पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक - 2020 ; पुण्याच्या मतदारांवर उमेदवारांची भिस्त
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांमध्ये अनुक्रमे चार लाख २६ हजार २५७ आणि ७२ हजार ५४५ मतदार मतदार झाले आहेत. दोन्ही मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार पुण्यातील असल्याने त्यांच्यावर सर्वच उमेदवारांची मदार अवलंबून आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मतदारांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांनी दाखल केलेले अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पदवीधर मतदारसंघात मतदारांची संख्या चार लाख २६ हजार २५७ झाली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार पुण्यातील असून, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ८९ हजार ५२९ आहेत. त्यानंतर सांगलीतील मतदारांची संख्या ८७ हजार २३३ झाली आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात ५९ हजार ७१ आणि सोलापूरमध्ये ५३ हजार ८१३ मतदारांनी नोंदणी केली आहे. पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि जनता दल सेक्युलरचे शरद पाटील हे तीनही उमेदवार सांगलीतील आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे उमेदवारांची मदार पुण्यावर अवलंबून असणार आहे; तसेच कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्यावर या उमेदवारांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शिक्षक मतदारसंघाचा निकालही पुण्यावर अवलंबून आहे. पुणे जिल्ह्यातील ३२ हजार २०१ मतदारांनी नावनोंदणी केली आहे. त्याखालोखाल सोलापूरमध्ये १३ हजार ५८४ आणि कोल्हापूरमध्ये १२ हजार २३७ मतदार आहेत. साताऱ्यात सात हजार ७११ आणि सर्वांत कमी सांगलीत सहा हजार ८१२ मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार सोलापूरमधील आहेत. काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर कोल्हापूरचे आहेत. 'मनसे'चे विद्यानंद मानकर आणि अपक्ष उमेदवार संतोष फाजगे पुण्यामधील उमेदवार आहे. या सर्व उमेदवारांची भिस्त पुण्यावर आहे. पुण्यातून सर्वाधिक मते घेणारा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुणेकर ठरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत सूचना जाहीर
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्यात आल्या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. त्यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्येय्य साध्य करण्यासाठी निवडणूक यंत्रणा कटीबद्ध आहे. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे नुकतेच पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव, पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक डॉ. निलीमा केरकेटा, शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर येथील उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उप विभागीय अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. निवडणूक कार्यक्रम- अधिसूचना प्रसिद्धी दिनांक 5.11.2020, नामनिर्देशन पत्र दाखल करणे दिनांक 12.11.20 पर्यंत, नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 13.11.2020, नामनिर्देशन पत्र मागे घेणे दिनांक 17.11.2020, मतदान दिनांक 1.12.20 आणि मतमोजणी दिनांक 3.12.2020 असा आहे. या निवडणुकीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपायुक्त (सर्वसाधारण) संजयसिंह चव्हाण, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून खादी व ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलीमा केरकेटा या पदवीधर मतदार संघासाठी तर श्रीकांत देशपांडे हे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडतील. निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये- मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर चिन्ह छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात १ पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा हिंदुस्थानी घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही हिंदुस्थानी भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत. मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळया स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा असतो. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या 11 सप्टेंबर 2018 च्या निर्देशानुसार राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा (NOTA- None Of The Above) हा पर्याय वगळण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे – 1) निवडणूक साहित्य स्वीकृती व तपासणी 2) मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी 3) प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीची कामे 4) मतदानास प्रत्यक्ष सुरूवात व मतदान केंद्राध्यक्ष / कर्मचारी यांची कामे 5) मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही 6) महत्त्वाचे अहवाल/नमुने 7) मतदान साहित्य परत करणे, मतदान साहित्य तपासणी- तिसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी आपली नियुक्ती ज्या मतदान केंद्रावर करण्यात आली आहे, त्या मतदान केंद्राचे साहित्य आपणास संकलन केंद्रावरुन देण्यात येईल. त्या ठिकाणावरुन आपण साहित्य प्राप्त करुन घ्यावे. प्राप्त साहित्य आपणास पुरविलेल्या यादीप्रमाणे योग्य व पुरेशा प्रमाणात असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच दोषपूर्ण व कमी असलेले साहित्य संकलन केंद्रावरील नेमून दिलेल्या कक्षातून बदलून / प्राप्त करून घ्यावे. मतदान प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले व मतदान केंद्रासाठी विशेषत्वाने नेमून दिलेले साहित्य काळजीपूर्वक तपासून घ्यावे. यामध्ये मतपेटी, मतपत्रिका, चिन्हांकित मतदार यादी, मतदार यादीची दुसरी प्रत, हिरवे पेपर सिल, विभेदक चिन्ह, पक्की शाई, जांभळ्या शाईचा स्केच पेन, कायद्याने विहित केलेले सर्व नमुने, लाख इत्यादी तपासून घेणे. मतदार यादी, विभेदक चिन्ह, ग्रीन पेपर सील यावर आपणास नेमून दिलेले मतदान केंद्र सुस्पष्ट नमूद असल्याची खात्री करावी. सर्व साहित्य बरोबर असल्याची व आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचीच असल्याची पुन्हा खात्री करून घ्यावी. मतपेटी सुस्थितीत व स्वच्छ असल्याची खात्री करणे. सर्व कळा/खटके (Hinges/Spring/ Mechanical Parts) कार्यरत असल्याची व मतपेटी व्यवस्थित बंद होत असल्याची खात्री करावी. पदवीधर मतदार संघासाठी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग पांढऱ्याच रंगाचे असतील. शिक्षक मतदार संघासाठी मतपत्रिका गुलाबी रंगाच्या असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग गुलाबी रंगाचे असतील. कोविड-19 (कोरोना)च्या प्रादुर्भावामध्ये निवडणूक घेतांना मतदान केंद्रावर आवश्यक त्या दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांच्यासाठी मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, ग्लोज पुरविले जातील. त्याचा वापर करावा. मतदानाच्या आदल्या दिवशी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घेणे अनिवार्य आहे. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी मतदारांना जास्त वेळ रांगेत ताटकळत राहू लागू नये म्हणून त्यांना टोकण वितरण करण्यासाठी मदत कक्ष (हेल्प डेस्क) राहील. त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. मतदान केंद्रावरील रांगेमधील मतदारांना रांगेत सामाजिक अंतर ठेवणे सुलभ जावे तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदार, पुरुष मतदार आणि स्त्री मतदार यासाठी मतदान केंद्रावर तीन स्वतंत्र रांगा व दोन व्यक्तीमधील सामाजिक अंतर 6 फुटाचे ठेवण्यासाठी या स्वतंत्र रांगेमध्ये 6 फुटाच्या अंतरावर चुना पावडरच्या सहाय्याने 15 ते 20 गोल वर्तुळे चिन्हांकित करावीत. ही कार्यवाही मतदान केंद्राच्या समोरील जागेतील जागा उपलब्धतेप्रमाणे करावी. