Monday 12 February 2018

कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का, भाजपच्या आशिष ढवळेंची बाजी

कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का, भाजपच्या आशिष ढवळेंची बाजी


कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सोमवारी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीने सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला अनपेक्षीत असा जबरदस्त धक्का दिला. भाजपच्या आशिष मनोहर ढवळे यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मेघा आशिष पाटील यांचा दोन मतांनी धक्कादायक पराभव केला.सभापतीपदासाठी उमेदवारी देण्यावरुन राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेली खदखद प्रत्यक्ष मतदानावेळी उफाळून आली आणि त्याची परिणीती अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्या बंडखोरीत झाली.दरम्यान, स्पष्ट बहुमतात असतानाही झालेल्या या पराभवाने सैरभैर झालेल्या कॉँग्रेस - राष्ट्रवादीने भाजपवर घोडेबाजार केल्याचा घणाघाती आरोप केला असून ‘काहीही करा पण भाजपची सत्ता महापालिकेत आणा’ अशा सुचना करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याची पूर्तता या निवडणुकीत केली अशी टीकाही केली आहे.कोल्हापूर महानगरपालिकेत तसेच विविध विषय समित्यांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत जंग जंग पछाडूनही भाजप - ताराराणी आघाडीला सत्तेपर्यंत पोहचता आले नाही. याची सल भाजपला होती.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे पदाधिकारी निवडणुकीत चमत्काराची भाषा केली होती, पण गेल्या तीन वर्षात त्यांना कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या बहुमताला छेद देता आला नाही. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मात्र हा चमत्कार घडवून आणण्यात यशस्वी झाले.एकाच घरात किती पदे द्यायची या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण या दोन स्थायी समितीच्या सदस्यांनी पक्षादेश धुडकावून ताराराणी आघाडीच्या आशिष ढवळे यांना मतदान केले. त्यामुळे पुरेसे संख्याबळ असताना केवळ पक्षांतर्गत नाराजीमूळे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेत्यांनी डावलल्याने या दोघा नगरसेवकांनी विरोधी आघाडीच्या उमेदवाराला स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मतदान केल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात चांगलीच रंगली आहे.राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांचा मात्र दोन मतांनी पराभव झाल्याने सत्ताधारी गटात निरव शांतता पसरली आहे. मेघा पाटील यांना 7 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारात आता नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.याचसोबत परिवहन समिती निवडणुकीच्या वेळी वेगळं चित्र पहायला मिळालं. परिवहन समिती निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलेले पहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे राहुल चव्हाण यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या शेखर कुसाळे यांचा पराभव केला. विषय समिती निवडीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेने मदत केली होती, त्याची परतफेड करत सत्ताधारी पक्षाने आज शिवसेनेला परिवहन समितीचे सभापतीपद देऊन केली.

CHANDRAKANT BHUJBAL 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.