Tuesday 4 June 2024

Maharashtra Loksabha Election Results 2024 : पुणे जिल्ह्यातील मतदारांनी अजित दादांना नाकारल्याचे चित्र

भाजप प्रणित महायुतीला मतदारांचा झटका; अजित पवारांना फटका




बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांची दादांकडे पाठ; सुप्रिया सुळे पुन्हा खासदार

बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर व खडकवासला या सहाही विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती, ती शेवटच्या फेरीपर्यंत कायमच राहिली. आमदार, पदाधिकारी हे जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने दिसत असले तरी मतदारांनी मात्र शरद पवार यांच्याच पारडयात मत टाकून आपला विश्वास त्यांच्याप्रती चौथ्यांदा व्यक्त केला. काही विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे तर काही मध्ये सुनेत्रा पवार आघाडी घेतील अशी जाणकारांची शक्यताही मतदारांनी मोडीत काढली. सर्वच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनाच मतदारांनी पसंती दिली. अजित पवारांनी या निवडणूकीत एकटे पडूनही चुरशीची लढाई करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. ज्या पदाधिका-यांच्या जिवावर अजित पवारांनी विजयाची आकडेवारी मांडली होती ते पदाधिकारी कुचकामी असल्याचेच या निकालाने दाखवून दिले. सुप्रिया सुळे यांनी मतदारांना त्यांच्या कामाच्या जोरावर मागितलेली मते, शरद पवार यांच्यासोबत त्यांचे कायम असणे, संसदेतील कामगिरी, भाषेवरील प्रभुत्व, मितभाषी स्वभाव या मुळे जरी पदाधिका-यांनी त्यांची साथ सोडली तरी मतदार त्यांच्यासोबत राहिले हेच या निकालाने दाखवून दिले. सुरवातील माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना विरोध केला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांनी आपली तलवार म्यान केली होती. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल १ लाख मतांनी पराभव केला आहे. नणंद-भावजय लढतीत अखेर नणंदच 'वरचढ' ठरली. शरद पवार यांचा करिष्मा आजही बारामतीत कायम असल्याचे या निकालाने अधोरेखीत केले. निवडणूकीत अजित पवार यांचे कुटुंबिय वगळता इतर बहुसंख्य पवार कुटुंबियांनी सुप्रिया सुळे यांना साथ देण्याचा निर्णय घेत त्यांचा प्रचार केला. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका काही मतदारांना रुचली नाही. त्याचा फटका या निवडणूकीत त्यांना सहन करावा लागला. स्वत: अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात केला होता, मात्र मतदारांनी शरद पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे निकालातून स्पष्ट झाले. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा समजला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात येथे मताधिक्यासाठी मोठी चुरस होती. दोन्ही बाजुंनी सुमारे एक लाखाचे मताधिक्य मिळवण्याचे ध्येय होते. मात्र, सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघात २० हजार‌ ७४६ चे मताधिक्य मिळाले, तर सुळे‌ यांना गेल्या वेळचे ४४ हजारांचे मताधिक्य कमी‌ करण्यात यश आले. या मतदारसंघात ५ लाख ३८ मतदार आहेत. त्यातील ५१.५५ टक्के म्हणजे २ लाख ७७ हजार ३६५ मतदारांनी मतदान केले. त्यात सुनेत्रा पवार यांना १ लाख ४१ हजार ९२८ तर, सुप्रिया सुळे यांना एक लाख २१ हजार १८२ मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहा माजी नगरसेवक, दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंचायत समितीचे माजी सदस्य होते. त्यांच्यासह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचे जाळे सोबत होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे १० माजी नगरसेवक, त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपचे १६ माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य होते. तसेच जिल्हा बँकेचे संचालक, बाजार समितीचे संचालक, पंचायत समितीचे माजी सदस्य यांची कुमकही त्यांच्यासमवेत होती. सुळे यांनी गेल्या निवडणुकीतील ६५ हजारांचे मताधिक्य यंदा २१ हजारांवर आणले, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरली. तर, सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी ६५ हजारांचे मताधिक्य एक लाखापेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, मित्रपक्षाची मोठी मजबूत फळी असतानाही त्यांना ते गाठता आले नाही. सुनेत्रा पवार यांना कोथरूड, बावधन, वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, नांदेड, डीएसके, धायरी नऱ्हे परिसरातून आघाडी मिळाली तर, सुप्रिया सुळे यांना कात्रज, बालाजीनगर, चैतन्यनगर, धनकवडीचा काही भाग, आंबेगाव, तसेच खडकवासला, नांदोशी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता ग्रामीण, शिवणे ग्रामीण, उजवी भुसारी कॉलनी, बावधनचा काही भाग, खेड शिवापूर, शिवगंगा खोरे येथून चांगले मतदान झाले.अजित पवारांनी बारामती लोकसभा जिंकण्यासाठी ताकद लावली होती, पण निकाल विरोधात लागला. बारामतीवर अजूनही शरद पवारांचे वर्चस्व असल्याचे निकालातून सिद्ध झाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदानाचे जी आकडेवारी आहे, ती अजित पवारांना धक्का देणारी आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध होती. अजित पवार यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर हे भाजपचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 65 हजार 365 मतांनी पराभव केला होता.विधानसभा निवडणुकीत इतकं प्रचंड मताधिक्य देणाऱ्या बारामतीने पक्ष फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली नाही, असे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे. यावेळी जी लोकसभा निवडणूक झाली त्यात बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य मिळालं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघात 1 लाख 43 हजार 941 इतकी मते मिळाली. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 96 हजार 560 इतकी मते मिळाली. म्हणजे सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातूनच मताधिक्य मिळू शकलेली नाही. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 47 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवलं आहे. हे मताधिक्यच अजित पवारांसाठी धोक्याचा इशारा आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच बारामतीकरांनी दिलेल्या या निकालामुळे अजित पवारांचे काय होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 2019 मध्ये भाजपने अजित पवारांविरोधात भाजपचा उमेदवार होता. पण, यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढवू शकतात, ही चर्चा लोकसभेच्या निवडणुकीपासूनच सुरू आहे. तसे झाल्यास बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.

