Friday, 28 March 2025

Shri Sant Tukaram Sugar Factory Election; श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न निष्फळ

संत तुकाराम कारखान्यातील एका गटासाठी अखेर निवडणूक;हिंजवडी-ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात 


मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर भागातील शेतकरी वर्गांसाठी एकमेव सुरू असलेला  अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाची पूर्णत्वाची कडी (को-जन इथेनॉल) लागलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखाच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. संत तुकाराम कारखान्यातील एका गटासाठी अखेर निवडणूक होणार असून हिंजवडी-ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरोध निवडणुकीच्या सर्वपक्षीय प्रमुखांसह सभासदांच्या आशा अखेर मावळल्या. 

२१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र ऊस उत्पादक गट क्र. १ हिंजवडी-ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष विदुरा उर्फे नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. हिंजवडी-ताथवडे गटामधून बाळू भिंताडे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दोन दिवस नेत्यांनी अतोनात प्रयत्न केले. पण, यश आले नाही. कारखान्याच्या गट क्रमांक १ ताथवडे-हिंजवडी या गटातील तीन जागेसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर चार अर्ज शिल्लक राहिले होते. या गटातील चार उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे.मतदारसंघाकरिता दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ५ या कालावधीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या तालुक्यातील ५७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. कारखान्याचे एकूण २२,२५८ मतदार आहेत. मतमोजणी दि. ६ एप्रिलला सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी सांगितले.

कासारसाई-दारुंब्रे (ता. मुळशी) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली. अर्ज माघारीच्या दोन दिवसांनंतर यादी जाहीर केली. निवडणुकीसाठी २१ जागांसाठी २२६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी २६ दुबार, तर ५ नामंजूर करण्यात आली. त्यामुळे अंतिम टप्प्यात १९५ पत्रे वैध ठरली. ते मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, संचालक मंडळातील जागांपेक्षा एक अर्ज जास्त राहिल्याने मतदान प्रक्रिया राबविणे भाग पडणार आहे.२१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली. मात्र, ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

उमेदवारांची अंतिम यादी

ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) : ३ जागा 
विदुरा नवले (ताथवडे)
चेतन भुजबळ (पुनावळे)
दत्तात्रय जाधव  (नेरे, पो. जांबे)
बाळू भिंताडे (कासारसाई).


ऊस उत्पादक गट क्र. २ (पौड-पिरंगुट) – ३ जागा
धैर्यशील ढमाले (बेलावडे)
यशवंत गायकवाड (नाणेगाव, पो. कुळे)
दत्तात्रय उभे (कोळावडे).


ऊस उत्पादक गट क्र. ३ (तळेगाव-वडगाव) : ३ जागा
ज्ञानेश्वर दाभाडे  (माळवाडी, पो. इंदोरी)
बापूसाहेब भेगडे (तळेगाव दाभाडे)
संदीप काशिद (इंदोरी).


ऊस उत्पादक गट क्र. ४ (सोमाटणे-पवनानगर) : ३ जागा
छबुराव कडू (पाचाणे, पो. चांदखेड)
भरत लिम्हण  (सांगवडे, पो. साळुंब्रे)
उमेश बोडके (गहुंजे, पो. देहूरोड).


ऊस उत्पादक गट क्र. ५ (खेड-शिरूर-हवेली) : ४ जागा 
अनिल लोखंडे (मरकळ)
धोंडिबा भोंडवे (शिंदे वस्ती, रावेत)
विलास कोतोरे (चिंबळी)
अतुल काळजे (काळजेवाडी, चऱ्होली बु.).


महिला राखीव – २ जागा
ज्योती अरगडे (काळुस)
शोभा वाघोले (दारुंब्रे).


अनुसूचित जाती-जमाती : १ जागा 
लक्ष्मण भालेराव (काले पो. पवनानगर).


इतर मागासवर्ग : १ जागा
राजेंद्र कुदळे (सुभाषनगर, शुक्रवार पेठ, पुणे).


विमुक्त जाती/भटक्या जमाती – १ जागा
शिवाजी कोळेकर (कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड).


