Monday, 17 October 2016

'सोशल मीडिया आणि निवडणूक आचारसंहिता'..... “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ (चंद्रकांत भुजबळ) ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे.

'सोशल मीडिया आणि निवडणूक आचारसंहिता'
सोशल मीडियाद्वारे लोकांशी संवाद साधणं, माहिती आणि विचारांची देवाण-घेवाण करणं सोपं होतं. सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असून निवडणूक प्रचारातही या मीडियाचा वापर होतोय. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियाच्या (use of Social Media during Election code of conducts) वापरासाठीही निवडणूक आयोगानं काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहेत सोशल मीडियाबाबतच्या सूचना ?
१ उमेदवार म्हणून फॉर्म २६ भरताना प्रत्येकानं आपल्या सोशल मीडिया नेटवर्किंग अकाउंट्सची माहिती द्यावी.
२ आचारसंहितेदरम्यान टीव्ही, केबलवर जाहिराती दाखवण्यापूर्वी उमेदवाराला राजकीय जाहिरातींना आधीच मंजुरी (प्री-सर्टिफिकेशन) घ्यावी लागते. अन्यथा पेड न्यूजचा आरोप होतो. सोशल मीडियावरील जाहिरातींसाठीही ही मंजुरी घ्यावी. कुठल्याही वेबसाइटवर जाहिरात करण्यापूर्वी प्री-सर्टिफिकेशन करून घ्यावं.
३ सोशल मीडियाद्वारे जो प्रचार कराल, त्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती आयोगाला द्यावी. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल अॅक्ट१९५१ अंतर्गत कलम-७७(१) नुसार निवडणुकीसाठी उमेदवार जो खर्च करेल, त्याची तपशीलवार माहिती ७५ दिवसांत सबमिट करणं आवश्यक आहे.
४ इंटरनेट वा सोशल मीडियावरील कंटेटसाठीही आचारसंहिता आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षाव्यतिरिक्त अन्य कुणी कंटेट पोस्ट करत असेल, तर माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या सल्लानुसार त्याबाबत माहिती प्रसारित करावी.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत आणि त्यांची आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना काही तत्वं पाळणं बंधनकारक असतं. पण यासंदर्भात योग्य माहिती नसल्यामुळे अनावधानानं उमेदवारांकडून काही चुका होऊ शकतात. या टाळण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता लागू असताना काय करावं आणि काय करू नये, (Dos and Don'ts) याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावं?
१ निवडणूक घोषित होण्यापूर्वी जे कार्यक्रम सुरू झाले आहेत, ते सुरू राहू शकतात.
२ नैसर्गिक संकटं वा रोगराई आल्यास जनतेला मदत करता येते. पुनर्वसनाचं कामही करता येऊ शकतं.
३ गंभीर आजारी व्यक्तींना उपचारांसाठी उचित मान्यता घेऊन रोख रक्कम वा वैद्यकीय मदत देता येते.
४ मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणं, हेलिपॅड हे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना निःपक्षपातीपणानं वापरण्यास मिळावे.
५ इतर राजकीय पक्षांवरील टीका त्यांचं कार्य आणि धोरणं याबाबतच असावी.
६ प्रत्येक व्यक्तीच्या शांततापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराचा आदर करावा.
७ स्थानिक पोलिसांकडून सभेची जागा, वेळ याबद्दल पूर्वसूचना देऊन योग्य त्या परवानग्या घ्याव्यात.
८ कोणतेही निर्बंध वा प्रतिबंधात्मक आदेश असतील, तर त्यांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं. त्यात सूट हवी असल्यास तसा अर्ज करावा आणि संबंधितांकडून परवानगी मिळवावी.
९ सभेत लाउडस्पीकर वापरणे आणि अन्य प्रकारच्या सुविधांसाठी आधीच परवानगी घ्यावी.
१० सभेत अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांच्याच मदतीनं करावा.
११ मिरवणूक सुरू होण्याची वेळ, जागा, मार्ग, संपण्याची वेळ, जागा आधीच निश्चित असावी. त्यासंदर्भात पोलिसांकडून परवानगी घ्यावी.
१२ मिरवणुकीच्या मार्गातील वाहतुकीचे नियम आणि अन्य निर्बंध (असल्यास) यांचंही पालन करावं.
१३ मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये.
१४ मतदान शांतपणे पार पडण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावं.
१५ सर्व कार्यकर्त्यांनी ओळखपत्रं आणि बिल्ले ठळकपणे लावावी.
