Sunday, 16 June 2019

बडोले, सावरा, कांबळे, अत्राम या मागासवर्गीय मंत्र्यांना सरकारमधून डच्चू; विखे पाटील, क्षीरसागर यांना संधी

पुणे पिंपरी-चिंचवड शहर मंत्र्याविना पोरके; जिल्ह्यात भाजप निष्ठावंत आ.बाळा भेगडे यांना न्याय

मंत्रिमंडळ विस्तारातील नवनिर्वाचित मंत्री व विभाग

[?]   राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री) विभाग- उत्तर महाराष्ट्र

[?]    जयदत्त शिरसागर (कॅबिनेट मंत्री) विभाग- मराठवाडा

[?]    डॉ. आशिष शेलार (कॅबिनेट मंत्री) विभाग-  मुंबई

[?]    डॉ. संजय कुटे (कॅबिनेट मंत्री) विभाग- विदर्भ

[?]    सुरेश दगडू खाडे (कॅबिनेट मंत्री) विभाग- पश्चिम महाराष्ट्र

[?]    डॉ. अनिल बोंडे (कॅबिनेट मंत्री) विभाग- विदर्भ

[?]    डॉ. अशोक उईके (कॅबिनेट मंत्री) विभाग-  विदर्भ

[?]    तानाजी जयवंत सावंत (कॅबिनेट मंत्री) विभाग- विदर्भ (मूळ प. म.)

[?]    योगेश सागर (राज्यमंत्री) विभाग- मुंबई

[?]   अविनाश माहतेकर (राज्यमंत्री) विभाग- मुंबई

[?]    संजय भेगडे (राज्यमंत्री) विभाग- पुणे पश्चिम महाराष्ट्र

 [?]    परिणय फुके (राज्यमंत्री) विभाग- विदर्भ

[?]    अतुल सावे (राज्यमंत्री) विभाग- मराठवाडा

नव्या मंत्र्यांना मिळालेली खाती…

१) कॅबिनेट मंत्रीपदं

  • अॅड. आशिष शेलार (भाजपा) : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • राधाकृष्ण विखे-पाटील (भाजपा) : गृहनिर्माण
  • राम शिंदे  (भाजपा) : पणन व वस्त्रोद्योग
  • डॉ. संजय कुटे (भाजपा) : कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण
  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) : रोजगार हमी व फलोत्पादन
  • डॉ. सुरेश खाडे (भाजपा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  • प्रा. डॉ. तानाजी सावंत (शिवसेना) : जल संधारण
  • संभाजी पाटील-निलंगेकर (भाजपा) : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण
  • डॉ. अनिल बोंडे (भाजपा) : कृषी
  • डॉ. अशोक उईके (भाजपा) : आदिवासी विकास
  • जयकुमार रावळ (भाजपा) : अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
  • सुभाष देशमुख  (भाजपा) : सहकार, मदत व पुनर्वसन

२) राज्य मंत्रीपदं 

  • अविनाथ महातेकर (रिपाइं) : समाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
  • डॉ. परिणय फुके (भाजपा) : सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने
  • संजय भेगडे (भाजपा) :  कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
  • योगेश सागर (भाजपा) : नगरविकास
  • अतुल सावे (भाजपा) : उद्योग व खनीकर्म, अल्पसंख्यांक व वक्फ