मतदान आणि मतमोजणी कार्यक्रम असा असेल हिंजवडी-ताथवडे मतदारसंघासाठी ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. कारखाना कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली-शिरूर या तालुक्यांतील ५७ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया होणार आहे. एकूण २२,२५८ जण मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.

तब्बल २२ हजार मतदारसंख्या असून यामध्ये मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ २ हजार २१५, सोमाटणे-पवनानगर मतदार संघात ३ हजार २१ असे एकूण ५ हजार २३६ मतदार आहेत. पौड-पिरंगुट ३ हजार ५४६, हिंजवडी-ताथवडे ३ हजार ३०८ असे एकूण ६ हजार ८५४ मतदार आहेत व अन्य असे एकूण २२ हजार ९१७ सभासद आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई आदींनी वेळोवेळी कारखान्याच्या वाटचालीमध्ये मदत केली आहे. कारखान्याच्या उभारणीसाठी विदुरा नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार स्व.दिगंबर भेगडे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप, विलास लांडे, दिवंगत खासदार गिरीश बापट, माजी आमदार रुपलेखा ढोरे, आमदार शंकर मांडेकर, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, सुरेश गोरे यांनी योगदान दिले आहे. नवले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूकही सर्वपक्षीय सहमतीने आणि एकमताने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.  या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूरचा अंतर्भाव आहे. मावळमध्ये आमदार सुनील शेळके, मुळशीमध्ये शंकर मांडेकर तर; शिरूरमध्ये माऊली कटके असे तीन आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत. चिंचवडमध्ये शंकर जगताप हे भाजपचे; तर खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबासाहेब काळे आहेत. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याने स्वतः अजित पवार यांनी या निवडणुकीत गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, तीनही आमदारांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन आमदार नियमात बसत नसल्याने त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल केले होते. 

कारखान्याच्या निवडणूकीसाठी 226 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील 26 अर्ज दुबार भरलेले होते. मुळशी तालुक्यातील पौड-पिरंगुट आणि हिंजवडी-ताथवडे गटात प्रत्येकी 17 अर्ज वैध झाले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगांव-वडगाव गटात 23 आणि सोमाटणे पवनानगर गटात 37 अर्ज वैध राहिले होते. खेड-हवेली-शिरूर मतदार संघात 30 अर्ज वैध झाले होते. महिला राखीव गटात 20, अनुसुचित जाती/जमाती गटात 8, इतर मागासवर्गीय गटात 35 तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात 8 जणांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.  


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Monday, 24 March 2025

maharashtra gram panchayat election 2025; राज्य निवडणूक आयोगाच्या उद्दामपणामुळे ग्रामपंचायत निवडणुकांनाही रोख लागणाची शक्यता; ओबीसी आंदोलकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

राज्य निवडणूक आयोगाचे ओबीसींच्या रिक्त जागांवरील आरक्षण संपुष्टात आणण्याचे नवे वादग्रस्त परिपत्रक अन्यायकारक व बेकायदेशीर!



पुणे- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक व पोट निवडणूका न्यायालयीन स्थगितीमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. इतर मागासवर्ग राखीव जागा बाबत न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना त्या निकालाचा गैर अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्चला रिक्त जागांवरील आरक्षण संपुष्टात आणण्याचे नवे वादग्रस्त परिपत्रक आदेश जारी केलेला असून जिल्हाधिकारी यांना सूचित करणारा अन्यायकारक व बेकायदेशीर आदेश दिलेला आहे. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील मुदत संपणाऱ्या व रिक्त अशा एकत्रित १६७३ जागा वर ओबीसींच्या रिक्त जागांवरील आरक्षण संपुष्टात आणण्याचे नवे वादग्रस्त परिपत्रक आहे. या आदेशाला विरोध करुन ओबीसी आंदोलकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे.  