१६ मतदारांना दिल्या जाणाऱ्या नावाच्या चिठ्ठ्यांवर पक्षांची नावं किंवा चिन्हं नसावीत. या चिठ्ठ्या साध्या कागदावरच लिहाव्या.
१७ प्रचाराचा कालावधी आणि मतदानाच्या दिवशी वाहनांवरील निर्बंधांचं पूर्णपणे पालन करावं.
१८ निवडणूक आयोगाकडून वैध अधिकारपत्र मिळालेल्यांशिवाय अन्य कुणीही मतदान कक्षात जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
१९ निवडणूक वा मतदानाबाबात तक्रार असल्यास योग्य आणि सक्षम अधिकाऱ्यांच्याच ती निदर्शनास आणून द्यावी.
२० निवडणूक आयोग आणि आयोगानं नेमलेल्या सर्वच अधिकाऱ्यांच्या आदेश, सूचनांचं काटेकोर पालन करावं.
२१ आपण एखाद्या मतदारसंघातील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी वा मतदार नसल्यास प्रचाराचा कालावधी संपल्यावर त्या मतदारसंघात थांबू नये.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करू नये?
१ सत्ताधारी किंवा सरकारच्या कामगिरीची कोणतीही जाहिरात सरकारी खर्चानं करू नये.
२ मतदार असल्याशिवाय मतदान कक्षात आणि योग्य अधिकारपत्राशिवाय मतमोजणीच्या ठिकाणी जाऊ नये.
३ सरकारी कामांची निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ / गल्लत करू नये.
४ मतदारांना पैसे वा अन्य कुठल्याही प्रकारचं प्रलोभन वा आमीष दाखवू नये.
५ मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये.
६ जातीय, धार्मिक वा भाषक गटांमध्ये तणाव निर्माण होईल, असं कुठलंही कृत्य करू नये.
७ इतर पक्षाचे नेते वा कार्यकर्ते यांच्या खासगी आयुष्यावर टीका करू नये.
८ इतर पक्षांचे नेते वा कार्यकर्ते यांच्यावर विपर्यस्त माहिती किंवा आंधळेपणाने झालेले आरोप यांच्याबाबत टीकाटिप्पण्णी करू नये.
९ कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर भाषणं, पोस्टर लावणे, प्रचारगीतं वाजवणे अशा प्रकारच्या प्रचारासाठी करू नये.
१० मतदारांना प्रलोभन दाखवणं, दडपण आणणं, घाबरवणं, तोतयेगिरी, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरात प्रचार करणं या गोष्टी करू नयेत. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणं, मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यासही मनाई आहे.
११ लोकांच्या मतांच्या वा त्यांच्या कामांच्या निषेधासाठी घरासमोर निदर्शनं, धरणे देऊ नयेत.
१२ स्थानिक कायद्यांनुसार कुठल्याही व्यक्तीची मालमत्ता विशेष परवानगीशिवाय ध्वजदंड लावणे, निशाणं फडकावणं, सूचना वा घोषणा लिहिण्यासाठी वापरू नये.
१३ इतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सभा वा मिरवणुकांत अडथळा आणू नये.
१४ अन्य पक्षांच्या सभा सुरू असतील, त्या ठिकाणांहून मिरवणुका नेऊ नयेत.
१५ शस्त्र म्हणून वापर करता येईल अशी कुठलीही गोष्ट मिरवणुकीत जवळ बाळगू नये.
१६ इतर उमेदवारांची पोस्टर फाडू नये, खराब करू नयेत.
१७ मतदानाच्या दिवशी नावांच्या चिठठ्या दिल्या जातात, अशा ठिकाणी पक्षाचं नाव, निशाणी वा प्रचार होईल असं कुठलंही साहित्य वापरू नये.
१८ एका जागी स्थिर वा वाहनांवर लावलेल्या लाउडस्पीकरचा वापर सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीशिवाय करायचा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घ्यावी.
१९ संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय सभा-मिरवणुकांत लाउडस्पीकरचा वापर करू नये. लाउडस्पीकरची परवानगी स्थानिक कायदे, जागेची सुरक्षा, हवामान, सण वा परीक्षेचे दिवस आदी घटकांवर अवलंबून असते, हे लक्षात घ्यावे.
२० निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप करू नये.
२१ सरकारी सुरक्षा असलेल्या व्यक्तीनंही सुरक्षा रक्षकांसह मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतील भागात प्रवेश करू नये.
२२ खासगी सुरक्षा व्यवस्था वापरणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची नेमणूक निवडणूक वा मतदान वा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून करू नये.
“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ (चंद्रकांत भुजबळ)
ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.