शिरूरमध्ये आढळराव यांना केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा एक लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. आढळराव यांना केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. त्यामुळे आढळरावांना राष्ट्रवादीच्या आमदारांनीच रोखले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची उमेदवारनिहाय आकडेवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील बलाबल पाहिल्यास ‘काका विरुद्ध पुतण्या’ या लढाईत अजित पवार यांचीच ताकद जास्त दिसत होती. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आंबेगाव-दिलीप वळसे पाटील, खेड-आळंदी-दिलीप मोहिते पाटील आणि हडपसरमधून चेतन तुपे असे चार आमदार अजित पवार गटाकडे आहेत. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने या चारही विधानसभा मतदारसंघांसाठी त्यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा नियोजन समिती, आदिवासी योजना अशा विविध विकासकामांसाठी भरघोस निधी दिला होता. मात्र, त्याचा काही परिणाम मतदानावर झाला नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या पाच वर्षांपासून करणारे आढळराव यांनी ही जागा शिवसेनेकडून राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे नक्की झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, निकालाच्या आकडेवारीत एकमेव भोसरी विधानसभा मतदारसंघात आढळराव यांना साडेनऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव यांचा पराभव झाला असला, तरी भोसरी विधानसभा मतदारसंघातून ३७ हजार ७७, तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून ५३७० मतांची आघाडी मिळाली होती.

पुण्यात मताधिक्य घटले

लोकसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य घटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे. या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे आमदार असतानाही काँग्रेसला फायदा झाल्याने मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे, तर लोकसभा निवडणुकीत पक्षाची वाढलेली दीड लाख मतेही काँग्रेसला बळ देणारी ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने पुणे मतदारसंघ राखला. पुण्यातून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट हे साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या वेळी मात्र मताधिक्य दीड ते पावणेदोन लाखांनी घटले आहे. कसबा, पर्वती आणि कोथरूड या मतदारसंघांनी भाजपला तारले. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत दिसून आली. तसेच शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मात्र मोहोळ यांना जेमतेम आघाडी मिळाल्याचे पुढे आले आहे. शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील आमदार भाजपचे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निसटता विजय प्राप्त केला होता. काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी शिरोळेंना कडवी लढत दिली होती. त्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघातील भाजपची ताकत वाढली नसल्याचे लोकसभा निकालातून पुढे आले आहे. त्यामुळे शिवाजीनगरमधून केवळ तीन हजारांची आघाडी मोहोळ यांना मिळाली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपचे बारा नगरसेवक निवडून आले होते. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे भाजपचे आमदार आहेत. या मतदारसंघातूनही धंगेकर यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपची ताकत वाढल्याचे गेल्या दोन विधानसभा निवडणुकींतून दिसून आले होते. त्यामुळे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे आमदार या मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे झुकल्याचे धंगेकर यांना मिळालेल्या मताधिक्याने पुढे आले आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वासाठी शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ चिंता वाढविणारे ठरले आहेत. शिवाजीनगरमधील भाजपची कमी झालेली आघाडी आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसच्या वाढलेल्या मतदानामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांतून काँग्रेस भाजपपुढे आव्हान निर्माण करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसच्या एकूण मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ३ लाख ८ हजार २०७ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला ४ लाख ६१ हजार ६९० मते मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये दीड लाखाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी

शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत असलेल्या मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली आहे. श्रीरंग बारणे हे ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आले आहेत. बारणे यांना ६ लाख ९२ हजार ८३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळाली आहेत. मावळ लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. महाराष्ट्रातील प्रमुख लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जात होतं. शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी निवडणूक असल्याने शिवसैनिकांचं या ठिकाणी विशेष लक्ष होतं. २००९ पासून आजतागायत मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा पगडा राहिलेला आहे. आज देखील हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
मावळमध्ये 31 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणास लागलेल्या मावळ लोकसभेत शिंदे शिवसेनेची सरशी झाली. त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रिक केली. ते 96 हजार 615 मतांच्या ली़डने निवडून आले. पण,गेल्यावेळपेक्षा त्यांचे लीड तब्बल एक लाख 19 हजार 298 मतांनी घटले. 2014 ला श्रीरंग बारणे नगरसेवकाचे थेट खासदार झाले. 2012 ला ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2014 ला त्यांनी शेकापकडून लढलेले लक्ष्मण जगताप यांचा एक लाख 57 हजार 397 मतांनी पराभव केला.तर, गेल्यावेळी 2019 मध्ये त्यांनी पार्थ अजित पवारांवर 2 लाख 15 हजार 913 मतांनी दणदणीत विजय मिळवला. आता 2024 ला पुन्हा निवडून येत त्यांनी खासदारकीची हॅटट्रिक केली. मावळमध्ये पहिल्यांदाच ती झाली.पण त्यांचे लीड लक्षणीयरित्या म्हणजे एक लाख 19 हजार 298 ने कमी झाले. गेल्यावेळी अजित पवारांचे पूत्र पार्थ हे प्रतिस्पर्धी असूनही त्यांचा बारणेंनी दोन लाख १५ हजाराच्या लीडने दणदणीत पराभव केला होता.यावेळी अजित पवार राष्ट्रवादीतून ठाकरे शिवसेनेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेले संजोग वाघेरे-पाटील हे नवखे व पहिल्यांदा लोकसभा लढणारे उमेदवार असूनही त्यांना मागच्यापेक्षा निम्मेही मताधिक्य मिळाले नाही. यावेळी 2024 ला मावळमध्ये 14 लाख 2 हजार 641 जणांनी मतदान केले. त्यापैकी बारणेंना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली. 2019 ला त्यांना 7 लाख वीस हजार 663 मते मिळाली होती. यावेळी दोन लाख 28 हजार 892 ने जास्त मतदान होऊनही बारणेंना 2019 पेक्षा 27 हजार 831 मते कमी मिळाली. त्यांच्या मतांच्या टक्केवारीतच नाही,तर मताधिक्यातही गेल्यावेळपेक्षा मोठी घट झाली.यावेळी 33 उमेदवार मावळच्या रिंगणात होते.त्यातील वाघेरे सोडून बाकीच्या 31 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 16 हजार 760 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.तर, 254 मते बाद झाली. मावळमध्ये वंचितचे उमेदवार राजाराम पाटील यांनी 75 हजार 904 एवढी मते खेचली होती. ते त्यावेळी तिसऱ्या नंबरवर राहिले. 2024 ला त्यांनी बहूजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवली अन त्यांच्य़ा मतात मोठी घट झाली. त्यांना अवघी 14 हजार तीन मते मिळाली. ते चौथ्या क्रमांकावर राहिले.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतलेल्या पक्ष निहाय कल पाहिल्यास भाजप-9, काँग्रेस-13, शिवसेना (ठाकरे)-9,  राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार-8, शिवसेना-7, राष्ट्रवादी-1, अपक्ष-1 असे चित्र सद्यस्थितीत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलणार असून आघामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या निकालाचे महत्व अधोरेखित होणार आहे. भाजप प्रणित महायुतीला मतदारांनी झटका दिला असून शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष युतीत सामाविष्ट केल्याचा विपरीत परिणाम निकाल पाहून स्पष्ट होत आहे. सर्वाधिक फटका अजित दादांना बसणार असून त्यांच्या मागील आमदार सैरभैर होतील अशी स्थिती निकालातून पुढे येत आहे. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल)चे निष्कर्ष बहुतांश मतदारसंघात अचूक ठरत आहेत.




महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार व मताधिक्य

क्र

मतदारसंघ

विजयी उमेदवार

विजयी पक्ष

प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार

पराभूत पक्ष

मताधिक्य

1

नंदुरबार

गोवाल कागदा पाडवी

कॉंग्रेस

डॉ हिना विजयकुमार गावित

भाजप

159120

2

धुळे

बच्छाव शोभा दिनेश

कॉंग्रेस

भामरे सुभाष रामराव

भाजप

3831

3

जळगाव

स्मिता उदय वाघ

भाजप

करण बाळासाहेब पाटील-पवार

शिवसेना (उबाठा)

251594

4

रावेर

खडसे रक्षा निखिल

भाजप

श्रीराम दयाराम पाटील

राष्ट्रवादी (एसपी)

272183

5

बुलढाणा

जाधव प्रतापराव गणपतराव

शिवसेना

नरेंद्र दगडू खेडेकर

शिवसेना (उबाठा)

29479

6

अकोला

अनुप संजय धोत्रे

भाजप

अभय काशिनाथ पाटील

कॉंग्रेस

40626

7

अमरावती

बळवंत बसवंत वानखडे

कॉंग्रेस

नवनीत रवी राणा

भाजप

19731

8

वर्धा

अमर शरदराव काळे

राष्ट्रवादी (एसपी)

रामदास चंद्रभान तडस

भाजप

81648

9

रामटेक

श्यामकुमार (बाबालू) दौलत बर्वे

कॉंग्रेस

राजू देवनाथ पारवे

शिवसेना

76768

10

नागपूर

नितीन जयराम गडकरी

भाजप

विकास ठाकरे

कॉंग्रेस

137603

11

भंडारा गोंदिया

डॉ. प्रशांत यादराव पडोळे

कॉंग्रेस

सुनील बाबुराव मेंढे

भाजप

37380

12

गडचिरोली - चिमूर

डॉ. किरसन नामदेव

कॉंग्रेस

अशोक महादेवराव नेटे

भाजप

141696

13

चंद्रपूर

धनोरकर प्रतिभा सुरेश

कॉंग्रेस

मुनगंटीवार सुधीर

भाजप

260406

14

यवतमाळ- वाशीम

संजय उत्तमराव देशमुख

शिवसेना (उबाठा)

राजश्रीताई हेमंत पाटील (महाले)

शिवसेना

94473

15

हिंगोली

आष्टीकर पाटील नागेश बापूराव

शिवसेना (उबाठा)

बाबुराव कदम कोहळीकर

शिवसेना

108602

16

नांदेड

चव्हाण वसंतराव बळवंतराव

कॉंग्रेस

चिखलीकर प्रतापराव

भाजप

59442

17

परभणी

जाधव संजय (बंडू) हरिभाऊ

शिवसेना (उबाठा)

जानकर महादेव जगन्नाथ

रासप

134061

18

जालना

कल्याण वैजिनाथराव काळे

कॉंग्रेस

दानवे रावसाहेब दादाराव

भाजप

109958

19

औरंगाबाद

भुमरे संदिपनराव आसाराम

शिवसेना

इम्तियाज जलील सय्यद

एमआयएम

134650

20

दिंडोरी

भास्कर मुरलीधर भगरे

राष्ट्रवादी (एसपी)

डॉ. भारती प्रवीण पवार

भाजप

113199

21

नाशिक

राजाभाऊ प्रकाश वाजे

शिवसेना (उबाठा)

