Monday 29 January 2018

शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर खरा अन्याय कोणी केला? लाज कोणाला वाटावी!

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राजकारण



धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी २२ जानेवारीस मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. धर्मा पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरले. धर्मा पाटलांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यांचे डोळे दान केले आहेत. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर सरकारने पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे. दरम्यान, आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटील यांच्या मुलांने अशी भूमिका घेतली होती.  दरम्यान धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना प्रति हेक्टरी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देता येईल का याबाबत सरकारचा विचार सुरु आहे, अशी सरकारची भूमिका  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली. १९९ हेक्टर जागेचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. जुलै २००९ मध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आणि मार्च २०१५ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. या निवाड्याविरोधात धर्मा पाटील यांनी कलम १८ अंतर्गत कोर्टात जाणे अपेक्षित असते. भूसंपादनात कमी भाव मिळाला असेल, झाडांचे मूल्यांकन कमी झाले असेल कोर्टात दाद मागावी लागते. मात्र, धर्मा पाटील यांनी सुरुवातीला मोबदला स्वीकारला. मात्र, त्यानंतर त्यांनी जागेला कमी भाव मिळाला अशी तक्रार केली. अशी माहिती सरकारने स्पष्ट केली आहे.

सहा दिवस मृत्यूशी झुंज देणारे 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनांनतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सरकारने धर्मा पाटील यांची ही एक प्रकारे हत्या केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे. तर जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी पाटील यांचे निधन झाले. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी करणारे ट्वीट्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका करताना ‘सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले. या सरकारचा धिक्कार असून धर्मा पाटील यांच्या निधनासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, असे ट्विट्ट केले आहे. संबंधितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याचे राजकारण झाले नाही असे होणार नाहीच, मात्र खरी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

प्रसारमाध्यमांतून मिळालेली माहिती- 

या प्रकरणी प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाली ती, धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आले होते, धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं होते. अशाप्रकारचे वृत्त बहूतेक प्रसारमाध्यमांनी दिले आहेत.

अन्याय खरा कोणी केला? - 

शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर अन्याय खरा कोणी केला याची चौकशी तर होईलच परंतू महाराष्ट्रात असे फसवणूक झालेले व जमिनीचे आर्थिक मोबदल्याबाबत फसवणूक झालेले अनेक शेतकरी आहेत. प्रस्तावित प्रकल्प होणार याची माहिती केवळ लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांनाच असते. अशा प्रस्तावित प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन शासकीय दराने म्हणजे बाजारभावापेक्षा कमी दराने घेतल्या जातील अशी भीती दाखवून लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांचे साटेलोटे असलेले व्यवसायिक स्वतः गुंतवणूक करतात. कमी दराने खरेदी करून शासनाकडून जास्त मोबदला घेतात. अर्थातच सर्व मिळालेला नफा / फायदा हा  व्यवसायिक, सहभागी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी घेत असतात हि राज्यातील वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. व्यवसायिक आणि सहभागी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्या साटेलोटे असलेल्या जाळ्यातून शेतकरी धर्मा पाटील कसे सुटतील! आणि या अभद्र युतीनेच खरा अन्याय धर्मा पाटील यांच्या सारख्या हजारो शेतकऱ्यावर केला जात आहे.

या प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती -- 

धर्मा पाटील यांचा संघर्ष (2003 ते २०१८)

कसा होता संपादन घटनाक्रम? - (2009 ते 2014)

*  प्रस्ताव दाखल -  8 मे 2009
* संयुक्त मोजणी - 13 सप्टेंबर 2011
* एल.ए. अॅक्ट कलम 4 अन्वये प्रारंभिक अधिसूचना 13 जून 2012
* कलम 5(अ) अन्वये चौकशी, संपादित जमिनीचं स्थळ निरीक्षण 1 ऑक्टोबर 2012
* कलम 6 अन्वये अंतिम अधिसूचना 26 फेब्रुवारी, 2014
* कलम 9(1)(2) अन्वये हरकती आणि सुनावणी 7 एप्रिल 2014
धर्मा पाटील यांच्या ५ एकर जमिनीला ४ लाख ३ हजार रुपये आणि बाजूच्याच शेतकऱ्याला २ एकरासाठी १ कोटी ८९ लाख ४३ हजार रुपये मोबदला दिला गेला. हे सर्व प्रकरण होत असताना यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला असून, अधिकाऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार केलेला आहे.


