Monday 14 May 2018

'शिक्षक' व 'पदवीधर'चा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; विधानपरिषदेच्या चार जागांसाठी ८ जून रोजीचे मतदान पुढे ढकलले

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली


मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी मे महिन्याच्या सुट्टीत लागलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग लवकरच तारीख जाहीर करणार आहे. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी 8 जूनला मतदान होणार होतं. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही निवृत्त होणाऱ्या विद्यमान विधानपरिषद सदस्यांची मुदत 7 जुलै 2018 रोजी संपत आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी मे महिन्याच्या सुट्टीत लागलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. 8 जून रोजी निवडणूक झाल्यास सुट्टीसाठी बाहेरगावी गेलेले मतदार मतदानापासून वंचित राहतील, असा दावा पाटील यांनी केला होता. शिवाय शाळा 15 जून आणि 18 जून रोजी सुरु होत असून त्याआधी 8 जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना परत येणं निव्वळ अशक्य आहे, असंही म्हटलं होतं. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने कपिल पाटील यांच्या मागणीची दखल घेत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघांत ८ जूनला निवडणूक 


खालील आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत आहे.

1. प्रा. डॉ. अपूर्व हिरे (नाशिक विभाग शिक्षक) अपक्ष
2. डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधर) शिवसेना
3. निरंजन तटकरे (कोकण पदवीधर) राष्ट्रवादी
4. कपिल पाटील (मुंबई शिक्षक) लोकभारती

नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या विधानपरिषदेच्या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केला. या मतदारसंघांत ८ जून रोजी मतदान होत असून १२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधर), राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन तटकरे (कोकण पदवीधर), लोकभारतीचे कपिल पाटील (मुंबई शिक्षक)आणि नाशिकचे अपक्ष सदस्य प्रा. डॉ. अपूर्व हिरे (नाशिक विभाग शिक्षक) यांची ८ जुलै २०१८ रोजी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत असल्याने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या चारही जागांसाठी २२ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. २५ मे रोजी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी, ८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान आहे. बुधवारी, १२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघातील प्रा. डॉ. अपूर्व हिरे यावेळी विधानपरिषदेसाठी इच्छुक नाहीत. तर कपिल पाटील, निरंजन डावखरे या विद्यमान सदस्यांची त्याच मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानले जात आहे. शिक्षक मतदारसंघात आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शिक्षक परिषद या संघटनेच्या उमेदवाराला भाजपा पाठिंबा मिळत असे. यावेळी मात्र नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपने परिषदेला न विचारता आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिक्षक परिषदही स्वत:चे उदेवार देण्याच्या तयारी आहे. यामुळे भाजपेतर उमेदवारांना याचा फायदा मिळतो की आयत्या वेळी शिक्षक परिषद व भाजप यांच्यात समेट होतो यावर बरेच काही अवलंबून असेल.

सुट्टीमुळे शिक्षक निरुत्साही; मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम 

मुंबईतील शाळा १५ जूनपासून सुरू होत असून मुंबईतील अनेक शिक्षक आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ८ जून रोजी घोषित केली आहे. त्यामुळे ही निवडणूक शाळा सुरू झाल्यावर घेण्यात यावी, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, ८ जूनला शिक्षक मुंबईत परतणार नाहीत. यामुळे त्या दिवशी निवडणूक घेतल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होईल, असे मत मुंबईत मुख्याध्यापक संघटनेने व्यक्त केले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.