Monday, 7 November 2016

रस्ता मागणी आणि रस्‍ता अडविणे ..... महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६


मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले. जमीन मालक बदलले. त्यामुळे काही ठिकाणी नवीन खरेदीदाराला त्याच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नाही. त्यामुळे तो तहसिलदारांकडे रस्ता मागणीचा अर्ज करतो.स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार  तहसिलदारांना आहे.

अनेकवेळा असे दिसुन येते की, तहसिलदारांकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये दाखल केलेल्‍या रस्ता मागणीच्या अर्जावर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ च्या तरतुदींनुसार निकाल दिला जातो तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अन्वये दाखल अर्जावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदींनुसार निकाल दिला जातो. ही बाब चुकीची आहे. एका कायद्यान्वये दाखल अर्जावर अन्य कायद्यातील तरतुदींनुसार निकाल देणे बेकायदेशीर आहे. 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ च्या तरतुदींनुसार शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या कोणत्याही जमिनीतील उपलब्‍ध रस्‍त्‍याला किंवा स्वाभाविकपणे वाहत असेल अशा पाण्‍याच्‍या प्रवाहाला कोणीही अवैधरित्‍या अडथळा केला असेल तर असा अवैध अडथळा काढून टाकण्‍याचा अधिकार तहसिलदारांना आहे.
म्‍हणजेच म.ज.म.अ. कलम १४३ अन्‍वये कार्यवाही करतांना रस्‍ता आधीच उपलब्‍ध नसतो परंतु मा.को.ॲ. १९०६, कलम ५ अन्‍वये कार्यवाही करतांना रस्‍ता आधीच उपलब्‍ध असतो.  
     
F महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ :
या कलमानुसार तहसिलदारांकडे रस्ता मागणीसाठी अर्ज करतांना खालील कागदपत्रे अर्जाबरोबर सादर करावीत.
P अर्जदाराच्या शेतजमिनीचा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरुन रस्त्याची मागणी केली आहे त्याचा कच्चा नकाशा.
P अर्जदाराच्या शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा (उपलब्ध असल्यास)
P अर्जदाराच्या जमीनीचा चालू वर्षातील (तीन महिन्याच्या आतील) सात-बारा उतारा
P लगतच्या शेतकर्‍यांची नावे व पत्ते व त्‍यांच्‍या जमिनीचा तपशील
P अर्जदाराच्‍या जमीनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरु असतील तर त्याची कागदपत्रांसह माहिती.

¿ रस्ता मागणीसाठी अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया :
१. अर्ज दाखल करुन घेतला जातो.

२. अर्जदार व ज्या शेतकर्‍यांच्या भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे मांडण्‍याची संधी देण्यात येते.

३. अर्जदाराने सादर केलेल्या कच्च्या नकाशावरुन किमान किती फूटाचा रस्ता देणे आवश्यक आहे याची पडताळणी केली जाते.

४. तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांचेमार्फत समक्ष स्थळ पाहणी करण्यात येते. स्थळ पाहणीच्या वेळेस अर्जदाराला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय याची खात्री करण्यात येते.

५. रस्ता मागणीचा निर्णय करतांना तहसिलदारांनी खालील प्रश्‍नांची उत्तरे लक्षात घेणे अपेक्षित आहे:
अ. अर्जदाराला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय?
ब. अर्जदाराच्या शेताचे यापूर्वीचे मालक कोणत्या मार्गाचा वापर करीत होते?
क. जर नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर सर्वात जवळचा मार्ग कोणता?
ड. मागणी केलेला रस्ता सरबांधावरुन आहे काय?
इ. अर्जदाराला शेतात येण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय?
फ. अर्जदाराला नवीन रस्ता दिल्यास लगतच्या शेतकर्‍यांच्‍या होणार्‍या नुकसानाचे प्रमाण किती असेल?

६. उपरोक्त सर्व बाबींची शाहनिशा करुन, नवीन रस्ता देणे आवश्यक आहे याची खात्री पटल्यानंतर, तहसिलदार अर्ज मान्य करतात किंवा मागणी फेटाळतात. अर्ज मान्‍य झाल्‍यास, असा रस्‍ता लगतच्या शेतीच्या हद्दी/बांधावरून देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकर्‍यांचे कमीत कमी नुकसान होईल असे पाहिले जाते.
रस्‍ता देतांना दोन्ही बाजूने ४—४ रूंद असा एकूण ८ फुट रुंदीचा पायवाट रस्‍ता देता येतो. उभतांच्‍या सहमतीने अशा रस्‍त्‍याची रुंदी कमी-जास्‍त करता येते. गाडी रस्ता देतांना तो ८ ते १२ फूट रुंदीचा देता येतो.   
वाजवी रुंदीपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्याची मागणी असल्यास अर्जदाराने लगतच्या शेतकर्‍याकडून रस्त्याचे हक्क विकत घेणे अपेक्षीत आहे. 

¿ म.ज.म.अ.१९६६, कलम १४३ अन्‍वये फक्त बांधावरुनच रस्ता देतो येतो, या कलमाचे शीर्षकचं "हद्दीवरुन रस्त्याचा अधिकार" असे आहे, त्यामुळे एखादा गटाच्या मधून रस्ता दिल्यास अशी कार्यवाही कलम १४३ च्‍या तरतुदींशी विसंगत होईल आणि त्‍याविरुध्‍द दिवाणी न्यायालयात अपील झाल्यास तिथे असा निर्णय टिकणार नाही.