* २२ जानेवारीस मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांचे नाव-  कै. धर्मा मंगा पाटील (उपचारादरम्यान निधन)
* पत्नीचे नाव - श्रीमती सखुबाई धर्मा पाटील 
* मुलाचे नाव - नरेंद्र धर्मा पाटील
* राहणार व शेतजमीन- गाव- विखरण, तालुका-  शिंदखेडा, जि. धुळे
* शेतजमीन - खाते क्र. २७७० आणि १२१९
* शेतजमीन गट- गट क्र. २९१ ( २९१ या गटात एकूण तीन हिस्से आहेत.)
1. २९१/१ - 
2. २९१/२/अ - 
3. २९१/२/ब - 
असे तीन हिस्से आहेत.

1. २९१/१ - 

भुधारणा पद्धती- भोगवटादार वर्ग -1
भोगवटदाराचे नांव- गुरुचरण आणि महाराष्ट्र विजनिर्मिती कंपनी मर्या.------सामाईक क्षेत्र------
क्षेत्र- जिरायत - 0.95.00 हे.आर. तर पोटखराब (लागवडीस अयोग्य)- एकुण पो ख 1.08.00 असे एकूण क्षेत्र- २.०३.०० हे.आर. (म्हणजेच ५ एकर ३ गुंठे)
सातबारा वरील सर्व नोंद असलेले फेरफार क्र. (1),(273),(1427),(1532),(1833),(2260),(2772),(3225)
धर्मा मंगा पाटील व रंजना विजय सोनवणे यांच्याकडून खरेदी घेतलेले कैलास कांतीलाल जैन यांना महाराष्ट्र विजनिर्मिती कंपनी मर्या. यांना मोबदला देऊन खरेदी संपादन झाल्याने (कैलास कांतीलाल जैन) यांचे नाव कमी केले. अशी महसुली नोंद आहे.

या जागेचे खरेदीखत दस्त नोंद- 
दुय्यम निबंधक : सिंदखेड यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक : 2803/2003 नोदंणी केली आहे. दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 05/12/2003 असून मोबदला रु. 55000 (पंचावन्न हजार) दिला आहे. शासकीय बाजारभावाप्रमाणे किमत- रु. 1,14,000/- (एक लाख तर चौदा हजार) नमूद केले आहे. मिळकत वर्णन- इतर वर्णन :जिल्ह्याचे नाव : धुळे, तालुक्याचे नाव : शिंदखेडा, विभाग ग्रा.पं.हद्यीतील जिरायत शेत जमीन एकुण क्षेत्र.हे 2.03 असे नमूद आहे. दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव व पत्ता - कैलास कांतीलाल जैन असे आहे. तर दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे नाव - सौ.सखुबाई धर्मा पाटील असे आहे.

या जागेचे खरेदीखत दस्त नोंद- 
या जागेचे खरेदीखत दुय्यम निबंधक : सिंदखेड यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक : 2148/2012 नोदंणी केली आहे. दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 25/04/2012 असून मोबदला रु. 20,30,000 (वीस लाख तीस हजार) दिला आहे. शासकीय बाजारभावाप्रमाणे किमत- रु. 29,0290/- (एकूणतीस लाख ) नमूद केले आहे. मिळकत वर्णन- वर्णन :मौजे विखरण येथील जिरायत शेतजमीन मिळकत. गट नं 291/1 चे क्षेत्र हे 0.95 आर पो.ख.हे 1.08 आर एकूण क्षेत्र हे 2.03 आर असे आहे. दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव व पत्ता - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या.V27730339386 तर्फे श्री.शशिकांत बाबुराव गिरी,कार्यकारी अभियंता (स्था.)स्थापत्य बांधकाम विभाग,म.रा.वि.नि.क.मर्या,धुळे पॅन नं AAECM2935R असे आहे. तर दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे नाव - रंजना विजय सोनवणे असे आहे.