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश अत्राम या मागासवर्गीय मंत्र्यांना फडणवीस सरकारमधून डच्चू देण्यात आलेला असून भ्रष्ट व निष्क्रियतेचा ठपका ठेवून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, पर्यायवरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना राजीनामा देण्यास भाग पडले आहे. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचे विरोधीपक्षातील नेते सत्ताधारी पक्षाच्या हाताला लागले असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदावर संधी देण्यात आलेली आहे. तर पुणे पिंपरी-चिंचवड शहर राज्याच्या इतिहासात प्रथमच मंत्र्याविना पोरके राहिले आहे. जिल्ह्यात भाजपचे निष्ठावंत मावळचे आमदार बाळा भेगडे यांना राज्यमंत्री करून न्याय दिला आहे तर मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या पिंपरी-चिंचवड मधील आमदारांची निराशा करण्यात आलेली आहे. मंत्रीपदावरून अचानक केलेली गच्छंती राजीनामा दिलेल्यांना रुचली नाही तर विखेपाटील यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश भाजप आमदार व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना रुचलेला नाही. भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी दाखल झालेले 18 आमदार मंत्रीपदाची व महामंडळाची प्रतीक्षा करीत आहेत ते देखील नाराज आहेत. शिवसेनेत देखील विधानपरिषद व बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिल्याने नाराजीचा सूर आहे. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचा काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-भाजप असा राजकीय प्रवास राहिलेला आहे. जुन्या सहा मंत्र्यांना नारळ देण्यात आलेला आहे. काही मंत्र्यांना नारळ देण्याची कारणे देखील त्या स्वरुपाची आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे भोवली आहेत. लोकायुक्तांनी ताशेरे ओढल्यावर श्रेष्ठींचे संबंधही कामी आले नाहीत अन् राजीनामा द्यावा लागला. अदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे संघ परिवारातले ज्येष्ठ स्वयंसेवक पण नंतर ते अनागोंदित रमले, आदिवासी शाळातील व्यवहारावर अंकुश ठेवता आला नाही. प्रकृती साथ देत नाही अशी कारणे देत आता थेट घरी बसावे लागणार आहे. सोबतच सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी तर दलित शिष्यवृत्तींची सवलत आपल्या मुलीला अन सचिवासारख्या उच्चपदस्थाला दिली. दिलीप कांबळे काहीही न करता बडोलेंसह इतर नेत्यांशी वाद निर्माण करण्यात रमले. त्यांच्यावर एका प्रकरणात गुन्हाही नोंदवला गेला या कारणांनी दोघांना मंत्रिपदाला मुकावे लागले आहे. अंबरीश अत्राम तरूण पण बैठकांनाही हजर नसायचे म्हणून त्यांनाही नारळ देण्यात आला. प्रवीण पोटे निष्प्रभ ठरले आणि उशीरा का होईना पण मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना घरी बसवले. मोठे आरोप असलेले काही मोठे नेते मात्र अद्यापही मंत्री आहेत. अशा एका ना अनेक कारणांमुळे राजकुमार बडोले, प्रकाश महेता, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरीश आत्राम, विष्णू सावरा या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला यामध्ये एकूण १३ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये युतीने १०-२-१ हा फाॅर्म्युला मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वापरला आहे. ज्यांनी शपथ घेतली त्यामधील १० नेते भाजपचे, २ शिवसेनेचे, तर १ रिपाइंचे असे आहेत. १३ मंत्र्यापैकी ८ मंत्र्यांनी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर ५ जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे मिळाली असून त्याखालोखाल मुंबईला 3 मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. विदर्भातून डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, परिणय फुके, तानाजी सावंत, अशोक उईके यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर मुंबईतून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार योगेश सागर, आरपीआयकडून अविनाश महातेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मराठवाड्यातून अतुल सावे, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून पुणे ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळा भेगडे, सांगलीतील भाजपा आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विदर्भातील एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आता चार मंत्री झाले. पहिल्यांदाच 4 मंत्री एका जिल्ह्याला मिळाले आहेत. संजय राठोड महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे, मदन येरावर, ऊर्जा राज्यमंत्री भाजपचे, डॉ.प्राचार्य अशोक उईके (आमदार भाजप, राळेगाव) डॉ. तानाजी सावंत (विधान परिषद सदस्य, शिवसेना यवतमाळ) हे मंत्री झालेले आहेत. 

