नामनिर्देशन (Nomination)
नामनिर्देशन म्हणजे एखाद्या व्यक्तीने, अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे जी व्यक्ती, असे नाव दाखल करणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या नावे जमा असलेली रक्कम ताब्यात घेण्यास पात्र असेल.
नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या नावे जमा असलेली रक्कम ताब्यात घेण्यास पात्र असलेली व्यक्ती.
कायदेशीर तरतुद: विमा कायदा, १९३८, कलम ३९. (The Insurance Act 1938, Section 39)
वरील तरतुदीन्वये, प्रत्येक विमाधारक व्यक्तीला, त्याच्या मृत्यूपश्चात, त्याने केलेल्या विम्याची रक्कम ताब्यात घेण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीचे नाव, विम्याच्या कागदपत्रात नमूद करणे बंधनकारक आहे. ही तरतुद आता सर्वच वित्तिय व्यवहारांना लागू आहे.
नामनिर्देशित व्यक्ती शक्यतो नवरा/बायको, मुलगा किंवा मुलगी अथवा माता/पिता असतात तथापि, कोणत्याही विश्वासू व्यक्तीचे नाव नामनिर्देशित व्यक्ती म्हणून दाखल करता येऊ शकते.
नामनिर्देशित व्यक्ती म्हणजे मयत व्यक्तीला मिळणार्या वित्तिय संपत्तीची मालक किंवा वारस झाली असे कायदा मानत नाही. अनेक न्यायालयीन निकालांत ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे.
नामनिर्देशित व्यक्ती ही मयत व्यक्तीची विश्वस्त (Trusty) असते. मयत व्यक्तीची वित्तिय संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकारनामनिर्देशित व्यक्तीला प्राप्त असला तरीही ती अशा संपत्तीची मालक बनत नाही.
फक्त मयत व्यक्तीची वित्तिय संपत्ती ताब्यात घेणे आणि ती संपत्ती, मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांकडे सुपूर्द करणे हेनामनिर्देशित व्यक्तीचे कर्तव्य असते.
मयत व्यक्तीने जर मृत्यूपत्र केले असेल तर त्यानुसार मयताच्या संपत्तीचे वाटप करण्यात येते. अशा वेळेस नामनिर्देशित व्यक्तीने, मयताच्या वारसांकडे, अशी ताब्यात घेतलेली संपत्ती सोपवायची असते. मयत व्यक्तीने मृत्यूपत्र केले नसेल तर, मयताला लागू असलेल्या वारस कायद्यानूसार मयताच्या संपत्ती प्रक्रांत होते. अशा वेळेसही नामनिर्देशित व्यक्तीने, मयताच्या वारसांकडे, अशी ताब्यात घेतलेली संपत्ती सोपवायची असते.
नामनिर्देशन, मृत्यूपत्र किंवा वारस कायद्यांपेक्षा वरचढ ठरत नाही. साध्या भाषेत नामनिर्देशन म्हणजे मयताची वित्तिय संपत्ती 'स्वीकारण्याचा' अधिकार, मालकीचा नव्हे. (Nomination is the right to receive not to own).
'नामनिर्देशन' या शब्दाचा निवडणूकीशी संबंधीत अर्थही विश्वस्त (Trusty) असाच होतो हे सुध्दा "सर्वांनी" लक्षात घेणे अपेक्षीत आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.