या जागेचे खरेदीखत दस्त नोंद- 
दुय्यम निबंधक : सिंदखेड यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक : 1723/2009 नोदंणी केली आहे. दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 05/06/2009 असून मोबदला रु. 70,000 (सत्तर हजार) दिला आहे. शासकीय बाजारभावाप्रमाणे किमत- रु. 2,21,270/- (दोन लाख तर एकवीस हजार) नमूद केले आहे. मिळकत वर्णन- धुळे, तालुक्याचे नाव : शिंदखेडा, विभागाचा नंबर : 4, विभागाचे नाव : विखरण, मिळकतीचा प्रकार : शेती. मौजे विखरण येथील गट नं. 291/1 चे क्षेत्र.हे. 0.95 आर पो.ख.क्षेत्र.हे. 1.08 आर एकुण क्षेत्र.हे. 2.03 आर आकार रु. 1.05 पै. या क्षेत्राची जिरायत शेतजमीन मी तुम्हांस पक्के खरेदी दिली आहे  असे नमूद आहे. दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव व पत्ता - रंजना विजय सोनवणे असे आहे. तर दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे नाव - कैलास कांतीलाल जैन असे आहे. (291/1 चे क्षेत्र यापैकी जिरायत शेतजमीन मी तुम्हांस पक्के खरेदी दिली हा दस्ताचा विषय आहे.)

2. २९१/२/अ -

भुधारणा पद्धती- भोगवटादार वर्ग -1
भोगवटदाराचे नांव- धर्मा मगा पाटील
क्षेत्र- जिरायत - 0.50.00 हे.आर. तर पोटखराब (लागवडीस अयोग्य)- एकुण पो ख 0.54.00  असे एकूण क्षेत्र- १.०४.०० हे.आर. (म्हणजेच २ एकर ४४ गुंठे)
सातबारा वरील सर्व नोंद असलेले फेरफार क्र. ( 2260 ),(1832),(1865),(1866),(3226) इतर अधिकार- इतर- 4(1)अन्नये सपादनासाठी औष्णिक विधूत प्रकल्प ( 1855 ) बोजा - सहकारी सोसायटी इकरार, विखराण वि का से सो यांचा र रु 25000- बोजा ( 1865 )

या जागेचे खरेदीखत दस्त नोंद- 
दुय्यम निबंधक : सिंदखेड यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक : 1724/2009 नोदंणी केली आहे. दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 05/06/2009 असून मोबदला रु. 35,000 (पसतीस हजार) दिला आहे. शासकीय बाजारभावाप्रमाणे किमत- रु. 1,13,360/- (एक लाख तर हजार) नमूद केले आहे. मिळकत वर्णन- वर्णन :धुळे, तालुक्याचे नाव : शिंदखेडा, विभागाचा नंबर : 4, विभागाचे नाव : विखरण, मिळकतीचा प्रकार : शेती. मौजे विखरण येथील गट नं. 291/2 चे क्षेत्र.हे. 0.95 आर पो.ख.क्षेत्र.हे. 1.09 आर एकुण क्षेत्र.हे. 2.04 आर आकार रु. 1.15 पै. यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र.हे. 0.50 आर पो.ख.क्षेत्र.हे. 0.54 आर एकुण क्षेत्र.हे. 1.04 आर आकार रु.0.60 पै. असे आहे. दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव व पत्ता- धर्मा मंगा पाटील असे आहे. तर दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे नाव - कैलास कांतीलाल जैन असे आहे. (291/2 चे क्षेत्र यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र.हे. 0.50 आर हा दस्ताचा विषय आहे.)

3. २९१/२/ब 

भुधारणा पद्धती- भोगवटादार वर्ग -1
भोगवटदाराचे नांव- नरेंद्र धर्मा पाटील
क्षेत्र- जिरायत - 0.45.00 हे.आर. तर पोटखराब (लागवडीस अयोग्य)- एकुण पो ख 0.55.00 असे एकूण क्षेत्र- 1.00.00 हे.आर. (म्हणजेच अडीच एकर)
सातबारा वरील सर्व नोंद असलेले फेरफार क्र. २२६१ व ३२२६ तसेच इतर अधिकार विहीर( 1855 ) इतर 4(1)अन्नये सपादनासाठी औष्णिक विधूत प्रकल्प ( 1855 )

या जागेचे खरेदीखत दस्त नोंद- 
दुय्यम निबंधक : सिंदखेड यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक : 2802/2003 नोदंणी केली आहे. दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 05/12/2003 असून मोबदला रु. 55000 (पंचावन्न हजार) दिला आहे. शासकीय बाजारभावाप्रमाणे किमत- रु. 1,15,000/- (एक लाख तर पंधरा हजार) नमूद केले आहे. मिळकत वर्णन- इतर वर्णन :जिल्ह्याचे नाव : धुळे, तालुक्याचे नाव : शिंदखेडा, विभाग ग्रा.पं.हद्यीतील जिरायत शेत जमीन एकुण क्षेत्र.हे 2.04 असे नमूद आहे. दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव व पत्ता - कैलास कांतीलाल जैन असे आहे. तर दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे नाव - श्री धर्मा मंगा पाटील असे आहे.

