नशील आहेत. काही नेत्यांनी अंतरवालीचा दौरा करून प्राथमिक चर्चाही केली आहे; पण जरांगे यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. 

कोणी कोणावर डाव टाकला! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सरकारवर डाव टाकणार होते पण आता सरकारनेच आमच्यावर डाव टाकला असे ते म्हणत आहेत. निवडणूक लढवण्याबाबतचा अंतिम निर्णय २९ ऑगस्ट रोजी जाहीर करणार होते मात्र निर्धारित वेळेत निवडणुका जाहीर होणार नसल्याने निर्णय पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांचे अर्ज जरांगे यांनी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्या प्रमाणे ७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मागील १५ दिवसांपासून अंतरवालीचे दौरे सुरू आहेत. उपेक्षितांकडून स्थानिक पातळीवरील उपद्रवमूल्य वाढविण्यासाठी विधानसभा लढविण्याचा चंग बांधला असून सिल्लोड, गेवराई, बदनापूर, फुलंब्री, अंबड, परतूर, माजलगाव अशा काही मतदारसंघात जरांगे यांच्या फोटोसह इच्छुक उमेदवारांचे बॅनर आणि होर्डिंग्ज झळकत आहेत. भाजपच्या मिनल खतगावकर, बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि केजच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्यासह जवळपास ५०० ते ७०० रथीमहारथींनी जरांगे पाटील यांची भेट घेत थेट तिकीटाचीच मागणी केली आहे. इच्छुकांकडून सोशल मिडीयावर व्हायरल झालेली कथित, कपोलकल्पित जातीय आकडेवारीची माहिती असलेला राजकीय अहवाल देऊन पाठ थोपटून घेतली जात आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. दरम्यान मतदारसंघनिहाय अहवाल पाहून त्या मतदारसंघातील राजकीय, जातीय समीकरण आणि संभाव्य उमेदवाराचा प्रभाव याचा विचार करुन उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे. फक्त मराठा मतदारांना गृहीत धरून उमेदवारी दिली जाणार नसून, मतदारसंघात असलेले सामाजिक समीकरण समजून घेण्यात येत आहे. प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधातील आक्रमक प्रचाराचा मुद्दाही विचारात घेतला जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील नेमके काय म्हणाले ते पाहूया., इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, या निवडणुकीत शंभर टक्के भुईसपाट होणार आहे., आपली रणनिती काय यावर त्यांना काम करायचं होत, जशी निवडणुकीची तारिख येईल तसं आपण ठरवू, पुढे निवडणुक ढकलण्याचं काही कारण नव्हतं, संकट राज्यावर काही नसताना निवडणुका पुढे ढकलल्या सरकरचा डाव दिसतो आहे, आपली भूमिकेवर ते रणनिती आखणार होते., मी इतका पागल आहे का 29 ऑगस्टला निर्णय घ्यायचा आणि तुम्हाला चार महिने मोकळीक द्यायची निर्णयावर आपण ठाम आहोत, पाडायचं की लढायचं आपली रणनिती आता आपण गुलदस्त्यात ठेवू, राष्ट्रपती राजवट लावली तर ती तशीच ठेवतील की उठवतील यावर शंका आहे, शेवटी हे डावं आहेत यांचे, आपल्याकडे इच्छुकांची यादी आली तर त्यांना काही सूचत नाहीये, जे व्हायचं ते होऊद्या पण मराठ्यांनी डाव कळू द्यायच नाही, इच्छुकांचे अर्ज स्वीकारायसाठी आणखीन दोन तीन दिवस वाढवून घ्या. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. विधानसभा निवडणूका दिवळीनंतर होतील असं सांगण्यात येत असताना त्यांनी निवडणूका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते, अजून 4 महिने जायचे आहेत, त्यांना डाव खेळायला मोठा वेळ आहे. आपली रणनिती, डाव-प्रतिडाव सरकारला कळू द्यायचे? सरकारवर आता बेकार वेळ आली आहे. आता बैठक होणार नसली तरी आपण मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठक घेऊ, या बैठकीला मी येतो असे जरांगे म्हणाले. दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचे की कसे असेही ते म्हणाले. दरम्यान 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील लढायचं की पाडायचं यावर निर्णय घेणार होते मात्र त्यांनी हा निर्णय सध्या गुलदस्त्यात ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील जातवास्तव