¿ कलम १४३ अन्‍वये रस्‍ता देतांना 'गरज' (Necessity) तपासली जाते. या ठिकाणी 'Indian Easement Act 1882' चे कलम १४ पहावे, यात असा रस्ता 'Reasonably convenient' असावा असा शब्दप्रयोग आहे, तर कलम १४३ मध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरुरी आहे, याकडे तहसीलदाराने लक्ष द्यावे असे नमूद आहे, या कलमाखाली किती रुंदीच्या रस्त्याच्या वापराचा हक्क मान्य करावा याबाबत तरतुद आढळून येत नाहीत, त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी आदेशात 'बांधाच्या एकाबाजूने एक चाकोरी व दुसऱ्या बाजूने एक चाकोरी'  असा किंवा तत्‍सम उल्लेख करुन आदेश पारित करावा, या कलमाखाली फक्त "रस्त्याच्या वापराचा हक्क" मान्य केला जातो, "रस्त्याच्या जागेचा नाही" याची नोंद घ्‍यावी.

¿ तहसिलदारांचा आदेश मान्य नसल्यास त्याविरूध्द, आदेश प्राप्त झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडे अपील दाखल करता येते. किंवा तहसिलदारांच्या निर्णयाविरूध्द एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्यास महसूल अधिकार्‍याकडे अपील करता येत नाही.

¿ रस्‍त्‍याच्‍या निर्णयाची नोंद, ज्‍या खातेदाराच्‍या जमिनीतून रस्‍ता दिला आहे त्‍या खातेदाराच्‍या सात-बाराच्‍या 'इतर हक्‍क' सदरी नोदविता येते. त्याच बरोबर 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये देखील अशा नोंदी घेतल्या पाहिजेत.
मा. उच्च न्यायालयाचे न्‍यायाधिश श्री. ए. पी. भांगळे यांनी हरिराम मदारी अत्रे वि. उद्‍दल दयाराम लिलहरे या प्रकरणात निकाल देतांना नमूद केले आहे की, "म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम १६५ नुसार असलेल्‍या 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये घेण्यात आलेल्या नोंदी या चौकशी करुन तसेच प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम केल्या जात असल्‍यामुळे अशा नोंदी शाबीत करण्यासाठी आणखी पुरावा मागण्याची आवश्यकता नाही, असा वेगळा किंवा स्वतंत्र पुरावा मागणे हे 'वाजिब ऊल अर्ज' ठेवण्याच्या हेतू/ उद्देशालाच छेद देण्यासारखे आहे. गाव पातळीवर ठेवलेल्या 'वाजिब ऊल अर्ज' मधील नोंदीचा प्रतिवादीने आदर करावा आणि अर्जदार यांना रस्त्याच्या वापरास अडथळा करु नये."

मा. उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाचा विचार करता, खाजगी जमिनीतून असलेले वहीवाटीचे रस्ते व इतर सुविधाधिकार यांच्या नोंदी 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे, तसेच तहसीलदार यांनी मा.को.ॲ. कलम ५ अन्‍वये किंवा म.ज.म.अ. कलम १४३ नुसार आदेश पारित करुन, अनुक्रमे अडथळा दूर केल्यास किंवा नवीन रस्ता दिल्यास अशा रस्त्यांच्या नोंदी सुद्धा 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये घेणे आवश्‍यक आहे.

F मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ : शेतीच्या अस्‍तित्‍वात असणार्‍या रस्त्याला अडथळा करणार्‍याविरूध्द मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५(२) अन्वये (हरकतीपासून सहा महिन्याच्या आत) दावा दाखल करता येतो.  मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अन्वयेचे कामकाज दिवाणी न्यायालयाप्रमाणे चालविले जाते.

¿ मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ मधील महत्वाच्या तरतुदी :
P हा कायदा फक्त शेत जमिनींनाच लागू आहे, अकृषिक जमिनींना नाही. 

P हा कायदा मुंबई वगळता सर्व महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

P कलम ५ (१) (अ): शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या, पिके किंवा झाडे असलेल्या कोणत्याही जमिनीतून किंवा तीस संलग्न असलेल्या जमिनीत/जमिनीतून किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहात किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागावर अवैधरित्या कोणीही अडथळा केला असेल व अशा अडथळ्यामुळे शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या/पिके किंवा झाडे असलेल्या जमिनीस किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहाला किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागाला धोका पोहोचण्याचा संभव असेल तर तहसिलदाराला असा अवैध अडथळा काढून टाकण्‍याचा अधिकार आहे.

P या कलमान्वये कारवाई करतांना रस्ता पूर्वापार वहिवाटीचा व वापरामध्ये असावा तसेच त्या रस्त्यात अडथळा निर्माण केला गेला असावा. नवीन रस्ता देणे या कायद्यात अपेक्षीत नाही.   

P कलम ५ (१) (ब):  उपरोक्त प्रमाणे अवैध अडथळा केलेल्या जमिनीचा, प्रवाहाचा कब्जा वैध मालकास देता येतो. (या कायद्यान्वये शेत रस्त्यावरील अवैध अडथळा काढता येतो. परंतू शेत बांधावरून नवीन रस्ता देता येत नाही.)

P कलम ५ (२):  उपरोक्त प्रमाणे अवैध अडथळा केलेल्या इसमास निषेध आज्ञा काढून तसे न करण्यास फर्मावता येते. (या कायद्यान्वये दिलेल्या निषेध आज्ञेचा अवमान भा.दं.सं.कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र आहे.)  

P कलम ५ (३):  उपरोक्त प्रमाणे अवैध अडथळा निर्माण झाल्यापासून त्याविरूध्द सहा महिन्याच्या आत वादपत्र दाखल झाले पाहिजे. त्यानंतर या कायद्याखाली वादपत्र स्वीकारता येणार नाही. 
हा कायदा शेत जमिनींनाच लागू आहे. त्यामुळे जमीन वापराचा मूळ हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे.