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये किंवा परिसरात पुरुष व स्त्री मतदारासाठी दोन स्वतंत्र खोल्या प्रतीक्षा कक्ष म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात याव्यात. ज्यामध्ये खुर्ची, सतरंजी व इतर व्यवस्था ठेवण्यात येईल. मतदान केंद्रावर हात स्वच्छ करण्यासाठी मतदान केंद्राच्या येण्या-जाण्याच्या ठिकाणी साबण/हॅण्डवॉश व पाणी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. मतदान केंद्रामध्ये येण्या-जाण्याच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवले जाईल. आपल्याकडील साहित्यामधील कोविड-19 च्या प्रादुर्भाव संबंधाने जनजागृती बाबतचे भित्तीपत्रक मतदान केंद्राच्या परिसरात दर्शनी भागात लावले जातील. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था सामाजिक अंतराच्या निकषाप्रमाणे केंद्राध्यक्षांनी करून घ्यावी. मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यावर त्या मतदाराकडे मास्क नसल्यास त्यास मास्क पुरविण्यात यावा. मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत थर्मल स्कॅनरच्या सहाय्याने तापमान तपासणी करावी. थर्मल स्कॅनरच्या तपासणीमध्ये मतदाराचे तापमान आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे म्हणजे 98.6 फॅरनहिट किंवा 37 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आढळल्यास अशा मतदाराचे तापमान पुन्हा दोनदा तपासण्यात यावे. संबंधिताचे तापमान पुन्हा 18.60F किंवा ३७०C पेक्षा अधिक दिसून आल्यास संबंधित मतदारास टोकण / प्रमाणपत्र देऊन त्यास मतदानासाठीच्या शेवटच्या तासात मतदानासाठी येण्यास सांगावे. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये अशा मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी सुविधा पुरविण्यात यावी. मतदाराची ओळख पटविण्याबाबत कार्यवाही करताना आवश्यकता असल्यास चेहऱ्यावरील मास्क खाली घेण्यासाठी सांगण्यात येईल. अलगीकरणातील कोविड-१९च्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणामध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोरपणे पालन करून मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये मतदान नोंदविण्यासाठी अनुमती द्यावी. क्षेत्रिय अधिकारी या संबंधाने त्यांच्या क्षेत्रातील मतदान केंद्राच्या बाबतीत आवश्यक समन्वय ठेवतील. मतदान प्रतिनिधीच्या तपासणी नंतर तापमान विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास त्यास बदली प्रतिनिधी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी व त्याप्रमाणे अभिलेख्यात त्याची नोंद घ्यावी. मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी- मतदान केंद्रावर पोहोचणे- आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य तपासून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. आपल्या मतदान केंद्रासाठी नियोजित वाहतूक आराखड्यानुसार पथकातील सर्व सदस्य, पोलीस कर्मचारी व साहित्य घेऊन नेमून दिलेल्या वाहनाद्वारे दि. 30.11.2020 रोजी मतदान केंद्रावर जावयाचे आहे. आपण मतदान केंद्रावर सर्व साहित्यानिशी सुखरूप पोहचल्याचा अहवाल क्षेत्रिय अधिकाऱ्यांना त्याच दिवशी द्यावयाचा आहे. मतदान केंद्रावर एक दिवस मुक्काम असल्यामुळे आवश्यक वैयक्तिक साहित्य सोबत ठेवावे. गरम पाण्याची वाफ घेण्यासाठी आवश्यक असणारे उपकरणही सोबत ठेवता येईल. मतदान केंद्रावर आपणांस स्थानिक कर्मचाऱ्यांचे सहाय्य देण्यात येईल. त्यांची आवश्यक ती मदत घ्यावी. मतदान केंद्रापासून २०० मीटरचे अंतर चुना फक्कीने चिन्हांकित करावे. मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत काही प्रचार साहित्य असल्यास ते काढून टाकावे. मतदान केंद्रावर पोहोचल्याबाबतचा अहवाल क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे देणे. प्राप्त साहित्य तपासून घेणे. मतपेट्या सहज हाताळता येतात का हे पाहणे, साहित्य कमी असल्यास क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेणे. मतदान केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा घोषणा किंवा चिन्ह असल्यास ते काढून टाकणे किंवा झाकून टाकणे, वर्तमानपत्रांनी ते झाकले असल्यास वर्तमानपत्र उलट्या बाजूने लावण्यात यावे. आवश्यक फर्निचर उपलब्धता- टेबल व साहित्याची व्यवस्थित रचना करणे. सूचना फलक तयार करणे, ज्यावर मतदान केंद्राचा तपशील व व्याप्ती (पोलींग एरिया), खोट्या मतदानाबाबत इशारा, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नमुना 7 ब मधील यादी, मतदारांना मत नोंदवण्याबाबतच्या सूचना, कोवीड- 19 बाबत जागृती फलक, धूम्रपान मनाई इशारा, मतदान केंद्राच्या समोर दर्शनी भागात प्रदर्शित करावे. मतदान केंद्राबाहेर 100 मीटर व 200 मीटर चुना पावडरने मार्किंग करून घेणे. 100 मीटरच्या आतील प्रचार साहित्य / फोटो इत्यादी काढणे. उमेदवाराचे तंबू / बुथ 200 मीटरच्या हद्दीबाहेर असल्याची खात्री करुन घेणे. प्रवेश, बाहेर, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान प्रतिनिधी, मतदान कक्ष इत्यादी फलक मतदान केंद्रात योग्य ठिकाणी लावावेत. मतदान केंद्राच्या बाहेर पुरुष, स्त्री, दिव्यांग / ज्येष्ठ नागरिक मतदार यांच्यासाठी तीन स्वतंत्र रांगांची आखणी करुन त्यामध्ये सामाजिक अंतरासाठी 6 फुटावर चुना पावडरच्या साह्याने गोल वर्तुळाची आखणी करणे. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था- प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल. आपल्या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आपणांस मतदान केंद्रावर जावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या वेळी मतदान केंद्रामध्ये प्रवेश असणार नाही. नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लावणे, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात तोतयेगिरी वा निवडणूक प्रचार होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्झर्व्हर) नियुक्त असतील व ते ऑब्झर्व्हर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेवर जवळून लक्ष ठेवतील. तथापि, ते निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाहीत. अशा मतदान केंद्राला झोनल अधिकारी, पोलिस फिरते पथक वारंवार भेटी देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना त्यांची मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी व मतदान केंद्र माहीत होण्यासाठी मतदार सहायता कक्ष उभारण्यात येईल. मतदार सहायता कक्ष मतदान केंद्राच्या बाहेर आवश्यक कर्मचारी व साहित्यासह तयार करण्यात येईल. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्ये -तुमच्या मतदान पथकातील व्यक्तींशी तुम्ही परिचय करुन घेतला पाहिजे आणि मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती झाल्यापासूनच तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली पाहिजे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या संबंधातील सर्व सूचना तुम्ही स्वतः जवळ तयार ठेवल्या पाहिजे. तुमचे मतदान केंद्र कोठे आहे व तेथे जाण्या-येण्याचा मार्ग कोणता आहे, यासंबंधी तुम्हाला स्पष्ट कल्पना असावयास हवी. तुम्ही सर्व प्रशिक्षणाच्या वर्गाला न चुकता हजर राहिले पाहिजे. निवडणुकीसंबंधीचे साहित्य ताब्यात घेतांना आपणास सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत, याची तुम्ही खात्री करुन घेतली पाहिजे. मतपत्रिका, मतपेट्या, पेपर सील, मतदार यादीची चिन्हांकीत प्रत व दुसरी प्रत, मतदारासाठी जांभळ्या शाईचे स्केच पेन (Violet Colour SketchPen) विभेदक चिन्ह, कायद्याने विहित केलेले नमुने (Forms), लाख आणि पक्की शाई या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मतदान केंद्रावर आल्यावर, मतदान गुप्त राखले जाईल अशा रितीने मतदान केंद्राची उभारणी करणे, मतदारांना सामाजिक अंतर ठेऊन व्यवस्थित रांगेने उभे करुन त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, मतदानाचे कामकाज बाहेरील हस्तक्षेपापासून मुक्त ठेवणे यासाठी काय व्यवस्था करावयाची याची तुम्हाला स्पष्ट कल्पना असली