2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या तुलनेत राज्यातील धर्मनिहाय प्रमाण पुढीलप्रमाणे विषद केलेले आहे यामध्ये हिंदू धर्म- ७९.८३%, मुस्लिम- 11.54%, बौद्ध धर्म- 5.81%, जैन धर्म- 1.25%, ख्रिश्चन धर्म- ०.९६%, शीख धर्म- ०.२%, इतर- 0.41% असे प्रमाण आहे. दरम्यान २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या प्रमाण ९.३५% आहे. तर राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या ११.८१% इतकी आहे. याप्रमाणे राज्यातील सामाजिकदृष्ट्या लोकसंख्येचे प्रमाण एसस्सी/एसटी- २१.१६ टक्के, मुस्लिम- ११.५४ टक्के यांची बेरीज होते ३२.७० टक्के आणि जैन- १.२५%, ख्रिश्चन- ०.९६%, शीख- ०.२%, इतर- ०.४१% यांचे एकूण प्रमाणे २.८२ टक्के म्हणजे ३२.७० + २.८२ = ३५.५२ टक्के इतके प्रमाण आहे. उर्वरित समाजात ६४.४८ टक्के प्रमाणात ओबीसी ३६० जाती, मराठा, ब्राह्मण जातींचा समावेश आहे. मागासवर्गीय आयोगांनी महाराष्ट्रातील ओबीसींचे लोकसंख्येचे प्रमाण ५२ टक्के दर्शवलेले आहे. ब्राह्मण समाजाचे २ ते ३ टक्के प्रमाण मानले जाते. त्यामुळे उर्वरित १०.४८ टक्के राहत आहे. मराठा समाजाचे लोकसंख्येचे प्रमाण १५ ते १८ इतकेच मानले जात आहे. जरी मराठा समाजाचे राणे समिती व आयोगाच्या अहवालानुसार ३० ते ३२ टक्के प्रमाण गृहीत धरले तरी २८८ मतदारसंख्येत विभागलेले आहे ठराविक विधानसभा मतदारसंघात प्रभावी आहे त्याचे नगण्य प्रमाण होते. त्यामुळे केवळ जात म्हणून निवडणुकांना सामोरे जाणे अयशस्वीतेचे लक्षण आहे. याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच अन्य समाजाच्या आधाराशिवाय निवडणुकांमध्ये यश मिळवणे दुरापस्त आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर व्हायरल कथित, कपोलकल्पित जातीय आकडेवारींच्या मोहात अडकून राजकीय भविष्याचे आखाडे बांधण्यापासून दूर राहाणेच हिताचे ठरू शकते. 

महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निहाय मतदारसंघ निहाय सामाजिकदृष्ट्या मतदारसंख्या प्रमाणे जातवास्तव प्रमाण जाणून घेण्यासाठी पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडे सशुल्क माहिती उपलब्ध आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Tuesday 13 August 2024

Maharashtra mayor term is 5 years instead of 2-5 years for nagarpalika ; ओबीसींच्या राखीव जागांवर गडांतर; सोडतीशिवायच नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे

महायुती सरकारला विधानसभेत ओबीसींची नाराजी भोवणार


विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने धक्कादायक निर्णय घेऊन ओबीसींच्या राखीव जागांवर गडांतर आले असून सोडतीशिवायच राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे उर्वरीत अडीच वर्षांच्या कालावधीतही ओबीसी लोकप्रतिनिधीत्वा पासून वंचित राहणार आहेत. या निर्णयाचे पडसाद उमटू लागले असून प्रतिक्रिया समोर येत आहेत. महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत ओबीसींची नाराजी काय असते ते दाखवून देऊ असा गर्भित इशारा ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील यांनी दिलेला आहे. त्यामुळे महायुती सरकारला विधानसभेत ओबीसींची नाराजी भोवणार अशी साशंका व्यक्त केली जात आहे.