P कलम ७: या कायद्याखाली दावा दाखल करतांना वादपत्रात खालील मजकूर असला पाहिजे:
१. वादीचे नाव, धर्म, जात, व्यवसाय व राहणेचा पत्ता.
२. प्रतिवादीचे नाव, धर्म, जात, व्यवसाय व राहणेचा पत्ता.
३. उभारलेल्या अडथळ्याचे स्वरूप, ठिकाण व जी निषेध आज्ञा/कब्जा आवश्‍यक आहे त्याचे स्वरूप.
४. दाव्याचे कारण उद्भवल्याची तारीख.
५. दाव्याचे कारण उद्भवण्यास कारणीभूत परिस्थिती.
६. दाव्यास उपयुक्त कागदपत्रे, पुरावे, साक्षीदारांची संपूर्ण माहिती. (माहिती अपूर्ण आहे या सबबीखाली तहसिलदारला दावा फेटाळता येणार नाही)

P कलम ८: या कायद्याखाली दावापत्र तहसिलदार यांना समक्षच सादर केले गेले पाहिजे. दावापत्र टेबलावर ठेवले, पोस्टाने पाठवले, लिपीकाला दिले तर ते अयोग्यप्रकारे सादर केले असे मानले जाईल.

P कलम ९: वरीलप्रमाणे वादपत्र तहसिलदार यांना समक्ष सादर केल्‍यानंतर तहसिलदारने वादीची शपथेवर तपासणी करावी.

P कलम १०: वादपत्रावर शेवटी, अर्जदाराने/त्याच्या वकिलाने तहसिलदार यांच्या समक्ष स्वाक्षरी करावी व पुष्टीकरण आणि सत्यापन सादर करावे. पुष्टीकरण आणि सत्यापनाशिवाय दावा स्वीकारला जाणार नाही. (खोटे सत्यापन सादर करणे हा भा.दं.सं.कलम १९३ अन्वये अपराध आहे.)  

P कलम ११: तहसिलदारने वादपत्राची तात्काळ तपासणी करावी. उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास वादपत्रावर तसा शेरा नोंदवून सुनावणीची तारीख लावावी.

P कलम १२: वादपत्राची तपासणी केल्यावर उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता होत नसल्यास, तहसिलदार वादपत्रावर तसा शेरा नोंदवून वादपत्र नाकारू शकतात. 

P कलम १३: वादपत्राची तपासणी केल्यावर त्यातील विषय तहसिलदारच्या अधिकारक्षेत्राबाहेरील आहे असे वाटल्यास तहसिलदार वादपत्रावर तसा शेरा नोंदवून वादपत्र परत करू शकतात. 
P कलम १४: वादपत्र स्वीकारल्यानंतर तहसिलदारने तात्काळ नोटीस काढून सुनावणीची तारीख, अपरिहार्य कारण नसल्यास, नोटीस दिल्यानंतरच्या दिवसापासून अकरा ते पंधरा दिवसातील लावावी. सुनावणीची जागा उभय पक्षकारांच्या सोयीची असावी. 

P कलम १६: नोटीस बजावल्यानंतरही सुनावणीच्या तारखेस वादी अपरिहार्य कारणाशिवाय गैरहजर असल्यास तहसिलदार खर्चासह दावा काढून टाकू शकतात. मग इतर सर्व हजर असो किंवा नसो. नोटीस बजावल्यानंतरही सुनावणीच्या तारखेस प्रतिवादी अपरिहार्य कारणाशिवाय गैरहजर असल्यास तहसिलदार उपलब्ध साक्षी-पुराव्यांवरून एकतर्फी निर्णय घेऊ शकतात.

P कलम १९: सुनावणीच्या तारखेस तहसिलदार यांनी वादीच्या अर्जातील किंवा सादर केलेल्या पुराव्यातील प्रत्येक मुद्द्याची स्वत: खात्री करावी. स्थळ पाहणी आणि पंचनामा करावा. यात प्रतिवादीला असणारा अधिकार, अडथळ्यामुळे वादीला होणारे नुकसान, अडथळ्याचा कालावधी, वादीचा हक्क, कब्‍जा इत्यादीबाबत सविस्तर चौकशी करावी. कलम १९(२) अन्वये तहसिलदार यांना इतर साक्षीदार तपासण्याचा आणि वादग्रस्त मालमत्ता पाहण्याचा अधिकार आहे. 

P कलम २१: तहसिलदार यांनी या कायद्यान्वये दिलेला निर्णय कसा अंमलात आणावा याबाबतची कार्यपध्दती हे कलम विषद करते. यात वाढणार्‍या पिकांबाबत करण्याची कार्यवाही, निषेधाज्ञा बजविण्याची पध्दत, खर्चाची वसूली, निषेधाज्ञेची अवज्ञा झाल्यास शिक्षा करण्याची पध्दत नमूद आहे.     

P कलम २३(१): तहसिलदारने या कायद्यान्वये दिलेल्या निकालावर अपील करता येत नाही. 

P कलम २३(२): तहसिलदारने या कायद्यान्वये दिलेल्या निकालाचे उपविभागीय अधिकारी पुनर्विलोकन करू शकतात.

¨ उपविभागीय अधिकारी यांनी पुनर्विलोकनाध्ये दिलेल्या निकालाविरूध्द उच्च न्यायालयात रिट दाखल करावे लागते.
¨ या कायद्यान्वये काम करतांना या कायद्यात नमूद नोटीस, निषेध आज्ञा इत्यादी अनुसूचींचाच वापर करावा.


F शेत बांधाची मोजमापे :
महाराष्ट्र जमीन महसूल (सीमा व चिन्हे) नियम १९६९ अन्वये शेत बांधाची मोजमापे खालील प्रमाणे असावीत. 
क. कोरडवाहू जमीन           : ४.४६ मीटर रुंद x ०.६१ मीटर उंच
ख.भाताची व बागायत जमीन   : ०.२३ मीटर रुंद x ०.६१ मीटर उंच
ग. सरबांध                  : १.२२ मीटर रुंद x ०.६१ मीटर उंच
  
