Monday, 5 August 2024

MNS Maharashtra assembly election 2024; मनसेने जाहीर केलेले पहिले उमेदवार होतात पराभूत

विधानसभेत पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची धडपड


हाराष्ट्रातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून रणनीती देखील ठरविली जात असताना आगामी विधानसभेत पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची राजकीय धडपड सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे सर्वेसर्वा नेते राज ठाकरे सध्या जिल्हानिहाय दौरा करून उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. गेल्या 18 वर्षांत पक्ष स्थापनेपासून झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी युती आणि आघाडीपेक्षा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेले आहेत. मनसेकडून पहिली उमेदवारी जाहीर करण्याची परंपरा 2024 च्या निवडणुकीतही त्यांनी कायम ठेवलेली असल्याचे आज जाहीर केलेल्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे. परंतु आजपर्यंतचा इतिहास असा आहे की, विधानसभेसाठी पहिले म्हणून जाहीर केलेले उमेदवार निवडणुकीत मात्र पराभूत होतात. 2014 च्या निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून पहिली उमेदवारी जाहीर केलेली होती तर 2019 च्या निवडणुकीत सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून अशाच पद्धतीने पहिली उमेदवारी जाहीर केलेली होती मात्र जाहीर केलेल्या उमेदवारांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 करीता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून फारुक मकबूल शाब्दी यांना अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसेने सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केलेली होती. तिसऱ्या स्थानावरील फारुक शाब्दी यांना 22 हजार 651 मते मिळवून ते पराभूत झाले होते. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केलेली होती. या निवडणुकीत सहाव्या स्थानावरील नरेंद्र धर्मा पाटील यांना 1 हजार 185 मते मिळवून ते पराभूत झाले होते. त्यामुळे आज जाहीर केलेल्या उमेदवारांना भुतकाळाप्रमाणे अनुभव येऊ नये असे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील बाळा नांदगावकर आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्हीही उमेदवारांनी यापूर्वी विधानसभा निवडणुका लढविलेल्या आहेत मात्र त्यांना यश आलेले नव्हते. दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी 2009 ची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून लढविलेली होती त्यावेळी त्यांना अवघी 1 हजार 998 मते प्राप्त झालेली होती. तर बाळा नांदगावकर शिवडी विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये 6 हजार 463 मताधिक्याने निवडून आलेले होते. मात्र त्यांना 2014 च्या शिवडी मतदारसंघातून 30 हजार 553 मते प्राप्त करून पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून संतोष नलावडे यांनी मनसेने उमेदवारी दिलेली होती ते देखील पराभूत झालेले होते. दरम्यान, सध्या शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे आमदार आहेत. 

गेल्या 18 वर्षांत पक्षाने आपली विचारधारा, धोरणं, भूमिका किंवा आंदोलनाची दिशा यात सातत्य राखले नाही किंवा त्या बदलल्याने मतदारांसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम दिसून आला. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली. सुरुवातीला मराठी अस्मिता, मराठी मुलांसाठी शिक्षण, नोकऱ्या आणि राज्यात परप्रांतियांचे लोंढे याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतल्या आणि याच मुद्यांवर राज्यभरात पक्ष संघटन विस्तारले. याच फलीत 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले. परंतु त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत एक आमदार निवडून आला. 2009 मध्ये मनसेने 143 जागा लढवल्या होत्या. यापैकी 13 जागांवर मनसेचे आमदार निवडून आले. 2014 मध्ये 219 जागा लढवल्या. यापैकी एक आमदार निवडून आला. तर 2019 मध्येही 101 जागांवर उमेदवार उभे करूनही एका जागेवरच मनसेला समाधान मानावे लागले आहे. 2014 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केवळ एकच आमदार जिंकून विधानसभेत गेला. जुन्नर मतदारसंघात शरद सोनवणे यांचा विजय झाला होता. शरद सोनवणे यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेच्या राजू पाटील सद्यस्थिती एकमेव आमदार आहेत.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची स्तुती करणाऱ्या राज ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकांच्यावेळेस त्यांचा कडवा विरोध केला. तसेच त्यावेळी शरद पवार यांच्याशी जवळीक, सोनिया गांधी यांची भेट यामुळेही ते त्यावेळी चर्चेत आले. त्यानंतर कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने ऑगस्ट 2019 मध्ये त्यांना नोटीस बजावली. 22 ऑगस्टला त्यांची चौकशी करण्यात आली. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे असाही आरोप त्यांनी केला. यानंतर 2019 मध्ये मविआचं सरकार आल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पुन्हा ते भाजपसोबत संधान बांधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा झाली आणि 2024 मध्ये मोदींना बीनशर्त पाठिंबा अशा मनसेच्या राजकीय भूमिका बदलत गेल्या. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी तर होते, तसेच राज्यातील विविध समस्यांसंदर्भात अनेक संघटना त्यांना भेटण्यासाठीही जातात परंतु या सगळ्याचा फायदा मनसेला प्रत्यक्षात निवडणुकीत होताना दिसला नाही. सभांच्या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होताना का दिसत नाही असा प्रश्न नेहमीच मनसेच्याबाबतीत उपस्थित केला जातो. दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्यात 225 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा  राज ठाकरेंनी केलेली होती. त्यांच्या उमेदवारीने व भूमिकेने राजकीय गणिते काय बदलतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.