Monday, 28 November 2016

नगरपालिका निवडणूक राज्यात भाजपा नंबर १

नगरपालिका निवडणूक राज्यात भाजपा नंबर १




राज्यामध्ये सत्तेवर येऊन दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणा-या भाजपाने नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. १४७ नगरपालिका आणि १७ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक २२ नगरपालिका जिंकल्या आहेत तसेच नगराध्यक्ष निवडीतही भाजपाने बाजी मारली आहे. 
 
भाजपाचे ३० पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपा पाठोपाठ काँग्रेसने २० नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी १७ आणि शिवसेना १४ नगरपालिकांसह चौथ्या स्थानावर आहे. २५ नगरपालिका त्रिशंकू असून स्थानिक आघाडयांनी १२ नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या महत्वाच्या निवडणूका होत्या. नोटाबंदीच्या निर्णयाचा भाजपाला फटका बसणार ? की फायदा होणार याची उत्सुक्ता होती. मतदारांचा कौल पाहता भाजपाला नोटाबंदीचा फायदा झाल्याचे दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीत निमशहरी मतदारांनी मोठया प्रमाणावर मतदान केले. सरासरी ७० टक्के मतदान झाले होते. देवेंद्र फडणवीस सरकारला मतदारांनी दिलेला हा दिलासादायक कौल आहे. 
 
मतमोजणीच्या प्रारंभीच्या फे-यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती. भाजपापेक्षा शिवसेनेची स्थिती चांगली वाटत होती. पण दुपारनंतर चित्र बदलले. भाजप पहिल्या, काँग्रेस दुस-या, राष्ट्रवादी तिस-या आणि शिवसेनेला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यापूर्वी बहुतांश नगरपालिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. पण यावेळी भाजपा-शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यात ब-यापैकी यश मिळाले. 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.