म.ज.म.अ. कलम १४३ आणि मामलेदार कोर्ट ॲक्‍ट कलम ५ मधील फरक
म.ज.म.अ. कलम १४३
मामलेदार कोर्ट ॲक्‍ट कलम ५
साध्‍या अर्जावरून प्रकरण सुरू होते.
दावा दाखल केल्‍यावर प्रकरण सुरू होते.
रस्‍ता अस्‍तित्‍वात नसतो. 
रस्‍ता अस्‍तित्‍वात असतो.
रस्‍ता अडविलेला नसतो.
रस्‍ता अडविलेला असतो.
सरबांधावरुन नवीन रस्‍ता दिला जातो
रस्‍त्‍यातील अडथळा काढला जातो.
रस्‍ता खुला करण्‍याचा आदेश देता येत नाही.
रस्‍ता खुला करण्‍याचा आदेश देता येतो.
अर्ज दाखल करण्‍यास मुदतीचे बंधन नाही.
दावा दाखल करण्‍यास मुदतीचे बंधन आहे.
तहसिलदारच्‍या आदेशाविरूध्‍द उपविभागीय अधिकार्‍याकडे अपील करता येते.
उपविभागीय अधिकार्‍याला जिल्‍हाधिकार्‍यांनी अपीलाचे अधिकार प्रदान केले असतील तरच तहसिलदारच्‍या आदेशाविरूध्‍द उपविभागीय अधिकार्‍याकडे अपील करता येते. अन्‍यथा जिल्‍हाधिकार्‍यांकडे अपील दाखल करावे लागते.
उपविभागीय अधिकार्‍याकडील अपीलातील आदेशाविरूध्‍द अप्‍पर जिल्‍हाधिकार्‍यांकडे दाद मागता येते. 
उपविभागीय अधिकारी/ जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अपीलातील आदेशाविरूध्‍द उच्‍च न्यायालयात दाद मागावी लागते. 
निषेध आज्ञा देता येत नाही.
निषेध आज्ञा देता येते.

पीक पाहणी आणि वहिवाट प्रकरणे


शेतात पिकणारे पीक आणि देशाची अर्थव्‍यवस्‍था यांचा जवळचा संबंध आहे. शेती उत्‍पादन आणि अर्थव्‍यवस्‍था यांचा परस्परसंबंध प्रस्‍थापित करण्‍यासाठी शेती पासून मिळणार्‍या उत्‍पन्‍नाचा योग्य अभ्यास आणि विश्लेषण असणे आवश्यक आहे. यासाठी विविध पिकांखाली असलेल्‍या जमिनीचे अचूक क्षेत्र, घेण्‍यात आलेल्‍या पिकांचे विविध प्रकार याची योग्‍य, खरी अणि अचूक नोंद असणे अत्‍यावश्‍यक आहे. त्‍यासाठी गाव नमुना नंबर १२ अचूक असणे महत्‍वाचे आहे आणि हे काम फक्‍त आणि फक्‍त तलाठीच करु शकतात. येथे लक्षात घ्‍यावे की देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेतही तलाठी किती महत्‍वाची भूमिका बजावतो.

F ‘जमीन कसणे’ म्‍हणजे काय?:
पीक पाहणी समजून घेण्‍यापूर्वी ‘जमीन कसणे’ याबाबतची कुळ कायद्यातील व्याख्‍या लक्षात घ्यावी.  
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम २ (६) मध्ये ‘व्यक्तिश: जमीन कसणे’ याचा अर्थ ‘‘स्वत:साठी (एक) स्वत:च्या महेनतीने, अथवा (दोन) स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या कष्टाने अथवा (तीन) स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकडून, त्यांना रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन/मोबदला देऊन, परंतु पिकाच्या हिश्श्याच्या स्वरूपात नव्हे, जमीन कसून घेणे’’ असा आहे. याला अपवाद म्‍हणजे विधवा स्त्री, अवयस्क किंवा शारीरिक अथवा मानसिक दौर्बल्य जडलेला इसम, सशस्त्र, फौजेत नोकरीत असणारा इसम, हे नोकरांमार्फत, मजुरांमार्फत शेत कसून घेत असले तरीही ते स्वत:च जमीन कसतात असे कायद्‍याने मानले जाते.  
याचाच अर्थ अधिकृत अधिकाराशिवाय कोणालाही कोणाचीही जमीन वहिवाटता येणार नाही. 

F वहिवाट रीत: सन १९३२ ते १९७३ पर्यंत वहिवाट रीतचे खालील प्रकार होते.
रीत-१ = स्वत: वहिवाट करणे. याला "खुद्द" वहिवाट म्‍हणतात.
रीत-२ = स्वत:च्या देखरेखीखाली मजुरांकडून शेत कसून घेणे.
रीत-३ = इतर व्‍यक्‍ती अथवा कुळाकडून रोख खंडाने शेत कसून घेणे.
रीत-४ = इतर व्‍यक्‍ती शेत कसून घेणे आणि मोबदला म्‍हणून पिकातील वाटा खंड म्हणून देणे. याला "बराई"ने शेत कसणे म्‍हणत.
रीत-५ = इतर व्‍यक्‍ती शेत कसून घेणे आणि मोबदला म्‍हणून पिकातील निश्‍चित वाटा देणे. याला "अर्धेली"ने शेत कसणे म्‍हणत.
रीत-६ = इतर व्‍यक्‍ती शेत कसून घेणे आणि मोबदला म्‍हणून रोख रक्‍कम आणि पीक असा एकत्रित मोबदला देणे.

F कायदेशीर तरतूद: महाराष्‍ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका- खंड ४ मधील प्रकरण दोन, परिच्‍छेद ४ आणि ५ मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे पीक पाहणीची कामे वर्षात दोन वेळा करायची असतात.
१. खरीप हंगामात (०१ ऑगस्‍ट ते १५ ऑक्‍टोबर)
२. रब्‍बी हंगामात (१५ नोव्‍हेंबर ते ३१ जानेवारी)
तथापि, सध्‍या संकरीत बियाणे लागवड पध्‍दतीमुळे कापणी लवकर केली जात असल्यामुळे. खरीप हंगामात पीक पाहणी हंगामातील सप्टेंबर पर्यंत तर रब्बी पाहणी ३१ डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे.

