Saturday 23 June 2018

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर ; 16 जुलैला निवडणूक

रामराजे नाईक निंबाळकर आणि माणिकराव ठाकरे यांचे सभापती, उपसभापती पद अडचणीत 


महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडील विधानपरिषदेतली सभापती पदावर गंडांतर येण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचे उपसभापतीपदही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. भाजपचे भाई गिरकर, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, माथाडी नेते नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, रासपचे महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणार्‍या जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. 


या निवडणुकीत निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीचे 7 सदस्य निवृत्त होत असताना संख्याबळ पहाता दोघांचे मिळून तीनच सदस्य निवडून जाणार आहेत. त्यातच शेकापचे जयंत पाटीलही काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडेच उमेदवारी मागू शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षातील विद्यमान सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. राष्ट्रीवादीतून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची स्पष्ट शक्यता असल्याने जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत यांचा पत्ता कट होणार आहे. नरेंद्र पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्येही विधानपरिषदेचे उपसभापती असलेल्या माणिकराव ठाकरे यांची वर्णी निश्‍चित आहे. शरद रणपिसे, संजय दत्त यांचा पत्ता कापला जाणार आहे. शिवसेनेचे अनिल परब यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. तसेच शिवसेनेचा आणखी एक सदस्य सहज निवडून येऊ शकतो. भाजपचे चार ते पाच सदस्य विधानपरिषदेवर पोहचू शकतात. भाजपला महादेव जानकर यांना तिकीट द्यावे लागणार आहे. उर्वरित जागांसाठी भाजपमध्ये स्पर्धा रंगणार आहे. सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्या खालोखाल काँग्रेसचं संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपा विधानपरिषदेत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र 16 जुलैच्या निवडणुकीनंतर भाजपा विधानपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार असल्यानं काँग्रेस सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. सध्या विधानपरिषदेतील कमी संख्याबळामुळे सत्ताधारी भाजपाला अनेकदा विरोधकांच्या आक्रमकपणाला तोंड द्यावं लागतं. पण हे चित्र बदलण्याची संधी 16 जुलैच्या या निवडणुकीमुळे भाजपाला मिळणार आहे.


या सदस्यांचा कार्यकाळ संपणार

काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.


राजकीय पक्षाप्रमाणे निवृत्त संख्या-

राष्ट्रवादी - 3
काँग्रेस - 4
भाजप - 2 (रासप -1)
शिवसेना - 1
शेकाप - 1


संख्याबळा नुसार राजकीय पक्षाप्रमाणे निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या - 

(निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता) 
राष्ट्रवादी + काँग्रेस - 3
भाजप - 5 (रासप -1)
शिवसेना - 2
शेकाप - 1 (राष्ट्रवादी+काँग्रेस व इतरांनी पाठींबा दिला तर)


विधानपरिषद सध्याचे संख्याबळ-

राष्ट्रवादी काँग्रेस - 21
काँग्रेस - 19
भाजप - 18
शिवसेना - 9
जेडीयू - 1
शेकाप - 1
अपक्ष - 6
पीपल्स रिपब्लिकन पक्ष - 1


विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम-

28 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 5 जुलै उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून, 6 जुलैला छाननी करण्यात येईल. 9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल. विधानसभेचे आमदार यासाठी मतदान करणार आहेत.

28 जूनला नॉटिफिकेशन
अर्ज भरण्याची अंतिम मुदत : 5 जुलै
अर्जाची पडताळणी : 6 जुलै
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 जुलै
मतदान : 16 जुलै (स. 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत)
मतमोजणी : 16 जुलै (सायंकाळी 5 वाजेनंतर)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.