Saturday, 5 December 2020

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक 2020; महाविकास आघाडीची बाजी तर भाजपाला धक्का

सहापैकी चार जागा महाविकास आघाडीला 

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांतून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाला. विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. नागपूर आणि पुणे या आपल्या पारंपरिक पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित लढले. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या तिन्ही पदवीधर मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने विजय मिळवला. यापैकी नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडे होते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरूप आले होते. दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणावर पैशांचे वाटप झाल्याचे आरोप होत आहेत. याशिवाय, या निवडणुकीला जातीय वळणही मिळाले होते. करोना संकटामुळे महानगरपालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परंतु टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पहिलीच निवडणूक विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या माध्यमातून झाली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड सुमारे ४९ हजार मतांनी विजयी झाले. पुणे मतदारसंघातून गेल्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. या वेळी भाजपने आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे टाळून बाहेरून आलेल्या संग्राम देशमुख यांना रिंगणात उतरविले होते. परंतु हा प्रयोग फसला. या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीने आपली सर्व यंत्रणा उतरवली होती, तर भाजपने संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला होता. परंतु नागपूरप्रमाणेच हाही पारंपरिक मतदारसंघ भाजपला गमवावा लागला. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष किरण सरनाईक यांचा विजय झाला. अमरावतीची जागा शिवसेनेला गमवावी लागली. शिवसेनेने लढविलेली एकमेव जागाही गमवावी लागल्याने भाजपने चिमटा काढला आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले असले तरी तो पक्षापेक्षा पटेल यांचा व्यक्तिगत विजय मानला जातो. दरम्यान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एक एकेट्याने लढा असे आव्हान महाविकास आघाडीतील तीन ही पक्षांना केले. त्या विधानावर राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हेच यावरचे उत्तर आहे. वर्षभरात हे सरकार पडेल अशी अफवा परसरवली जात होती. पण हे सरकार टिकले. विजयाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देणं गरजेचं वाटत नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली. काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचा विजयोत्सव लाडू वाटून साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक मतदार संघाचे विजयी जयंत आसगावकर, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री विश्वजीत कदम बोलत होते.

महाविकास आघाडीचे अरूण लाड यांना ४८ हजार ८२४ मतांचे मताधिक्य

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत दहा वीस नव्हे, तर तब्बल ६२ उमेदवार रिंगणात होते़ यातील प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे अरूण लाड व भारतीय जनता पक्षाचे संग्राम देशमुख यांच्यामध्येच होती़ मात्र ही लढतही एकतर्फी झाल्याचे दिसून आले असून, लाड यांना देशमुख यांच्यापेक्षा पहिल्याच पसंती क्रमांकांच्या मतमोजणीत तब्बल ४८ हजार ८२४ मते मिळाली आहेत़पदवीधर मतदार संघातील मतमोजणी प्रक्रिया गुरूवारी सकाळी सुरू झाल्यावर प्रारंभी टपाली मते व सर्व जिल्ह्यातील मते एकत्र करण्यात आली़ यानंतर २ लाख ४७ हजार ५० मतपत्रिका ११२ टेबलवर मोजणीसाठी वितरित करण्यात आल्या़ यावेळी प्रथम वैध व अवैध मतपत्रिका निवडण्यात आल्या़ यामध्ये २ लाख २८ हजार २७२ मते वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास १ लाख १४ हजार १३७ हा विजयी कोटा ठरविण्यात आला. शुक्रवारी (४ डिसेंबर) पहाटेपर्यंत हे काम सुरू होते़ दरम्यान याच प्रक्रियेत लाड यांना मिळालेली मते पाहता त्यांचा विजय हा निश्चित मानला गेला़. लाड यांना पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीतच निश्चित कोट्यापैकी अधिकची ८ हजार ८ मते अधिक मिळाली़ त्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजण्याची आवश्यकताच पडली नाही़. भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ इतकी मिळाली असूनत्या खालोखाल मनसेच्या उमेदवार अ‍ॅड़ रूपाली ठोंबरे पाटील यांना ६ हजार ७१३ मते मिळाली आहेत़ तर संभाजी ब्रिगेडचे डॉ़ श्रीमंत कोकाटे यांना ६ हजार ५७२ मते मिळाली.