एकीकडे विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतांसाठी ओबीसीनचे लांगूलचालन करायचे आणि दुसरीकडून आरक्षण हिरावून घेण्याचे षडयंत्र सरकारकडून रचले जात आहे. ओबीसींच्या रिक्त जागावर पोट निवडणूक घेताना पुन्हा आरक्षण सोडत काढण्याचा चंग बांधला जात आहे त्याठिकाणी अतिरिक्त ठरत असल्यास सर्वसाधारण खुल्या वर्ग पद्धतीचा अवलंब करावा असा संदेश या आदेशातून दिलेला आहे. तसेच मागासवर्गीय यांचे लोकसंख्या प्रमाण व राखीव जागा प्रमाण समर्पित आयोगाने केलेल्या टक्केवारी शिफारसी केलेली आहे किंवा कसे याची खातरजमा करुन ओबीसींच्या जागा अतिरिक्त ठरत असल्यास त्या अनारक्षित करुन सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 

सदरील ओबीसींच्या रिक्त जागांवरील आरक्षण संपुष्टात आणण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे नवे वादग्रस्त परिपत्रक अन्यायकारक व बेकायदेशीर असल्याने ओबीसी आंदोलक या आदेशाला तीव्र विरोध करीत आहेत. ओबीसी आंदोलकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळे तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या उद्दामपणामुळे ग्रामपंचायत निवडणुकांनाही रोख लागणाची शक्यता आहे. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Saturday, 15 March 2025

gram-panchayat-members-disqualified-for-failing-to-submit-caste-certificate धारशिव, लातूर, परभणी जिल्ह्यातीतील राखीव जागांवरील ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह १०१८ सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्र अभावी अपात्रतेची कारवाई

राखीव जागा हडपणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; मराठवाड्यात साफसफाई सुरु

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन आहे. धारशिव, लातूर, परभणी जिल्ह्यातील अनेक सदस्यांनी हे बंधन गांभीर्याने घेतले नाही. यामुळे त्यांना दीड वर्षातच पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४२ ग्रामपंचायती सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे तर लातूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील अशा २६१ सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे तर परभणी जिल्ह्यात २१५ ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द करण्याची कारवाई केल्याने या तीन जिल्ह्यातील १०१८ ग्रामपंचायती सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. राखीव जागा हडपणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून मराठवाड्यात साफसफाई सुरु केलेली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून संबंधितांना कारवाई बाबत नोटिसा प्रक्रिया सुरु आहेत. राज्यात सर्वच जातींना मागासवर्गीय प्रमाणे आरक्षण मागणी होत आहे. राजकीय आरक्षणावर मागील काही कालावधीत अतिक्रमण होत आहे. राखीव जागा हडपण्याचा सर्रास प्रयत्न केला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून येण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र काढून राजकीय आरक्षणावर दरोडा टाकला जात आहे. दरम्यान सन २०२०-२०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत राखीव पदावर निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ११९८ ग्रामपंचयात सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांनी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांवर आपत्रतेची पहिलीच कारवाई आहे. या कारवाई मुळे राखीव जागांवर किती अतिक्रमण होत आहे ही उघड झालेले आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 542 ग्रामपंचायती सदस्यांना केले अपात्र 

