Thursday 8 August 2024

Maval Lok Sabha Election 2024 Result Challenged In High Court ; मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली!

खासदार बारणे यांच्यासह सर्व पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका


मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका प्रवेशापुर्वीच तांत्रिकदृष्ट्या त्रुटीवर आक्षेप घेऊन फेटाळण्यात आली असून त्या याचिकेत सुधारणा करून निवडणूक आयोग व खासदार बारणे यांच्यासह सर्व पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका मुंबई उच्च न्यायालयात पराभूत अपक्ष उमेदवार अ‍ॅड. राजू पाटील यांनी अ‍ॅड. पूजा कलाटे यांच्यातर्फे दाखल केली आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 33 उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये विविध राजकीय पक्षांचे 14 तर अपक्ष 19 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या 19 अपक्षांमध्ये अ‍ॅड. राजू पाटील यांचा समावेश आहे. त्यांना या निवडणुकीत 32 व्या क्रमाने केवळ 670 मते मिळालेली आहेत. त्यामध्ये एकमेव पोस्टल मताचा समावेश आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत एकूण 14 लाख 19 हजार 655 मते ग्राह्य धरण्यात आलेली असून पोस्टल 254 मते अवैध ठरलेली आहेत. तर नोटाला एकूण 16 हजार 760 मते दिलेली आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना (उबाठा) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळालेली होती. 96 हजार 615 मतांनी बारणे यांनी मताधिक्य घेतलेले होते. असे असताना मावळ लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मतमोजणीत आलेले मतदानात 573 मतांची तफावत आहे. इतकी तफावत येऊ नये असा आक्षेप याचिकाकर्ते व अपक्ष उमेदवार अ‍ॅड. राजू पाटील यांनी घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस आयुक्त, संजोग वाघेरे पाटील यांच्यासह सर्व उर्वरीत उमेदवारांना या याचिकेत प्रतिवादी केलेले आहे. अ‍ॅड. राजू पाटील यांची निवडणूक आयोगासह संबंधित सर्वच उमेदवारांच्या विरोधात याचिका आहे. अ‍ॅड. राजू पाटील यांनी दिनांक 12 जुलै 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली होती मात्र प्रवेशातच तांत्रिकदृष्ट्या त्रुटीवर आक्षेप घेऊन दिनांक 25 जुलैला फेटाळण्यात आली होती. त्या याचिकेत सुधारणा करून त्यांनी पुन्हा दाखल केली 30 जुलैला प्राथमिक प्रवेशावर स्विकारण्यात येऊन त्यामधील उर्वरीत त्रुटी दूर करण्यास सांगून पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला ठेवण्यात आलेली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेसंदर्भात अनेक त्रुटी असल्याचे दाखल प्रवेशातच म्हंटले होते यामध्ये सारांश अपूर्ण असणे, मागणी व मुद्दे, म्हणणे व्यवस्थित नाहीत, काही पृष्ठे अनुक्रमा शिवाय गहाळ असणे, प्रत्येक पानावर याचिकाकर्त्याची स्वाक्षरी नसणे, व सत्यापित न करणे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 83 (अ) नुसार संलग्न करण्यात येणाऱ्या तथ्यांचे संक्षिप्त विवरण नसणे, कलम 83(c) तरतुदीनुसार भ्रष्ट व्यवहाराच्या आरोपाच्या समर्थनार्थ जोडले जाणारे प्रतिज्ञापत्र आणि त्याचे तपशील नसणे, लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाने तयार केलेल्या नियम 25 नुसार खर्चासाठी देय असलेली सुरक्षा ठेव कार्यालयात जमा न करणे याप्रकारे आक्षेप घेण्यात आलेले होते.

राजू पाटील स्वतः वकील असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हंटले असून त्यांनी शिक्षण विषयक माहिती अपूर्ण दिलेली आहे. कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले ते नमूद केलेले नाही केवळ पुणे विद्यापीठ एलएलबी 2022 इतकेच नमूद केलेले आहे. तर लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारासाठी 33 हजार 421 खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अंतिम अनुसूचित नमूद केलेले आहे. दरम्यान याचिकाकर्ते यांच्या अ‍ॅड. पूजा मारुती कलाटे या पत्नी आहेत. याबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्रात अ‍ॅड. पाटील यांनी तसे नमूद केलेले आहे. उपरोक्त याचिका त्यांच्या तर्फे दाखल करण्यात आलेली आहे.  

राजू पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. १९८८ मध्ये असा प्रकार झाला होता. त्यावेळी त्या आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती. ही सर्व उदाहरण याचिकेत दिले आहेत. मात्र यासंदर्भात उच्च न्यायालयातील वकीलांचे मत जाणून घेतले असता त्यांनी सदर आव्हान याचिका तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. मोघम आरोपांच्या आधारावर निवडणूक प्रक्रियेतील दोषांवर बोट ठेवणे सिद्धतेसाठी पुरेसे नसते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर या याचिकेचा कोणताही परिणाम होणार नाही. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.