राजीनामे दिलेले मंत्री व पद

१. राजकुमार बडोले – भाजप – सामाजिक न्यायमंत्री
२. प्रकाश मेहता – भाजप – गृहनिर्माण मंत्री
३. विष्णू सावरा – भाजप – आदिवासी विकास मंत्री
४. प्रवीण पोटे – भाजप – पर्यायवरण राज्यमंत्री
५. दिलीप कांबळे – भाजप – सामाजिक न्याय राज्यमंत्री
६. अंबरीश अत्राम – भाजप - आदिवासी विकास राज्यमंत्री
=============================

रिपाइं नेते अविनाश महातेकर यांना पोलिसांनी गेटवर अडवले-

रिपाइं नेते अविनाश महातेकर हे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पोहोचले तेव्हा महातेकर यांना गेटवर पोलिसांनी अडवले. ते मंत्रिपदाची शपथ घ्यायला आले असल्याचे प्रेस फोटोग्राफरने सांगितल्यानंतर पोलिसांनी महातेकर यांना आत सोडले. यावेळी पत्नी वृषाली महातेकर यावेळी उपस्थित होत्या.
======================================

विरोधी पक्षनेते ते मंत्रिपद महाराष्ट्राची परंपराच!

शरद पवार, नारायण राणे, शिंदे यांच्यानंतर विखे-पाटील थेट मंत्रिमंडळात
तेराव्या विधानसभेतील एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे-पाटील हे दोन विरोधी पक्षनेते सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आगळावेगळा विक्रम घडला आहे. विरोधी पक्षनेतेपद भूषविले त्याच सरकारमध्ये सहभागी होण्याची राज्यात नेत्यांची परंपराच आहे. १९८५ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले होते. पवार तेव्हा विरोधी पक्षनेते होते. १९८७ मध्ये पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला आणि १९८८ मध्ये पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २००५मध्ये शिवसेनेच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले. तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व त्यांचा लगेचच मंत्रिमंडळात समावेश झाला.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. पण एकनाथ शिंदे यांचे विरोधी पक्षनेतेपद अल्पकाळ टिकले. कारण शिवसेनेने भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने एकनाथ शिंदे हे मंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत मुलाच्या उमेदवारीसाठी भाजपचा आधार घेणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.
=================================

नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी खालीलप्रमाणे

राधाकृष्ण विखे पाटील, माजी विरोधी पक्षनेते (कॅबिनेट) 

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचे पुत्र सुजय यांना लोकसभेसाठी नगरमधून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देत विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जाहीररित्या विखेंनी भाजपात प्रवेश केला नव्हता.

अ‍ॅड आशिष शेलार, आमदार, मुंबई (कॅबिनेट) 

सलग दोन टर्म, गेली सहा वर्षे मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष, सन2017 च्‍या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्‍बल 83जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाचे नेतृत्‍व केले. 

प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप राळेगाव विधानसभा (कॅबिनेट मंत्रिपद) 

२०१४ मध्ये पहिल्यांदाच माजी शिक्षणमंत्री काँग्रेसचे उमेदवार प्रा. वसंतराव पुरके यांचा पराभव करून प्राचार्य डॉ. अशोक उईके विजयी झाले. विधीमंडळाच्या अनुसूचित जमाती समितीचे विद्यमान अध्यक्ष. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीमंडळात समावेश आहे.

प्रा.डॉ. तानाजी सावंत, आमदार, शिवसेना यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघ (कॅबिनेट मंत्रिपद) 

२०१६ मध्ये यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांचा पराभव करून शिवसेनेचे प्रा.डॉ. तानाजी सावंत विजयी झाले. शिक्षण व साखर सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे विद्यमान उपनेते. शिवसेनेचे उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खा.रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. निंबाळकर यांना तानाजी सावंत यांनी एकहाती प्रचार करत निवडून आणले. यामुळेच त्यांचा मंत्रिमंडळात सेनेकडून समावेश झाल्याचे मानण्यात येत आहे. शिवजलक्रांती घडवून तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले. एक महिन्याच्या फरकानेच यवतमाळ येथून विधानपरिषद लढविण्याची त्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. या विजयाने शिवसेनेत त्यांचे महत्त्व वाढले होते. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी त्यांचेवर शिवसेनेने सोपवली आहे. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. तानाजी सावंत हे यवतमाळ वाशीममधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. उस्मानाबादच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे. विशेष म्हणजे कोणतेही मोठे आंदोलन न करता सांवत यांनी शिवसेनेत मोठे स्थान निर्माण केले आहे. 'लक्ष्मी'पुत्र अशी त्यांची शिवसेनेत ओळख आहे. सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देखील सावंत यांच्याकडे आहे. सावंत यांनी राष्ट्रवादीचे बबन शिंदेंविरोधात तिनदा निवडणूक लढवली होती. शिवसेनेकडून दोनदा तर एकदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली.  उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याची उभारणी करून त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.  त्यामुळे साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी त्यांची ओळख आहे.