काही ठिकाणी उन्‍हाळी भुईमुग, उन्‍हाळी कांदा इत्‍यादी पिकांची लागवड जानेवारी/फेब्रुवारी महिन्‍यात केली जाते. त्‍यांचीही पीक पाहणी होणे आवश्‍यक आहे.      

F कार्यवाही: ¿ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३० (१) नुसार, जेव्‍हा पिके  शेतात उभी असतील त्‍याच काळात तलाठी यांनी व्‍यक्‍तीश: शेतावर जाऊनच पीक पाहणी करणे आवश्‍यक आहे.

¿ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३० (२) नुसार, तलाठी यांनी पीक पाहणीसाठी जाण्‍यापूर्वी संबंधीत शेत मालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य आणि गावकरी यांना पीक पाहणीच्‍या वेळेस हजर रहाण्‍याची सूचना/नोटीस लेखी स्‍वरूपात, किमान सात दिवस आधी दिनांक व वेळ दवंडीने अथवा समुचित पध्‍दतीने कळवली पाहीजे. तशी नोंद दवंडी रजिस्‍टरला घ्‍यावी.

¿ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३० (३) नुसार, ठरवलेल्‍या दिनांक आणि वेळेवर, उपस्‍थित लोकांसह तलाठी यांनी पीक पाहणी करावी आणि त्‍याची नोंद नमुना ११ ला घ्‍यावी.  

¿ पीक पाहणी करतांना तलाठी यांनी जे पीक खरोखरच शेतात उगवले गेले आहे त्‍याची आणि जितक्‍या क्षेत्रावर ते पीक उगवले गेले आहे त्‍या क्षेत्राची अचूक नोंद घेणे आवश्‍यक आहे. आजकाल संगणीकरण आणि माहितीचा अधिकार यामुळे तलाठी यांनी याबाबत दक्ष रहाणे आवश्‍यकच आहे. चुकीच्‍या नोंदीचा खुलासा देण्‍याची वेळ न आणणे कधीही चांगले.

¿ पीक पाहणी करतांना तलाठी यांनी शेतात उभ्‍या पिकासह, त्‍या जमीनीतील कुळ हक्‍क, वहिवाटदार, सीमा चिन्‍हे, मिश्र पिके, झाडे, फळझाडे, दुबार पिके, जल सिंचनाची साधने नवीन विहीर, बोअरवेल इत्‍यादींची तपासावी करावी व दप्‍तरातील नोंदी अद्‍ययावत कराव्‍या.

¿ अनेकदा तलाठी मागील वर्षीच्या पीक पाहणीची खात्री न करता, चालू वर्षीही मागील प्रमाणेच पीक पहाणी लिहितात. कधी कधी तोवहिवाटदार मयत असतो परंतू त्याची नोंद गाव दप्तरी झालेली नसते. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत मयताचे नाव दरवर्षी या सदरी तसेच लिहिलेजाते. अशा प्रकारांबाबत दक्ष रहावे. 

¿ पीक पाहणी करतांना काही ठिकाणी असे निदर्शनास येते की, अनेक शेतकरी त्यांचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयारकरतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान करतात, हद्दीच्या निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा करतात किंवा बुजवूनटाकतात. जर कोणाही शेतकर्‍याने  त्याचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान केल्याचे, निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा केल्याचे  किंवा बुजवून टाकल्याचे आढळल्यास त्याचे विरूध्द महाराष्ट्र जमीन महसूलसंहिता, १९६६ च्या कलम १४०/१४५ अन्वये कारवाई करण्यात यावी.

¿ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम३०(४) नुसार, तलाठी यांनी पीक पाहणी केल्‍यानंतर, जमेल तितक्‍या लवकर, मंडलअधिकारी किंवा त्‍याच्‍या दर्जापेक्षा कमी नाही असा अधिकारी त्‍या गावाला, पूर्व सूचना देऊन भेट देईल आणि तलाठी यांनी केलेल्‍या पीक पाहणीची पडताळणी करेल. पीक पाहणीतील ज्‍या नोंदी चुकीच्‍या आढळतील त्‍यात तलाठी यांच्‍याकडून दुरूस्‍ती करवून घेईल.

¿ तलाठी व मंडलअधिकारी यांनी वरील प्रमाणे पीक पाहणी संपविल्‍यानंतर गाव नमुना नंबर ११ मध्‍ये सर्व पिकांची नोंद घेऊन तो अद्‍ययावत करावा आणि अद्‍ययावत गाव नमुना नंबर ११ तहसीलदारकडे ३१ मे पूर्वी सादर करावा.

F पीक पाहणी करतांना होणार्‍या चुका:
P पिके जेव्‍हा शेतात उभी असतात त्‍या काळात पीक पाहणी न करता नंतर तोंडी माहितीनुसार नोंदी घेतल्‍या जातात.
P तलाठी व्‍यक्‍तीश: शेतावर जाऊन पीक पाहणी करत नाहीत.
P ठरलेल्‍या कालावधीत सुरू होत नाही आणि ठरलेल्‍या कालावधीत संपवली जात नाही.
P गावी दवंडी देणे, दवंडी रजिस्‍टरला नोंद घेणे, गावकर्‍यांना आणि संबंधितांना सूचना देणे या गोष्‍टी केल्‍या जात नाही.
P शेत मालक, सरपंच, ग्रामपंचायत सद्‍स्‍य आणि गावकरी यांच्‍या अनुपस्‍थितीतच पीक पाहणी करण्‍यात येते.
P प्रथम नमुना ११ भरणे आवश्‍यक असतांनाही तो न भरताच गाव नमुना क्रमांक १२ लिहिला जातो.
P तलाठी यांनी केलेली पीक पाहणी, मंडलअधिकारी तपासत नाहीत.
P जे पीक खरोखरच शेतात उगवले गेले आहे त्‍याची आणि जितक्‍या क्षेत्रावर ते पीक उगवले गेले आहे त्‍या क्षेत्राची अचूक नोंद घेतली जात नाही.
P शेतात उभ्‍या पिकासह, त्‍या जमीनीतील कुळ हक्‍क, वहिवाटदार, सीमा चिन्‍हे, मिश्र पिके, झाडे, फळझाडे, दुबार पिके, जल सिंचनाची साधने, नवीन विहीर, बोअरवेल इ. तपासून दप्‍तरातील नोंदी अद्‍ययावत केल्‍या जात नाहीत.
P पीक पाहणी करतांना ज्‍या शेतकर्‍यांनी त्यांचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान केलेले असते, हद्दीच्या निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा केलेल्‍या असतात किंवा बुजवुन टाकलेल्‍या असतात, त्याचे विरूध्दमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १४०/१४५ अन्वये कारवाई करण्यात येत नाही यामुळे महसूल खात्‍याचा वचक रहात नाही.
P मागील वर्षीच्‍याच वहिवाटदाराचे नाव खात्री न करता चालू वर्षीही लिहिले जाते. वहिवाटदार जिवंत आहे किंवा मयत याची खात्री केली जात नाही. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत मयताचे नाव वहिवाटदार सदरी तसेच लिहिले जाते.
P नमुना १४ चा फॉर्म तहसिलदारकडे लवकर पाठवला जात नाही.
P कुळ मयत असल्‍यास, त्‍याच्‍या वारसांची नोंद गाव दप्‍तरी न करताच, कुळाच्‍या वारसांची नावे वहिवाटदार सदरी लिहिली जातात.
P बागायती पिके कोणत्‍या पाण्‍यावर घेतली याची खात्री केली जात नाही.