सर्वाधिक मते मिळविणारे पहिले 10 उमेदवार-

अरूण गणपती लाड (महाविकास आघाडी) १२२१४५
संग्राम देशमुख (भारतीय जनता पक्ष) ७३३२१
अ‍ॅड़ रूपाली पाटील ठोंबरे (मनसे) ६७१३
डॉ़ श्रीमंत कोकाटे (अपक्ष) ६५७२
प्रा़ शरद पाटील (जनता दल सेक्युलर) ४२५९
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) ३१३९
अरूण (अण्णा) लाड (अपक्ष) २ हजार ५५४
डॉ़ अमोल पवार (आम आदमी पार्टी) ११२१
धनंजय घोंडकर (अपक्ष) ९८९
कृपाल पळूसकर (संभाजी ब्रिगेड) ८४३

पुणे शिक्षक मतदारसंघात महा-आघाडीचे जयंत आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय

पुणे शिक्षक मतदारसंघात महा-आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी 33 फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुस-या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी 25 हजार 985 मते घेतल्याने अखेर तब्बल 36 तासानंतर विजय निश्चित झाला. एकूण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने वैध, अवैध आणि पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यासाठी गुरूवारी रात्रीचे साडे आकरा वाजले. यामध्ये शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मताथमध्ये निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला 25 हजार 114 हा अकडा पार करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुरूवातीपासूनच आघाडीवर आसलेले आसगावकर यांना पहिल्या पसंतीत केवळ 16 हजार 874 मते मिळाली. यामुळे नियमानुसार निवडणूक यंत्रणेला दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यामध्ये देखील 33 व्या फेरीपर्यंत आसगावकर यांना 25 हजारांचा कोटा पूर्ण करता आला नाही. 33 व्या फेरीत आसगावकर यांना 22 हजार 345, सावंत यांना 15 हजार 357 तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची 34 फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत 25 हजार 985 मते घेतली. तर सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय झाला.

सर्वाधिक मते मिळविणारे 10 उमेदवार     पसंतीची मते 
1) जयंत आसगावकर ( विजयी उमेदवार) 16874
2) दत्तात्रय सावंत (विद्यमान शिक्षक आमदार) 11024
3) जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत) 5795
4) गोरखनाथ थोरात 4515
5) प्रकाश पाटील 2365
6) रेखा पाटील 1689
7) तानाजी नाईक 696
8) नंदकिशोर गायकवाड 643
9) नितीन पाटील 637
10) सुभाष जाधव 610

पुणे शिक्षकची २ हजार ७८४ मते बाद तर पदवीधरची १९ हजार ४२८ मते बाद 

पुण्याच्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघात तब्बल २२ हजार २१२ मते बाद ठरली आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदान करताना सुमारे तीन ते चार टक्के मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने बाद ठरल्या. माध्यमिक शिक्षक, पदवीधर मतदार असताना मतदान करताना पसंतीक्रम लिहिण्याऐवजी उमेदवारापुढे त्याचा अनुक्रमांक लिहिणे, आयोगाने दिलेला पेन वापरण्याऐवजी स्वतःच्या पेनाचा वापर करणे, पसंती क्रमांकाऐवजी ‘बरोबर’ अशी खूण करणे, मतपत्रिकेतील मोकळ्या रकान्यात पसंती क्रमांकाऐवजी उमेदवाराच्या नावावरच क्रमांक लिहिणे, ज्या उमेवाराला पहिल्या पसंतीचे मतदान करायचे त्या उमेदवारांच्या समोर पसंती क्रमांक एक लिहिण्याऐवजी त्याच उमेदवाराचा क्रमांक लिहीणे, एकाच वेळी अनेक उमेदवारांना एकाच क्रमांकाची पसंती देणे अशा ‘चुका’ शिक्षित मतदारांनी केल्या. पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण ५२ हजार २८७ शिक्षकांनी मतदान केले. त्यापैकी २ हजार ७८४ मते अवैध ठरली. एकूण ५० हजार २२६ वैध मते ठरली. यामुळे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी २५ हजार ११४ हा मतांचा कोटा निश्चित झाला. पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख ४७ हजार ६८७ मतदान झाले. त्यापैकी तब्बल १९ हजार ४२८ मते बाद ठरली. वैध मतांची संख्या २ लाख २८ हजार २५९ झाली. त्यामुळे पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी १ लाख ११ हजार ३७ हा मतांचा कोटा निश्चित झाला.

नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्यायाने भाजपाचे प्राबल्य असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ६१७०१ मते मिळाली आहेत. तर विरोधी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना ४२९९१ मते मिळाली आहेत. संदीप जोशी यांचा १८७१० मतांनी पराभव झाला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुस-या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. नागपूर पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून जनसंघ आणि नंतर भाजपने हा मतदारसंघ पारंपरिकदृष्टय़ा आपल्याकडे कायम राखला होता. परंतु काँग्रेसने यंदा तो प्रथमच जिंकला. नागपूर या गडातच भाजपचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. नागपूरमध्ये माजी आमदार अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवार मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. पण जोशींना भाजपाचा बालेकिल्ला राखता आला नाही. नागपूरमधील भाजपाच्या पराभवाची कारणमीमांसा सुरु आहे. सोशल मीडियावर नागपूरकर तर्कवितर्क लढवत आहेत. यामध्ये बरेच जण संदीप जोशी यांना पराभवाचे कारण मानत आहे. 

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची हॅट्ट्रीक

भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणारी मराठवाड पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी हॅट्ट्रीक साधली. त्यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयासाठी 109409 मताचा कोटा ठरवण्यात आला होता. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी झाले. औरंगाबाद पदवीधरसाठी दुपारी तीन वाजता मजमोजणीला सुरुवात झाली. सतीश चव्हाण पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना 27850 तर शिरीष बोराळकर यांना 11558 मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीअखेर 28930 मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 42 हजार मतांची आघाडी मिळाली होती. तिसरी फेरीत सतीश चव्हाण यांना 26739 तर शिरीष बोराळकर 14471 मते मिळाली. या फेरीत चव्हाण यांना 12268 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण 41198 मतांनी आघाडीवर होते. चव्हाण यांना एकूण 81216 मते तर शिरीष बोराळकर 40018 मते पडली. तिसऱ्या फेरीत 5374 मते अवैध ठरली. थ्या फेरीअखेर सतीश चव्हाण 53611 मतांनी आघाडीवर होते. त्यांना 107916 मते तर शिरीष बोराळकर यांना 54305 मते पडली. या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. या फेरीअखेर भाजपच्या सर्व प्रतिनिधींनी मतदान केंद्र सोडले. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. यासोबतच सतीश चव्हाण यांचा 57895 मतांनी विजय झाल्याचे निश्चित झाले. या निवडणुकीत सचिन ढवळे यांना 11702, नागोराव पांचाळ यांना 8993, रमेश पोकळे यांना 6712, सिद्धेश्वर मुंडे यांना 8053 मते मिळाली. या मतमोजणीत एकूण 241908 मतांची मोजणी करण्यात आली. तर 23092 मते अवैध ठरली.

अमरावतीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव

अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरशीच्या लढाईत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत. सरनाईक यांनी विद्यमान आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांना पराभूत केले असून सरनाईक यांना १५ हजार ६०६ मते तर देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली आहेत. विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. अमरावतीचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात १५ हजार ६०६ मतांसह सरनाईक यांनी विजयाला गवसणी घातली. प्रा. देशपांडे यांना ९ हजार १९१ मतांपर्यंतच मजल मारता आली. या मतदारसंघात एकूण २९ हजार ८२९ मते वैध ठरली होती. त्यामुळे विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. तो मॅरेथॉन मतमोजणीनंतर सरनाईक यांनी पूर्ण केला .विधान परिषदेची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधील निवडणुकीचे निकाल धक्कादायक असले तरीही अमरावतीने शिवसेना आणि भाजपावर मोठी नामुष्कीची वेळ आली त्यामध्ये उमेदवार मतमोजणीतच बाद ठरला. देशपांडे यांना राष्ट्रवादीचे बंडखोर चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांच्यामुळे फटका बसल्याचे दिसत आहे. भोयर २५व्या फेरीपर्यंत टक्कर देत होते. ते बाद झाल्यानंतर सरनाईक व देशपांडे यांच्यात लढत होती व त्यात सरनाईक यांनी कोटा पूर्ण करत विजय साकारला. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.