पाहिजे. प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूवर मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची पूर्ण स्वाक्षरी करावयाची आहे. परंतु स्वाक्षरी स्थळप्रतीवर असता कामा नये. निश्चित केलेल्या वेळी मतदानास प्रारंभ करता यावा म्हणून काही मतपत्रिकांवर मागील बाजूस आगाऊ स्वाक्षऱ्या करुन ठेवाव्यात. प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूवर तसेच तिच्या स्थळप्रतीवर तुम्हास देण्यात आलेल्या रबरी शिक्क्याने तुमच्या मतदान केंद्राचे विभेदक चिन्हसुद्धा उमटविणे आवश्यक आहे. मतदारांच्या बोटावरील पक्की शाई सुकलेली आहे आणि बोटावर स्पष्ट व पक्की खूण झालेली आहे, याची खात्री करुन घेण्यासाठी मतदार हा मतदान केंद्र सोडून जाण्यापूर्वी शेवटच्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीची / मधल्या बोटाची परत तपासणी करणे इष्ट ठरेल. ज्या मतदाराला मतपत्रिका देण्यात आली आहे त्याने ताकीद मिळाल्यावरही मतदान केंद्रावर मतदान गुप्त राखण्यासंबंधातील कार्यपध्दतीचे पालन करण्यास नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका त्याने मत नोंदवलेले असो किंवा नसो तुम्ही किंवा तुमच्या सांगण्यानुसार मतदान अधिकाऱ्याने परत घ्यावी व त्यानंतर ती रद्द ठरवावी. मतदान सुरु होण्याच्या वेळी व मतदान संपल्यानंतर तुम्ही काही प्रतिज्ञापत्र भरावयाची असून त्यावर मतदान केंद्रात हजर असलेल्या मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावयाची आहे. तुम्हास देण्यात आलेल्या व अनुक्रमांकित असलेल्या मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीमध्ये संबंधित घटनांची नोंद त्या जशा घडतील त्या क्रमांकानुसार घ्यावयाची आहे. मतदान शांततेने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तुम्हाला मतदान केंद्रातील कामकाजाचे नियमन करावे लागेल. यासाठी तुम्हाला हिंमतीने तर वागावे लागेलच शिवाय तुम्ही स्वतः खंबीर व निःपक्षपाती असले पाहिजे. मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रात प्रत्येक उमेदवाराचा जो मतदान प्रतिनिधी हजर असेल त्याला मतपत्रिकांच्या हिशोबाच्या अधिप्रमाणित प्रती तुम्ही देणे आवश्यक आहे. निरनिराळ्या लिफाफ्यात निवडणूकविषयक कागदपत्रे मोहोरबंद करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे म्हणजे ज्या चुका पुढे सुधारता येणार नाहीत व टाळता येण्याजोग्या आहेत, अशा कोणत्याही चुका होणार नाहीत. मतदानानंतर मतपेट्या व इतर निवडणूक विषयक साहित्य नियोजित ठिकाणी रितसर पावती घेवून संबंधितांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी तुमची राहील. (मतदान अधिकारी यांची कामे) पहिला मतदान अधिकारी-मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यावर मतदार हा सर्वप्रथम थेट पहिल्या मतदान अधिकारी यांच्याकडे जाईल. मतदारास उमेदवार किंवा प्रतिनिधी यांच्याकडून अनौपचारिक ओळखपत्र चिठ्ठी दिली जाते (ओळखपत्र चिठ्ठी – साध्या पांढऱ्या कागदावर मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव नमूद असते. (परंतु राजकीय पक्षाचे नाव / उमेदवाराचे नाव नमूद नसावे) ओळखपत्र चिठ्ठीवरून मतदार यादीची चिन्हांकित प्रत पाहून मतदाराची ओळख पटविणे. निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्यासाठी दिलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मतदार दर्शवील त्यावरुन ओळख पटविण्याची कार्यवाही हा अधिकारी पूर्ण करेल. मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक आणि मतदाराचे नाव मतदान प्रतिनिधी व दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यास ऐकू जाईल एवढया मोठ्याने वाचून दाखवील. पुरुष मतदार असल्यास मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतिमध्ये त्याच्या नावाखाली अधोरेखीत करेल. स्त्री मतदार असल्यास मतदाराच्या नावाखाली अधोरेखीत करुन मतदाराच्या नावाच्या डाव्या बाजूला बरोबरची (ü) अशी खूण करेल.