तलाठी यांनी वरील चुका टाळाव्‍यात आणि योग्‍य वेळेला संकरीत, उन्‍हाळी व इतर सर्व लागवडीची पाहणी करून शासनाला शेती पासून मिळणार्‍या उत्‍पन्‍नाचा योग्य अभ्यास आणि विश्लेषण करण्‍यात सहाय्‍यक व्‍हावे.

F वहिवाट प्रकरणे
¿ नमुना १४ चा फॉर्म: हा नमुना १४ चा फॉर्म म्‍हणजे महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३१ अन्‍वये विहीत केलेला नमुना.
पीक पाहणी करतांना तलाठी यांना जर असे निदर्शनास आले की, एखादी जमीन, अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्यात असल्याचेमानण्यात येणार्‍या व्यक्ती व्यतिरिक्त इतर इसमाच्या कब्ज्यात/वहिवाटीस, कायदेशीर दस्‍तऐवजाशिवाय आहे, तर तलाठी यांनी गाव नमुना  ७-ब मध्ये पेन्सिलने त्याची नोंद घ्‍यावी. यानंतर त्‍या जमिनीबाबत नमुना १४ चा फॉर्म भरून शक्य असेल तितक्या लवकर (कमाल दहा दिवसांत) तहसिलदाराकडे पाठवावा. मालकाशिवाय दुसर्‍या व्यक्तीच्‍या नावे पीक पाहणी सदरी थेट लावण्याचे अधिकार तलाठी यांनानाहीत. परंतु, जमीन मालकाच्या एकत्र कुटुंबातील अन्य सदस्य वहिवाट करीत असेल तर नमुना १४ चा फॉर्म भरू नये.
 ज्‍या जमिनीबाबत नमुना १४ चा फॉर्म भरला असेल त्‍या जमीनीसंबंधात गाव नमुना ७-ब मध्‍ये शेरा स्‍तंभात "नमुना १४ भरुन पाठवला-निर्णयाधिन" अशी पेन्सिलने नोंद घ्‍यावी.

¿ दिनांक ०१/०१/१९७६ पासून 'महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका-खंड ४' मध्‍ये विहीत करण्‍यात आलेला गाव नमुना बारा, अंमलात आला. यामध्‍ये पंधरा स्‍तंभ होते, पंधरावा स्‍तंभ 'शेरा' हा होता. १० मे १९७६ रोजीच्‍या शासन परिपत्रकानुसार, गाव नमुना बारामध्‍ये एक स्‍तंभ वाढवण्‍यात यावा आणि स्‍तंभ पंधरामध्‍ये 'प्रत्‍यक्ष लागवड करणार्‍याचे नाव' लिहावे आणि नवीन सोळावा स्‍तंभ शेर्‍यासाठी ठेवावा असा आदेश पारित झाला होता. मात्र महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीतीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम २९, ३० व ३१ यांचे एकत्रीत वाचन केल्‍यास फक्‍त ज्‍या व्‍यक्‍तींना अधिकार अभिलेखातील नोंदींप्रमाणे जमीन कसण्‍याचा अधिकार आहे अशाच व्‍यक्‍तींची नावे स्‍तंभ पंधरामध्‍ये लिहीणे योग्‍य ठरते. त्‍यामुळे प्रचलीत गाव नमुना बारामध्‍ये पंधरा स्‍तंभच ठेवण्‍यात आले आहेत.    

¿ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २(१२) नुसार ‘जमीन धारण करणे' किंवा ‘जमिनीचा धारक असणे' याचा अर्थ वैधरीत्या जमिनीचा कब्जा असणे असाच आहे. मग असा कब्‍जा प्रत्यक्षात असो किंवा नसो. तसेच कलम २(२३) नुसार भोगवटा करणार म्हणजे 'भोगवटादार' या संज्ञेचा अर्थ 'कुळ किंवा शासकीय पट्टेदार खेरीज बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला धारक' असा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदींनुसार 'वैधरित्या कब्जा' असलेल्या व्यक्तीचीच नोंद अभिलेखात घेणे आवश्यक आहे. अवैध कब्जा चालू ठेवण्‍यासाठी कोणत्‍याही कायद्‍यात कोणतीही तरतूद नाही.
¿ विहित पध्‍दतीशिवाय, एखाद्‍या शेत जमिनीत, जमीन मालकाशिवाय अन्‍य व्यक्तीचे नांव वहिवाट सदरी लागल्यास अशी व्यक्ती, सात-बारा मधील नोंद दाखवून, वहिवाटीस अडथळा आणू नये अशी मागणी करुन, जमीन मालकाविरुध्‍द दिवाणी न्यायालयातून मनाई आदेश आणण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. असे मनाई आदेश अनेक दिवस राहिल्यास प्रकरणात गुंतागुंत निर्माण होते. त्‍यामुळे याबाबत तलाठी यांनी नेहमीच दक्ष रहावे.

