Monday 7 November 2016

शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी.... पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता

शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी
लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम, कलम २७ अन्‍वये शिक्षक व पदवीधर मतदार संघाची तरतुद आहे.  
भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या सात घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषद सुद्धा अस्तित्वात आहे. विधान परिषद असावी की नसावी याचा निर्णय घेण्‍याचा अधिकार विधान सभेला आहे. विधान परिषद हे कायम सभागृह असून त्‍यातील सभासद सहा वर्षाचा कार्यकाळ संपवून, दर दोन वर्षानी १/३ सभासद निवृत्त होत असतात. विधान परिषद सभासदांना इंग्रजीमध्‍ये M.L.C. (Member of Legislative Council) म्‍हटले जाते.

१९५६ च्‍या सातव्‍या घटनादुरूस्‍तीनुसार, विधान परिषद सदस्‍यांची संख्‍या, संबंधित राज्‍याच्‍या विधान सभेतील सदस्‍य संख्‍येच्‍या १/३ पेक्षा जास्‍त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी असे निर्धारित करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्र राज्‍यात एकूण ३६ जिल्‍हे असून, विधान परिषदेतील एकूण ७८ सभासदांपैकी ३१ सभासद (१/३ सदस्‍य)  विधानसभेतून, २१ सभासद (१/३ सदस्‍य) स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांकडून, १२ सदस्‍यांची (१/६ सदस्‍य)  राज्‍यपालांकडून नेमणूक केली जाते तर ७ सदस्‍य (१/१२ सदस्‍य) शिक्षक मतदार संघातून आणि ७ सदस्‍य (१/१२ सदस्‍य) पदवीधर मतदार संघातून निवडले जातात.
महाराष्‍ट्रात मुंबई, पुणे, कोंकण, औरंगाबाद, नागपुर, नाशिक आणि अमरावती या सात जिल्‍ह्‍यांत शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ अस्‍तित्‍वात आहे.

F पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता:
१. तो भारताचा नागरीक असावा.
२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्‍सम विद्‍यापिठाचा पदवीधर असावा.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा
४. त्‍याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.
५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्‍य असेल तरच पदवीधर गृहित धरण्‍यात येईल.   

F शिक्षक मतदार नोंदणीकरिता पात्रता:
१. तो भारताचा नागरीक असावा.
२. त्‍याने मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या लगतच्या ६ वर्षात किमान ३ वर्षे माध्‍यमिक किंवा उच्‍च माध्‍यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्णवेळ काम केलेले असावे.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा
४. त्‍याने विहित कागदपत्रांसह त्यांनी फॉर्म क्र. १९ भरावा.

शिक्षक पदवीधर असल्‍यास शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्‍ही मतदारसंघात मतदान करू शकतात.
F शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्‍यक इतर कागदपत्रे:
१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्‍ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्‍यताप्राप्‍त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)
२. मार्क लिस्‍टची साक्षांकित प्रत.
३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.
४. ओळखपत्र
५. शिक्षक असल्‍यास नोकरी करीत असल्‍याबाबत (आजी किंवा माजी) प्राचार्यांचे पत्र
६. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्‍यास त्‍याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्‍यास प्रतिज्ञापत्र.

F साक्षांकन: प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्‍ह्‍यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी,किंवा शासन मान्‍यता प्राप्‍त विद्‍यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्‍य राजपत्रित अधिकार्‍यांकडून करून घ्‍यावे.    

F अर्ज आणि कागदपत्रे सादर करणे:  मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO)किंवा अन्‍य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्‍टानेही सादर केल्‍या जाऊ शकतात. शक्‍यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्‍यांची पोहोच घ्‍यावी. तसेच अद्‍ययावत प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द झाल्‍यानंतर, त्‍यात स्‍वत:चे नाव असल्‍याची खात्री करावी.  

F मतदान:
P पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.
P मतपत्रिकेवर नमुद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.
P सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठीइंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.
P पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील).  
P मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत. 
P मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.  
P "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.
P 'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.