दरवर्षी १ जुलै हा दिवस राज्यभर "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय
दरवर्षी १ जुलै हा दिवस राज्यभर "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून मतदान प्रक्रियेबाबत प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहे.सदर परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय क्र. ईएलआर-२०१७/प्र.क्र. 347 /का.३३ दिनांक : 20 मे, २०१७ म्हणून आदेश जारी केला आहे.
भारत निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाही बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने "स्वीप" (SVEEP - Systematic Voters' Education and Electoral Participation) हा महतवाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमातून मतदारांबरोबर संपर्क साधून त्याना लोकशाहीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेपासून कोणताही मतदार वंचित राहू नये यासाठी सतत प्रयतनशील राहावयाचे आहे.या उद्देशाने दरवर्षी १ जुलै हा दिवस राज्यभर "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकविषयक प्रक्रियेचे व नियमांचे जनप्रबोधन व प्रशिक्षण देणारी संस्था असलेल्या ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)’ च्या वतीने चंद्रकांत भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी दिनांक २५ जानेवारी रोजी "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने देशभर मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तथापी,"स्वीप" कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ "राष्ट्रीय मतदार दिनी" या पुरती मर्यादित राहू नये तर मतदार जागृतीचे काम निरंतरपणे वर्षभर सुरु राहावे या हेतूने दरवर्षी राज्यस्तरावर "राज्य मतदार दिवस" व प्रत्येक जिल्हास्तरावर "जिल्हा मतदार दिवस" साजरा करण्यात यावा असे आदेश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये " राज्य मतदार दिवस" साजरा करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता.त्यानुसार "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'राज्य मतदार जागृती दिवस' साजरा करण्यास
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आक्षेप
विधानसभेत जीएसटी विधेयक मंजुरीसाठी कामकाजाला सुरवात होताच विरोधक आक्रमक झाले होते. १ जुलै हा मतदार दिवस म्हणून जाहीर केल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, "१ जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून तो कृषी दिन म्हणून साजरा होता. अशा वेळी मतदार दिवस जाहीर करुन सरकारने वसंतराव नाईक यांचा अवमान केला आहे. अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुनगंटीवार यांनी त्यावर उत्तर दिले. "मतदार दिवस जाहीर केला आहे, मात्र वसंतराव नाईक यांच्याबद्दल आदर असून कृषी दिन रद्द केला नसल्याचे" अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.शेतकरी दिन आता तिथीनुसार साजरा होणार;
कृषी दिन पण तिथीनुसार साजरा करणार काय?
शेतकरी दिन आता तिथीनुसार साजरा होणार आहे. शेतकरी दिन २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जात होता, २९ ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. तो वर्षानुवर्षे याच तारखेला होत आहे. मात्र शेतकरी दिनाच्या बाबतीत तिथीचा विचार करण्यात आला आहे, त्यामुळे आता शेतकरी दिन २ वर्षे २९ ऑगस्टला साजरा केल्यानंतर, तो आता तिथीनुसार करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी त्यांचे नातू आणि तत्कालीन राज्य सरकारमधील कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
तत्कालीन आघाडी सरकारने १६ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार २९ ऑगस्ट रोजी, शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा दिन साजराही करण्यात आला.मात्र आता सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप - शिवसेना सरकारने शेतकरी दिन, तिथी नुसार साजरा करण्याचा निर्णय घेतला.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म झाला होता. गेल्यावर्षी नारळी पौर्णिमा १७ ऑगस्ट रोजी असल्याने हा दिन १७ रोजी साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला होता. तसा अध्यादेशही काढण्यात आला होता. तिथीनुसार हा दिन साजरा करण्यात येणार असल्याने दरवर्षी नारळी पौर्णिमेला बदलत्या तारखेनुसार हा दिन साजरा केला जाईल.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.