ईडीच्या कारवाईने राज्याच्या राजकारणात खळबळ
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. त्यांच्या 10 पेक्षा जास्त ठिकाणांवर ईडीने कारवाई सुरू केली. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवास्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकली. आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग आणि पुर्वेश यांच्या घरी आणि प्रताप सरनाईक यांच्या व्यावसायिक कार्यालयावरही ईडीने धाड टाकली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव युवासेना सचिव पूर्वे़श सरनाईक हे भाजपचे आमदार आणि गृहराज्य मंत्री रणजित पाटिल यांचे जावई आहेत तर सरनाईक यांचे दुसरे चिरंजीव विहंग सरनाईक यांनी दक्षिण मुंबईतील पारसी समाजातील असलेल्या अनाहिता पगडीवाला यांच्याशी विवाहबद्ध झालेले आहेत. त्यांचा विवाह उभयतांचा समान (कॉमन) मित्राच्या ओळखीतील संबंधातून ठरलेला आहे. दरम्यान सेनाप्रमुख ठाकरे यांच्या घराण्याशी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटचा संबध असल्याने ही कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी विधानसभा निवडणुक- 2019 मध्ये जाहीर केलेली संपत्ती 143 कोटी 97 लाख 18 हजार 745 आहे तर विधानसभा निवडणुक- 2014 मध्ये जाहीर केलेली संपत्ती 25 कोटी 08 लाख 53 हजार 190 इतकी होती. त्यांच्या संपत्तीत 5 वर्षात 474 टक्के (118 कोटी 88 लाख 65 हजार 555 इतकी) भरघोस वाढ झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान आ.प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक गेले त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाले आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचे स्वागत केले आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून केली होती राजकारणाला सुरुवात
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात केली होती. रिक्षाचालक ते सक्रिय राजकारणी असा त्यांचा जीवनप्रवास आहे. विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत. यासोबतच घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी आहे. यामध्ये स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा विविध सोयी आहेत. प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्ध्यामध्ये झाला. ते 65 वर्षांचे आहेत. लहानपणीच ते वर्ध्यामधून मुंबईत स्थाइक झाले. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबवली पूर्वेतील एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतले.शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरनाईकांनी काही काळ रिक्षाही चालवली. यानंतर त्यांनी 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्तव घेत सक्रीय राजकारणात उडी घेतली. 1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. 2008 मध्ये सरनाईकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले. प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदार आहेत. प्रताप सरनाईकांना दोन मुलं आहेत. यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग तर धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे जवळचे संबंधत आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. तर युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. तर पूर्वेश यांच्या पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत.
राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक- खासदार शरद पवार
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,' अशी टीका खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत; खासदार नारायण राणेंची टीका
सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु- खासदार संजय राऊत
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 'ईडीने भाजपा कार्यालयात शाखा उघडली असावी. पण आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,' असे जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे. 'काही झाले तरी आमचे हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचे सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,' असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 'प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये' अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?- काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत
सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर झालेल्या कारवाईवर काँग्रेसने भूमिका मांडत 'गेल्या सहा वर्षात एकातरी भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?,' असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 'विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपा असे घाणेरडे डाव खेळत आहे. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या ६ वर्षात भाजपा नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपावाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?', असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत. सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपाचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजपा जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपामध्ये घेतले', असे म्हणत सावंत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष सुरळीत चालणार!- मंत्री छगन भुजबळ
महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली की,' सेना नेते आमदार प्रताप सरनाईक हे अतिशय चांगले काम करत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. पण असे विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे नेते कदाचित काहींच्या डोळ्यात खुपताना दिसत आहेत, म्हणून हा राजकीय सूडाचा प्रकार घडतोय. ईडी हे केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं झाल्याचे दिसतंय. पण कोणतंही आणि कितीही दडपण आणले गेले तरीही एक लक्षात ठेवा, हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष आणि त्यापुढेही सुरळीत चालणार! असे ते म्हणाले.
चूक नसेल तर घाबरण्याचे कारण नाही – विरोधीपक्ष नेते फडणवीस
'ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल,' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.