F हिंदू धर्मिय व्यक्तीच्या मृत्यूपत्राबातच्या तरतुदी
भारतात मृत्यूपत्र कसे असावे किंवा मृत्यूपत्राने वारसा कसा प्राप्त होतो यासंबंधी भारतीय वारसा कायदा, १९२५ मध्ये चर्चा केलेली आहे.
मृत्यूपत्र साध्या कागदावरही करता येते. ते नोंदणीकृतच असावे असे नाही. नोंदणी अधिनियम १९०८, कलम १८ अन्वये मृत्यूपत्राची नोंदणी वैकल्पिक आहे. मृत्यूपत्र करणारा हयात असेल तर त्याला कधीही मृत्यूपत्र नोंदवून घेता येते.
¿ मृत्यूपत्र: एखाद्या व्यक्तीने, त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या मालकीच्या संपत्तीचे वाटप कसे व्हावे याबाबत घोषित केलेली इच्छा म्हणजे मृत्यूपत्र.
¿ कायदेशीर तरतूद: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (एच) अन्वये मृत्यूपत्राची व्याख्या दिली आहे. आणि याच कायद्याच्या भाग ६ मध्ये कलम ५७ पासून मृत्यूपत्राबाबत तरतुदी दिलेल्या आहेत.
भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ५७ म्हणजे हिंदू विल्स ॲक्ट, १८७० च्या कलम २ ची पुनरावृत्ती आहे.
भारतीय वारसा कायदा, १९२५ भारतातील सर्वधर्मियांना म्हणजे हिंदु, ख्रिश्चन, पारशी, अँग्लो इंडियन्स इ. यांना लागू होतो. हिंदू या संज्ञेमध्ये बौद्ध, शिख, जैन, ब्राम्होसमाजी, आर्यसमाजी, नंबुद्री, लिंगायत यांचाही समावेश होतो व या सर्वांना हा कायदा अंशत: लागू पडतो. मुस्लिम धर्मिय लोकांना हा कायदा पूर्णपणे लागू पडत नसला तरी प्रोबेट, लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इ. साठी लागू आहे. जेथे व्यक्तीगत कायद्यानुसार वारसासंबंधी प्रश्न निर्माण होत नाहीत तेथे मृत्यूपत्रासाठी भारतीय वारसा कायदा १९२५ च्या तरतुदी लागू होतात.
मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या विविध धर्माच्या व्यक्तींच्या मिळकतीचे वारस कसे ठरविले जातात या विषयीच्या तरतुदी या कायद्यात दिलेल्या आहेत.
भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (ह) अन्वये मृत्यूपत्र-इच्छापत्राची व्याख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे.
‘‘ मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’
¿ मृत्यूपत्राचे प्रकार:
(१) संयुक्त मृत्यूपत्र (Joint Will): जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती, एकाच लेखाने, त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावावी याबाबत लेख करतात त्याला संयुक्त मृत्यूपत्र म्हणतात. या व्यक्तींपैकी ज्याचा मृत्यू होईल, त्या व्यक्तीच्या संपत्त्तीबद्दल मृत्यूपत्रातील भाग प्रभावित होईल.
(२) पारस्परिक मृत्यूपत्र (Mutual Will): जेव्हा दोन व्यक्ती, एकाचा मृत्यू झाल्यावर दुसर्याला त्याची संपत्ती मिळेल या आशयाचा लेख करतात त्याला पारस्परिक मृत्यूपत्र म्हणतात.
(३) स्वलिखित मृत्यूपत्र (Holographic Will): पूर्णत: स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या मृत्यूपत्राला स्वलिखित मृत्यूपत्र म्हणतात.
(४) नोंदणीकृत मृत्यूपत्र (Registered Will): नोंदणी कायदा, १९०८, कलम १७ अन्वये नोंदणी केलेल्या मृत्यूपत्राला नोंदणीकृत मृत्यूपत्र म्हणतात. मृत्यूपत्राची नोंदणी करता येते, रुपये शंभरच्या स्टँपपेपरवर मृत्यूपत्र नोंदणीकृत केलेले असल्यास पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत. तथापि, नोंदणी कायदा, १९०८, कलम १८ अन्वये मृत्यूपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही.
