Saturday 26 May 2018

"साम दाम दंड भेद" ही राजकीय कुटनीतीच! पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार!

"साम दाम दंड भेद" ही राजकीय कुटनीतीच! 


चाणक्य यांच्या राजनीति शास्त्रातील मूळ नीतीमध्ये "साम दाम दंड  भेद" याचा समावेश आहे. "साम दाम दंड भेद" ही राजकीय कुटनीती  आहे. आजच्या काळात सर्वच राजकीय पक्ष या नीतीचा अवलंब करीत  आहेत. "साम दाम दंड भेद" असे शब्द प्रयोग वापरणे गैर नाहीच. 
   

साम- दाम -दंड- भेद म्हणजे साधारण अर्थ ?

(१) साम :---- साम म्हणजे सामोपचार. प्रतिस्पर्ध्याशी सर्वप्रथम सामोपचाराची बोलणी करावी. एकाएकी संतप्त होऊन संघर्षाला उभे ठाकू नये. (२) दाम :---- दाम म्हणजे पैसा, संपत्ती. प्रतिस्पर्धी  सामोपचाराने ऐकत नसेल, तर त्याला दाम देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा. (३) दंड :---- दंड म्हणजे शिक्षा.प्रसंगी युद्ध करण्याची वेळ आली, तर युद्ध करावे. (४) भेद :--- भेद म्हणजे भिन्नभाव, दुरावा. प्रतिस्पर्ध्याशी सामोपचाराची बोलणी करूनही तो ऐकत नसेल, तर या टप्प्यावर त्याच्याशी असलेले शत्रुत्व उघडपणे मान्य करावे  आणि त्यानुसार पावले उचलावीत.


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला 


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत केलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 

निवडणूक आयोगाकडे भाजप व शिवसेनेने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या तरी यामधून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण ज्यांनी ही क्लिप एडिट करुन, लोकांना दिशाभूल केलं असा आरोप आहे त्यामध्ये क्लिप एडिट केली नसून ती अर्थवट जाहीर केल्याचे दिसून येत आहे. एखादी क्लिप किती जाहीर करावी किवा करू नये याबाबत काही बंधन नाही व असण्याचे कारण नाही, यामध्ये निवडणूक नियमांचे उलंघन होत नाही. तसे आक्षेपार्ह देखील नाही. मात्र पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलिसाच्या सखोल तपासातून स्पष्ट होईलच की हे कृत्य कोणाचे आहे. 

पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल

पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ‘साम दाम दंड भेद’ वापरल्याचा आरोप अधिक गडद होत आहे. पैसे वाटपाच्या आरोपानंतर आज अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली. कलम १७१ अंतर्गत पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण १२ युवकांवर डहाणू पोलिस स्थानकात गुन्हा दाखल दाखल झाला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पालघरमधील रानशेत भागात आज शिवसैनिकांनी काही लोकांना पैसे वाटताना रंगेहात पकडलं. त्यावेळी पैसे वाटणाऱ्यानी हे पैसे भाजपने आपल्याला दिल्याची कबुली दिली. भाजपचे शहराध्यक्ष अशोक अंबोरे यांचेच हे पैसे असल्याची कबुली पैसे वाटणाऱ्या तरुणांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून भाजपच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

भाजपने आरोप फेटाळले

शिवसेनेने केलेले आरोप भाजपने फेटाळले आहेत. हा शिवसेनेचा कट असून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेकडून अशा नाट्यमय घडामोडी घडवून आणल्या जातात, असं प्रत्युत्तर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिलं. पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रकाराची सध्या चौकशी सुरु आहे.


ती वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती: मुख्यमंत्री

शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप जाहीर सभेत ऐकवली. पण ऑडिओ क्लिपमध्ये मोड- तोड करुन ती लोकांना ऐकवण्यात आली. साम-दाम-दंड- भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो. कूटनीतीने प्रहार करणाऱ्यांना कूटनीतीचा उतारा द्यावा लागतो, असे माझे म्हणणे होते. त्या क्लिपच्या सुरुवातीची आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती आणि त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली होती. यात फडणवीस यांनी साम-दाम-दंड- भेद याचा वापर करावा, असे म्हटल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या कथित ऑडिओ क्लिपवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती. अखेर या क्लिपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वसईतील सभेत स्पष्टीकरण दिले. फडणवीस म्हणाले, ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. ती ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची असली तरी शिवसेनेने ती मोडून- तोडून जनतेसमोर आणली. क्लिपची पहिली आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडघशी पडली असती. आता मी स्वत:च ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे. मी काही चुकीचे केले असेल तर निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जाण्यास मी तयार आहे. पण मी निर्दोष सुटलो तर क्लिपमध्ये मोड- तोड करुन ती जनतेसमोर आणून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पराभव दिसू लागल्याने शिवसेना इतक्या खालच्या स्तराला गेली. ती क्लिप ऐकवणाऱ्या आदेश बांदेकर यांनी किमान सिद्धिविनायक मंदिराचा अध्यक्ष असेपर्यंत खरे बोलायला हवे होते.  पण तो आदेशाने काम करणारा आदेश बांदेकर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्ही कोणतेही काम केले की काही लोकांकडून विरोध केला जातो. त्यांनी पालघरच्या विकासाबाबत भाष्य केले नाही. ते फक्त प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना होती. पण दुर्दैवाने ती आता शिवविरोध सेना झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. वसईतील माणिकपूर येथे शनिवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यात त्यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली. पालघरमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठित खंजीर खुपसला. वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल शिवसेना आणि वनगा यांचे चिरंजीव करत आहे. चिंतामण वनगा यांचा आत्मा त्यांना माफ करणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, शिवसेनेचे नेते आता मते मागायला येत आहेत. पण वसईतील बसेसच्या २६ फेऱ्या कोणी बंद केल्या?. शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे गेले. त्यावेळी रावतेंनी बससेवा सुरु करण्यास नकार दिला होता. आता हीच लोकं पोपटासारखं बोलत आहेत, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्यांची स्वप्नं होती, आता तो पक्ष कुठे गेला?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या भाषणांनी खालचे स्तर गाठले आहे. भाजपाचे रक्त तुम्ही पाहिलं नाही. तुमच्या जन्मापूर्वीपासून भाजपाने संघर्ष केला आहे. आमच रक्त भेसळयुक्त असल्याची टीका तुम्ही करताय. मग चिंतामण वनगा यांचे रक्तही भेसळयुक्त असल्याचे तुम्ही म्हणताय का? आणि हे बोलून त्यांच्याच मुलाला गावोगावी घेऊन फिरता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

