Friday 28 October 2016

नगरपालिका निवडणुकीत व्यवसायाची माहिती सक्तीची

काळे धंदे करणाऱ्यांसमोर आता अडचणी!

नगरपालिका निवडणुकीत व्यवसायाची माहिती सक्तीची



नगरपालिका निवडणुकीत काळे धंदे करणारे उमेदवार अडचणीत आहेत. अधिकृत व्यवसाय व कामधंद्याची माहिती अर्जात द्यावयाची आहे. काळा धंदा लपवला तर त्याविरुद्ध नागरिकांना हरकती घेता येतील. त्यामुळे अर्जात कामधंद्याचा तपशील देताना कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ काही कुख्यात उमेदवारांवर आली आहे.
या अर्जात अपत्यांची संख्या, शैक्षणिक तपशील, गुन्हेगारी पाश्र्वभूमी, वार्षिक उत्पन्न, जंगम व स्थावर मालमत्ता तसेच वित्तीय संस्थांचे देणे याचा उल्लेख करावा लागणार आहे. पण त्याचबरोबर व्यवसाय व कामधंद्याची माहिती द्यावी लागणार आहे. त्याकरिता त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करावयाचे आहे. एखादा दुकानाचा परवाना काढून तोच व्यवसाय असल्याचे ते सांगत. पण आता त्यांच्या काळय़ा धंद्यावर पोलीस, दारूबंदी व उत्पादन शुल्क खात्याने धाडी टाकल्या असतील. तसेच त्याचे गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांना त्या  व्यवसायाचा उल्लेख अर्जात करावा लागणार आहे. जर उमेदवाराने ही माहिती दडवली अन् एखाद्याने त्याला पुराव्यासह हरकत घेतली तर तो अडचणीत येणार आहे. आता मागील दोन वर्षांत अशा प्रकारच्या धाडी एखाद्या उमेदवारावर वारंवार पडल्या असतील तर त्यांचा तो व्यवसाय गृहीत धरण्याची तरतूद आहे.
अनेक उमेदवार हे भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अशा व्यवहारांची नोंदही वारंवार झालेली असते. मात्र त्यांनी विकासक अथवा भूखंड खरेदी-विक्रीच्या व्यवसायाची माहिती अर्जात न दिल्यास त्याविरुद्धही त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे शक्य आहे. एकूणच पालिका निवडणुकीत प्रथमच काळय़ा धंद्यावर प्रकाश पडणार आहे.
हरकती घेतल्यास चौकशी
पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जात व्यवसाय व कामधंद्याची माहिती द्यावयाची आहे. माहिती खरी असल्याचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत उमेदवाराला द्यावे लागते. माहिती उमेदवाराने दडवली असेल तर कोणीही हरकत घेऊ शकतो. दोन वर्षांत जर संबंधित उमेदवाराचे व्यवसाय विविध कारवाईत पुढे आले असतील तर त्यांना त्याची नोंद अर्जात करावी लागेल. कायद्यानुसार ते बंधनकारक आहे. माहिती दडवणे हे गंभीर असून पुराव्यासह तक्रार केली तर चौकशी होईल. त्यानंतर पुढे निर्णय घेतला जाईल

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.