¿ नमुना १४ चा फॉर्म प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर, तहसिलदार यांनी, किमान सात दिवस आधी पूर्वसूचना देऊन त्या गावी भेट द्यावी. गाव कामगार तलाठी यांनी उपरोक्त जमिनीच्या सर्व हितसंबंधीत लोकांना चौकशीच्या वेळी हजर ठेवावे.

¿ यावेळी तहसिलदार यांनी दोन लायक पंचासह सदर जमिनीवर जाऊन वहिवाटदाराकडे चौकशी करावी. यावेळी उपरोक्‍त कुळ कायद्यातील ‘जमीन कसणे’ याबाबतची व्याख्‍या लक्षात घ्यावी. लगतच्या जमीनधारकांचे जबाब घ्यावे. सदर वहिवाटदाराकडे, तो कोणत्या अधिकाराने किंवा कोणत्या नोंदणीकृत कायदेशीर कागदपत्राच्या आधारे सदर जमीन वहिवाटत आहे याची चौकशी करावी. त्‍याच्‍या ताब्यात जमीन कोणत्या नोंदणीकृत दस्ताने आणि केव्हा आली याबाबत त्याचा जबाब घ्यावा. जमिनीत आत्तापर्यंत कोणकोणती पिके घेतली, आज रोजी कोणते पीक आहे याबाबत पंचनामा करावा. अनेक वेळा खरेदी-विक्रीचा व्यवहार कायद्यानुसार पूर्ण होऊ शकला नाही तर, पिक पाहणीद्‍वारे, गाव दप्‍तरी नाव दाखल करुन आडमार्गाने व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक "जमिनीचा ताबा हा जमिनीच्‍या मालकी पाठोपाठ आला पाहिजे" हे कायद्याचे सर्वमान्य तत्व आहे, म्‍हणून जमिनीचा ताबा कसा आला याबाबत पुरावा दिला गेला पाहिजे.

¿ सदर वहिवाटदार नोंदणीकृत कायदेशीर कागदपत्राच्या आधारे (नोंदणीकृत दस्त, ताब्यासह नोंदणीकृत साठेखत, न्यायालयीन आदेश, सक्षम अधिकार्‍याचा आदेश, वारसा हक्क, बक्षिसपत्र, मृत्युपत्र इत्‍यादी) अधिकृतपणे जमिनीत वहिवाट करीत असेल अशी तहसिलदाराची खात्री झाल्‍यास, तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख निकालपत्रात करुन, त्या वर्षासाठी अशा वहिवाटदाराचे नाव सदर जमिनीच्या वहिवाट सदरी नोंदविण्याचा आदेश पारित करावा. केवळ जबाब व पंचानामाच्या आधारे कोणाचीही वहिवाट लावणे अवैध ठरेल हे लक्षात ठेवावे. 

¿ मागील अनेक वर्षाची वहिवाट दाखल करता येत नाही. मागील अनेक वर्षाची वहिवाट लावण्याचा आदेश बेकायदेशीर ठरेल. वहिवाटदाराकडे असणारा दस्त नोंदणीकृतच असावा असा आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेला आहे तसेच मा. विभागीय आयुक्तांनीही अशा प्रकारचे आदेश पारीत केलेले आहेत.

¿ अशा वहिवाटदाराचे नाव चालू वर्षासाठीच वहिवाट सदरी नोंदविण्याचा आदेश पारित करता येतो हे लक्षात ठेवावे. पुढच्या वर्षी तलाठी यांनी जरी तोच वहिवाटदार वहिवाट करीत असेल तरी पुन्हा नमुना १४ चा फॉर्म भरून पाठवणे आवश्यक असते.
¿ एखाद्या वर्षी मालकाव्यतिरिक्त दुसर्‍याचे नाव वहिवाट सदरी लागले म्हणजे तो आपोआप कुळ बनला असे होत नाही. कुळकायद्यानुसार कुळ व मालक यांच्यात करार होणे, कुळ व मालक असे नाते सिध्द होणे, कुळाने मालकास खंड देणे इत्यादी बाबी कुळ सिध्द होण्यास आवश्यक असतात. हा फार मोठा गैरसमज आहे. कुळ कायदा कलम ४ मध्‍ये 'कुळ म्‍हणून मानावयाच्‍या व्‍यक्‍ती' ची व्‍याख्‍या नमूद आहे.
कुळ कायदा कलम '३२ ओ' मध्‍ये कुळ कायदा कलम '३२ ओ' मध्‍ये 'जमीन मालकाने दिनांक ०१/०४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्‍या कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो.' असे नमुद असले तरीही कुळ कायदा कलम '३२ ओ'अन्वये कुळ जाहिर करणेसाठी खालील पात्रता अत्‍यावश्‍यक आहे. 
१) कुळकायद्याने कुळास दिलेला हक्क बजावण्याची ज्याची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या आंत, त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे.
२) अशा प्रकारे कळविल्यानंतर शेतजमीन न्यायाधिकरण (तहसिलदार) याप्रकरणी नोटीस बजावून चौकशी करतात. या चौकशीच्यावेळी खालील मुद्दे स्पष्टपणे/निसंदिग्धापणे सिध्द होणे अत्यावश्यक असते.
अ) अर्जदार कुळ आणि जमीन मालक यांच्‍यात 'कुळ व मालक' असे नाते सिध्द होत आहे काय?
ब) कुळ आणि मालक यांच्यात 'कुळ व मालक' नाते सिध्द करणारा आणि न्यायालयात निसंदिग्धपणे सिध्द होणारा करार झाला आहे काय? 
क) कुळ मालकाला रोखीने खंड देत आहे काय? 
ड) कुळ देत असलेला रोख खंड मालक स्वीकारत आहे काय आणि त्याबाबत पावती देत आहे काय?
वरील बाबी सिध्‍द झाल्‍या तरच वहिवाटदार कुळ ठरू शकतो.