न्यायालयाने ट्रिपल टेस्टच्या प्रतिपूर्तीसाठी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर तात्पुरती स्थगिती दिलेली असताना ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा खुल्या प्रवर्ग झाल्याने आरक्षण संपुष्टात आलेले होते. तसेच ओबीसींच्या शिवायच अनुसूचित जाती व जमातीसाठी सदरील नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा/अध्यक्षपदांचे आरक्षण सोडत काढण्यात आलेली होती त्यांची मुदत अडीच वर्ष कालावधी होता. कालांतराने न्यायालयाला अपेक्षित ट्रिपल टेस्टच्या प्रतिपूर्तीनंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यात येऊन आरक्षण पूर्ववत झालेले असताना उर्वरीत अडीच वर्षांच्या कालावधीत तरी ओबीसींना लोकप्रतिनिधीत्व मिळेल अशी शक्यता असतानाच महायुती सरकारने सोडतीशिवायच अडीचऐवजी 5 वर्षे कालावधीत वाढ करून ओबीसींच्या राखीव जागांवर गडांतर आणले असल्याने इतर मागास प्रवर्गातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली असून ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत.
    
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान होऊन जानेवारी सन 2022 मध्ये निकाल जाहीर करण्यात आलेला होता. या निवडणुकीत भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (एकूण जागा 105), भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (एकूण जागा 210), राज्यातील 106 नगरपंचायती- 344 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (एकूण जागा 1,802),  महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (एकूण 4 जागा) प्रमाणे खुल्या प्रवर्गातून निवडणूक झाल्याने ओबीसी समाज लोक प्रतिनिधीत्वापासून वंचित राहिलेला होता. या निवडणुकीसाठी राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करून अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे राखीव तर अन्य खुल्या प्रवर्गातून निवडली गेलेली असल्याने ओबीसींना राखीव जागा अभावी हक्क डावललेला होता. नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्ष होता त्यामुळे आरक्षण सोडत देखील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी होती.   
      
अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष पदाची निवड होत नगराध्यक्ष विराजमान झाले मात्र त्यांचा कालावधी आता ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पुढील नगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणे गरजेचे होते. मात्र अद्यापपर्यंत आरक्षण जाहीर झाले नसल्याने याचा नागराध्यक्षाचा कालावधी वाढणार का असा प्रश्न आता उपस्थित होत होता. अडीच वर्षापूर्वी नगराध्यक्ष स्वप्न मनाला घेऊन बसलेले नगरसेवकांचा हिरमोड झालेला आहे. नव्याने अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष बनणार होते त्यांचे मात्र स्वप्न भंगणार आहे. राज्यात एकीकडे 2 वर्षांपासून बहुतांश नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकांमध्ये प्रशासन राज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्यामुळे येथील नगराध्यक्षदाची खुर्ची रिकामी असून तो पदभारही प्रशासनाकडे आहे. त्यातच आता राज्यातील उर्वरीत नगर पंचायतींमधील नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी 5 वर्षांचा करण्यात आला आहे. राज्यात अंदाजे 105 नगर पंचायतच्या निवडणुका अडीच वर्षापूर्वी पार पडल्याने अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. मात्र, या नगराध्यक्षांचा कालावधी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत आतापर्यंत निघणे आवश्यक होते. आता, सरकारने अडीच वर्षांचा कालावधी आता थेट 5 वर्षांचा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे, अडीच वर्षानी नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची मोठी निराशा झाली आहे.

राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय गत महायुती सरकारने घेतला होता. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून नगराध्यक्षांची निवड सभागृहातील नगरसेवकांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या, तो निर्णय लागू असून अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची निवड होती, ती आता 5 वर्षे करण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 105 नगरपालिकांमध्ये पुढील काही दिवसांत नगराध्यक्ष बदलले जाणार होते. सन 2020 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 12 नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी  अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे प्रचलित पद्धतीने नगरसेवकांमधूनच निवडले जात असून त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला होता. नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करताना राज्यातील नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे राज्यातील नगरपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आली होती. प्रत्येक प्रवर्गात निम्म्यापेक्षा कमी नाहीत इतकी पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. एखादी नगरपंचायत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी येत असल्यास तेथे ज्या प्रवर्गाच्या लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे, अशा प्रवर्गासाठी ती राखीव ठेवण्यात आली होती.
 
ज्या 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले होते त्या नगरपंचायतीचे आरक्षण प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे-
अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपदाच्या 17 जागा असून त्यातील 9 जागा या अनुसूचित जाती (महिला) तर 8 जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
० अनुसूचित जाती (महिला) राखीव- लाखणी, कुही, नातेपुते, खंडाळा (जि. सातारा), जळकोट (लातूर), माळेगाव बुद्रुक, पाटण, देहू, वैराग (सोलापूर)
० अनुसूचित जाती (सर्वसाधारण) राखीव- म्हाळुंग श्रीपूर, भिसी, केज, देवणी, वाशी, औंढा नागनाथ, संग्रामपूर, लोणंद
अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण 13 जागा राखीव असून त्यातील 7 अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी तर 6 जागा अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत.
० अनुसूचित जमाती (महिला) राखीव- धानोरा, अहेरी, मोहाडी, बाभुळगाव, साक्री, सोयगाव, शहापूर
० अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)- दिंडोरी, देवरी, गोंडपिंपरी, राळेगाव, भिवापूर,सडक अर्जुनी
खुल्या प्रवर्गासाठी एकूण 109 अध्यक्ष पदे असून त्यातील 55 अध्यक्षपदे हे महिलांसाठी राखीव निश्चित करण्यात आले आहेत.  
० खुला प्रवर्ग (महिला) राखीव- कळंब, समुद्रपूर, अर्जुनी मोरगाव, अनगर, पारशिवनी, मंठा, शेंदुर्णी, हिंगणा, वाभवे वैभववाडी, खालापूर, बदनापूर, चामोर्शी, भातकुली, महादुला, वाडा, वडूज, रेणापूर, दापोली, शिंदखेडा, एटापल्ली, देवगड-जामसंडे, जामणी, कारंजा, महागाव, नायगाव, शिरुर अनंतपाळ, पालम, सिरोंचा, पोलादपूर, कोरपना, देवरुख, देवळा, सेनगाव, लांजा, सावली. फुलंब्री, कोरची, तिर्थपुरी, तळा, पोंभुर्णा, जाफ्राबाद, पाटोदा, जिवती, शिर्डी, कुडाळ, निफाड, धारणी, कर्जत, कुरखेडा, वडगाव मावळ, कोरेगाव, सेलू, आष्टी, सालेकसा, शिरुर-कासार. 
० खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)- गुहागर, अकोले, मुक्ताईनगर, घनसावंगी, मानोरा, मंडणगड, माहूर, आष्टी (वर्धा), कवठे महांकाळ, लोहारा (बु), खानापूर, बार्शी-टाकळी, नांदगाव खंडेश्वर, मुरबाड, ढाणकी, कळवण, हातकणंगले, मुलचेरा, आजरा, दहिवडी, कणकवली, पेठ, पाली, बोदवड, तिवसा, मोताळा, मारेगाव, गोरेगाव, मंचर, मेढा, हिमायतनगर, मौदा, लाखांदूर, भामरागड, सिंदेवाही, मालेगाव-जहांगीर, वडवणी, सुरगाणा, अर्धापूर, चाकूर, धडगाव-वडफळ्या, पारनेर, नेवासा, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, माणगाव, म्हसळा, कसई-दोडामार्ग, कडेगाव, शिराळा, माळशिरस, माढा, चंदगड.

