राष्ट्रवादीच्या सर्व नऊ उमेदवारांचा पराभव; एका मतदारसंघात मतविभाजनाचा लाभ भाजपला!
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक लढवून मतांची टक्केवारी वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न फोल ठरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांपैकी 5 उमेदवारांना 200 मतांचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नाही या ठिकाणी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून 2 मतदारसंघात अनुक्रमे केवळ 360 व 626 मते मिळाली आहेत. अवघ्या 2 मतदारसंघात पाच अंकात मते मिळाली त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदारसंघात 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली तर राणेबेन्नूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर शंकर यांना 37 हजार 559 इतकी मते मिळाली आहेत. या मतदारसंघात मतविभाजनाचा लाभ भाजपला झाल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील पक्षाच्या उमेदवारांच्या मतांकडे आणि त्यांच्या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते मात्र राष्ट्रवादीच्या आशा देखील फोल ठरल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात एकूण केवळ 1 लाख 04 हजार 807 इतकी नगण्य मते मिळाली आहेत.
निपाणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली असून 35.25 टक्के मतांचे प्रमाण आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवाराने 73 हजार 348 इतक्या मतांनी विजय मिळवला असून कॉंग्रेसच्या उमेदवाराला 44 हजार 107 मते मिळाली त्यामुळे मतविभाजनाचा फायदा या मतदारसंघात भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देवर हिप्परगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार मसूरसाहेब बिलगी यांना अवघी 129 मते मिळाली आहेत. नोटाला 695 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवाराने 65 हजार 952 मते मिळवून कॉंग्रेस सह भाजपच्या उमेदवारांवर मात केली आहे. अनुक्रमे कॉंग्रेसच्या 33 हजार 673 तर भाजपच्या उमेदवाराला 45 हजार 777 मते मिळाली आहेत.
बसवान बागेवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार जमीर अहमद इनामदार यांना केवळ 140 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसने विजय मिळवत 68 हजार 126 मते प्राप्त केली आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून मतविभाजनाचा प्रयत्न असफल झाला आहे. नागठाण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार कुलप्पा चव्हाण यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून अवघी 360 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात आपच्या उमेदवाराला 2 हजार 974 मते मिळाली असून कॉंग्रेसने तिरंगी लढतीत 78 हजार 990 इतकी मते मिळवून यश मिळवले आहे. तर भाजपला 48 हजार 175 मते आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला 34 हजार 114 मते या मतदारसंघात मिळाली आहेत.
येलबुर्गा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर हरी यांना केवळ 626 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र फोल ठरले असून दुरंगीच लढत झाली यामध्ये कॉंग्रेसने 94 हजार 330 मते मिळवून यश मिळवले असून भाजप व जनता दलाला धूळ चारली आहे. भाजपला 77 हजार 149 मते तर जनता दलाला अवघी 1 हजार 038 मते मिळाली आहेत.
राणेबेन्नूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर शंकर यांना 37 हजार 559 इतकी मते प्राप्त झाली असून 19.46 टक्के मतांचे प्रमाण आहे. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराने 71 हजार 830 इतक्या मतांनी विजय मिळवला असून भाजप उमेदवाराला 62 हजार 030 मते मिळाली आहेत. मतविभाजनाचा फायदा या मतदारसंघात भाजप होऊ शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हंगरी बोम्मनहल्ली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार के सुगुणा यांना अवघी 148 मते मिळवून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाने 84 हजार 023 मते मिळवून कॉंग्रेस व भाजला धूळ चारली आहे. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराने 72 हजार 679 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून भाजपला केवळ 27 हजार 026 मते मिळाली आहेत.
विराजपेठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार एसवायएम मसूद फौजदार यांना अवघी 121 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने 83 हजार 791 मते मिळवून धर्मनिरपेक्ष जनता दल व भाजला धूळ चारली आहे. भाजपला 79 हजार 500 मते मिळाली आहेत या ठिकाणी दुरंगी लढत झाली.
नरसिंहराजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार रेहाना बानो यांना अवघी 134 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने 83 हजार 480 मते मिळवून यश संपादन केले आहे तर भाजपला 51 हजार 802 मते तर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाला 41 हजार 037 मते प्राप्त करून तिरंगी लढत दिली. राष्ट्रवादीचे अस्तित्व मात्र या तिरंगी लढतीत कोठेही दिसून आले नाही.
बंडखोरी केलेल्या त्या फुटीर आमदारांना जनतेने नाकारले!
कर्नाटक मध्ये सन २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या आमदारांना जनतेने नाकारले आहे. २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणास कारणीभूत ठरलेल्या त्या ‘१७’ आमदारांपैकी 8 बंडखोरांना या निवडणुकीत काठावरचे मताधिक्य मिळाले असून अन्य त्या बंडखोर आमदारांचा दारूण पराभव झालेला आहे.
२०१९ साली झालेल्या ऑपरेशन लोटसमुळे जेडीएस-काँग्रेस-अपक्ष अशा १७ आमदारांनी बंडखोरी करून राजीनामा दिला. यापैकी काही आमदारांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवून भाजपाला साथ दिल्यामुळे कर्नाटकात भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. या बंडखोर आमदारांचे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला त्याचे विश्लेषण केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ चा निकालात १३५ जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मागील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती.
२०१८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने २२४ पैकी १०४ जागा मिळवल्या. मात्र बहुमताच्या ११३ या आकड्यापासून भाजपा दूर होते. काँग्रेसने या निवडणुकीत ७६, तर जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या. इतर अपक्ष आमदारांसह ११६ आमदारांच्या पाठिंब्यावर जेडीएस-काँग्रेसने सरकार स्थापन केले. जेडीएस-भाजपाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केले. बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या काही आमदारांना भाजपाने मंत्रिपद देऊ केले, काहींना दिल्लीत वर्णी लावली तर काहींची उमेदवारी डावलण्यात आली.
सन २०१९ साली बंडखोरी करून भाजपावासी झालेल्या यातील काही आमदारांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली होती मात्र त्यापैकी सर्वांना विजय मिळू शकला नाही. अनेकांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. सन २०१९ साली भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून दोन्ही पक्षांचे १७ आमदार फोडले. या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडले होते. भाजपाने दोन्ही पक्ष आणि एक अपक्ष मिळून १७ आमदार फोडले होते. या १७ पैकी दोन आमदारांनी या वेळी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा पराभव झाला.
उर्वरित १४ आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यापैकी आठ जणांचा पराभव झाला असून फक्त सहा आमदारांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. बंडखोरी केलेले काँग्रेस माजी आमदार रमेश जारकीहळ्ळी यांनी २०२३ च्या निवडणुकीत गोकाक विधानसभा मतदारसंघातून सर्वात चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यात जारकीहळ्ळी यांचा प्रमुख सहभाग होता. या वेळी त्यांनी एक लाखाहून अधिकची मते घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. बंडखोरी केलेल्यांपैकी सात जणांना भाजपा सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते, त्यापैकी सहा जणांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. पण बीसी पाटील यांना हिरेकेरूर येथून पराभव सहन करावा लागला आहे.