गोडसे हेमंत तुकाराम

शिवसेना

162001

22

पालघर

डॉ. हेमंत विष्णू सावरा

भाजप

भारती भारत कामडी

शिवसेना (उबाठा)

183306

23

भिवंडी

सुरेश गोपीनाथ म्हात्रे

राष्ट्रवादी (एसपी)

कपिल मोरेश्वर पाटील

भाजप

66121

24

कल्याण

डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे

शिवसेना

वैशाली दरेकर - राणे

शिवसेना (उबाठा)

209144

25

ठाणे

नरेश गणपत म्हस्के

शिवसेना

राजन बाबुराव विचारे

शिवसेना (उबाठा)

217011

26

मुंबई उत्तर

पियुष गोयल

भाजप

भूषण पाटील

कॉंग्रेस

357608

27

मुंबई उत्तर पश्चिम

रवींद्र दत्ताराम वायकर

शिवसेना

अमोल गजानन कीर्तिकर

शिवसेना (उबाठा)

48

28

मुंबई ईशान्य

संजय दिना पाटील

शिवसेना (उबाठा)

मिहीर चंद्रकांत कोटेचा

भाजप

29861

29

मुंबई उत्तर मध्य

गायकवाड वर्षा एकनाथ

कॉंग्रेस

उज्वल निकम

भाजप

16514

30

मुंबई दक्षिण मध्य

अनिल यशवंत देसाई

शिवसेना (उबाठा)

राहुल रमेश शेवाळे

शिवसेना

53384

31

मुंबई दक्षिण

अरविंद गणपत सावंत

शिवसेना (उबाठा)

यामिनी यशवंत जाधव

शिवसेना

52673

32

रायगड

तटकरे सुनील दत्तात्रेय

राष्ट्रवादी

अनंत गीते

शिवसेना (उबाठा)

82784

33

मावळ

श्रीरंग आप्पा चंदू बारणे

शिवसेना

संजोग वाघेरे पाटील

शिवसेना (उबाठा)

96615

34

पुणे

मुरलीधर मोहोळ

भाजप

धंगेकर रवींद्र हेमराज

कॉंग्रेस

123038

35

बारामती

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी (एसपी)

सुनेत्रा अजितदादा पवार

राष्ट्रवादी

158333

36

शिरूर

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे

राष्ट्रवादी (एसपी)

आधलराव शिवाजी दत्तात्रेय

राष्ट्रवादी

140951

37

अहमदनगर

निलेश ज्ञानदेव लंके

राष्ट्रवादी (एसपी)

डॉ. सुजय विखेपाटील

भाजप

28929

38

शिर्डी

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे

शिवसेना (उबाठा)

लोखंडे सदाशिव किसन

शिवसेना

50529

39

बीड

बजरंग मनोहर सोनवणे

राष्ट्रवादी (एसपी)

पंकजा मुंडे

भाजप

6553

40

उस्मानाबाद

ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर

शिवसेना (उबाठा)

अर्चना राणाजगजितसिंह पाटील

राष्ट्रवादी

329846

41

लातूर

डॉ. काळगे शिवाजी बंडप्पा

कॉंग्रेस

सुधाकर तुकाराम शृंगारे

भाजप

61881

42

सोलापूर

प्रणिती सुशीलकुमार शिंदे

कॉंग्रेस

राम विठ्ठल सातपुते

भाजप

74197

43

माढा

मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह

राष्ट्रवादी (एसपी)

रणजीतसिंह नाईक निंबाळकर

भाजप

120837

44

सांगली

विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील

अपक्ष

संजय (काका) पाटील

भाजप

100053

45

सातारा

श्रीमंत छ.उदयनराजे भोंसले

भाजप

शशिकांत जयवंतराव शिंदे

राष्ट्रवादी (एसपी)

32771

46

रत्नागिरी- सिंधुदुर्ग

नारायण तातू राणे

भाजप

विनायक भाऊराव राऊत

शिवसेना (उबाठा)

47858

47

कोल्हापूर

छत्रपती शाहू शहाजी

कॉंग्रेस

संजय सदाशिवराव मंडलिक

शिवसेना

154964

48

हातकणंगले

धैर्यशील संभाजीराव माने

शिवसेना

सत्यजीत पाटील सरूडकर

शिवसेना (उबाठा)

