Friday, 13 May 2022

ओबीसी संघटनांच्या आक्षेपांनंतर समर्पित आयोगाकडून दिखावा! राज्यव्यापी 4 दिवसांचा 'मेरॉथॉन' दौरा

अवघ्या 12 तासांच्या वेळेत राज्यातील नागरिकांची मते जाणून घेणार!
नागरिकांना निवेदने, मते व्यक्त करण्यासाठी भेटीपूर्वी नोंदणीची अजब अट

पुणे- राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी, भटके-विमुक्त जातीचे नागरिक सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या मागासलेला नाही अशा नकारार्थी मानसिकतेतून कार्य करणारा समर्पित आयोग ओबीसी संघटनांच्या आक्षेपांनंतर खडबडून जागे झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या नागरिकांना राजकीय आरक्षण मिळून देण्यासाठी नियुक्त केलेला समर्पित आयोग गेली 2 महीने सुस्त कारभार करीत होता. समर्पित आयोगाच्या नकारार्थी कार्यपद्धतीवर ओबीसीं समाजात संतापाची लाट उसळलेली आहे. ओबीसी संघटनांच्या आक्षेपांनंतर राज्यातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोग धावता दौरा करणार आहे. कारण समर्पित आयोगाच्या कामाची पद्धतच अतिशय वेगवान आहे. 11 कोटी जनतेची मते केवळ 12 तासांत जाणून घेण्याचा विक्रम समर्पित आयोग करणार आहे. 4 दिवसांमध्ये 6 विभागांमध्ये प्रत्येकी 2 तासांच्या प्रमाणे मेरॉथॉन बैठका घेणार आहेत. फक्त महाराष्ट्रातील नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या नागरिकांनी या आयोगाला निवेदन अथवा मते मांडावयाची झाल्यास त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात भेटीच्या दिनांकापूर्वी आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे. कारण ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या नागरिक खूप प्रगल्भ आणि आधुनिक विचाराचे साधन सामुग्रीने दळणवळण, माहिती तंत्रज्ञानाने अवगत असल्याचे ठाम मत या समर्पित आयोगाचे असल्याने अशाप्रकारे धावता दौरा करून मते जाणून घेणार आहे तसेच नागरिकांना या दौऱ्याची माहिती आपोआपच पोहोचणार आहे अशा देखील भ्रमात असल्याची उपरोधात्मक टिपणी ओबीसी वेल्फेअर फौंडेशन संस्थेने केलेली आहे.

समर्पित आयोगाकडून भेटीचे वेळापत्रक

विभाग

दिनांक

भेटीची वेळ

कालावधी

पुणे

21 मे 2022

सकाळी 9.30 ते 11.30

2 तास

औरंगाबाद

22 मे 2022

सकाळी 9.30 ते 11.30

4 तास

नाशिक

सायं. 5.30 ते 7.30

कोकण भवन

25 मे 2022

दुपारी 2.30 ते 4.30

2 तास

अमरावती

28 मे 2022

सकाळी 9.30 ते 11.30

4 तास

नागपूर

सायं. 4.30 ते 6.30

भेटीचे ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय-   भेटीसाठी दिनांकपूर्व नोंदणी आवश्यक

     ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समर्पित आयोगाने महाराष्ट्रातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी राज्यातील विभाग निहाय 6 विभागीय कार्यालयात प्रत्येकी 2 तासांचा वेळ दिलेला असून त्या दिनांकास तमाम ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या बांधवानी आपापल्या संस्था, संघटना, वैयक्तीकरीत्या राजकीय आरक्षण मिळण्याकामी निवेदने, म्हणणे मांडावे असे आवाहन ओबीसी वेल्फेअर फौंडेशन संस्थेने केलेले आहे.
       राज्यातील मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भरतीच्या दिनांकापुर्वी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आलेले आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटीयांना राजकीय आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने दि. 19 मार्च 2022 रोजी अधिसूचना काढून समर्पित आयोग गठीत केलेला आहे. या आयोगाने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर करून आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेले आहे.
        समर्पित आयोगाची स्थापना होऊन 2 महीने होत आहेत. आयोगाला पहिल्या बैठकीपासून पुढील 3 महीने असा कालावधी शासनाने निर्धारित केलेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा फेटाळलेल्या अहवालातील शैक्षणिक विभागातील दुय्यम सांख्यिकी माहितीचा (डेटा) नव्याने संकलन करून पुन्हा त्याचाच वापर करण्याचा समर्पित आयोगाकडून प्रताप सुरु असून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची समर्पित आयोगाकडून आहुती देण्याचा प्रयत्न होत असल्याने समर्पित आयोगाच्या नकारार्थी कार्यपद्धतीवर ओबीसीं समाजात प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. ओबीसींच्या लोकसंख्येचे प्रमाण दुय्यम माहितीच्या आधारे चुकीचे प्रमाण निश्चिती करू नये अशी माफक मागणी ओबीसींच्या संघटनांची आहे.
          राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत, औरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेत, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेत, अमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.
----------------------------
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.