(५) जमा केलेले मृत्यूपत्र (Deposited Will): नोंदणी कायदा, १९०८, कलम ४२ अन्वये मृत्यूपत्र, पाकीटात बंद/सील करुन निबंधकाकडे जमा करता येते. याला जमा केलेले मृत्यूपत्र म्हणतात.
¿ मृत्यूपत्र करण्यास सक्षम व्यक्ती: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ५९ अन्वये:
* मृत्यूपत्र करणारी व्यक्ती वयाने सज्ञान असावी तसेच तिचे मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी.
* हिंदू स्त्री, तीने तिच्या जीवनकाळात स्वकष्टाने कमावलेली कोणतीही मालमत्ता मृत्यूपत्राने देऊ शकते.
* मुक किंवा बधीर किंवा अंध व्यक्ती, जर त्यांना परिणामांची जाणीव असेल तर, मृत्यूपत्र करु शकतात.
* मृत्यूपत्र स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:च्या हिश्शाबाबत करता येते.
* हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम ३० अन्वये हिंदू व्यक्तीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधील स्वत:च्या हिश्शाबाबत मृत्यूपत्र करता येते.
* वेडसर व्यक्ती, जेव्हा वेडाच्या भरात नसेल तेव्हा मृत्यूपत्र करु शकते. परंतू वेडाच्या भरात, नशेत, आजारात, शुद्धीवर नसताना,फसवणुकीने, दबावाखाली करण्यात आलेले मृत्यूपत्र विधीग्राह्य असणार नाही.
¿ मृत्यूपत्र रद्द करणे/त्यात बदल करणे: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ६२ अन्वये:
मृत्यूपत्र करणारी व्यक्ती, त्याने केलेले मृत्यूपत्र रद्द करु शकते किंवा त्यात कितीही वेळा बदल किंवा दुरुस्ती करू शकते.
¿ मृत्यूपत्र कसे असावे: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ६३ अन्वये:
* मृत्यूपत्रावर, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीने, मृत्यूपत्र त्याने स्वत: केले आहे हे दर्शविण्याची निशाणी म्हणून त्यावर स्वाक्षरी किंवा अंगठा किंवा इतर निशाणी केलेली असावी. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जर स्वाक्षरी करण्यास असमर्थ असेल तर, इतर कोणतीही व्यक्ती, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या निर्देशानुसार, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या समक्ष मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करु शकते.
* किमान दोन किंवा अधिक साक्षीदारांनी, त्यांची नावे, वय, पत्ता व स्वाक्षरीसह, असे मृत्यूपत्र साक्षांकीत केलेले असावे.
¿ मृत्यूपत्रातील इतर मजकूर:
* मृत्यूपत्रात उल्लेख केलेल्या मिळकतीबाबत पुरेसे आणि निश्चित वर्णन मृत्यूपत्रात असावे.
* मृत्यूपत्रात उल्लेखित मिळकत मृत्यूपत्र करणार्याकडे कशी आली आणि मृत्यूनंतर त्या मिळकतीची विल्हेवाट कोणी व कशी लावावी याबाबत स्पष्ट उल्लेख असावा.
* मृत्यूपत्रात शेवटी, मृत्यूपत्र स्वतंत्रपणे, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असतांना आणि विचारपूर्वक केलेले असल्याचा उल्लेख असावा.
* मृत्यूपत्रात शेवटी किंवा स्वतंत्रपणे, मृत्युपत्र करणारी व्यक्ती, मृत्यूपत्र करण्यास, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असल्याबाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र असावे. असे प्रमाणपत्र मृत्यूपत्राचाच भाग असावा. यामुळे पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत.
* हिंदू व्यक्ती स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:चा हिस्सा, अशा एकूण मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी यासाठी मृत्यूपत्र करू शकते.