13426












१३ केंद्रीय मंत्र्यांचा पराभव

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाही बहुमत मिळाले नाही. तर दुसऱ्या बाजूला देशामधील दिग्गज नेत्यांनाही धक्कादायकरित्या या निवडणुकीतून पराभूत व्हावं लागलं आहे. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपच्या खासदार राहिलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. त्या २०१९ मध्ये राहुल गांधी यांना पराभूत करून बालविकास मंत्री म्हणून केंद्रात काम करत होत्या. या लोकसभा निवडणुकीमध्ये १ लाख ६७ हजार १९६ मतांनी त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा हे अमेठी मतदारसंघात ठिकाणी विजयी झाले आहेत. केरळच्या तिरुवनंतपुरम मतदार संघात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव शेखर यांना पराभूत व्हावं लागलेलं आहे. काँग्रेसचे शशी थरूर यांनी त्यांना १६ हजार ७७ मतांनी पराभूत केले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचाही पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाच्या उत्कर्ष वर्मा यांनी त्यांचा ३४ हजार ३२९ मतांनी पराभव केला आहे. टेनी यांच्या मुलाला २०२१ मध्ये लखीमपुर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. झारखंड मधील खुंटी या मतदारसंघात केंद्रीय मंत्री खासदार अर्जुन मुंडा यांचा पराभव काँग्रेस उमेदवार कालीचरण मुंडा यांनी केला आहे. १ लाख ४९ हजार ७७५ मतांनी त्यांचा पराभव झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. महाराष्ट्रातील जालना मतदारसंघांमध्ये केंद्रीय रेल्वे कोळसा आणि खाण मंत्री भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पराभूत केले आहे. कल्याण काळे यांना १ लाख ९५८ मतांचे मताधिक्य मिळाले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचा उत्तर प्रदेशातील चंदोली मतदारसंघात पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाच्या विरेंद्र सिंह यांच्याकडून २१हजार ५६५ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला आहे. पश्चिम बंगालच्या बांकुरा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांचा तृणमूलच्या उमेदवाराने पराभव केला आहे. अरुप चक्रवर्ती यांनी ३२ हजार ७७८ मतांनी सुभाष सरकार यांच्या विरोधात विजय प्राप्त केला आहे. केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांचा राजस्थानमधील बारमेर या मतदार संघात पराजय झाला आहे. बारमेर या ठिकाणी उमेदाराम बेनिवाल यांचा ४ लाख १७ हजार ९४३ इतक्या मताधिक्याने विजय झाला आहे. उत्तर बंगालमधील भाजपाचा युवा चेहरा केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि युवक तसेच क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांना कुचबिहार मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे. तृणमूलच्या जगदीश चंद्र बसुनिया यांनी त्यांना ३९ हजार २५० मतांनी पराभूत केले आहे. केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांचा तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या ए राजा यांनी पराभाव केला आहे. २ लाख ४० हजार ५८५ मताधिक्क्याने मुरुगन यांचा पराभव झाला आहे. केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांचा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या हरेंद्र सिंह मलिक यांच्याकडून २४ हजार ६७२ मतांनी पराभव झाला आहे. महाराष्ट्रातील भिवंडी मतदारसंघात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश गोपीनाथ म्हात्रे (शरदचंद्र पवार) यांच्याकडून ६६ हजार १२१ मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आदिवासी व्यवहार राज्यमंत्री भारती पवार यांचा महाराष्ट्रातील दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) भास्कर भगरे यांच्याकडून ५ लाख ७७ हजार ३३९ मतांनी पराभव झाला.