फोटो ओळखपत्र (एपिक) नसलेल्या मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक इतर पुरावे- 1)आधार कार्ड 2) ड्रायव्हींग लायसन्स 3) आयकर ओळखपत्र (पॅनकार्ड ) 4)पासपोर्ट (पारपत्र) 5) केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था किंवा औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवाचे ओळखपत्र 6) खासदार/विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर / शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर / शिक्षक मतदारांना वितरीत केलेले ओळखपत्र 8) विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र, टीप-ज्या मतदारांना निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे, त्यांनी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, असे ओळखपत्र सादर न करु शकणाऱ्या मतदारांनी वरीलपैकी एक पर्यायी फोटो ओळखपत्र त्यांची ओळख देण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे. (निवडणूक आयोगाच्या दि.10/11/2020 रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशांप्रमाणे पहिला मतदान अधिकारी-पक्की शाई लावण्याची रीत-मतदाराची ओळख पटविल्यानंतर पदवीधर मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे हे पहिल्या मतदार अधिकाऱ्याचे प्रमुख काम राहील. (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या दि. 9 नोव्हेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशांप्रमाणे मतदारास डाव्या हातावर बोटे नसतील तर पदवीधर मतदारसंघाकरीता मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे. पक्की शाई लावल्यानंतर पहिला मतदान अधिकारी मतदारास मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे जाण्यास सांगेल. दुसरा मतदान अधिकारी – दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे मतपत्रिकेचे गठ्ठे असतील. पदवीधर मतदारसंघासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल तर शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मोठ्याने वाचून दाखवलेला मतदाराचा मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर नोंदवून घेईल. मतपत्रिका स्थळ प्रतिपासून वेगळी करुन मतदारास देईल आणि त्याला मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे जाण्यास सांगेल. कोणत्याही मतदान प्रतिनिधीस मतपत्रिकेवरील अनुक्रमांकाची नोंद घेण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. यामुळे मतदान प्रक्रियेचा भंग होतो. मतदारास मतपत्रिका देणे- मतदाराला मतपत्रिका मत नोंदविण्यासाठी देण्यापूर्वी मतपत्रिकेच्या पाठीमागे स्थळ प्रतिवर व मतपत्रिकेवर उजव्या कोपऱ्यात विभेदक चिन्ह उमटवून मतपत्रिकेवरील विभेदक चिन्हाच्या खाली केंद्राध्यक्ष स्वाक्षरी करील. मतदाराला मतपत्रिका देण्यापूर्वी संबंधित मतदान अधिकारी चिन्हांकित मतदार यादीतील मतदाराचा मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक स्थळ प्रतीवर लिहील व त्यावर त्याची स्वाक्षरी घेईल. तिसरा मतदान अधिकारी –तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जांभळ्या शाईचे स्केचपेन व ढकल पट्टी असेल. तिसरा मतदान अधिकारी मतदाराकडून मतपत्रिका घेईल व मतपत्रिकेच्या मागच्या बाजूस वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर उमटवलेले विभेदक चिन्ह स्पष्ट दिसेल अशी मतपत्रिकेची उभी घडी व नंतर आडवी घडी अशी दोन वेळा घडी करील. त्यानंतर मतपत्रिकेची घडी उलगडून मतदारास देईल व मत नोंदवल्यानंतर परत त्याचप्रमाणे घडी करण्यास मतदारास सांगेल. मतपत्रिकेवर मत नोंदविण्याबाबत सूचना – मत नोंदविण्यासाठी मतदारास जांभळा स्केच पेन देवून मतदान कक्षात जाण्यास सांगेल. मतदान कक्षात मतदार ज्या उमेदवारास मत देऊ इच्छित असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनने फक्त एकाच अंकात पसंती क्रमांक दर्शवावा. पसंती क्रमांक फक्त अंकातच द्यावयाचा आहे. तसेच पसंतीचे अंक मराठी, इंग्रजी, रोमन किंवा हिंदुस्थानी घटनेच्या आठव्या अनुसूचीमधील कोणत्याही एका भाषेतील अंकात नमूद करावयाचे आहे. (उदा. रोमन-I, II, III, मराठी 