या जागेचे खरेदीखत दस्त नोंद- 
दुय्यम निबंधक : सिंदखेड यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक : 1722/2009 नोदंणी केली आहे. दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 05/06/2009 असून मोबदला रु. 35000 (पसतीस हजार) दिला आहे. शासकीय बाजारभावाप्रमाणे किमत- रु. 1,09,000/- (एक लाख तर नऊ हजार) नमूद केले आहे. मिळकत वर्णन- इतर वर्णन :जिल्ह्याचे नाव : धुळे, तालुक्याचे नाव : शिंदखेडा, विभागाचा नंबर : 4, विभागाचे नाव : विखरण, मिळकतीचा प्रकार : शेती. मौजे विखरण येथील गट नं. 291/2 चे क्षेत्र.हे. 0.95 आर पो.ख.क्षेत्र.हे. 1.09 आर एकुण क्षेत्र.हे. 2.04 आर आकार रु. 1.15 पै. यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील क्षेत्र.हे. 0.45 आर पो.ख.क्षेत्र.हे. 0.55 आर एकुण क्षेत्र.हे. 1.00 आर आकार रु.0.55 पै. या क्षेत्राची जिरायत शेतजमीन मी तुम्हांस पक्के खरेदी दिली आहे. असे नमूद आहे. दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव व पत्ता - नरेंद्र धर्मा पाटील असे आहे. तर दस्तऐवज करुन देणा-या पक्षकाराचे नाव - कैलास कांतीलाल जैन असे आहे. (291/२ चे क्षेत्र यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील क्षेत्र.हे. 0.45 आर पो.ख.क्षेत्र.हे. 0.55 आर एकुण क्षेत्र.हे. 1.00 आर आकार रु.0.55 पै. या क्षेत्राची जिरायत शेतजमीन मी तुम्हांस पक्के खरेदी दिली हा दस्ताचा विषय आहे.)

कोण आहेत कैलास कांतीलाल जैन 
कैलास कांतीलाल जैन हे किशोर फुड्स प्रॉडक्टस प्रा.ली. कंपनीचे संचालक आहेत. Kishor Food Products Private Limited या कंपनीत Director पदी दिनांक 22 August 2004 रोजी नियुक्त झाले आहेत. Kishor Food Products Private Limited हि कंपनी 17 March 1988 रोजी स्थापन करण्यात आली आहे. (CIN)U15200MH1988PTC046571 असा असून  registration number is 46571. असा आहे तर  registered address is MATRUCHHAYASTATION AREA DONDAICHA MH 000000 IN असा आहे.

* रंजना विजय सोनवणे यांची माहिती उपलब्ध नाही

जुलै २००९ मध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आणि मार्च २०१५ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली अशी  माहिती सरकारने दिली आहे . या जागेचे व्यवहार 2003 पासूनच झाले आहेत. त्यावेळी सदर प्रकल्प प्रस्तावित होता. भूसंपादनाची प्रक्रिया जुलै २००९ सुरु झाली त्यावेळी  पुन्हा व्यवहार झाले आहेत.

वरील सर्व माहिती विषद केल्यानंतर लक्षात येते कि कोणी कोणाची फसवणूक केली आहे. धर्मा पाटील यांच्यावर अन्याय कोणी केला आहे. कदाचित सर्व वस्तुस्थिती मुलाला माहित असल्याने वारंवार भूमिकेत बदल केला जात असावा असे वाटते तर धर्मा पाटील हे व्यवहारात अज्ञातपोटी आपली जमीन कवडीमोल दराने गेली व आपली फसवणूक झाली असा समाज करून सर्व राग अखेर सरकारवर काढण्यात आला आहे यामध्ये त्यांचा दोष नाही हे दिसून येत आहेच. केवळ खरी वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेस माहित व्हावी या उद्देशाने माहित देण्यात येत आहे. कोणाचीही बद्नही व अवहेलना करण्याचा कोणताही उद्देश नाही.












POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे महाराष्ट्र


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.