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 542 ग्रामपंचायती सदस्यांना अपात्र करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील 97 , धाराशिव तालुक्यातील 55 उमरगा तालुक्यातील 145, परंडा तालुक्यातील 71, भूम तालुक्यातील 85 वाशी तालुक्यातील 40 लोहारा तालुक्यातील 22, कळंब तालुक्यातील 27 सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची ही धाराशिव जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव जागांवरील निवडून आलेल्या सदस्यांसाठी एक नियम आहे. त्यानुसार, या सदस्यांना निवडून आल्यानंतर 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक सदस्यांना सूचना देऊनही त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले. धाराशिव जिल्ह्यात 2021 नंतर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधी सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारी यांनी सदस्यत्व रद्द केले आहे .यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांच्या शिफारसी नंतर जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारी यांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 10(1-अ) अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात प्रशासनाने मोठी कारवाई केली. 542 सदस्यांना थेट घरी बसवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या 12 मार्च रोजी याविषयीचा आदेश दिला. आता ग्रामपंचायत सदस्य या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या 97 सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केले केल्यामुळे चार गावच्या सरपंचासह 93 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपात्र घोषित केले त्यामुळेराजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत‎ निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक‎ लढवून निवडून आलेल्या ग्रामपंचायत‎ सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर‎ करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी‎ देण्यात आलेला असतो. या कालावधीत‎ जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे‎ सदस्यांना बंधनकारक असते. परंतु तुळजापूर तालुक्यातील निवडून आलेल्या 93 सदस्यांनी व चार गावच्या सरपंचानी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार 12 मार्च रोजी आदेश अपात्रतेबाबत आदेश दिले आहेत. अपात्र ठरलेल्यामध्ये पांगरदरवाडीच्या सरपंच सिंधू कृष्णात पोफळे, गंजेवाडीच्या सरपंच शेख शाईन फियाज, नंदगावच्या सरपंच राधिका विद्यानंद घंटे, मूर्टाच्या सरपंच मीना विजय कुमार लोहार यांना अपात्र केले आहे. यांच्यासह सदस्य 93 ग्रामपंचायत सदस्यांमध्ये बंदपट्टे उज्वला मधुकर अणदूर, शेख नसीबा फारुख (आरळी बुद्रुक), भिसे पद्मिनी संतोष कदमवाडी, पात्रे संगीता श्रीशैल कसई, मनीषा बालाजी मुळे काळेगाव, विशाल रामचंद्र मुळे काळेगाव, स्वामी सिद्धलिंग मल्लिकार्जुन किलज, क्षीरसागर संतोष सोमनाथ कुंभारी, कोळी संगीता नागेश कुंभारी, बालिका अभिमन्यू जवान खडकी, माळी सुजाता सुरेश खानापूर, कागे राजश्री नामदेव जळकोट, कांबळे भाग्यश्री शहाजी जवळगा मेसाई, मस्के मंडाबाई पंडित जवळगा मेसाई, सत्यभामा वीरभद्र पोतदार तीर्थ खुर्द, गायकवाड संतोषी तानाजी दहिवडी, अंधारे सुजाता शिवाजी दहिवडी, विकास मच्छिंद्र थोरात देवकुरुळी, राम ज्ञानदेव कोळी देवकुरुळी, चव्हाण अनिल किसन धनगरवाडी, राहुल अशोक माळी पिंपळा खुर्द, देवकर राजश्री लक्ष्मण बाबळगाव, कदम नंदिनी मिनीनाथ बिजनवाडी, कांबळे निलावती बाळू भातंब्री, लोंढे सुरेखा राजेंद्र भातंब्री, हजारे गंगाबाई पांडुरंग मंगरूळ, कसबे लिंबराज रघुनाथ येवती, डोंबाळे सुप्रिया सूर्यकांत येवती, गोरे दिपाली अनिल शहापूर, कांबळे मधुबाई महादेव वाणेगाव, गोरे दिपाली अनिल शहापूर, महाबोले मुक्ताबाई बाबुराव सराटी, दुपारगुडे रेश्मा विद्याधर सराटी, महादेव निवृत्ती सुरवसे सराटी, राठोड गोविंद सुभाष सराटी, सिद्ध गणेश सिंधू सुरेश सिंदफळ, सिद्ध गणेश धम्मपाल गौतम सिंदफळ, ठोंबरे पुनम शेषेराव सिंदफळ, माळी जयश्री उमेश सिंदफळ, इनामदार याकूब मुस्तफा सिंदफळ, गायकवाड रंजना मनोज सिंदफळ, कांबळे रंजना परमेश्वर हंगरगा नळ, कांबळे नवनाथ विश्वंभर हंगरगा नळ, घोडके महानंदा अंबादास हंगरगा नळ, कलशेट्टी नागरबाई दत्तात्रय हंगरगा नळ, साखरे उषा यादव हिप्परगा ताड, आरबळी येथील सदस्य काजल नदाफ पिंजारी, उबाळे सीताबाई सिद्राम, नदाफ हसीना सुरज, उमरगा चिवरी येथील बनसोडे कोमल जगन्नाथ, पिंजारी मोहम्मद काशिम, काक्रंबा येथील सुरवसे निर्मला दुर्वास, काटगाव येथील घोडके भारतबाई जालिंदर, धुते कोमल योगेश, कांबळे इंदुबाई अंकुश, घोडके भारतबाई जालिंदर, काटी येथील कुरेशी बिस्मिल्ला मंजूर, शिंदे रंजना बाळासाहेब, सोनवणे प्रकाश रामचंद्र, कामठा येथील शैला संतोष क्षीरसागर, कुन्सावळी येथील वाघमोडे विकास लक्ष्मण, सुतार कोंडाबाई बाबा, केशेगाव येथील घंटे शंकर सिद्राम, गुजनुर येथील मोरे नामदेव बाबू व वाघमारे कमाबाई तुकाराम, गुळहळी येथील काळुंके छाया नागनाथ, गायकवाड नितीन व्यंकट चिकुंद्रा, देवसिंगा तूळ येथील वाघमारे करिष्मा रवी, चिवरी येथील देडे रवी विमा, चिमणे लता उत्तम, देवसिंगा नळ येथील राठोड दयानंद भीमला, नंदगाव येथील शेवाळे प्रज्वला दत्तात्रय, बोरनदवाडी येथील पवार काजल गोवर्धन व जाधव सिद्राम मनु, गोळेगाव येथील रुपनूर अंकुश अरुण, मूर्टा येथील गवळी शिवगंगा गुणवंत, चव्हाण सुमन नामदेव, थोरात सिंधुबाई अशोक, राठोड संजय कोंडीबा, लोहगाव येथील बनसोडे म्हाळप्पा तम्मा, बनसोडे अश्विनी अमोल, वडगाव लाख येथील चंदनशिवे कुसुम दत्ता, वागदरी येथील बिराजदार मीनाक्षी महादेव, शिरपूर येथील गायकवाड छायाबाई राम, शिरगापुर येथील सुळ सत्यभामा विठ्ठल, सलगरा मड्डी येथील वाघमारे मीनाक्षी चंद्रकांत, इटकर राजेंद्र वेंकना, सांगवी काटी येथील बनसोडे नामदेव परमेश्वर, सावरगाव येथील व्हटकर सुषमा सतीश, तानवडे परमेश्वर चंद्रकांत, हंगरगा तूळ येथील डुकरे मुक्ता अंबादास व होणाळा येथील मस्के महेश गोविंद यांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील २६१ सदस्यांनी गमवाले पद

लातूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील अशा २६१ सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी ही कारवाई केली. उर्वरित सहा तालुक्यांतील अशा सदस्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे अनेक ग्रामपंचायतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून काही ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या संख्येने सदस्य अपात्र झाल्यामुळे तिथे गणपूर्तीअभावी प्रशासकाचीही नियुक्ती होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एक जानेवारी २०२१ ते १० जुलै २०२३ कालावधीत झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कायद्यातील कलम १० (१ अ) व कलम ३० (१ अ) नुसार राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिने म्हणजे वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याचे बंधन आहे. सन २०२१ व २०२२ मध्ये निवडून आलेल्या सदस्यांसाठी राज्य सरकारने ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचनेद्वारे आधी एक व त्यानंतर एक अशी दोन वेळा मुदतवाढ मंजूर केली होती. .त्यानंतरही सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्राचा विषय गांभीर्याने घेतला नाही. या सदस्यांना नऊ जुलै २०२४ पूर्वी वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याचे बंधन होते. मात्र या मुदतीत वेळोवेळी सूचना देऊनही सदस्यांनी प्रमाणपत्र दाखल केले नाही. अशा सदस्यांची माहिती गटविकास अधिकाऱ्यांकडून संकलित करण्यात आली.अपात्र झालेले तालुकानिहाय सदस्य- लातूर ९६, शिरूर अनंतपाळ ८०, जळकोट २०, देवणी ६५ असे एकूण २६१ अपात्र केले आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र अभावी परभणी जिल्ह्यात २१५ ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तथापि जिल्ह्यातील अनेक सदस्यांनी त्याचे उल्लंघन केल्याने त्यांना पदावरून काही महिन्यांतच पायउतार व्हावे लागले आहे. जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, पालम, सोनपेठ, मानवत, पाथरी, सेलू, पुर्णा आणि परभणी या ९ तालुक्यातील २१५ सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या सर्वांना अपात्र ठरवले आहे. परभणी जिल्ह्यात जानेवारी २०२१ मध्ये ५६६, ऑगस्ट २०२२ मध्ये ३, सप्टेंबर २०२२ मध्ये ३ व डिसेंबर २०२२ मध्ये १२७ अशा एकूण ६९९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १०- १ अ नुसार राखीव प्रवर्गातून ग्रामपंचायत निवडणूक लढविणा-या ज्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसेल, अशा उमेदवारास निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे, नसता अशा सदस्याची निवड नियमानुसार रद्द ठरते. त्यावरूनच ही कार्यवाही करण्यात आली आहे. जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या ५६६ ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना शासनाने एका परिपत्रकानुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १७ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत वाढवून दिली होती. तसेच जानेवारी २०२१ मधील निवडणुकीसह त्यानंतर झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या व त्यानंतर बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांना शासनाने दिनांक १० जुलै २०२३ अन्वये अध्यादेशाच्या दिनांकापासून बारा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून दिली होती. ही मुदत दि.९ जुलै २०२४ रोजी समाप्त झाली. सर्व तहसील कार्यालयाकडून राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना ९ जुलै २०२५ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांची माहिती मागविण्यात आलेली होती. तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जात वैधता प्रमाणपत्र दाखल न करणा-या एकूण ३८९ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक २० ते २७ जानेवारी २०२५ रोजी नोटीसा बजाऊन त्यांनी विहित मुदतीत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल केलेले आहे किंवा नाही याबाबत पडताळणी करण्यात आली. पडताळणी अंती ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी राखीव प्रवर्गातून निवडून येऊन त्यांचे जातीचे, जमातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत दाखल केले नाही, अशा राखीव संवर्गातून ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेल्या २१५ ग्रामपंचायत सदस्यांना आता अपात्र ठरवण्यात आले आहे.