पराभूत झालेले आमदार- प्रतापगौडा पाटील (काँग्रेस) मस्की विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होताच. या वेळीदेखील काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महेश कुमठळ्ळी (काँग्रेस) अथनी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. लिंगायत समाजाचे नेते असलेल्या कुमठळ्ळी यांना काँग्रेसच्या लक्ष्मण सावदी यांनी पराभूत केले आहे. लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापल्यामुळे एक महिन्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. बीसी पाटील (काँग्रेस) हिरेकेरुर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. तीन वेळा जेडीएस आणि दोन वेळा काँग्रेसचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. बोम्मई सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम केले. काँग्रेसचे उमेदवार उजनेश्वार बसवन्नप्पा यांनी त्यांचा पराभव केला. श्रीमंत पाटील (काँग्रेस) कागवाड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकले होते. काँग्रेसमधून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. या वेळी काँग्रेसच्या भरमगौडा कागे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. के. सुधाकर (काँग्रेस) चिकबळ्ळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. काँग्रेसच्या प्रदीप ईश्वर यांनी त्यांचा पराभव केला. बोम्मई सरकारच्या काळात ते आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री होते. के. सी. नारायण गौडा (जेडीएस) क्रिष्णाराजपेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. जनता दलाच्या एच. टी. मंजू यांनी त्यांचा पराभव केला. एन. नागाराजू (काँग्रेस) होसकोटे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. या वेळी भाजपाच्या तिकिटावर त्यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली, तरीही त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या शरथ कुमार बच्चेगौडा यांचा येथून विजय झाला. २०१९ साली विजयानगरचे आमदार असलेल्या आनंद सिंह (काँग्रेस) यांनी बंडखोरी केली होती. या वेळी त्यांचे पुत्र सिद्धार सिंह ठाकूर यांना भाजपाने तिकीट दिले होते, मात्र त्यांना हा मतदारसंघ गमवावा लागला. काँग्रेसच्या एच. आर. गवियप्पा यांचा येथे विजय झाला. आर. शंकर (अपक्ष) यांनी २०१९ साली बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावली होती. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर रानीबेण्णूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.
विजयी झालेले आमदार- रमेश जारकीहोळी (काँग्रेस) यांचा गोकाक मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय झाला आहे. २०१९ साली जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले होते. मात्र सेक्स सीडी प्रकरणात २०२१ साली त्यांनी राजीनामा दिला. एन. मुनिरत्ना (काँग्रेस) राजराजेश्वरीनगर येथून निवडणूक लढवीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांच्यावर ख्रिश्चन समुदायाविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तरीही भाजपाने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली. १,२७,९८० मते मिळवीत त्यांचा विजय झाला. के. गोपालैह्या (जेडीएस) महालक्ष्मी लेआऊट मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ९६ हजार ४२४ मते घेऊन त्यांनी विजय मिळवला. बी. ए. बसवराज (काँग्रेस) यांनी के. आर. पुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. १ लाख ३९ हजार ९२५ मते घेऊन त्यांचा विजय झाला. शिवराम हेब्बर (काँग्रेस) येल्लापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. ७४ हजार ६९९ मतदान घेऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. एस. टी. सोमशेखर (काँग्रेस) यांनी येशवंथपुरा येथून निवडणूक लढवली. १ लाख ६९ हजार मतदान घेऊन त्यांनी जेडीएसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर उर्वरीत रोशन बेग आणि एच. विश्वनाथ यांनी सन २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवलेली नाही.
दरम्यान सन २०१४ च्या तुलनेत भाजपच्या जनाधार घटत असून आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळेल त्यावर लोकसभा निवडणुकांचा अंदाज स्पष्ट होणार आहे. सध्या देशात 30 विधानसभा आहेत. त्यात 2 केंद्रशासित प्रदेश, दिल्ली आणि पुद्दुचेरी देखील आहेत. कर्नाटकच्या निकालानंतर 15 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यापैकी केवळ 9 राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आहे. उर्वरित 6 राज्यांमध्ये आघाडीच्या साथीदारांसोबत भाजप सत्तेत आहे. यापैकी एकही राज्य दक्षिण भारतातील नाही. 2018 मध्ये भाजपची 21 राज्ये आणि देशाच्या 71% लोकसंख्येवर सत्ता होती, परंतु आता भाजपची सत्ता लोकसंख्येच्या 45% पर्यंत कमी झाली आहे. भाजप किंवा त्यांच्या आघाडीच्या प्रदेशातील फक्त 7 राज्यांची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. भाजपच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास जनाधार घटत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
"महाराष्ट्रातील राजकारण"
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.