या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. भाजपाने २४ नगरपंचायती जिंकून सर्वाधिक ३८४ जागा मिळवल्या होत्या. २०१७ मध्ये भाजपाकडे नगरपंचायतीत ३४४ सदस्य होते. भाजपा (३८४) पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी (३४४), काँग्रेस (३१६) आणि शिवसेनेचा (२८४) क्रमांकवर होता. भाजपाने सर्वाधिक नगरपंचायती जिंकतानाच सदस्य संख्येतही पहिला क्रमांक मिळवला होता. शिवसेनेने १४ नगरपंचायतींमध्ये विजय मिळवून २८४ जागा प्राप्त केल्या होत्या मात्र आता पक्षात फाटाफूट झालेली आहे. राष्ट्रवादीने २५ नगरपंचायती आणि ३४४ जागा जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये राष्ट्रवादीचे ३३० सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये घट झालेली होती. या निवडणूकीत सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला होता. २०१७ मध्ये ४२६ सदस्यसंख्या असणारी काँग्रेस ३१६ वर पोहोचली आहे. काँग्रेसने १८ नगरपंचायती जिंकल्या होत्या. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली होती. तसेच त्यावेळी झालेल्या भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत भंडाऱ्यात काँग्रेस – 22, राष्ट्रवादी काँग्रेस – 13, भाजप – 12, अन्य – 05 गोंदियामध्ये भाजप – 26, काँग्रेस – 13,राष्ट्रवादी काँग्रेस – 8, अन्य – 06 जागा मिळालेल्या होत्या.

महाराष्ट्र राज्याच्या २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या, २४१ नगरपालिका, २७ महापालिका, १२८ नगरपंचायती आणि २७८३१ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यास महापालिकांमध्ये बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार ७ महापालिकांचे महापौर पद ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधीला मिळेल. राज्यातील २४१ नगरपालिकांपैकी २७ टक्के ओबीसी आरक्षणाप्रमाणे ६६ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होईल. १२८ नगरपंचायतीपैकी ३७ ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असेल. नगरपंचायतीमध्ये देखील ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळेल. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांपैकी ७ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला देण्यात यावे, अशी शिफारस बांठिया आयोगाने केली आहे. जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना २३. २ टक्के आरक्षण मिळेल. तर, राज्यातील ३५१ पंचायत समित्यांपैकी ८१ पंचायत समितीमध्ये सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव, असावे अशी शिफारस करण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग तयार करण्यात आला. या प्रवर्गामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, एनटी-सी आणि एन-टी डीमधील जातींचा समावेश होतो. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Thursday 8 August 2024

Maval Lok Sabha Election 2024 Result Challenged In High Court ; मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली!

खासदार बारणे यांच्यासह सर्व पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका


मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका प्रवेशापुर्वीच तांत्रिकदृष्ट्या त्रुटीवर आक्षेप घेऊन फेटाळण्यात आली असून त्या याचिकेत सुधारणा करून निवडणूक आयोग व खासदार बारणे यांच्यासह सर्व पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका मुंबई उच्च न्यायालयात पराभूत अपक्ष उमेदवार अ‍ॅड. राजू पाटील यांनी अ‍ॅड. पूजा कलाटे यांच्यातर्फे दाखल केली आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 33 उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये विविध राजकीय पक्षांचे 14 तर अपक्ष 19 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या 19 अपक्षांमध्ये अ‍ॅड. राजू पाटील यांचा समावेश आहे. त्यांना या निवडणुकीत 32 व्या क्रमाने केवळ 670 मते मिळालेली आहेत. त्यामध्ये एकमेव पोस्टल मताचा समावेश आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत एकूण 14 लाख 19 हजार 655 मते ग्राह्य धरण्यात आलेली असून पोस्टल 254 मते अवैध ठरलेली आहेत. तर नोटाला एकूण 16 हजार 760 मते दिलेली आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना (उबाठा) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळालेली होती. 96 हजार 615 मतांनी बारणे यांनी मताधिक्य घेतलेले होते. असे असताना मावळ लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मतमोजणीत आलेले मतदानात 573 मतांची तफावत आहे. इतकी तफावत येऊ नये असा आक्षेप याचिकाकर्ते व अपक्ष उमेदवार अ‍ॅड. राजू पाटील यांनी घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस आयुक्त, संजोग वाघेरे पाटील यांच्यासह सर्व उर्वरीत उमेदवारांना या याचिकेत प्रतिवादी केलेले आहे. अ‍ॅड. राजू पाटील यांची निवडणूक आयोगासह संबंधित सर्वच उमेदवारांच्या विरोधात याचिका आहे. अ‍ॅड. राजू पाटील यांनी दिनांक 12 जुलै 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली होती मात्र प्रवेशातच तांत्रिकदृष्ट्या त्रुटीवर आक्षेप घेऊन दिनांक 25 जुलैला फेटाळण्यात आली होती. त्या याचिकेत सुधारणा करून त्यांनी पुन्हा दाखल केली 30 जुलैला प्राथमिक प्रवेशावर स्विकारण्यात येऊन त्यामधील उर्वरीत त्रुटी दूर करण्यास सांगून पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला ठेवण्यात आलेली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेसंदर्भात अनेक त्रुटी असल्याचे दाखल प्रवेशातच म्हंटले होते यामध्ये सारांश अपूर्ण असणे, मागणी व मुद्दे, म्हणणे व्यवस्थित नाहीत, काही पृष्ठे अनुक्रमा शिवाय गहाळ असणे, प्रत्येक पानावर याचिकाकर्त्याची स्वाक्षरी नसणे, व सत्यापित न करणे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 83 (अ) नुसार संलग्न करण्यात येणाऱ्या तथ्यांचे संक्षिप्त विवरण नसणे, कलम 83(c) तरतुदीनुसार भ्रष्ट व्यवहाराच्या आरोपाच्या समर्थनार्थ जोडले जाणारे प्रतिज्ञापत्र आणि त्याचे तपशील नसणे, लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाने तयार केलेल्या नियम 25 नुसार खर्चासाठी देय असलेली सुरक्षा ठेव कार्यालयात जमा न करणे याप्रकारे आक्षेप घेण्यात आलेले होते.

राजू पाटील स्वतः वकील असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हंटले असून त्यांनी शिक्षण विषयक माहिती अपूर्ण दिलेली आहे. कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले ते नमूद केलेले नाही केवळ पुणे विद्यापीठ एलएलबी 2022 इतकेच नमूद केलेले आहे. तर लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारासाठी 33 हजार 421 खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अंतिम अनुसूचित नमूद केलेले आहे. दरम्यान याचिकाकर्ते यांच्या अ‍ॅड. पूजा मारुती कलाटे या पत्नी आहेत. याबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्रात अ‍ॅड. पाटील यांनी तसे नमूद केलेले आहे. उपरोक्त याचिका त्यांच्या तर्फे दाखल करण्यात आलेली आहे.  

राजू पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. १९८८ मध्ये असा प्रकार झाला होता. त्यावेळी त्या आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती. ही सर्व उदाहरण याचिकेत दिले आहेत. मात्र यासंदर्भात उच्च न्यायालयातील वकीलांचे मत जाणून घेतले असता त्यांनी सदर आव्हान याचिका तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. मोघम आरोपांच्या आधारावर निवडणूक प्रक्रियेतील दोषांवर बोट ठेवणे सिद्धतेसाठी पुरेसे नसते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर या याचिकेचा कोणताही परिणाम होणार नाही. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Wednesday 7 August 2024

Parliamentary Constituency 37 - Ahmednagar ; खासदार निलेश लंके यांच्या निवडणूक खर्चावर आक्षेप; हिशोब चुकता करण्यासाठी सुजय विखे यांची याचिका

उत्साहाच्या भरात तफावत मान्य केल्याने लंकेंच्या हिशोबात घोळ 



अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप पक्षाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असून न्या. संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. निलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी माजी खासदार सुजय विखे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल दाखल करण्याबरोबरच लोकसभेच्या 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी देखील यापूर्वीच केलेली होती.