* मुस्लिम धर्मीयाने मुस्लीम कायद्यानुसार आपले मृत्यूपत्र केले असेल तरच ते परिणामक्षम मृत्यूपत्र ठरते.
* कोणतेही मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अंमलात येऊ शकते.
* मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रात बदल करणे, ते रद्द करणे, नष्ट करणे, नवीन मृत्यूपत्र करणे इत्यादी करण्याचे अधिकार, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीला असतात.
* आधीचे मृत्यूपत्र रद्द करुन नवीन मृत्यूपत्र करतांना, "आधीचे, दिनांक ...रोजी केलेले मृत्यूपत्र रद्द समजावे" असा उल्लेख नवीन मृत्यूपत्रात असणे अपेक्षीत आहे.
* एकाच व्यक्तीने, एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र एकाच व्यक्तीचे असतील तर त्याने सर्वात शेवटच्या दिनांकास केलेले मृत्यूपत्र ग्राह्य मानले जाते.
¿ हिंदू स्त्रिया/विधवा: हिंदू स्त्रियांना किंवा विधवांना स्त्रीधन म्हणून मिळालेली, स्वकष्टार्जित आणि वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता ही त्यांच्या पूर्णत: मालकीची असते. त्यामुळे अशा मिळकतींबाबत हिंदू स्त्रियांना किंवा विधवांना मृत्यूपत्र करता येते.
¿ विशेष मृत्यूपत्र: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ६५ अन्वये:
* एखाद्या सज्ञान सैनिकाने प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस किंवा विशेष मोहीमेवर असतांना, किंवा एखाद्या सज्ञान दर्यावर्दीने जहाजावर असतांना किंवा एखाद्या सज्ञान वैमानिकाने, विमानात असतांना केलेल्या मृत्यूपत्राला विशेष मृत्यूपत्र म्हणतात.
* भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ६६ अन्वये असे विशेष मृत्यूपत्र लेखी अथवा तोंडी असू शकते.
* जर असे मृत्यूपत्र वर नमूद व्यक्तींनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले असेल तर त्यावर त्याची स्वाक्षरी असण्याची आणि ते साक्षीदारांमार्फत साक्षांकीत असण्याची आवश्यकता नाही.
* जर अशा मृत्यूपत्राचा काही भाग वर नमूद व्यक्तींच्या स्वहस्ताक्षरात असेल आणि काही भाग इतर व्यक्तीने लिहिले असेल आणि त्याखाली असे मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीची स्वाक्षरी असेल तर ते साक्षीदारांमार्फत साक्षांकीत असण्याची आवश्यकता नाही.
* विशेष मृत्यूपत्र जर इतर व्यक्तीने लिहिले असेल आणि त्याखाली असे मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीची स्वाक्षरी नसेल आणि असे विशेष मृत्यूपत्र, वर नमूद व्यक्तींच्या निर्देशानुसार लिहिले गेले असे सिध्द करण्यारत आले तर असे विशेष मृत्यूपत्र विधीग्राह्य मृत्यूपत्र समजण्यात येते.
¿ साक्षीदार वारस: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ६८ अन्वये:
कोणत्याही मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणार्या व्यक्तीला, त्या मृत्यूपत्रात नमूद संपत्तीत वाटा मिळत असल्यास किंवा अशा साक्षीदार व्यक्तीला, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीने मृत्यूपत्राचा व्यवस्थापक (Executor) म्हणून नेमलेले असले तरी तिच्या साक्षीदार असण्यावर परिणाम होणार नाही.
¿ कोडिसिल (Codicil): भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ७० अन्वये:
कोडिसिल म्हणजे एक असा दस्त ज्याद्वारे मृत्युपत्रातील मजकुरासंबंधात स्पष्टीकरण दिलेले आहे किंवा बदल केलेला आहे किंवा अधिक माहिती जोडलेली (add) आहे. कोडिसिलचा दस्त मृत्युपत्राचा एक भाग मानला जातो.
