Tuesday 17 October 2017

भाजपकडे सर्वाधिक संपत्ती

भाजपकडे सर्वाधिक संपत्ती

असोसिएशन फॉर डेमोक्रॉटिक रिफॉर्म्स अँड इलेक्शन वॉचने (एडीआर) राजकीय पक्षांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर

देशातील राजकीय पक्षांची संपत्ती किती आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय अशा अनेक प्रश्नांची चर्चा नेहमीच सुरु असते. मात्र आता देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष कोणता याचं उत्तर समोर आलं आहे.असोसिएशन फॉर डेमोक्रॉटिक रिफॉर्म्स अँड इलेक्शन वॉचने (एडीआर) राजकीय पक्षांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर केली आहे. 2004-05 ते 2015-16 या काळात राजकीय पक्षांची संपत्ती किती वाढली, याबाबतची आकडेवारी एडीआरने जारी केली आहे.देशातील सात राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या संपत्तीवरुन ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी, तृणमूल, भाकप, माकप यांचा समावेश आहे.यानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. भाजपशिवाय काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सर्वच पक्षांची संपत्ती अनेक पटींनी वाढली आहे.

भाजप नंबर वन
गेल्या 10-11 वर्षात भाजपची संपत्ती अनेक पटींनी वाढली आहे.  भाजपची 2004-05 मधील संपत्ती 122.93 कोटी रुपयांची होती, ती 2015-16 मध्ये तब्बल 893.88 कोटी रुपये झाली आहे.

काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर
दुसरीकडे या यादीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसची संपत्ती 2004-05 मध्ये 167.35 कोटी रुपये इतकी होती. ती 2015-16 पर्यंत 758.79 कोटी रुपयांवर पोहोचली.

मायावतींच्या बसपाची मोठी भरारी
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने संपत्ती वाढीच्या बाबतीत मोठी मजल मारली आहे.  दहा वर्षापूर्वी बसपाची संपत्ती केवळ 43 कोटी रुपये होती, ती आता तब्बल 559 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ममतांच्या तृणमूल काँग्रेसची संपत्ती किती?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची संपत्तीही बऱ्यापैकी वाढली आहे. कारण 11 वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसची संपत्ती केवळ 25 लाख रुपये होती, ती 2015-16 पर्यंत 44.99 म्हणजेच जवळपास 45 कोटींवर पोहोचली आहे.

डाव्यांची संपत्ती
संपत्ती वाढीच्या बाबतीत डावे पक्षही कमी नसल्याचं दिसतंय. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अर्थात माकपच्या संपत्तीत 11 वर्षात तब्बल 383 टक्के वाढ झाली आहे. 2004-05 मध्ये माकपची संपत्ती 90.55 कोटी रुपये होती ती 2015-16 मध्ये 437.78 कोटींवर पोहोचली.दुसरीकडे भाकप अर्थात भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांच्या संपत्ती वाढीचं गती मात्र खूपच कमी आहे. कारण भाकपची संपत्ती 5.56 कोटी रुपयांवरुन केवळ 10.18 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस
देशातील राष्ट्रीय पक्षांच्या संपत्ती वाढीचा वेग मोठा असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचा वेग तितकासा सुपरफास्ट नसल्याचं दिसतंय. कारण 2004-05 मध्ये राष्ट्रवादीची संपत्ती 1.6 कोटी इतकी होती, ती 2015-16 पर्यंत  14.54 कोटी इतकी झाली.

 दरम्यान, राजकीय पक्षांच्या संपत्तीचे हे आकडे केवळ फिक्स्ड असेट्स अर्थात स्थावर संपत्तीचे आहेत. अन्य संपत्तीचे आकडे समोर आलेले नाहीत.सध्या भाजपकडे सर्वाधिक 868.89 कोटी रुपयांचं भांडवल आहे. त्यानंतर बसपाकडे 557.38 कोटीचं आणि 432.64 कोटींचं भांडवल माकपकडे आहे. 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.