Friday, 28 October 2016

ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा ......नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना दिलासा

ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा

नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना दिलासा



राज्यात होत असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत असलेल्या अडचणींची गंभीर दखल घेत आता ही नामनिर्देशनपत्रे पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) दाखल करण्यासही परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली.
राज्य निवडणूक आयोगाने २१२ नगरपरिषद, नगरपंचायतीच्या तसेच नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदांसाठी चार टप्प्यांतील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्य़ांतील १४७ नगरपरिषदा आणि १८ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच १४७ नगरपरिषदांमधील अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन भरण्याचा आज, २९ ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे.  नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सहजरीत्या भरता यावीत, यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी केवळ ऑनलाइनच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय अगोदर राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु ही संगणक प्रणाली चालत नसल्याबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी सुरू आहेत. ऑनलाइन नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात अडचणी येत असून आयोगाने ऑफलाइनही उमेदवारी अर्ज स्वीकारावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही केली होती. त्यानंतर निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे भरणे शक्य व्हावे, यासाठी पारंपरिक पद्धतीनेही अर्ज दाखल करण्यास मुभा देण्यात आल्याचे सहारिया यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.