एनडीए आघाडीला २९३ जागा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला त्याच ३०३ जागांपैकी २०८ जागांवर पुन्हा विजय मिळाला; परंतु उर्वरित ९५ पैकी ९२ जागांवर पराभव पत्करावा लागला आणि सहकारी पक्षांना म्हणजेच संयुक्त जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल व राष्ट्रीय लोक दल यांना देण्यात आलेली प्रत्येकी एक जागा त्यांनी जिंकली. यावेळी भाजपाने नव्या ३२ मतदारसंघांमध्ये विजय संपादित केला आहे. अशी भाजपाची एकूण सदस्यसंख्या २४० वर आली आहे. भाजपाने यावेळी ‘चारसौपार’ जाण्याचे लक्ष्य ठेवले असले तरीही ते दिवास्वप्नच ठरले आणि त्यांच्या आहे त्या जागांमध्येही कमालीची घट झाली आहे. एकूण एनडीए आघाडीलाही २९३ जागा प्राप्त झाल्या असून, तीनशेपारही जाता आलेले नाही. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या २९ मतदारसंघांमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सर्वाधिक फटका बसला असून, एकूण ९२ पराभूत जागांपैकी २९ जागा एकट्या उत्तर प्रदेशमध्ये गमवाव्या लागल्या आहेत. उत्तर प्रदेशसमवेत ज्या इतर दोन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. भाजपाला महाराष्ट्रात १६, तर राजस्थानमध्ये १० जागी पराभूत व्हावे लागले आहे. त्याशिवाय भाजपाला कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी आठ जागा गमवाव्या लागल्या आहेत. हरियाणामध्ये भाजपाने अर्ध्या म्हणजेच पाच जागा गमावल्या आहेत. त्याबरोबरच भाजपाने बिहार- ५, झारखंड- ३, पंजाबमध्ये २ आणि आसाम, चंदिगड, दीव आणि दमण, गुजरात, लडाख व मणिपूर या राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा गमावली आहे. एकुणात भाजपाने १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ९२ जागा गमावल्या आहेत. भाजपाने राखीव जागांसोबतच सामान्य प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या जागांवरही पराभव पत्करला आहे. भाजपाने गमावलेल्या ९२ जागांपैकी १८ जागा अनुसूचित जातींसाठी; तर ११ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव होत्या. उर्वरित ६३ जागा सामान्य प्रवर्गासाठी खुल्या होत्या. या पराभूत जागांमध्ये बहुतांश जागा ग्रामीण भागातल्या असल्या तरीही त्यामध्ये काही शहरी मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबई उत्तर मध्य व मुंबई ईशान्य या शहरी मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीने भाजपा उमेदवारांचा पराभव केला आहे. भाजपा जेथे पराभूत झाला त्या ९२ पैकी औरंगाबाद, दुमका, लोहरदगा, गुलबर्गा, रायचूर, गडचिरोली-चिमूर, बारमेर, करौली-धोलपूर, बांदा, चांदौली व फतेहपूर हे ११ मतदारसंघ देशातील सर्वाधिक गरीब जिल्ह्यांमध्ये मोडतात. या ११ पैकी काँग्रेसने सहा; तर समाजवादी पार्टीने तीन मतदारसंघांमध्ये भाजपाला पराभूत केले आहे. भाजपा पराभूत ठरलेल्या ९२ पैकी ४२ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील आठ व उत्तर प्रदेशमधील चार जागांचा समावेश आहे. भाजपा पराभूत ठरलेल्या मतदारसंघांपैकी २५ ठिकाणी समाजवादी पार्टीने विजय मिळवला आहे. तर, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाने आठ आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गटाने पाच जागा जिंकल्या आहेत. भाजपाला ९२ जागी पराभूत केलेल्या इतर पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, भारत आदिवासी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनिस्ट), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये भाजपाने विजय संपादन केलेल्या ३०३ जागांमधील ७७ जागा या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या होत्या. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये या ७७ पैकी फक्त ४८ जागांवर भाजपाला पुन्हा विजय प्राप्त करता आला आहे. उर्वरित २९ जागा विरोधकांनी भाजपाकडून हिरावून घेतल्या आहेत. भाजपाने ९२ जागा गमावल्या असल्या तरीही ३२ नव्या मतदारसंघांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. या नव्या ३२ जागा ११ राज्यांमध्ये मिळाल्या आहेत. या जागांच्या जोरावरच भाजपाला २४० चा आकडा गाठता आला. या ३२ पैकी सर्वाधिक १२ जागा ओडिशा या राज्याने दिल्या आहेत. तेलंगणा- चार, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यात प्रत्येकी तीन, पश्चिम बंगाल- दोन; तर बिहार, दादरा व नगर हवेली, छत्तीसगड, अंदमान व निकोबार द्वीप, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांत प्रत्येकी एक अशा एकूण ३२ नव्या जागी भाजपा विजयी ठरली आहे. या ३२ पैकी फक्त तीन जागा अनुसूचित जातींसाठी; तर पाच जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव होत्या.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.