¿ मृत्यूपत्रातील लेखन प्रमाद: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ७६ अन्वये:
मृत्यूपत्रातील नाव, क्रमांक इत्यादींबाबतचा लेखन प्रमाद, त्याचा नेमका अर्थ लक्षात येत असेल तर दुर्लक्षित करण्यात यावा.
¿ मृत्यूपत्रातील विसंगत प्रदाने: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ८८ अन्वये:
जर एखाद्या मृत्यूपत्रात नमूद दोन कलमात नमूद इच्छा दाने विसंगत असतील आणि त्या दोन्ही इच्छा एकत्रपणे पूर्ण करणे शक्य नसेल तर शेवटी नमूद इच्छा विधिग्राह्य ठरेल.
उदाहरण १. एका मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीने, त्याच्या मृत्यूपत्रातील पहिल्या कलमामध्ये, त्याची 'क्ष' ठिकाणी असणारी मालमत्ता 'अ' ला द्यावी असे नमूद केले आणि त्याच मृत्यूपत्रात, दुसर्या कलमामध्ये, त्याची 'क्ष' ठिकाणी असणारी मालमत्ता 'ब' ला द्यावी असे नमूद केले.
एकच मालमत्ता एकत्रपणे दोघांना देणे शक्य नसल्याने ही दोन्ही कलमे विसंगत ठरतात व शेवटचे कलम विधिग्राह्य ठरुन अशी मालमत्ता 'ब' ला मिळेल.
उदाहरण २. एका मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीने, त्याच्या मृत्यूपत्रातील पहिल्या कलमामध्ये, त्याची 'क्ष' ठिकाणी असणारे घर 'अ' ला द्यावे असे नमूद केले आणि त्याच मृत्यूपत्रात, शेवटच्या कलमामध्ये असे नमूद केले की, त्याचे 'क्ष' ठिकाणी असणारे घर विकुन टाकावे आणि येणार्या रक्कमेचा विनियोग 'ब' साठी करण्यात यावा.
एकच घर 'अ' ला देणे आणि तेच घर विकुन येणार्या रक्कमेचा विनियोग 'ब' साठी करणे या दोन्ही गोष्टी एकत्र करणे शक्य नसल्याने ही दोन्ही कलमे विसंगत ठरतात व शेवटचे कलम विधिग्राह्य ठरुन घर विकुन येणार्या रक्कमेचा विनियोग 'ब' साठी करणे विधिग्राह्य ठरेल.
¿ नाते (Relations): भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ९९ अन्वये नात्यांची व्याख्या दिलेली आहे.
¿ गर्भस्थ शिशू: हिंदू डिस्पोझिशन्स ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, १९१६ च्या तरतुदी अस्तित्वात असल्याने गर्भस्थ शिशूच्या नावे मृत्यूपत्र करता येते.
¿ स्वमिळकत: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम १५२ अन्वये, फक्त स्वत:च्या मालकीच्या मिळकतीचे किंवा मिळकतीतील स्वत:च्या हिश्शाचेच मृत्यूपत्र करता येते.
¿ गावदप्तरी नोंद: अशाप्रकारे मृत्यूपत्राने वारसा हक्क सांगणार्या व्यक्तीने मृत्यूपत्र हजर केल्यानंतर त्यामध्ये वरील पैलूबाबत काही अपूर्णता आहे का हे प्रथम पहावे. त्याबाबत कुणाची हरकत अगर तक्रार नसल्यास अधिकार अभिलेखात मृत्यूपत्रातील तरतुदीप्रमाणे बदल करणेस हरकत नाही. मृत्यूपत्राबाबत काही वाद असतील तर सक्षम दिवाणी न्यायालयातून हक्काबाबत निर्णय होईपर्यंत अशा मृत्यूपत्राची नोंद करु नये.
¿ मृत्युपत्राची शाबिती (Probate of Will): प्रोबेट म्हणजे अशी कायदेशीर प्रक्रिया ज्यात भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ कलम ५७, २१३ अन्वये, फक्त मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र असलेल्या मुंबई, कलकत्ता, चेन्नई याठिकाणचीच दिवाणी न्यायालये मृत्युपत्राची सत्यता (authenticity) प्रमाणित करतात. फक्त याच न्यायालयांना प्रोबेटचा अधिकार आहे.