सुरेश खाडे, आमदार - भाजपा (कॅबिनेट) 

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ आमदार म्हणून सुरेश खाडे यांची ओळख आहे. भाजपाचा प. महाराष्ट्रातला अनुसुचित जातीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात खाडेंचा मोठा वाटा आहे. 2004 साली सांगली जिल्ह्यातल्या जतमधून विजयी झाले होते. सांगली मिरज-कुपवाड मनपावर भाजपची सत्ता आणण्यात महत्वाचे योगदान आहे. 

डॉ. संजय कुटे, आमदार, भाजपा (कॅबिनेट) 

जळगाव-जामोदचे आमदार आहेत, बुलढाण्यातला भाजपाचा चेहरा असून 2003 मध्ये जळगाव-जामोदचे तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असणारे कुटे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्यात आली आहे. 2004, 2009, 2014 सलग तीन वेळा कुटे विधानसभेवर निवडून आले आहेत. 

डॉ. अनिल बोंडे, भाजपा, आमदार, धुळे (कॅबिनेट) 

डॉ. अनिल बोंडे हे मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. ५४ वर्षांचे आमदार बोंडे हे एमबीबीएस, एमडी आहेत. १९९६ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००२ ते २००५ या कालावधीत ते जिल्हाप्रमुख होते. त्यांनी २००४ मध्ये शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यांचा १३०० मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या  विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ते ४१ हजार मतांनी विजयी झाले होते.

संजय भेगडे, आमदार, मावळ (राज्यमंत्री)

भारतीय जनता पक्षाचे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात चांगले काम केल्याने त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. 2014 मध्ये मावळ मधून विधानसभेवर निवडून आले बाळा भेगडे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 

अतुल सावे - आमदार, भाजपा (राज्यमंत्री)

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत, त्यांनी 2014 ला काँग्रेस उमेदवाराचा पराभवन करुन त्यांनी विजय मिळविला होता. अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे पहिले खासदार होते. त्यानंतर सावे कुटुंबीय शिवसेना सोडून भाजपात आले. भाजपात अतुल सावेंना जिल्हाध्यक्ष आहेत. 

अविनाश महातेकर, आरपीआय नेते (राज्यमंत्री)

महातेकर हे दलित पॅँथरचे संस्थापक सदस्य आहेत. रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये ते राष्ट्रीय प्रवक्ते आणि सरचिटणीस पदावर काम करतात. आंबेडकर चळवळीचे अनुयायी म्हणून त्यांची ओळख आहे. 

योगेश सागर, आमदार, भाजपा (राज्यमंत्री)

महेता यांना शह देण्यासाठी चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर यांची वर्णी लागली आहे. सागर हे दुसऱ्या वेळी निवडून आले आहेत. नगरसेवक असल्यापासून त्यांचा चारकोप परिसरात चांगला दरारा आहे. 

डॉ. परिणय फुके - आमदार, भंडारा-गोंदिया विधानपरिषद (राज्यमंत्री) 

राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2007 पासून नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून केली. महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी काम करत फुके यांनी आपली राजकीय पटलावर आपली छाप निर्माण केली. ऑक्टोबर 2016 मध्ये भाजपाकडून त्यांना भंडारा-गोंदिया विधानपरिषद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. यात अनेक दिग्गजांना पराभूत करत फुके यांनी विजय मिळविला. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================









No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.