जोपर्यंत जमीनमालक कुळाचा कायदेशीर कुळ म्‍हणून स्‍वीकार करत नाही किंवा ती व्‍यक्‍ती कुळ नाही हे विधान कायदेशीररीत्‍या फेटाळले जात नाही तो पर्यंत कुळाचा, कुळकायदा कलम ३१-ओ नुसार दिलेला एक वर्षाचा कालावधी सुरू होत नाही. (लक्ष्‍मण धोंडी झुरळे वि. यशोदाबाई, २००५(२)- ऑल महा. रिपो.-८१२)

¿ जर चौकशीच्यावेळी तहसिलदार यांच्या असे निदर्शनास आले की, कोणत्याही नोंदणीकृत दस्ताशिवाय किंवा कायदेशीर कागदपत्राशिवाय, अनाधिकाराने किंवा दंडेलशाहीने अशी वहिवाट सुरू आहे तर तत्काळ अशी वहिवाट करणार्‍याविरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ५९ व २४२ अन्वये कारवाई करावी.     

¿ तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्‍या फॉर्ममध्ये नाव असणारी व्‍यक्‍ती जमीन कसत होती' असा निकाल दिला तर गाव नमुना ७-ब मध्‍ये शेरा स्‍तंभात तहसिलदार यांनी सदर बाबत दिलेल्‍या निकालाचा क्रमांक व दिनांक लिहून तशी नोंद करावी.

¿ जर तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्‍या फॉर्ममध्‍ये नाव असणारी व्‍यक्‍ती अनाधिकाराने जमीन कसत आहे' असा निकाल दिला तर गाव नमुना ७-ब मधील पेन्सिलची नोंद खोडून टाकावी.

नामनिर्देशन (Nomination)


नामनिर्देशन (Nomination)


नामनिर्देशन म्‍हणजे एखाद्‍या व्‍यक्‍तीने, अशा व्‍यक्‍तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे जी व्‍यक्‍ती, असे नाव दाखल करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर, त्‍याच्‍या नावे जमा असलेली रक्‍कम ताब्‍यात घेण्‍यास पात्र असेल.

नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) म्‍हणजे एखाद्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर, त्‍याच्‍या नावे जमा असलेली रक्‍कम ताब्‍यात घेण्‍यास पात्र असलेली व्‍यक्‍ती.  

कायदेशीर तरतुद: विमा कायदा, १९३८, कलम ३९. (The Insurance Act 1938, Section 39)

वरील तरतुदीन्‍वये, प्रत्‍येक विमाधारक व्‍यक्‍तीला, त्‍याच्‍या मृत्‍यूपश्‍चात, त्‍याने केलेल्‍या विम्‍याची रक्‍कम ताब्‍यात घेण्‍याचा अधिकार असलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव, विम्‍याच्‍या कागदपत्रात नमूद करणे बंधनकारक आहे. ही तरतुद आता सर्वच वित्तिय व्‍यवहारांना लागू आहे.
नामनिर्देशित व्यक्ती शक्‍यतो नवरा/बायको, मुलगा किंवा मुलगी अथवा माता/पिता असतात तथापि, कोणत्‍याही विश्‍वासू व्‍यक्‍तीचे नाव नामनिर्देशित व्यक्ती म्‍हणून दाखल करता येऊ शकते.

नामनिर्देशित व्यक्ती म्‍हणजे मयत व्‍यक्‍तीला मिळणार्‍या वित्तिय संपत्तीची मालक किंवा वारस झाली असे कायदा मानत नाही. अनेक न्‍यायालयीन निकालांत ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यात आलेली आहे.
नामनिर्देशित व्यक्ती ही मयत व्‍यक्‍तीची विश्‍वस्‍त (Trusty) असते. मयत व्‍यक्‍तीची वित्तिय संपत्ती ताब्‍यात घेण्‍याचा अधिकारनामनिर्देशित व्यक्तीला प्राप्‍त असला तरीही ती अशा संपत्तीची मालक बनत नाही.
फक्‍त मयत व्‍यक्‍तीची वित्तिय संपत्ती ताब्‍यात घेणे आणि ती संपत्ती, मयत व्‍यक्‍तीच्‍या कायदेशीर वारसांकडे सुपूर्द करणे हेनामनिर्देशित व्यक्तीचे कर्तव्‍य असते.

मयत व्‍यक्‍तीने जर मृत्‍यूपत्र केले असेल तर त्‍यानुसार मयताच्‍या संपत्तीचे वाटप करण्‍यात येते. अशा वेळेस नामनिर्देशित व्यक्तीने, मयताच्‍या वारसांकडे, अशी ताब्‍यात घेतलेली संपत्ती सोपवायची असते. मयत व्‍यक्‍तीने मृत्‍यूपत्र केले नसेल तर, मयताला लागू असलेल्‍या वारस कायद्‍यानूसार मयताच्‍या संपत्ती प्रक्रांत होते. अशा वेळेसही नामनिर्देशित व्यक्तीने, मयताच्‍या वारसांकडे, अशी ताब्‍यात घेतलेली संपत्ती सोपवायची असते.

नामनिर्देशन, मृत्‍यूपत्र किंवा वारस कायद्‍यांपेक्षा वरचढ ठरत नाही. साध्‍या भाषेत नामनिर्देशन म्‍हणजे मयताची वित्तिय संपत्ती 'स्‍वीकारण्‍याचा' अधिकार, मालकीचा नव्‍हे. (Nomination is the right to receive not to own).

'नामनिर्देशन' या शब्‍दाचा निवडणूकीशी संबंधीत अर्थही विश्‍वस्‍त (Trusty) असाच होतो हे सुध्‍दा "सर्वांनी" लक्षात घेणे अपेक्षीत आहे.