उत्साहाच्या भरात खर्च प्रतिनिधीने एसआरओ नोंद वहीतील खर्चातील तफावत मान्य केल्याने लंकेंच्या हिशोबात घोळ झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाल्याने माजी खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या हिशोबावर बोट ठेवले आहे. खासदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत एकूण निवडणूक खर्च 66 लाख 46 हजार 088 इतका झाल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या भाग 2 अनुसूचीमध्ये नमूद केलेले आहे. यामध्ये त्यांनी मुद्रीत माध्यमावर केलेला खर्च 94 हजार 80 रु. खर्च अमान्य करून अंतिम खर्चात सामाविष्ट केलेला नाही. दिनांक 1/7/2024 रोजी झालेल्या अखेरच्या खर्च तपासणी मध्ये उमेदवार खर्च 53 लाख 37 हजार 469 झालेला होता. निवडणूक आयोगाच्या अभिरूप दैनंदिन खर्च नोंदवहीतील निरीक्षणानुसार एसआरओ प्रमाणे अनुक्रमे 10 लाख 25 हजार 010 आणि 11 लाख 13 हजार 619 तफावत आलेली असून ती मान्य केल्याचे खासदार निलेश लंके यांच्या दैनंदिन निवडणूक खर्च नोंदवहीत नमूद केलेले आहे. त्यामुळे एकूण खर्च 53 लाख 37 हजार 469 अधिक 10 लाख 25 हजार 010 आणि 11 लाख 13 हजार 619 याप्रमाणे 74,76,098/-रु. इतका होत असून प्रत्यक्षात लंकेंच्या प्रतिनिधीने एकूण खर्च 53 लाख 37 हजार 469 अधिक 11 लाख 13 हजार 619 याप्रमाणे एकूण खर्च 64,51,098/-रु. इतका वहीत हिशोब नमूद केलेला आहे. त्यामुळे हिशोबातील घोळ झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत असल्याने त्याच्यावर विखे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. सुजय विखेपाटील (भाजप) यांनी लोकसभा निवडणुकीत 85,09,291/-रु. इतका खर्च केल्याचे नमूद केलेले आहे.

माजी खासदार सुजय विखे यांनी अॅड. आश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. सुजय विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 21 लाख रुपयांचे शुल्क भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर  5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत-जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केलेली आहे. 

याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच नीलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी लंकेंनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे, आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव झाला होता. आता कायदेशीर लढाई मध्ये कोण बाजी मारते हे आगामी काळात स्पष्ट होईलच. 

संबंधित वृत्त-
लोकसभेतील निवडणूक खर्चाचा उमेदवारांकडील अंतिम तपशील आयोगाकडून जाहीर 


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Monday 5 August 2024

MNS Maharashtra assembly election 2024; मनसेने जाहीर केलेले पहिले उमेदवार होतात पराभूत

