Friday 28 October 2016

पुणे शहरात ५८ हजार नव्या मतदारांची नोंद

जिल्हा निवडणूक शाखेच्या सहकार्याने महापालिकेने राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेतून मतदार यादीत शहरातील ५८ हजार मतदारांची नोंद झाली आहे. यातील बहुसंख्य मतदार यंदा पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच मतदान करणार आहेत.
साधारण मार्च २0१६ मध्ये पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होईल. त्याआधीच जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. हीच यादी पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. ती जास्तीत जास्त अद्ययावत असावी, यासाठी पालिका प्रशासनाने जिल्हा निवडणूक शाखेच्या साह्याने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयात मतदार नोंदणी मोहीम राबविली. १६ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या या मोहिमेत ४६ हजार ८७१ मतदारांची नोंद करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एक आठवडा (दि. १५ ते २१ ऑक्टोबर) याची मुदत वाढविण्यात आली. त्यात १0 हजार ८१८ मतदार नोंदवून घेण्यात आले. एकूण ५७ हजार ६८९ मतदारांची नोंद या कालावधीत नव्याने करण्यात आली.
मतदार यादीत नाव दाखल करण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाला नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा झालेले सर्व अर्ज प्रशासनाच्या वतीने जिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल करण्यात आले. त्यातील पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातील. एखादा अपवाद वगळता अर्ज बाद होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर केली जाते. त्यातून नंतर महापालिकेच्या नव्याने झालेल्या प्रभागांप्रमाणे मतदार यादी तयार करण्यात येईल. 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.