श्रीनिवास कुठे फसलास रे बाबा

शिवसेनेने ‘सामना’मध्ये जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमधून श्रीनिवास वनगा गायब आहेत. निवडणुकीपूर्वीच ही अवस्था असेल तर नंतरच्या परिस्थितीचा अंदाज येईल. श्रीनिवास तू कुठे फसलास रे बाबा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप

पालघरमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भरसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जगजाहीर केली. हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये केली.

काय आहे ही फडणवीसांची कथित ऑडिओ क्लीप?

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे? ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही. आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...साम, दाम, दंड, भेद...ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.'अरे ला कारे'च करायचं..'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.


मुख्यमंत्र्यांनी जारी केलेली ऑडिओ क्लिप

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?..ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही..आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे..ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...साम, दाम, दंड, भेद...ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही...कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे...तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे...'अरे ला कारे'च करायचं..'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे..चिंता करु नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी सक्षम आहोत. 

(शिवसेनेने इथवर दाखवली होती, त्यापुढची क्लिप मुख्यमंत्र्यांनी जारी केली)

आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. 
परंतु आपल्या विरुद्ध जो कोणी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला सोडणारही नाही. ही मानसिकता या निवडणुकीत ठेवली पाहिजे.

संपूर्ण क्लिप 14 मिनिटांची आहे. त्यात काही माझ्याबद्दल आक्षेपार्ह असेल, तर माझ्यावर कारवाई करा....पण ज्यांनी ही क्लिप एडिट करुन, लोकांना दिशाभूल केलं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. असे मुख्यमंत्री यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा ! नवाब मलिक यांची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री ऑडिओ क्लीपमध्ये सरळसरळ धमक्या देत आहेत. ते विरोधकांवर हल्ले करण्याची चितावणीखोर भाषा वापरत आहेत त्यामुळे त्यांच्यावर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.पालघरमध्ये शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ क्लीप ऐकवून दाखवली. त्यामधील मुख्यमंत्र्याची भाषा अशोभनीय आहे. विरोधकांवर हल्ले करा. मी सर्वाधिक मोठा गुंड आहे असे मुख्यमंत्री बोलत आहेत. त्यांची भाषा ही चितावणीखोरपणाची आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लीप निवडणूक आयोगाने ऐकून त्याची खात्री करुन किंवा वेळ पडल्यास फॉरॅन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवावी आणि पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही मलिक यांनी केली. पालघर,भंडारा-गोंदिया पोटनिवडणूका पराभूत होत असल्याचे लक्षात येताच भाजप साम-दाम-दंड-भेदाचा वापर करुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. बळाचा वापर आणि पैशाचा वापर भाजपकडून केला जात आहे. कालच पालघरमध्ये पैसे वाटणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.शिवसेनेने ही ऑडिओ क्लीप बाहेर काढली आहे ती सभेत जनतेसमोर पुंगी म्हणून न वाजवता हिम्मत असेल निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. त्यावर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो असेही  मलिक म्हणाले.

‘ती’ क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित ऑडिओ क्लिपवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतील वाद टोकाला पोहोचला असून शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ‘जशास तसे उत्तर द्यावे’ असे म्हटले होते. साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला पाहिजे. अरे ला कारे करायचं. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे’, असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले होते. शिवसेनेने ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘निवडणुक आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. क्लिप खोटी असेल तर उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी’, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवार, २८ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान 


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 2097 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.मतदान सोमवार 28 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, तर मतमोजणी 31 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.या पोटवडणुकीसाठी 12 हजार 894 कर्मचारी, तसेच 4 हजार 219 सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार आहे. पालघर जिल्ह्यातील 2097 केंद्रांपैकी 14 केंद्रांना संवेदनशील आहे.भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
तालुकानिहाय मतदान केंद्र
पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगडमध्ये 328, पालघरमध्ये 318, बोईसरमध्ये 338, नालासोपारामध्ये 449, तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत.
संवेदनशील मतदान केंद्र
यापैकी डहाणूमधील पतीलपाडा (63), बोईसरमधील बोईसर (34), धोंडीपूजा (85), खैरपाडा (294) तसेच वळीवमधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार 117 होमगार्ड आणि 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक याना तैनात करण्यात आले  आहेत. मतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, 7 हजार 737 मतदान अधिकारी आणि दोन हजार 308 शिपाई यांचा फौजफाटा कार्यरत राहणार आहे.
पालघर येथे 31 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक आणि मायक्रो ऑब्झर्वर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत असतील.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================








No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.