1,2,3, – इंग्रजी 1, 2, 3). मतपत्रिकेवर एकापेक्षा अधिक उमेदवाराच्या नांवासमोरील रकान्यात एकसारखा पसंती क्रमांक देता येणार नाही. मतदारास पसंतीनुसार निवडणुकीस उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या नावासमोर पसंतीचे आकडे लिहिलेल्या आकड्यापैकी एक अंक येईल. मतपत्रिकेवर पसंती क्रमांक व्यतिरिक्त इतर कोणताही मजकूर लिहू नये. मतदाराने मतपत्रिकेवर मतदान नोंदविल्यावर पूर्वीच्या घडीवर त्या मतपत्रिकेची घडी घालावी. त्यानंतर घडी केलेली मतपत्रिका मतदान कक्षातून बाहेर आणावी आणि मतपेटीत टाकावी. मतदार ही घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकेल व स्केच पेन तेथेच ठेवेल. मतदाराने खऱ्या मतपत्रिकेशिवाय इतर कोणतीही वस्तू अथवा कागद मतपत्रिकेत टाकता कामा नये, यासाठी मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्ह व केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी दिसेल अशा रितीने घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकण्याची प्रत्येक मतदाराला वेळोवळी सूचना देईल. यासाठी प्रत्येक मतदार मतपेटीमध्ये घडी केलेली मतपत्रिका टाकताना दक्ष राहून लक्ष ठेवील. मतपत्रिका मतपेटीत टाकल्यानंतर मतदार मतदान केंद्रातून बाहेर जाण्यापूर्वी त्याच्या बोटावरील पक्क्या शाईची खूण स्पष्टपणे उमटली असल्याची तसेच बोटावरील शाई पुसली नसल्याची खात्री करेल. मतदान सुरु करण्यापूर्वीची तयारी – 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान सुरुवात करण्यापूर्वी किमान 45 मिनिटे अगोदर म्हणजे सकाळी 7.15 वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यावर हजर होणे आवश्यक आहे.
पदवीधर मतदारसंघ
जिल्हा - मतदारसंख्या
पुणे - एक लाख ३६ हजार ६११
कोल्हापूर - ८९ हजार ५२९
सांगली - ८७ हजार २३३
सातारा - ५९ हजार ७१
सोलापूर - ५३ हजार ८१३
एकूण - चार लाख २६ हजार २५७
शिक्षक मतदारसंघ
जिल्हा - मतदारसंख्या
पुणे - ३२ हजार २०१
सोलापूर - १३ हजार ५८४
कोल्हापूर - १२ हजार २३७
सातारा - सात हजार ७११
सांगली - सहा हजार ८१२
एकूण - ७२ हजार ५४५
पुण्यात पुरवणी यादीच्या रूपाने पदवीधर- ८३ हजार ७६२ तर शिक्षक- १३ हजार ८१५ मतदारांची भर
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील चुरस वाढल्याने राजकीय पक्षांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव केल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघांमध्ये ९७ हजार ५७७ मतदार वाढले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत दाखल केलेले ऑनलाइन अर्ज मंजूर झाल्याने पदवीधर मतदारसंघात ८३ हजार ७६२ आणि शिक्षक मतदारसंघामध्ये १३ हजार ८१५ मतदारांची भर पडली आहे. या दोन्ही मतदारसंघांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी आलेल्या अर्जांमुळे पुण्यात पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ३६ हजार ६११ आणि शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण ३२ हजार २०१ मतदार झाल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार पदवीधर मतदारसंघामध्ये ५२ हजार ८४९ आणि शिक्षक मतदार संघामध्ये १८ हजार ३८६ मतदारांची नोंदणी झाली होती. राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी केलेल्या धावपळीमुळे सुमारे ९७ हजार ५७७ मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही मतदार संघांची निवडणूक जून महिन्यात होणार होती. मात्र, करोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली. डिसेंबर २०१९मध्ये दोन्ही मतदारसंघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. एक जानेवारी २०२० पासून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. संबंधित मतदारांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यात आल्याने राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी जोर लावला. त्यामुळे दोन्ही मतदार संघांमध्ये ९७ हजार ५७७ मतदार वाढले आहेत.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.