Monday 29 May 2023

Pune Loksabha By Election 2023; पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपानंतर कॉंग्रेसचीच ताकद; राष्ट्रवादीला अनुकुलता नाही!

पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार!


पुणे शहरातील मध्य भागातील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्या पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपानंतर कॉंग्रेसचीच ताकद जास्त असून या मतदारसंघात राष्ट्रवादीला अनुकुलता नसल्याचे मागील निवडणुकांच्या मतदानाच्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. पुणे महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त असली तरी लोकसभा मतदारसंघात केवळ कॉंग्रेसपेक्षा 3 नगरसेवक जास्त आहेत मात्र सदरील नगरसेवकांच्या मतांचे विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मताधिक्य परावर्तीत होत नाही हे मागील निकालांवरून दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या मतांचा आधार जागावाटपात प्रबळ दावेदार ठरू शकत नाही. पुणे लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट 6 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पेक्षा कॉंग्रेसला मागील निवडणुकांमध्ये मते प्राप्त झाल्याचे दिसून येत असल्याने भाजपानंतर कॉंग्रेसचीच ताकद पुणे लोकसभा मतदारसंघात आहे.  
    पुणे लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघ मनसेला जागा सोडण्यात आल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी व कॉंग्रेसने उमेदवार दिलेला नव्हता तर उर्वरित 5 पैकी कॉंग्रेसला 3 तर राष्ट्रवादीला 2 असे जागावाटप झालेले होते. यामध्ये केवळ वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीला यश आले होते तर कॉंग्रेसला नुकत्याच झालेल्या कसबापेठ पोटनिवडणुकीत यश आलेले आहे. उर्वरित पर्वती व पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादी व कॉंग्रेसला मिळालेली आहेत. त्याप्रमाणे राष्ट्रवादीला वडगावशेरी मतदारसंघात विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना 97 हजार 708 (45.52 प्रमाण) मते तर पर्वती विधानसभा मतदारसंघात अश्विनी कदम यांना दुसऱ्या क्रमांकाची 60 हजार 245 (34.67 प्रमाण) मते मिळाली होती अशी एकूण 1 लाख 57 हजार 953 मते राष्ट्रवादीला मिळालेली होती तसेच कॉंग्रेसला कसबापेठ पोटनिवडणुकीत विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 309 (52.98 प्रमाण) मते तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे दत्तात्रय बहिरट यांना दुसऱ्या क्रमांकाची 53 हजार 603 (39.98 प्रमाण) मते प्राप्त झाली होती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे रमेश बागवे यांना दुसऱ्या क्रमांकाची 47 हजार 148 (37.25 प्रमाण) मते या प्रमाणे कॉंग्रेस एकूण 1 लाख 74 हजार 060 मते मिळाली होती ती राष्ट्रवादीच्या तुलनेत जास्त आहेत. 
      2017 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मुंबईत (२ लाख ८४ हजार), अन्य नऊ महापालिकांमध्ये (३४ लाख, १७ हजार) तर जिल्हा परिषदांमध्ये (५६ लाख ९३ हजार) मते मिळाली. राष्ट्रवादीच्या एकूण मतांची संख्या ही ९२ लाखांच्या आसपास आहे. तर काँग्रेसला मुंबईत (८ लाख २९ हजार), अन्य नऊ महापालिका (३० लाख) तर जिल्हा परिषदा (४९ लाख ७२ हजार) मते मिळाली. काँग्रेसच्या एकूण मतांची संख्या ही ८९ लाख आहे. मनसेला मुंबईत चार लाख अन्य अन्य महापालिकांमध्ये नऊ लाख मते मिळाली आहेत. एमआयएमला मुंबई २.५५ टक्के मते मिळाली आहेत. 
      पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करीत आहे मात्र या मतदारसंघात प्रबळ व प्रभावी उमेदवार अद्यापही इच्छुक म्हणून पुढे आलेला नाही केवळ शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली मात्र ते शिरूर लोकसभा अंतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघात त्यांचे कार्यक्षेत्र आहे. माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून पुण्याच्या मध्यवस्तीतील मतदारांच्या कितपत पसंतीत उतरतील त्याबाबत पक्षांतर्गतच साशंका व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या तुलनेत कॉंग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशींची उमेदवारी प्रभावी ठरत असून त्यांना मागील 3 लोकसभा लढविण्याचा अनुभव आणि निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेली आहेत त्यामुळे मागील निवडणुकांच्या मतदानाच्या तुलनेत भाजपानंतर कॉंग्रेसचे प्राबल्य या लोकसभा मतदारसंघात असल्याचे दिसून येत आहे.  
      पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर पुणे शहरातून काँग्रेस निवडणूक लढविते. महाविकास आघाडी झाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडून आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहेत. या मतदारसंघातील गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय नोंदविले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात अनेक वर्षे ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी. महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा निर्णय घेतील असे काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले. 
      राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. त्या वेळी भाजपचे प्रदीप रावत 42 टक्के मते मिळवीत विजयी झाले. दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसचे मोहन जोशी यांना 29 टक्के, तर राष्ट्रवादीचे उमेदवार व तत्कालीन खासदार विठ्ठल तुपे यांना 27 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांची राज्यात आघाडी झाली. 2004 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी सुमारे पाऊण लाख मताधिक्याने जिंकले, तर 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कलमाडींचे मताधिक्य 25 हजारांपर्यंत घसरले. त्या वेळी मनसेने 75 हजार मते मिळविली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद उपनगरांत जास्त आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर भाजपची ताकद वाढली. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी राष्ट्रवादीकडे वडगाव शेरी हा एक मतदारसंघ असून, कसबा पेठ मतदारसंघ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत भाजपकडून खेचून घेतला. पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. दोन्ही ठिकाणी कमी फरकाने काँग्रेस पराभूत झाली होती. 
      पुणे महापालिकेच्या गेल्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक निवडून आले, तर काँग्रेसचे 10 नगरसेवक निवडून आले. मात्र, काँग्रेसचे दहाही नगरसेवक पुणे लोकसभा मतदारसंघातील आहेत, तर या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या तेरा होती. राष्ट्रवादीचे उर्वरित 29 नगरसेवक हडपसर व खडकवासला मतदारसंघांतील प्रभागांतून निवडून आले होते. आमदार आणि नगरसेवकांच्या संख्येपेक्षा मतदानाची संख्या राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसची वरचढ ठरत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद राष्ट्रवादी व कॉंग्रेसपेक्षा जास्त असून युती व महाविकास आघाडीत सरळ लढत झाल्यास निवडणूक चुरशीची होऊ शकते. भाजपकडून दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काँग्रेसमधून माजी आमदार मोहन जोशी, रोहित टिळक, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी मंत्री रमेश बागवेंची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे तर भाजपमध्येही नऊ-दहा महिने खासदार होण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांच्यात चुरस आहे. दरम्यान जूनअखेरीस मतदान घेण्याचा विचार सुरू असल्याचे निवडणूक आयोगाच्या प्रक्रीयेवरून दिसून येते. लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील संसदेतील सदस्यत्व अवघे काही महिन्यांच्या कालावधीचे आहे त्यामुळे अल्पकालीन खासदारकीसाठी इच्छुकांची संख्या देखील नगण्य दिसून येत आहे. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.