विधानसभेत पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची धडपड


हाराष्ट्रातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून रणनीती देखील ठरविली जात असताना आगामी विधानसभेत पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची राजकीय धडपड सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे सर्वेसर्वा नेते राज ठाकरे सध्या जिल्हानिहाय दौरा करून उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. गेल्या 18 वर्षांत पक्ष स्थापनेपासून झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी युती आणि आघाडीपेक्षा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेले आहेत. मनसेकडून पहिली उमेदवारी जाहीर करण्याची परंपरा 2024 च्या निवडणुकीतही त्यांनी कायम ठेवलेली असल्याचे आज जाहीर केलेल्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे. परंतु आजपर्यंतचा इतिहास असा आहे की, विधानसभेसाठी पहिले म्हणून जाहीर केलेले उमेदवार निवडणुकीत मात्र पराभूत होतात. 2014 च्या निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून पहिली उमेदवारी जाहीर केलेली होती तर 2019 च्या निवडणुकीत सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून अशाच पद्धतीने पहिली उमेदवारी जाहीर केलेली होती मात्र जाहीर केलेल्या उमेदवारांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 करीता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून फारुक मकबूल शाब्दी यांना अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसेने सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केलेली होती. तिसऱ्या स्थानावरील फारुक शाब्दी यांना 22 हजार 651 मते मिळवून ते पराभूत झाले होते. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केलेली होती. या निवडणुकीत सहाव्या स्थानावरील नरेंद्र धर्मा पाटील यांना 1 हजार 185 मते मिळवून ते पराभूत झाले होते. त्यामुळे आज जाहीर केलेल्या उमेदवारांना भुतकाळाप्रमाणे अनुभव येऊ नये असे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील बाळा नांदगावकर आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्हीही उमेदवारांनी यापूर्वी विधानसभा निवडणुका लढविलेल्या आहेत मात्र त्यांना यश आलेले नव्हते. दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी 2009 ची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून लढविलेली होती त्यावेळी त्यांना अवघी 1 हजार 998 मते प्राप्त झालेली होती. तर बाळा नांदगावकर शिवडी विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये 6 हजार 463 मताधिक्याने निवडून आलेले होते. मात्र त्यांना 2014 च्या शिवडी मतदारसंघातून 30 हजार 553 मते प्राप्त करून पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून संतोष नलावडे यांनी मनसेने उमेदवारी दिलेली होती ते देखील पराभूत झालेले होते. दरम्यान, सध्या शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे आमदार आहेत. 

गेल्या 18 वर्षांत पक्षाने आपली विचारधारा, धोरणं, भूमिका किंवा आंदोलनाची दिशा यात सातत्य राखले नाही किंवा त्या बदलल्याने मतदारांसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम दिसून आला. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली. सुरुवातीला मराठी अस्मिता, मराठी मुलांसाठी शिक्षण, नोकऱ्या आणि राज्यात परप्रांतियांचे लोंढे याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतल्या आणि याच मुद्यांवर राज्यभरात पक्ष संघटन विस्तारले. याच फलीत 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले. परंतु त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत एक आमदार निवडून आला. 2009 मध्ये मनसेने 143 जागा लढवल्या होत्या. यापैकी 13 जागांवर मनसेचे आमदार निवडून आले. 2014 मध्ये 219 जागा लढवल्या. यापैकी एक आमदार निवडून आला. तर 2019 मध्येही 101 जागांवर उमेदवार उभे करूनही एका जागेवरच मनसेला समाधान मानावे लागले आहे. 2014 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केवळ एकच आमदार जिंकून विधानसभेत गेला. जुन्नर मतदारसंघात शरद सोनवणे यांचा विजय झाला होता. शरद सोनवणे यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेच्या राजू पाटील सद्यस्थिती एकमेव आमदार आहेत.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची स्तुती करणाऱ्या राज ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकांच्यावेळेस त्यांचा कडवा विरोध केला. तसेच त्यावेळी शरद पवार यांच्याशी जवळीक, सोनिया गांधी यांची भेट यामुळेही ते त्यावेळी चर्चेत आले. त्यानंतर कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने ऑगस्ट 2019 मध्ये त्यांना नोटीस बजावली. 22 ऑगस्टला त्यांची चौकशी करण्यात आली. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे असाही आरोप त्यांनी केला. यानंतर 2019 मध्ये मविआचं सरकार आल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पुन्हा ते भाजपसोबत संधान बांधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा झाली आणि 2024 मध्ये मोदींना बीनशर्त पाठिंबा अशा मनसेच्या राजकीय भूमिका बदलत गेल्या. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी तर होते, तसेच राज्यातील विविध समस्यांसंदर्भात अनेक संघटना त्यांना भेटण्यासाठीही जातात परंतु या सगळ्याचा फायदा मनसेला प्रत्यक्षात निवडणुकीत होताना दिसला नाही. सभांच्या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होताना का दिसत नाही असा प्रश्न नेहमीच मनसेच्याबाबतीत उपस्थित केला जातो. दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्यात 225 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा  राज ठाकरेंनी केलेली होती. त्यांच्या उमेदवारीने व भूमिकेने राजकीय गणिते काय बदलतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book