याबाबतचा निर्णय भगवानजी करसनभाई राठोड वि. सुरजमल आनंदराज मेहता या प्रकरणात दिनांक ८ जुलै २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. इतर दिवाणी न्यायालये मृत्यू्पत्र योग्य की अयोग्य याबाबत निर्णय देऊ शकतात.
¿ मृत्यूपत्राबाबत महत्वाचे न्यायनिवाडे :
* मृत्यूपत्रासाठी कोणताही निश्चित असा नमुना कोणत्याही कायद्यात सांगितलेला नाही. (वेंकटरामा अय्यर वि. सुंदरमबाळ, ए.आर.आर- १९४० मुंबई- ४०२)
* मृत्यूपत्र करणार्याने त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट त्याच्या मृत्यूनंतर कशी लावावी हे स्पष्ट केल्याशिवाय ते मृत्यूपत्र पूर्णपणे कायदेशीर होत नाही. (अहमद बिन सलाह वि. मोहमद बादशहा, ए.आय.आर. १९७२ एस. सी.)
* १८ वर्षाखालील व्यक्तीने केलेले मृत्यूपत्र अंमलात येऊ शकणार नाही. तसेच जर ती व्यक्ती अज्ञान असतानाच मृत झाली तरी असे मृत्यूपत्र विधिग्राह्य व प्रभावशाली ठरणार नाही. (के. विजयरत्नम वि. सुदरसनराव ए. आय.आर. १९२०, मद्रास-२३७)
* मृत्यूपत्र खरे नाही, ते खोटे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जो तसा अरोप करतो त्याच्याकडे आहे. (चंद्रकांत मेढी वि. लखेश्वरनाथ ए.आय.आर- १९७६ गोहत्ती पान -९८)
* मृत्यूपत्र हा एक पवित्र दस्त मानला गेला आहे. अशा दस्ताद्वारे मृत व्यक्ती आपल्या संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतची इच्छा व्यक्त करीत असते. म्हणून मृत्यूपत्राचे एक गंभीर व पवित्र दस्त म्हणून पालन केले गेले पाहिजे. (रामगोपाल लाल वि. ऐपिनकुमार ४९.ए. आय. आर ४१३)
F मुस्लिम धर्मिय व्यक्तीच्या मृत्यूपत्राबातच्या तरतुदी:
भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ५८ अन्वये हा कायदा मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूपत्राबाबत (वसियतनामा) लागू होत नाही. मुस्लिम धर्मिय व्यक्तींसाठी मृत्यूपत्राबाबतच्या तरतूदी त्यांच्या 'हेदाय' या बाराव्या शतकातील अधिकृत ग्रंथात दिलेल्या आहेत. यासंबंधात दुसरा ग्रंथ 'फतवा आलमगिरी' हा सतराव्या शतकात लिहिण्यात आला. 'शराय-उल-इस्लाम' हा ग्रंथ प्रामुख्याने शिया पंथीय मुस्लिमांसाठी आहे.
¿ स्वाक्षरी: मुस्लिम धर्मिय व्यक्तीने केलेल्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली नसेल किंवा त्यावर साक्षीदारांचे साक्षांकन नसले तरी ते मत्यूपत्र वैध मानले जाते.
¿ सज्ञानता: मुस्लिम कायद्यानुसार पुरूष व्यक्ती १५ वर्षे वयाचा झाल्यावर त्याला सज्ञान समजले जाते. इंडियन मेजॉरिटी ॲक्ट, १८७५ अन्वये पुरूष व्यक्ती १८ वर्षे वयाचा झाल्यावर त्याला सज्ञान समजतात परंतू जर अशी व्यक्ती अज्ञान असतांना न्यायालयाने त्याच्याबाबत 'पालक' नेमला असेल तर अशी व्यक्ती २१ वर्षे वयाचा झाल्यावर त्याला सज्ञान समजतात. इंडियन मेजॉरिटी ॲक्ट, १८७५ हा सर्वधर्मियांना लागू असल्याने मुस्लिम पुरूष व्यक्ती १८ वर्षे वयाचा झाल्यावर सज्ञान समजली जाते. १५ वर्षे वयाची सज्ञानता केवळ विवाह, तलाक. मेहेर यांसाठीच लागू आहे.
