Monday 17 October 2016

आदर्श आचारसंहिता ........“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे........चंद्रकांत भुजबळ


आदर्श आचारसंहिता काय आहे ?
       राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी असलेली आदर्श आचारसंहिता ही एक नियमावली आहे. राजकीय पक्षांच्या सहमतीने ही नियमावली तयार करण्यात आली असून या आचारसंहितेच्या तत्त्वांचे पालन करण्यास त्यांनी संमती दर्शवली आहे आणि त्यांचा आदर करण्यासाठी ते बांधिल आहेत.
अशा आचारसंहितेचे गरज काय ?
             सर्व राजकीय पक्षांना एका समान पातळीवर निवडणूक लढवता यावी तसेच निवडणूक योग्य आणि निकोप व्हावी, पक्षांतील मतभेद आणि संघर्ष टाळले जावेत तसेच शांतता आणि सुव्यवस्था राखावी हा या आचारसंहितेचा उद्देश आहे किंवा राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षांनी आपल्या अधिकारी पदाचा निवडणूक काळात गैरवापर करु नये हा या आचारसंहितेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे पैसा आणि शक्ती प्रदर्शनाचे परिणामही कमी झाले आहेत.
या प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे ?
             भारतीय घटनेच्या कलम 324 अन्वये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका मुक्त, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष (केंद्रातील आणि राज्यातील सत्तारुढ पक्षासह) आणि उमेदवार वैधानिक कर्तव्ये योग्य रितीने पार पाडतात का यावर निवडणूक आयोग देखरेख करतो. निवडणुकीसाठी अधिकृत यंत्रसामुग्रीचा  दुरुपयोग होणार नाही याकडेही आयोगाचे लक्ष असते. तसेच तोतयेगिरी, लाच देणे, मतदारांना प्रलोभन दाखवणे, धमक्या यांसारखे गुन्हे होणार नाहीत हे देखील आयोग सुनिश्चित करतो. नियमांचे उल्लंघन केल्यास योग्य कारवाई केली जाते.
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कधी होते आणि ती कधीपर्यंत लागू असते ?
       निवडणूक आयोगाकडून निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्याच्या तारखेपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु होते आणि ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू असते.
सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणूकी दरम्यान नियम कसे लागू होतात ?
(अ)     लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये संपूर्ण देशात आचारसंहितेचे नियम लागू असतात.
(आ)   विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यात हे नियम लागू असतात.
(इ)       पोटनिवडणूकांदरम्यान संपूर्ण जिल्हा किंवा मतदारसंघ असलेल्या जिल्हयात नियम लागू होतात.
आदर्श आचारसंहितेची वैशिष्टये काय आहेत ?
       राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार आणि सत्ताधारी पक्ष यांनी निवडणूक प्रक्रिये दरम्यान कशी वर्तणूक ठेवावी यासंदर्भात आचारसंहितेची वैशिष्टये तयार करण्यात आली आहे. उदा. निवडणूकीदरम्यान सभा आणि मिरवणूक आयोजित करतांना, मतदानाच्या दिवशीचे उपक्रम आणि सत्ताधारी पक्षाचे कामकाज इत्यादी.
निवडणूक कार्याबरोबर मंत्री अधिकृत दौरा एकत्र आयोजित करु शकतात का ?
             नाही. निवडणूकीच्या कामाबरोबर मंत्री कार्यालयीन भेटी एकत्रित करु शकत नाही. तसेच अधिकारिक यंत्रणा किंवा व्यक्तींचा वापरही ते निवडणूक कामांमध्ये करु शकत नाही.
निवडणूक कामांसाठी सरकारी वाहनांचा वापर करता येऊ शकतो का ?
       नाही. अधिकृत विमाने, वाहने इत्यादी कुठलीच साधने पक्ष किंवा उमेदवाराला वापरता येत नाही.
निवडणूक कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या सरकार करु शकते का ?
       प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर संपूर्णपणे बंदी असते. जर एखादया अधिकाऱ्याची बदली  किंवा नेमणूक आवश्यक असेल तर त्यांच्या मंजुरीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
सत्तेत असलेल्या पक्षाने पुन्हा निवडून येण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करुन आपल्या कामगिरीची जाहिरात देण्यावर काही निर्बंध आहेत का ?
       हो, सरकारी खर्चाने आपल्या कामगिरीची जाहिरात वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये देणे आणि अधिकृत प्रसार माध्यमांचा गैरवापर करणे यावर बंदी आहे.
केंद्र/राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या साध्य केलेल्या गोष्टींसंदर्भातील जाहिरातींचे फलक कायम ठेवता येतात का ?
             नाही, संबंधित अधिकाऱ्यांकडून असे फलक, जाहिराती इत्यादी काढून टाकल्या पाहिजेत. तसेच सरकारी राज्यकोषातून वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक तसेच इतर कुठल्याही माध्यमात या जाहिराती प्रसारित करता येऊ शकत नाहीत.
स्वेच्छाधीन निधीतून मंत्री किंवा इतर अधिकारी अनुदान मंजूर करु शकतो का ?
             नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मंत्री किंवा इतर अधिकारी स्वेच्छाधीन निधीतून अनुदान मंजूर करु शकत नाही.
निवडणूक अभियान तयार करण्यासाठी राजकीय पक्ष/उमेदवारांसाठी मुख्य मार्गदर्शक तत्त्वे  काय आहेत ?
             निवडणूक प्रचारा दरम्यान, विविध जाती, जमाती, धर्म, भाषा आदी मुद्दयांवर समाजात दुही माजेल अथवा तेढ निर्माण होईल अशी गोष्ट कोणत्याही पक्ष अथवा उमेदवाराने करु नये. अन्य राजकीय पक्षांवर टीका करतांना, ती त्यांची धोरणे आणि कार्यक्रम यापुरती मर्यादित असावी, वैयक्तिक आयुष्यातल्या बाबींवर टीका करु नये. खातरजामा न करता कोणत्याही प्रकारचे आरोप करणे सर्व राजकीय पक्ष/उमेदवारांनी टाळायला हवे.
निवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वार करण्यावर काही निर्बंध आहेत का ?
             होय. निवडणूक प्रचारासाठी मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळांचा व्यासपीठ म्हणून वापर करता येत नाही. तसेच मते मिळवण्यासाठी जातीय भावनांना आवाहन केले जाऊ शकत नाही.
उमेदवार किंवा पक्षाने आदर्श आचारसंहितेचे (एमसीसी) पालन केले नाही तर काय होते ?
             निवडणूक आयोगाच्या निदर्शनास अशी घटना आल्यास, त्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी केली जाते. आवश्यक असल्यास सूचना जारी केली जाते.  आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळल्यास  त्या उमेदवाराला कडक शब्दात सुनावले जाते किंवा भविष्यात या नियमांच्या बाबतीत काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आचारसंहितेला जरी कायदेशीर पाठबळ नसले तरी यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या आदेशाचा निवडणूकीत पक्ष आणि उमेदवाराच्या भविष्यावर परिणाम होतो.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.