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Tuesday, 4 March 2025

Maharashtra MLC By-Election 2025: विधानपरिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी २७ मार्चला निवडणूक

विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी  २७ मार्चला निवडणूक


विधानपरिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १० ते १७ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येईल. अर्जांची छाननी १८ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० मार्च पर्यंत असेल. रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ मार्च रोजी संध्याकाळी होईल आणि निकाल जाहीर केले जातील.  राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांसाठी निवडणूक होणार आहे.

आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. चार महिन्यापूर्वी राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या मध्ये भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

विधानसभा सदस्यामधून विधानपरिषदेसाठी निवडून द्यायच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत आहे. हे बहुमत लक्षात घेता पाचही जागा त्यांनाच मिळतील असे चित्र आहे. हे पाच सदस्य नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या पाच जणांचा कार्यकाळ वेगवेगळा असणार आहे. या आमदाराचा कार्यकाळ वेगवेगळा असणार असल्याने विरोधकांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जी अधिसूचना जारी केली आहे. त्या आधीसुचनेत या पाच जागांची निवडणूक एकाच दिवशी पण वेगवेगळी निवडणूक घ्यावी असे म्हटले आहे. याचा अर्थ प्रत्येक जागेसाठी जिंकण्यासाठीचा कोटा हा वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांना जिंकण्याची संधी नाही. दुसरीकडे ज्यांचा कार्यकाळ एकाच वेळेस समाप्त होतो. त्या तीन जागांची निवडणूक एकत्र व अन्य दोन जागांची निवडणूक वेगवेगळी झाली असली तरी जिंकण्यासाठीचा कोटा विरोधकाकडे नसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार असल्याचे लक्षात येते. अजित पवार गटाकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वा पाच वर्षाचा असणार आहे तर शिंदेसेनेकडून संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वातीन वर्षाचा असणार आहे. भाजपकडून ज्यांना आमदारकी मिळेल त्याचा कार्यकाळ 13 महिन्याचा असणार आहे. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्या फळीतील एक, दोन जणांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book