¿ गर्भस्थ शिशू: मुस्लिम धर्मानुसार त्याच व्यक्तीच्या नावे मृत्यूपत्र करता येते जी मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्यूच्यावेळी जीवित असेल. तथापि, मृत्यूपत्र करण्याच्यावेळी गर्भात असणार्या शिशूचा जन्म मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा महिन्यात झाला तर त्याच्या नावे केलेले मृत्यूपत्र ग्राह्य मानले जाते.
¿ मर्ज-उल-मौत: मुस्लिम धर्मिय व्यक्तीला त्याचा दफन खर्च व कर्ज फेडीसाठी आवश्यक रक्कम सोडून, त्याच्या संपत्तीच्या १/३ संपत्तीपुरते मृत्यूपत्र कोणत्याही वारसांच्या संमतीशिवाय करता येते. १/३ संपत्तीपेक्षा जास्त संपत्तीचे मृत्यूपत्र वारसांच्या संमतीनेच वैध होते.
¿ प्रोबेट: भारतीय वारसा कायदा, १९२५ चे कलम २१३ मुस्लिम व्यक्तीला लागू होत नाही. त्यामुळे त्यांना प्रोबेटची आवश्यकता नाही.
¿ अमान्य तत्व: मुस्लिम कायद्याला अविभक्त कुटुंब, मृत व्यक्ती मागे जिवंत असणारे, वारसा हक्क, जन्मसिध्द हक्क, ज्येष्ठ मुलाचा हक्क अशी तत्वे मान्य नाहीत. एखाद्या व्यक्तीचा मुलगा, त्या व्यक्तीच्या जिवंतपणी मयत झाला तर मयताच्या मुलाला मालमत्तेत कोणताही हक्क नसतो.
पवित्र कुराणात, सर्व रक्त संबंधी, लग्नामुळे झालेले संबंधी हे जवळचे वारस (शेअरर) मानले जातात. मुस्लिम कायद्यान्वये पवित्र कुराणात ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वारसांना हिस्सा मिळतो.
मुस्लिम सुन्नी हनफी कायद्यानुसार मुस्लिम व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला मयत व्यक्तीच्या मालमत्तेतील १/८ ठराविक हिस्सा मिळतो. मयत मुस्लिम व्यक्तीस दोन पत्नी असतील तर प्रत्येक पत्नीला १/१६ हिस्सा मिळतो. मयताला मुले असतील तर मुलाला दोन हिस्से आणि मुलीला एक हिस्सा मिळतो.
¿ अपात्रता: मुस्लिम कायद्यान्वये ज्या व्यक्तीने आत्महत्त्या करण्यासाठी विष प्राशन केले असेल किंवा स्वत:ला जखमी करुन घेतले असेल अशा व्यक्तीला वसियतनामा करण्याचा अधिकार नसतो.
F शब्दार्थ:
¿ Testator: अशी व्यक्ती ज्याने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र केले आहे.
¿ Intestate: अशी व्यक्ती ज्याने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र केलेले नाही.
¿ Legatee/Beneficiary: अशी व्यक्ती ज्याला मृत्युपत्रान्वये मालमत्ता मिळाली आहे.
¿ Executor: अशी व्यक्ती ज्याची नेमणूक मृत्युपत्र करणार्याने किंवा आदेशान्वये न्यायालयाने, मयताच्या मालमत्तेचे मृत्युपत्रानुसार वाटप करण्यासाठी केलेली आहे. अशी व्यक्ती मृत्युपत्र करणार्या मयत व्यक्तीची कायदेशीर प्रतिनिधी म्ह्णून काम करते
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.