Wednesday 7 February 2024

Sugar Factory Election 2024 बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतही रंगत!

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 9 मार्चला निवडणूक



पूर्व हवेलीतील बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतही रंगत आली असून अनेक इच्छुक उमेदवारी दाखल करण्यासाठी सरसावले आहेत. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या सोमवार (दि. 5) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर, आवश्यकता असेल, तर ‘यशवंत’च्या निवडणुकीसाठी 9 मार्च रोजी मतदान घेतले जाणार आहे. 

राज्य सहकारी निवडणूक प्रान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले असून, सहकार उपनिबंधक डॉ. शीतल पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याची अंतिम मतदार यादी 17 जानेवारी 2024 रोजी अंतिम करण्यात आलेली आहे.  

शिवाजीनगर येथील साखर संकुल येथील चौथ्या मजल्यावरील सभागृह हे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कार्यालय असणार आहे. उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करता येतील. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील आणि 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत ते दाखल करून घेतले जाणार आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारी अर्ज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता घोषित केले जातील, तर 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.

अंतिम उमेदवारी अर्ज 28 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होऊन पात्र उमेदवारांना निशाणी वाटप केले जाणार आहे. तर, आवश्यकता असेल तर 9 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान स्थळ नंतर कळविण्यात येणार आहे. तर, 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येईल.

मुंबई उच्च न्यायालयातील दाखल याचिका क्रमांक ४७६२ दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजीचा आदेश आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या ११ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये यशवंत कारखान्याच्या प्राथमिक मतदार यादी नंतर अंतिम यादी तयार करण्यात आली. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी आणि संस्था सभासद मिळून एकूण २१ हजार ४१४ सभासदांचा प्राथमिक यादीत समावेश आहे.

याचिकाकर्त्यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार तात्पुरत्या मतदार यादीवर आक्षेप घेतला होता. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विचार करून दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी हरकती नाकारल्या, त्यामुळे, याबाबत चौकशी होत नसल्याबाबत याचिकाकर्त्यांचा आक्षेप गैरलागू आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (निवडणूक) नियम २०१४ च्या नियम ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्या निर्णयाला आव्हान न देता सोसायटीकडून मृत सदस्यांबाबत उपाययोजना होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केलेली मागणी अवाजवी असल्याचे न्यायालयाने म्हंटले होते. 

राज्य सहकारी निवडणूक असली तरी प्राधिकरणाने आपली अधिसूचना २६/१२/२०२३ रोजी प्रसिद्ध केली, आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये विवेकाधीन अधिकारक्षेत्राचा वापर या टप्प्यावर करणे योग्य वाटत नाही त्यामुळे उपरोक्त कारणांमुळे रिट याचिका फेटाळत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हंटले होते.

या निवडणुकीच्या निमित्ताने लोणी काळभोर येथील सहकारातील दोन कडव्या विरोधी गटांचे मनोमिलन झाले असून अशोक काळभोर व माधव काळभोर हे गेल्या चाळीस वर्षांपासून राजकीय विरोधक होते. ते आता या निवडणुका एकत्र लढणार आहेत. सहकारातील तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक काळभोर यांचे चिरंजीव सागर काळभोर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. तर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर म्हणाले की, अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून आम्ही मनापासून एकत्र आलो आहोत. या पुढील सर्व निवडणुका एकत्रित विचारविनिमय करून समान न्याय भावनेने काम करणार आहोत. या पुढील काळातही गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेणार आहोत.

दरम्यान लोकनेते अण्णासाहेब मगर आणि पू. मणिभाई देसाई यांच्या पुढाकारातून यशवंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1968 साली करण्यात आली. थेऊर व हवेलीच्या पूर्व भागात या कारखान्यामुळे गतवैभव प्राप्त झाले होते. कारखान्याच्या स्थापनेनंतर सलग 2009 पर्यंत वैभवाचे दिवस होते मात्र कालांतराने स्वार्थी प्रवृत्तीच्या आर्थिक राजकारणाने शिरकाव केला त्याचा परिणामामुळे चांगल्या स्थितीतील कारखान्याचा ऱ्हासानंतर व्यवस्था कोलमडून पडल्याने 2011 पासून पूर्णतः बंद अवस्थेत कारखाना उभा आहे.

शहरीकरणामुळे शेती नाहीशी होऊन वसाहतीला चालना मिळाली आणि कारखान्याच्या जागेवर सर्वांकडून मोह झडला. कारखान्याच्या मालकीची 248 एकर शेतजमीन आहे. त्यामधील काही जागा एनए केलेली आहे. आर्थिक दृष्ट्या तोटा आणि कर्जामुळे अडचणीत आलेल्या कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी 2013 मध्ये 110 एकर जागा ‘म्हाडा’ला देण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. कारखान्याची 110 एकर जागा एकरी एक कोटी सात लाख रुपये दराने ‘म्हाडा’ला देण्याच्या या व्यवहारातून कारखान्याला ११७ कोटी रुपये मिळणार होते मात्र न्यायालयात प्रकरणे दाखल झाली आणि अजून कोर्टकचेरी सुरूच आहे. 

प्रदीर्घ 18 वर्षांच्या कालखंडानंतर हवेली तालुक्यातील यशवंत कारखान्याच्या निवडणुकीला कोर्टाने संमती दिली आहे. कारखान्याच्या संबंधित आजपर्यंत एकुण १२ याचिका दाखल असून त्यातील एका याचिकेवर न्यायालयाने निवडणुकीबाबत आदेश दिला आहे. कारखान्यातील गैरव्यवस्थापनामुळे 2 एप्रिल 2011 रोजी संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि त्यानंतर जवळपास हा कारखाना बंद अवस्थेतच आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी सभासदांनी निवडणूक निधी गोळा केलेला आहे. निवडणुकीनंतर बंद पडलेल्या कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्यास महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.